Wednesday, 21 November 2018


आजच्या दिवशी आम्हाला.. अजमेर शरीफ दर्गा आणि पुष्कर येथील ब्रम्ह मंदिराला भेट देण्यासाठी जायचं होतं. सकाळी नऊ वाजता आमच्या प्रवासाला सुरवात झाली. जयपूर ते अजमेर हे एकूण एकशे तीस किलोमीटरचं अंतर. आणि अजमेर ते पुष्कर हे सोळा किलोमीटरचं अंतर होतं. अगदी सुरवातीला आम्ही, अजमेर शरीफ दर्गा येथे निघालो.
आमची पन्नास सीटर बस असल्याने, ती बस काही अजमेर दर्ग्याच्या आतील बाजूस येत नव्हती. म्हणून त्या बसला हायवेवर पार्क करून आम्हाला रिक्षा करुन दर्ग्या पर्यंत यावं लागलं. तिथे रिक्षा वाल्यांची एक वेगळीच पद्धत मला पाहायला मिळाली. एकदा भाडं ठरवलं, कि जाता येता त्याच रिक्षाने प्रवास करावा लागतो. नाहीतर ते विनाकारण आपल्याशी हुज्जत घालतात.
रिक्षात बसून, आम्ही दर्ग्याच्या दिशेने निघालो. आमची रिक्षा एका ठिकाणी थांबली..
आणि गल्ली बोळातून मार्गक्रम करत आम्ही दर्ग्याच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर आलो. दुरूनच प्रशस्थ असं त्या दर्ग्याच भव्य प्रवेशद्वार आम्हाला दिसत होतं.
दर्गारोड.. रस्त्याच्या दुतर्फा, हार फुलं आणि लोबान ( धूप ) विक्रीची दुकानं थाटली गेली होती. त्यातच काही जर्मलच्या विशिष्ट प्रकारच्या भांड्याची दुकानं सुद्धा दिसून येत होती. सायकलवर पाणी पुरीची विक्री करणारे छोटे व्यापारी दिसत होते. प्रत्येक दुकानात लोबान ( धूप ) प्रज्वलित केला असल्याने, सर्व परिसर सुगंधित झाला होता. दर्ग्याच्या परिसरात, फारच मोठ्या प्रमाणात अपंग भिक्षेकरी दिसून येत होते. त्यांची विकलांगता पाहून, काळजात अगदी चर्रर्र होत होतं. हा सगळा लवाजमा पाठीमागे सारत आम्ही पुढे निघालो होतो.
त्या दर्गा प्रवेशद्वारा समोर.. पादत्राणे काढायची फार मोठी व्यवस्था केली होती. एका चप्पल साठी दहा रुपये भाडं आकारलं जात होतं. आणि त्या चपला सुद्धा एका विशीष्ट प्रकारे गठ्ठा करून बांधून ठेवल्या जात होत्या. ते कसब पाहून मी खरोखर दंग झालो होतो.
काही वेळातच.. हार फुलं घेऊन, डोक्याला रुमाल गुंडाळून आम्ही दर्ग्यात प्रवेशित झालो. आणि एक मुजावर आमच्याकडे आला. आणि आम्हाला दर्शनासाठी घेऊन गेला. इथे एक गोष्ट बाकी लक्षात आली, कि एक मुजावर आपल्या जवळ आल्यावर दुसरा मुजावर आपल्याला दर्शनाला घेऊन जाण्याची जोर जबरदस्ती करत नाही. बरेच भाविक लोकं, आपल्या डोक्यावर फुलांची एक छोटीशी परडी घेऊन दर्शनाला जाताना दिसत होते. आम्ही आतमध्ये गेल्यावर, एक व्यक्ती पखालीने पाणी पुरवण्याचं काम करत होता. इथे फार वर्षांनी मला पखाल पाहायला मिळाली. ( पखाल म्हणजे, बकऱ्याच्या चामडी पासून बनवलेली, पाणी वाहण्याची चामडी पिशवी असते.)
गर्दीतून वाट काढत तो मुजावर आम्हाला दर्ग्यात घेऊन निघाला होता. भल्यामोठ्या गर्दीतून आम्ही मुख्य मजारीपाशी पोहोचलो. तिथे मुख्य मुजावाराच्या गळ्यात, भल्या मोठ्या लाल पिवळ्या नाड्यात गुंफलेल्या मोठ्या चावीचा एक जुडगा दिसून येत होता.
तिथे भक्तिभावाने फुलांची चादर अर्पण केली. भक्तिभावाने नमन करत आम्ही तेथून बाहेर पडलो. आतील बाजूस, हि सोनेरी रंगाची दर्गा फारच कलाकुसर केलेली दिसून येते. इथे असणारा जन्नती दरवाजा चांदीचा बनवला गेला आहे. सगळीकडे आरशाचे आणि हिऱ्याचे मनी लाऊन मस्त नकाशी तयार केलेली दिसून येते. आरशी काचामुळे, सगळीकडे झगमगाट पसरलेला असतो. सगळी दर्गा संगमरवरी असल्याने, त्याठिकाणी एक विशिष्ट प्रकारचा गारवा जाणवत होता.
बाहेरील बाजूस.. काही कव्वाल ख्वाजाच्या कव्वालीचे गायन करत होते. तिथे काहीवेळ व्यतीत केला. दर्ग्याच्या मागील बाजूस काही महिला अक्षरशः रडून रडून मन्नत मागत असताना दिसत होत्या. मी असं ऐकून आहे, कि हे देवस्थान नवसाला पावणारं आहे. आणि इथे मागितलेली मुराद नक्कीच पूर्ण होत असते. विशेष म्हणजे, नवस करायला आलेल्या महिलांमध्ये जास्तीकरून राजस्थानी हिंदू महिलांचा फार मोठा भरणा होता. मन्नत मागताना, लाल आणि पिवळ्या रंगाचा नाडा तिथे असणाऱ्या लोखंडी आणि संगमरवरी तावदानांना बांधला जात होता.
आणि तेथून बाहेर पडलो. बाहेर पडताना, तिथे मला एक भलीमोठी कढई दिसली, ज्यामध्ये.. दान केलेल्या वस्तू टाकल्या होत्या. त्यात.. तांदूळ, सुखामेवा, सोनं, चांदी, ते अगदी देशी-विदेशी चलनाची बंडलं सुद्धा दिसून आली. दर्शन आटोपलं, आता दुपारी आम्हाला.. पुष्कर येथे जायचं होतं. म्हणून जास्तीचा वेळ न दवडता. आम्ही तेथून ताबडतोब बाहेर पडलो..
क्रमशः

Tuesday, 20 November 2018



आमचा राजस्थानचा दौरा, अगदीच निष्फळ ठरला...
संयोजकांच ढिसाळ नियोजन त्याला कारणीभूत ठरलं. दुपारी तीन वाजता, आमची ट्रेन जयपूरला पोहोचली. तिथे पोहोचल्या बरोबर, टूर्स वाल्याने आम्हा सर्वांचं रसाळ संत्री देऊन स्वागत केलं. त्या नारंगी चमकदार संत्री पाहून मला हेच समजेना. कि मी नेमका जयपूर मध्ये आहे, कि नागपूरमध्ये..? पण नंतर समजलं, कि जयपूर भागात सुद्धा संत्र्याचं पिक फार मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. तेथून विश्रामगृहावर पोहोचायला आम्हाला साधारण अर्धा तास लागला.
सर्वांनी अंघोळी उरकून लवकरात लवकर विश्रामगृहाच्या बाहेर येण्याचं फर्मान सोडलं गेलं. तळघरात जेवणाची व्यवस्था होती. पण.. तेलकट पुरी भाजी पाहून, मी जेवण्याचा मोह टाळला. आणि थेट बस मध्ये येऊन बसलो. ..
बस मार्गस्थ झाली. सुरवातीला गाडीतूनच गाईडने बोलघेवडेपणा करायला सुरवात केली. गाडीची घरघर आणि त्याचा बायकी कोमल आवाज. त्यामुळे, तो काय माहिती सांगतोय तेच आम्हाला समजत नव्हत. निट कान देऊन ऐकल्यावर, आपण निघालो आहोत त्याच्या दुतर्फा पिंकसिटी आहे असं मला समजलं. तोवर, ती पिंक सिटी संपत आली होती.
थोड्यावेळाने.. हा हवामहेल आहे. असं सांगण्यात आलं. बसमध्ये मी उजव्या बाजूला बसलो असल्यामुळे, नेमका डाव्या बाजूला आलेला हवा महेल नजरेआड हवेतच विरून गेला.
थोडं पुढे गेल्यावर, उजव्या हाताला जलमहाल होता. तो हि चालत्या गाडीतून भुर्रकन नजरेआड झाला. काही वेळाने, आमच्या बसने छोटासा घाट चढायला सुरवात केली. रसत्याच्या आजूबाजूला लांबवर पसरलेली किल्ल्याची तटबंदी दिसत होती.
आमेर किल्ला, आता नजरेच्या टप्प्यात आला होतो. तिथे पोहोचेपर्यंत संध्याकाळचे सव्वापाच झाले होते. पुन्हा एकदा आमचं दुर्दैव, सरकारी आदेशानुसार संध्याकाळी साडेपाचला किल्ला बंद करतात. त्यामुळे, हे पाहण्याचं ठिकाण असून सुद्धा. त्यालाही, दुरूनच पाहून आम्हाला समाधान मानावं लागलं. अजून बऱ्यापैकी उजडे होता, म्हणून इकड तिकडचे पाच पन्नास फोटो काढून झाले. तोवर परतीचा प्रवास सुरु झाला.
आमची बस, जलमहालापाशी येवून थांबली. तोपर्यंत संध्याकाळचे सहा सव्वासहा वाजले होते. प्रकाश अंधुक झाला होता. फोटोही काही खास येत नव्हते. त्यामुळे त्या भागात थोडा फेरफटका मारला. त्या जल महालात कोणाला सोडत नव्हते. त्यामुळे दुरूनच त्याचं वैभव पाहिलं आणि बसमध्ये विराजमान झालो. पुन्हा एकदा आमची बस मार्गस्थ झाली. आता फक्त, एक ठिकाण पहायचं राहिलं होतं. आणि त्यानंतर.. आम्हाला मुक्काम स्थळी पोहोचायचं होतं.
आम्ही त्या " विशिष्ट " ठिकाणी पोहोचायच्या अगोदर, त्या गाईडचा आवाज खूपच खुलला होता. आता त्याचं सगळं काही बोलनं आम्हाला स्पष्ट ऐकू येत होतं.
" देखिये.. हम अभी जहा जानेवाले है, वहापर रजाई, गालीचा और अन्य कपडोपर हाथसे डिझाईन कैसे निकाली जाती है. वोह आपको देखनेको मिलेगा.. यहापर बस आधे घंटेके लिये रुखेगी. "
थोड्याच वेळात, ते ठिकाण आलं. आम्ही सगळ्यांनी त्यांची कलाकारी पाहिली.. आणि वरच्या बाजूला असणाऱ्या दुकानात आम्ही गेलो. तिथे विविध प्रकारेचे.. गालिचे, शाल ईतर बरच काही होतं. खरेदी सुरु झाली.
आणि, बघता-बघता.. त्या दुकानात घोडेबाजाराला सुरवात झाली.
आमच्या ग्रुपमध्ये, बरेच मालदार आणि गुंठामंत्री लोकं होते. मग काय सांगायचं. कोणी एकाने एखादी रजई वगैरे घेतली. कि तो दुकानदार त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्या रजाईची किंमत आणि त्या व्यक्तीचं नाव जाहीर करायचा. हे पाहून, लगेच दुसऱ्या एका बाईला इगो दुखावल्या सारखं व्हायचं. कि ती लगेच, त्याच्या दुप्पट रकमेची रजई खरेदी करायची. अशा चढाओढीत त्या दुकानदाराची मात्र भरपूर विक्री झाली. पहिल्याच दिवशी, ओझ्याचा ताण नको. म्हणून आम्ही मात्र, त्या खरेदी पासून चार हात लांबच राहिलो..!

क्रमशः

Thursday, 8 November 2018


पहाटे पाच वाजता, बायकोने मला आवाज दिला..
आहो.. सहा वाजलेत, उठा..!
( तिची हि नेहेमीचीच सवय, अशाने आपल्याला एक तास जास्ती झोप मिळाल्याचा 'फसवा' आनंद मिळतो. )
नेहेमीप्रमाणे... अंगाला आळोखे, पिळोखे देत उठलो.
बेडवरूनच धरणीमातेला ( पार्टेक्स फरशीला ) स्पर्श करून नमस्कार केला. आणि, धरणीमातेची क्षमा मागून जमिनीवर पाय ठेवला. प्राथर्विधी उरकले, मुखमार्जन करून घेतलं. 
आरशामध्ये पाहिलं, हनुवटीवर दाढीचे वाढलेले खुंट डोकावत होते. हातासरशी, त्यांचा सुद्धा सफाया करून टाकला. गालावर उलटा हात फिरवून, दाढीचे खुंट हाताला लागत तर नाहीत ना..? त्याची, पुन्हा एकदा खात्री करून घेतली. तुळतुळीत मुखड्याला, आफ्टर शेव्ह लोशन चोपडून पुन्हा एकवार न्याहाळलं. आणि, हसत मुखाने पाटावर येऊन बसलो.
बाहेर.. सौ ने अभ्यंगस्नानाची तयारी करून ठेवली होती. तिने, गुलाबजल आणि तेलमिश्रीत सुगंधी उटण्याने माझं सगळं अंग हळुवार चोळून दिलं.
स्नानगृहात, गेसगीजर च्या उकळत्या पाण्यामध्ये थोडं थंड पाण्याचं मिश्रण घेतलं.
घंगाळा मध्ये हात घालून, पाण्याची तपासणी केली. त्यामुळे, मेंदूला पाण्याचा उष्मांक समजला. मेंदूने होकार दिल्यानंतर, मुखाने हर हर गंगे म्हणत... तांब्यातील पाणी मस्तकावरून पायापर्यंत ओघळले. अंगाला आलेल्या तेलकट पणामुळे, शरीरावर पाणी असं दिसतच नव्हतं.
अधूनमधून एखाद दुसरा थेंब डोकावत, ओघळण्याच्या तयारीत असलेला दिसत होता.
सुगंधित चंदन उटी असलेल्या मोती साबणाची, हातामध्ये न मावणारी मोठी गोलसर वडी ( वडा ) घेतली. सर्वांगाला, 'मोती' साबण चोळवटून घेतला. बाहेरून, पुन्हा एकदा सौ चा आवाज..
अहो, जरा थांबा... तुमच्या पाठीला साबण लावून देते.
ह्या पाठीचं सुद्धा, वर्षातून एकवेळ नशीब उघडतंच बघा. नाहीतर, एरवी सगळ्या पाठभर आपला हात कुठे पोहोचतो, नाही का...!
सौ ने.. पाठीला साबण लाऊन, नायलॉनच्या चोत्याने पाट खसखशीत घासून दिली. पाठीवर तांब्याभर पाणी टाकलं. नंतर मी, हळुवारपणे चोत्याने माझी कांती खुलवण्याचा प्रयत्न केला.
पुन्हा एकदा, सर्वांगावरून गरम पाण्याचा अभिषेक करून घेतला. वाफाळलेल्या अंगावर, थबकलेले पाण्याचे 'मोती' बिंदू पंच्याने टिपून घेतले. ओलेत्याने, परमेश्वराचे दर्शन घेतले.
दिवाळ सनातली, माझी " पहिली अंघोळ " अशा रीतीने पार पडली.
माझ्या सर्व... मित्र आणि मैत्रिणींना. भाऊ, बहिणींना दीपावलीच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा.
हि दिवाळी, सर्वांना भरभराटीची, तेजोमय आणि आनंदमयी जावो.
हीच, ईश्वरचरणी प्रार्थना..!!

परवा सकाळी, आमच्या ऑफिसमध्ये एक उच्चशिक्षित तरुण मुलगा, सॉक्स विकण्यासाठी आला होता. त्याच्या हातामध्ये सॉक्सचे दोनचार मोठाले गठ्ठे होते. आणि पाठीवर, सॉक्स भरलेली एक सॅग बॅग होती.
त्यात.. लहान, मोठे, बारीक, आखूड.. अशा विविध साईजचे बरेच सॉक्स होते.
आमच्या ऑफिसमध्ये शूज घालणारी बरीच मंडळी असल्याने, त्या मित्राचे भरपूर सॉक्स तिथे नेहेमी विक्री होत असतात.
नेहेमीप्रमाणे.. आज सुद्धा तो आमच्या ऑफिसमध्ये सॉक्स विक्री करण्यासाठी आला.
तो मुलगा, साठ रुपयाला तीन जोडी सॉक्स विकत होता. म्हणजे, वीस रुपयाला एक जोडी, तरी सुद्धा काही लोकं..
पन्नासला तीन जोड्या दे कि..!
असं म्हणून, त्याच्याशी हुज्जत घालत भाव करत होते. तो मुलगा सगळ्यांना म्हणत होता.
साहाब..एक जोडीके पीछे, मुश्कीलसे दो, तीन रुपये छुटते है..!
पण लोकं कसली ऐकतात हो,
तर.. तिथे असणाऱ्या काही लोकांनी, पन्नास रुपयाला तीन-तीन जोड्या सॉक्स विकत घेतले.
शेवटी.. माझ्या सोबत असणाऱ्या एका मित्राने सुद्धा, तीन जोड्या सॉक्स घेतले. आणि, त्याच्या हातावर पन्नास रुपये टेकवले. तसा तो मुलगा माझ्या मित्राला म्हणाला..
साहाब.. और दस रुपये दिजीये..!
मित्र म्हणाला.. तू सगळ्यांना पन्नास रुपयाला सॉक्स दिले. आणि मला साठला विकतोस होय.? हा सगळा प्रकार मी अगदी जवळून पहात होतो, मी तडक माझ्या मित्राला म्हणालो. त्याला अजून दहा रुपये दे.!
दहा रुपये, हि खूप छोटी रक्कम होती, दहा रुपयाला आज बाजारात अशी किती किंमत आहे.?
साधा वडापाव सुद्धा, पंधरा रुपयाला झाला आहे. मग इतर गोष्टी फारच दूर राहिल्या.
तर.. माझ्या मित्राने सुद्धा माझा मान राखत, पाकिटात हात घालून, लगेच त्याला एक्स्ट्रा दहा रुपये देऊ केले. तेंव्हा तो मुलगा म्हणाला..
साहेब.. तुम्ही हे दहा रुपये मला अगदी मनापासून देत असाल तर द्या, नाहीतर राहूद्यात..!
त्यावर मी त्याला म्हणालो.. अरे मित्रा, द्यायचे नसते तर हा प्रकार आम्ही केला नसता.
हा वार्तालाप घडल्यानंतर, तो मुलगा आम्हाला म्हणाला. तुमच्या सारखी फार कमी लोकं असतात. कि.. आम्ही मागून घेतल्यावर लगेच पैसे देऊ करतात.
पण, काही लोकं किती नालायक असतात. हे मी तुम्हाला सांगतो. आणि त्याने, त्याच्या सोबत घडलेली एक सत्यघटना आम्हाला सांगितली.
म्हणाला.. एकदा असेच सॉक्स विकत मी निघालो होतो.
सॉक्स विक्री करण्यासाठी, आम्हाला बरीच पायपीट करावी लागते. दिवसभरात साधारण, पंधरा ते वीस किलोमीटर अंतर आमचं चालणं होतं.
रस्त्यावर चालताना, सगळी लोकं एकमेकांच्या तोंडाकडे पाहात असतात. परंतु.. आम्ही मात्र, फक्त लोकांच्या पायाकडे पाहात असतो. कोणाच्या पायात शूज दिसला, कि लगेच त्याला सॉक्स विकत घेण्याची गळ घालतो. असा आमचा व्यवसाय आहे.
तर, त्यादिवशी.. बाईकवर असणाऱ्या एका व्यक्तीने मला थांबवलं. भावताव करून, माझ्याकडून एक डझन लेडीज सॉक्स विकत घेतले. आणि, एक डझन जेन्ट्स सॉक्स सुद्धा घेतले. मोठं गिर्हाईक झालं असल्याने, मी खूप खुश होतो.
त्या व्यक्तीने.. ते सगळे सॉक्स, त्याच्या बाईकच्या डिकीत ठेवले. त्याची बाईक चालूच होती. आणि.. डोळ्याची पापणी लवती न लवती तोच.. अगदी काही सेकंदात, बाईकला गियर टाकून तो मनुष्य सुसाट वेगाने माझे पैसे न देताच पळून गेला.
चोवीस जोड्या सॉक्स म्हणजे, जवळपास पाचशे रुपयाचा माल होता. आता काय करावं.?
मी तर.. चालतच निघालो होतो, त्याचा पाठलाग तरी कसा करावा.? पळत जाणं सुद्धा शक्य नव्हतं. मी या विचारात असताना. दोनचार बाईकवाल्या व्यक्तींना, मी विनंती वजा हात सुद्धा केला. पण कोणीच थांबला नाही. शेवटी.. कर्मधर्म योगाने, समोरून एक पोलीसवाला मला येताना दिसला. मी त्यांना हात केला. तसे ते थांबले.
घडलेला सगळा प्रकार मी त्यांना सांगितला, म्हणालो.. तो मनुष्य कोरेगाव पार्क रोडने, कल्याणीनगरच्या दिशेने गेला आहे. त्या पोलिसाने, ताबडतोब त्याला आपल्या बाईकवर बसवलं, आणि त्या दिशेने ते दोघे सुसाट निघाले.
पुढे.. कल्याणीनगर ( हॉटेल वेस्टीन ) चौकात, बाराही महिने ट्राफिक जाम असतं. तसं त्यावेळी सुद्धा होतं. आणि त्या गर्दीमध्ये, बाईक वरून खाली उतरून तो मनुष्य याने लगेच ताडला. पोलिसाने सुद्धा त्याची बाईक बाजूला पार्क केली. त्या व्यक्तीपाशी गेला, आणि.. पहिली, त्याच्या गाडीची चावी काढून घेतली. आणि त्याला बाईक बाजूला घ्यायला लावली. बाईक बाजूला घेतल्यावर, तो पोलीस.. त्या व्यक्तीला म्हणाला..
तुला, एक हजार रुपयाची दंडाची पावती करावी लागणार आहे..!
तो मनुष्य म्हणाला, मी का म्हणून दंडाची पावती करू.?
पण, तो पोलीस सुद्धा खूप चलाख होता. तो त्याला अगदी रागातच म्हणाला,
तू.. बंड गार्डन चौकात सिग्नल तोडून आला आहेस. इतक्या लांब तुझा पाठ्लाग करत यायला मी काही मूर्ख आहे का.?
त्या हुशार पोलिसाने हवेत सोडलेला बाण अगदी निशाण्यावर लागला होता. बहुतेक तो हरामखोर व्यक्ती सिग्नल तोडूनच पुढे आला असावा. आणि, हा कांड करून पुढे गेला असावा.
मग काय.. झक मारत त्या व्यक्तीला एक हजार रुपये दंडाची पावती करावी लागली.
शिवाय.. या मुलाचा मुद्देमाल सुद्धा त्याला परत द्यावा लागला. घडलेला हा सगळा प्रकार, आजूबाजूला असणारी लोकं सुद्धा पाहात होते. म्हणून तो व्यक्ती त्या सॉक्स विक्रेत्या मुलाला सॉक्स न देता पैसे देऊ लागला. तर तो मुलगा म्हणाला..
मला तुम्हाला माल विकायचा नाहीये. पैसे नको, माझे सॉक्स मला परत द्या..!
तो पोलीसवाला चांगला माणूस होता. त्याने त्या मुलाला पुन्हा बंड गार्डन चौकात आणून सोडला. आणि आपल्या कामाला निघून गेला.
हे सगळं ऐकल्यावर.. मी त्या मुलाला म्हणालो, सॉक्स घेतल्यावर त्या व्यक्तीच्या कानाखाली तू आवाज का नाही काढलास.? तर म्हणाला..
साहाब.. पेट भरणे के लिये यहां आये है, झगडा करणे के लिये नही..!
त्या मुलाच्या या उत्तरावर, मी अगदी निरुत्तर झालो. इलाहाबादी असून सुद्धा, तो मुलगा फारच सौम्य वाटत होता.
तर.. माझ्या सर्व मित्रांना या दिवाळीत मी हा एकच संदेश देणार आहे.
उंची मॉलमध्ये जाऊन, आपण फारच उंची आणि महागड्या वस्तू खरेदी करत असतो. खरेदी करताना, त्या वस्तू ओरीजनल आहेत कि नाही.? ते सुद्धा आपल्याला माहिती नसतं, फक्त छापील ब्रँड पाहून, भरपूर रोकडा मोजून आपण त्या वस्तू खरेदी करत असतो.
तर आजपासून.. असे छोटेमोठे विक्रेते, काही वस्तू विक्री करायला तुमच्याकडे आले.
तर.. त्यांच्याकडे असणाऱ्या वस्तू तुम्ही नक्की विकत घेत चला.
मोठमोठे #शॉपिंग_मॉल वाले, भरपूर #माल कमवून बसले आहेत.
जरा.. गोर गरिबांची #दिवाळी सुद्धा साजरी होऊद्यात..!

मनापासून अभ्यास करावा, असं मला कधीच वाटलं नाही. पण, मन मारून मला अभ्यास करावा लागायचा. काय करणार..?
किमान त्यामुळे तरी, माझ्या घरच्या लोकांचं समाधान व्हायचं.
आपलं पोरगं काहीतरी शिकतंय. आणि चांगलं शिकून, मी नक्कीच फार मोठा अधिकारी वगैरे होईल हा त्यापाठीमागचा त्यांचा आशावाद.. पण कसलं काय, मला तर वाटतंय..
पाचवी पूजताना, सटवाईने आपल्या कपाळावर जे लिहून ठेवलेलं असतं. तेच, आणि तसच घडत असतं. आपण मात्र, विनाकारणच त्रास घेत असतो. असो, हा गमतीचा विषय झाला.
तर, बारावीला असताना.. माझ्या सोबत माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा असणारा. एक मित्र, बाहेरून बारावीची परीक्षा देत होता. त्यावेळी, तो एका टेक्नीकल शाळेमध्ये वेल्डर ह्या विषयाचा शिक्षक होता. पण, उरलेलं शिक्षण पूर्ण करण्याची त्याला खूप आवड होती. आणि, तो अभ्यासात सुद्धा खूप हुशार होता. त्यामुळे, त्याला ते शक्य सुद्धा होतं. वयाने मोठा, आणि अभ्यासात हुशार असल्यामुळे. आमच्या घरचे, मला मुद्दाम त्याच्यासोबत अभ्यासाला धाडायचे.
अभ्यासाबाबतीत, माझा एकच शिरस्ता असायचा..
शरीराला जास्ती त्रास करून घ्यायचा नाही. झेपेल तेवढाच अभ्यास करायचा. आणि, रात्रीचा दिवस करायचा नाही.
हि पथ्य, काठेखोरपने पाळल्यामुळे.  बारावीत मी जेमतेम मार्काने कसाबसा पास झालो..
त्यावेळी, या अभ्यासिकेत एक भलताच भीतीदायक प्रकार घडला होता...
उद्या... इंग्रजी विषयाचा पेपर होता.
नेहेमीप्रमाणे, रात्री नऊ वाजता आम्ही दोघे त्याच्या रूम मध्ये अभ्यासाला बसलो. मी खाटेवर बसून अभ्यास करायचो. तर हा मित्र, रूम मध्ये फेऱ्या मारत वाचन करायचा. त्याची अभ्यास करण्याची पद्धत खूप निराळी होती. तो, इंग्रजी धड्याचं गाईड मधील मराठी भाषांतर पाठ करायचा. आणि त्यानुसार, प्रश्नाची उत्तरं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून लिहायचा.
त्याचं इंग्रजी चांगलं असल्याने, हे.. त्याला खूप मस्त जमून गेलं होतं. तर मी, व्याकरणावर भर देऊन पास होण्याच्या तयारीत असायचो. त्या रात्री, मी अकरा वाजेपर्यंत कसाबसा अभ्यास केला. आणि, पहाटे लवकर उठून थोडा अभ्यास करूयात असं ठरवून. मी, झोपण्याच्या तयारीला लागलो.. तर हा म्हणाला, तू झोप... मी अजून थोडावेळ पाठांतर करतो..
मला झोप खूप आवडीची, त्यामुळे अंग टाकल्या टाकल्या मी लगेच झोपी गेलो.
आणि काही वेळाने... अचानक कसल्याशा आवाजाने मला जाग आली..
धाप्पकन काहीतरी पडण्याचा आवाज झाला... झोपेतच दचकून, डोळे चोळत मी उठलो.
पाहतो तर.. माझा मित्र, जमिनीवर चित्र विचित्र अवस्थेत पालथा पडला होता. त्याच्या हातातलं गाईड त्याच्या बाजूलाच पडलं होतं. घड्याळात पाहिलं तर, पहाटेचे पाच वाजले होते. मी झोपून, बराच कालावधी लोटला होता.
मला तर काहीच समजेना, कि नेमकं काय झालं आहे..?
धाडस करून, मी त्याला उठवलं. तसा, तो हि ताबडतोब उठून बसला. मी त्याला विचारलं,
काय झालं रे..?
म्हणाला, कुठे काय..? मी तर झोपलो होतो. आणि, त्याने घड्याळाकडे पाहिलं..
अरे... पाच वाजलेत. चल, आपण बाथरुमला जाऊन येवूयात..
त्यावेळी, त्याच्या घरात शौचालय नव्हतं. म्हणून आम्ही, शौचासाठी तेथे जवळच असणाऱ्या ओढ्यावर गेलो. तिथे आणखीन एक वेगळाच प्रकार मला पाहायला मिळाला..
ह्या बहाद्दराने, शौचाला बसण्यासाठी एक एक करून अंगावरील सगळी वस्त्र काढून ठेवली. आणि उघडाबंब होऊन शौचाला बसला. हा काहीतरी वेगळेच विचित्र चाळे करत होता. असला भलताच प्रकार पाहून, मी तर जाम घाबरून गेलो होतो. हा भयंकर प्रकार पाहून, मी त्याच्या पासून थोडं अंतर राखूनच बसलो होतो.
जवळ-जवळ तासभर तो तिथेच अगदी भ्रमिष्ट अवस्थेत बसला होता. शेवटी, थोड्या वेळाने तांबडं फुटलं. तसं थोडं दरडावूनच मी त्याला कपडे घालायला लावले. आणि त्याला घेऊन, रूमवर आलो...
रूमवर आल्यावर, अभ्यासासाठी त्याने पुन्हा एकदा ते गाईड उघडलं. आणि, अभ्यासाला बसला. थोडा वेळ त्याने वाचन केलं. आणि, मला म्हणाला..
पंडित, मी रात्रभर खूप पाठांतर केलं होतं रे.. पण, आता मला त्यातलं काहीच आठवत नाहीये..!
त्याच्या ह्या वाक्यासरशी मी तर खूपच शॉक झालो.. आणि, काहीही न बोलता मी आमच्या घरी निघून गेलो. त्या दिवशी, मी इंग्रजीच्या पेपरला गेलो. पण, तो काही पेपरला आला नव्हता...
आणि, तिथून पुढच्या कोणत्याच पेपरला तो आला नाही.
अर्थात, तो नापास झाला. आणि मी पास झालो.
त्यानंतर, ऑक्टोबरमध्ये तो सगळे विषय घेऊन पुन्हा एकदा परीक्षेला बसला. आणि चांगल्या मार्काने पास सुद्धा झाला. पण, त्यारात्री आणि पहाटे नेमकं काय घडलं होतं..?
ते, त्यालाही माहित नव्हतं. आणि, मला सुद्धा कधी समजलं नाही...!

परवाच्याला पंजाबच्या रेल्वे अपघातात जे काही घडलं, ते अत्यंत दुर्दैवी होतं..पण, जनतेला एवढी सुद्धा समज नाहीये का, कि तमाशा पाहायला कुठे थांबावं.? किंवा हा तमाशा पाहत असताना, आजूबाजूला लक्ष असावं कि नाही.?
रावण दहन होतं, त्या फटाक्याच्या आवाजामुळे कसलाच अंदाज आला नाही. आणि, हा अपघात घडला हे मला मान्य आहे. पण मी काय म्हणतो, रेल्वे रुळावर थांबून हा तमाशा पहायची काही गरज होती का.? किंवा हा तमाशा पाहिला नसता, तर काही बिघडणार होतं का.? पण आपल्या भारतीय जनतेला एक खूप मोठी घाण सवय आहे.
चार लोकं.. नदीत वाकून बघत असतील, तर.. आमंत्रण न देता सुद्धा, त्याच्या मागोमाग एक एक व्यक्ती जमा होत जातो. आणि त्या गर्दीचा भाग होतो.
मला सांगा ना.. दुनियादारी भोसड्यात गेली, तो वाकला आहे म्हणून आपण वाकलंच पाहिजे का.? आपण आपल्या मनाला आवर घालू शकत नाही का.?
काही वर्षांपूर्वी मी एक घटना ऐकली होती.. अशाच एका प्रकारात, पुलावरून खाली काय झालंय ते पाहण्यासाठी लोकांची अगदी झुंबड उडाली होती. तिथे नेमकं काय चालू आहे, ते पाहायला जाम रेटारेटी झाली होती. अफाट गर्दी होती, आणि त्या बघ्यांच्या गर्दीतून एक तरुण मुलगा पुलावरून खाली पडला. नेमकं काय घडलं हे कोणालाही समजू शकलं नाही. खुन्नस काढली होती, कि.. ते सगळं ठरवून झालं होतं, कि.. तो नेमका अपघात होता..? हे काहीच समजलं नाही. पण तो खाली पडणारा मुलगा जीवानिशी गेला..
पण मी काय म्हणतो, कशाला झक मारायला जायचं का त्या ठिकाणी.? आपण काही सुपर मैन आहोत का.? जे कि, समोरील दृश्य पाहून आपण लगेच कोणाचा तरी जीव वाचवणार आहोत.?
अरे वेड्या भावांनो, जीव कसला वाचवताय.. काहीच कारण नसताना, त्या अपघाती मुलाचे आईवडील अनाथ झाले असतील. कालच्या अपघातात सुद्धा किती घरं बसली असतील, त्याचा अंदाज बांधता येणार नाही.
अजून एक गोष्ट आहे..
रेल्वे वाल्यांनी, भविष्यातील गोष्टीचा विचार करून. त्या रेल्वे रूटच्या बाजूला भरपूर मोकळी जागा, भविष्यात निर्माण होणाऱ्या रेल्वे रुळासाठी आरक्षित करून ठेवलेली असते.
पण त्याठिकाणी, आजच्याला फार मोठ्या झोपडपट्ट्या निर्माण झाल्या आहेत. रेल्वे प्रशासनाला हे वेळीच समजलं नसेल का.?
किंवा.. ज्या कोणी या पुढील उपक्रमासाठी हे नियोजन केलं असेल, त्याच्या बुद्धीला घोडा लावल्या सारखा प्रकार नाहीये का.?
भारत भरातल्या प्रत्येक शहरातील रेल्वे स्थानकाला लागून मोठमोठ्या झोपडपट्ट्या निर्माण झाल्या आहेत. फक्त निर्माण झाल्या नाहीत, तर आजच्याला त्या सरकारी जागेवर ते आपला हक्क सांगत आहेत. आणि हि जागा खाली करायची असेल, तर.. आम्हाला सरकारी खर्चाने नव्या ठिकाणी घरं मोफत द्या म्हणत आहेत.
अरे पण मी म्हणतो.. हि पिलावळ आलीय कोठून..? याची पहिली चौकशी करा. जमल्यास त्यांचा पोशिंदा कोण आहे त्याची चौकशी करा.!
पण नाही.. हि जनता जमा झाल्यावर, त्याच झोपडपट्टी मध्ये लहानाचा मोठा झालेला एखादा स्थानिक दादा, मामा, तात्या, भाई.. तिथे नगरसेवक म्हणून निवडून येतो. काय पद्धत आहे का हि..?
आपला देश पाठीमागे का आहे.?
तर, वरील सर्व गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. हे फार मोठं षडयंत्र आहे. आणि, हे सगळं अगदी ठरवून केलं जातं बरं का. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. नाहीतर, भविष्यात प्रत्येक शहराची आजच्या पेक्षा जास्ती दुर्दशा झाल्याशिवाय राहणार नाही..!
अपघातातील सर्व मृतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!!

उसनवारी घेतलेल्या पैशावरून एक किस्सा आठवला.
माझ्या ओळखीतल्या एका व्यक्तीला, उसनवारी पैसे घेण्याची खूप घाण सवय होती.
सवय तर घाण होतीच. पण.. घेतलेले पैसे तो कोणाला वेळेवर परत सुद्धा करत नसायचा. विषय अगदी हजार पाचशे रुपयाचा असायचा. त्यामुळे कोणी जास्तीचं मनावर घेत नसायचं. आणि अर्थातच, त्यामुळे याचं बाकी खूप फावायचं. तो, रोजच्या रोज नवीन ओळखी करून त्यांना टोप्या घालतच राहायचा. त्याचं काम अगदी राजरोसपणे चालू होतं.
पण एकदा काय झालं..!
एका व्यक्तीने त्याच्या भूलथापांना बळी पडत, उसने म्हणून त्याला पाच हजार रुपये दिले. या गोष्टीला बरेच दिवस उलटून गेले. पैसे परत देण्याची वेळ होऊन गेली. तरी सुद्धा हा गडी पैसे द्यायचं काही नाव घेईना.
शेवटी त्या व्यक्तीने याला दमदाटी सुरु केली. तरी सुद्धा हा काही त्याला बधत नव्हता.
शेवटी तो समोरील व्यक्ती सुद्धा वैतागला, आणि.. एकदा या पैशापायी त्याने भर चौकात त्याच्या कानाखाली जाळ काढला.
त्यावर समोरील व्यक्तीची प्रतिक्रिया होती..
पैसे देतो म्हणलं होतं ना..! मग मारायचं काय कारण होतं.? लेट होईल म्हणलं होतं, नाही म्हणलं होतं का.?
आता मी तुला पैसे देत नसतोय..!
आणि जर तुला तुझे पैसे हवे असतील, तर.. चारचौघात मी सुद्धा तुझ्या मुस्कटात मारून मगच पैसे देणार. जमत असलं तर सांग, मला बी या गोष्टीचा लै बेक्कार राग आहे. मला काही इज्जत आहे की नाही.? तुला मी आत्ताच मारला असता. माझे हात काय XXX गेले नाहीत.
असल्या फालतू माणसाकडून कोण मार खाऊन घेईल.?
आणि या फालतू विषयावरून मारामारी करून पोलीस चौकीच्या पायऱ्या झिजवण्यात काहीच हाशील नव्हतं. असा विचार करत, त्या व्यक्तीने आपल्या पैशावर कायमचं पाणी सोडलं.
पण..तो गडी मात्र आजही, नवनवीन शक्कल लढवून नवनवीन लोकांकडून पैसे उकळण्याचे धंदे करतच आहे. आणि विशेष म्हणजे त्यात त्याला जय सुध्दा आहे..!

सुरवातीच्या काळात, मी.. एका खाजगी कंपनी मध्ये सुपरवायजर म्हणून कामाला होतो. तिथे, हा विनोदी प्रसंग घडला होता.
सकाळी नऊची वेळ असावी.. आमच्या ऑफिसमध्ये कामाला असणाऱ्या टेलिफोन ऑपरेटर अजून आल्या नव्हत्या. त्यामुळे, बाहेरून येणारे सगळे फोन कॉल्स माझ्याच टेबलवर येत होते.
त्यादिवशी सकाळच्या पारी.. असाच एक फोन आला.
मी तो फोन उचलला,
हॅलो, कोण बोलतय ? पलीकडून, एक मुलगी बोलत होती.
हेल्लो, तुकाराम वाचमीन हायेत का ?
आमच्या इथे, तुकाराम नावाचा कोणी वॉचमेणच काय.. त्या नावाचा, कोणी कामगार सुद्धा नव्हता. त्यामुळे सुरवातीला मी सुद्धा थोडा गोंधळून गेलो. समोरून बोलणारी मुलगी, थोड्या ग्रामीण भाषेत बोलत होती. बहुतेक आसपासच्या भागातील खेडेगावात राहणारी ती मुलगी असावी.
आणि नेमकं, त्यादिवशी कंपनी मध्ये मला म्हणावं असं काम सुद्धा नव्हतं. म्हणून, मला जरा त्या मुलीची फिरकी घ्यावीशी वाटली.
मी त्या मुलीला म्हंटलो, एक मिनिट थांबा हां.. मी, तुकारामला बोलावून घेतो.
आणि, मी मुद्दामच मोठ्याने आवाज दिला. तुकाराम, तुझ्यासाठी एका महिलेचा फोन आहे..!
थोड्यावेळाने, पुन्हा मी स्वतःच रिसिव्हरवर रुमाल ठेऊन तिच्याशी बोलायला सुरवात केली.
हेल्लो, कोण बोलतंय..?
( ती लटक्या आवाजात ) हेल्लो मी बोलतेय.. किती दिवस झाले, तुम्ही फोन का नाय केला मला..?
आगं कामामुळे वेळ मिळत नाही बाई, कामाचा लय ताप वाढलाय. तुला खोटं वाटल, चार दिवस मी घरी गेलोच नाही, दोन वाचमेण कामाला येईनाच झालेत.
( ती लटक्या आवाजात ) ते सगळं खरं आहे, पण.. आता किती दिवस झाले, तुम्ही मला भेटले पण नाय..!
हो ना... सांग ना, कधी भेटायचं आपुन, मला सुद्धा फार भेटावं असं वाटतंय.
( ती लटक्या आवाजात ) उध्याच्याला भेटताल का..?
हो भेटू कि, पण कुठं भेटायचं ?
( ती लटक्या आवाजात ) मागच्या वेळेस आपण कुठं भेटलो..? तिथच...!!
आता बाकी, मला प्रश्न पडला. तिला नेमकं काय उत्तर द्यावं.?
कारण, ते ठिकाण फक्त त्या #तुकारामालाच माहित होतं, या #पांडुरंगाला नाही..!
थोडा विचार करून मी पुन्हा म्हंटल.. आगं पण कुठं..?
आता मात्र, तिला सुद्धा थोडी शंका आली.
आणि ( थोड्या घाबर्या आवाजात ) ती मला म्हणाली. खरं सांगा तुम्ही कोण बोलताय...?
मी म्हटलं, आगं बाई... मी, तुझा तुकारामच बोलतोय.
( थोड्या घाबर्या आवाजात ) ती म्हणाली, नाय बया मला तुमी कुणी तरी वेगळेच वाटताय..!
मी म्हणालो, आगं नाही... मी तुझा तुकारामच बोलतोय.
त्यावर ( थोड्या लटक्या आवाजात ) ती म्हणाली, मग सांगा बरं माझं नाव काय आहे.?
आता मात्र, मला तिने पक्कं कोड्यात पाडलं होतं. कोड्यात काय, चक्क पकडलच होतं..
आणि, मी एकदम म्हणून गेलो... #सोने.. ( त्याकाळी मुलींचं सोनी नाव ठेवायची लई फॅशन अली होती. ) असं का म्हणून तू मला विचारायला लागलीस.?
माझा खेळ संपला होता, माझा निशाना काही बरोबर लागला नव्हता. आणि घाबर्या आवाजात ती मला म्हणाली.
नाय बया.. तुमी कोण तरी वेगळेच दिसताय..!
शेवटी, मला सुद्धा हसू आवरलं नाही.. आणि, मोठ्याने हसत मी तिला म्हणालो.
हॅलो ताई.. तुमचा रोंग नंबर लागला होता. मलाही काही काम नव्हतं, म्हणून तुमची थोडी गंमत केली.. माझ्या या वक्तव्यावर, ती मुलगी सुद्धा थोडी हसली,
आणि, फोन कट झाला..!

पुण्यातील विश्रांतवाडीच्या अलीकडे.. फुलेनगर येथे, #कावेरी हॉटेलची नवीन शाखा सुरु झाली आहे.
कावेरी हॉटेल आणि माझी ओळख.. साधारण आठ दहा वर्षांपूर्वी झाली असेल. वाघोलीला गेलो असता, माझ्या एका मित्राने मला तिथे जेऊ घातलं होतं.
तर तेंव्हा.. त्या हॉटेलमध्ये, मटन खारट हा प्रकार मला पहिल्यांदा वाचायला आणि खायला सुद्धा मिळाला. मला वाटलं, मटन खारट म्हणजे.. अळणी मटन असेल. पण नाही, हे पक्कं खारवलेलं असं खारट मटन होतं. फक्त हळद आणि चढत्या मिठात हे मटन बनवलं होतं. त्या मटणाला जास्तीची खारट चव जरी असली.. तरी, खाताना मात्र ते खूपच अप्रतिम चव देत होतं.
असो.. तर, कालच्याला मी यांच्या नवीन शाखेत जेवायला गेलो होतो. हल्ली बरीच हॉटेल्स हे फक्त नावावर चालू आहेत. असं म्हणलं तर ते वावगं ठरू नये.
पण हॉटेल कावेरी.. त्यांची चव अजून टिकवून आहे. तर्रीबाज झणझणीत तिखट जाळ मटन रस्सा, दोन्ही हातात मावणार नाही अशी मोठ्ठी ज्वारीची भाकरी, आणि.. चमचमीत मसाल्यात परतलेलं मऊशार मटन..आपल्या जेवणाची रंगत आणखीन वाढवून जातं. ज्यांना तिखटा सहन होत नाही, अशा व्यक्तींनी, रस्सा हा तर्री विरहीत घ्यावा.
नाव मोठं आहे.. अजून तरी ते नाव टिकवून ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे. पण मटन थाळी थोडी महागच आहे. शेवटी ज्याचा त्याचा फंडा असतो..!!


कोल्हापुरातील.. मटन खानावळी, आणि तिथे असणाऱ्या तमाम हॉटेल्स बाबत हि विशेषण अगदी तंतोतंत लागू पडतं. तिरुपती वरून कोल्हापूरला येताना, कोल्हापुर रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडल्यावर.. आम्ही, राजपुरुष हॉटेलमध्ये उतरत असतो.
तर.. तिकडे चालत जाताना, मला एक चाणाक्ष रिक्षावाला भेटला. #राजपुरुष हे हॉटेल रेल्वेस्थानकापासून अगदी जवळ आणि चांगलं सुद्धा आहे. आम्ही चालतच तिकडे निघालो होतो, तर तो रिक्षावाला मला म्हणाला..
राजपुरुषला जाणार असाल, तर माझ्या रिक्षात चला. मला काही भाडं वगैरे देऊ नका. तुम्ही तिथे रूम घेतल्यावर मला शंभर रुपये कमिशन मिळून जाईल.
जमतंय कि मग, पाच मिनिटाच्या अंतरात आपल्या पासून कोणाचा तरी फायदा होतोय. आणि त्यात आपलं सुद्धा काही नुकसान नाही. अशा पद्धतीने, कोल्हापुरात सुद्धा मला एक चाणाक्ष #पुणेकर मिळाला.
रूममध्ये अंघोळी उरकल्या, बाहेर पडलो.. रंकाळा परिसरात थोडासा फेरफटका मारला, आणि आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनाला निघालो. खरं तर, कोल्हापुरात माझा फार मोठा फेसबुक मित्रपरिवार आहे. पण.. आल्यासरशी सर्वांना भेटायला वेळ देता येत नाही, म्हणून मी कोल्हापुरात गेल्यावर फेसबुकवर पोस्ट वगैरे करणं मुद्दाम टाळत असतो. तरी सुद्धा.. #नियर_बाय हा ऑप्शन पाहून खातरजमा करण्यासाठी एका कोल्हापुरी मित्राचा मला फोन आलाच.
दादा कोल्हापुरात आहात का..?
त्यांच्याशी थोडी बातचीत केली. घाईमुळे भेट काही होणार नव्हती. जमल्यास भेटू म्हणालो, पण ते काही जमलं नाही.
महालक्ष्मी मंदिरात कितीही गर्दी असली, तरी..माझ्या एका फेसबुक मित्राकरवी, मला तिथे व्हीआयपी दर्शन सुद्धा मिळत असतं. पण मी ते मुद्दाम टाळत असतो. एकदा त्यांच्या मार्फत असंच व्हीआयपी दर्शन घ्यायला गेलो. आणि दर्शन बारीत असणाऱ्या लोकांच्या शिव्या शाप ऐकून आलो. त्यामुळे तेंव्हापासून तो विषय मी नेहेमी टाळत असतो. ( त्या मित्राचं नाव मी इथे मुद्दाम टाकत नाहीये, नाहीतर इतर मित्र त्यांना त्रास द्यायचे.  ) तिरुमला येथे.. बालाजीच्या दर्शनाला आठ दहा तास लाईनीत उभं राहता येतंय. तर मग.. महालक्ष्मीच्या दारात तासभर थांबायला काय हरकत आहे.?
हॉटेल राजपुरुष मधील शुद्ध शाकाहारी जेवणाची थाळी फारच प्रसिद्ध आहे, असं मला तिथे गेल्यावर समजलं. तिथे पोर्चमध्ये, काही महिला जेवण कधी तयार होईल याची वाट पहात होत्या. पण, सातच्या आत तिथे काहीच मिळत नाही असं समजलं.
तिकडे काहीही असो, पण.. कोल्हापुरात गेल्यावर #शाकाहारी जेवण करणं मला काही पटत नाही. कोल्हापूर म्हणजे, अस्सल #मांसाहार. हे गणित माझ्या डोक्यात अगदी फिट्ट झालं आहे. कोल्हापुरात घरगुती खानावळी आणि हॉटेल्सची बिलकुल कमतरता नाहीये.
कुंभार गल्लीमध्ये तर.. अगदी दोन घरं सोडली कि एक खानावळ आहे म्हणतात. पण मी स्वतः कुंभार असून सुद्धा, त्या गल्लीत अजून गेलो नाहीये.
मी तर म्हणतो, एकट्या कोल्हापुरात जेवढ्या मटन खानावळी आणि हॉटेल्स असतील. तेवढी सगळी मिळून उभ्या महाराष्ट्रात सुद्धा नसतील. आणि हे का कमी म्हणून, कोल्हापुरात चिक्कार रस्सा मंडळं सुद्धा आहेतच. म्हणून मी हौसेने म्हणत असतो. पर्यटना सोबतच.. #कोल्हापूर म्हणजे, मांसाहारी खवय्येगिरी करणाऱ्या व्यक्तींसाठी मटणाच्या हॉटेलांचा सुद्धा #महापूर आहे.
जेवण करायला.. कोल्हापुरातील एक मित्र आम्हाला, रंकाळ्या शेजारील #मिनी_वसंत_घरगुती_खानावळ येथे घेऊन गेला.
मी.. आजवर #गंधार किंवा #पद्माला बरेचदा जेवण केलं आहे. पण या मित्राच्या, मित्राचा आग्रह आम्हाला काही मोडवेना. आणि आम्ही त्या छोटेखानी हॉटेलमध्ये दाखल झालो.
थोडं #मोकळं व्हावं म्हणून, त्या हॉटेल मालकाला टॉयलेट कुठे आहे म्हणून विचारलं. तर म्हणाला.. एक दुकान सोडल्यावर गल्लीतून पुढं जावा. तिथं हाय बघा..!
हे बाकी आपल्याला खास आवडलं, लाजाय लपायचं बिलकुल कामच नाही. सरळ सरकारी शौचालयाचा रस्ता दाखवायचा.
या मिनी वसंत हॉटेलमध्ये खूपच स्वस्त जेवण होतं. वेगवेगळ्या मेन्यू प्रमाणे.. नव्वद, शंभर आणि एकशे तीस रुपयाला मर्यादित मटन थाळी येथे उपलब्ध होती. शिवाय.. पन्नास साठ रुपयाच्या घरात, इतर पदार्थ सुद्धा उपलब्ध आहेत.
इथे असणाऱ्या एकशे तीस रुपयाच्या थाळीमध्ये, मटन खिमा दिला जातो. रात्रीचे दहा वाजले होते, मटन खिमा उपलब्ध नसल्याने, आम्हाला नाईलाजाने शंभर रुपयावाली थाळी घ्यावी लागली..
छोट्याशा ताटात, एका मोठ्या डिशमध्ये मटन आणि रस्सा होता. मटन अगदी जास्ती सुद्धा नाही, आणि फारच कमी सुद्धा नाही. पण अस्सल खादाड व्यक्तीला ते मटन नक्कीच पुरेसं नाही. हे मात्र तितकच खरं, दुसऱ्या वाटीत अर्धा अंडा मसाला होता, तर बाकी दोन वाटयामध्ये तांबडा आणि पांढरा रस्सा होता. दोन मोठाल्या कोल्हापुरी चपात्या, आणि मसाला राईस. असा एकंदरीत, साधा आणि सुटसुटीत पाहुणचार होता.
चवीचा विषय म्हणाल.. तर, घरगुती विषय असल्याने जास्ती भडक, तिखट किंवा जळजळ होणारं असं जेवण नव्हतं. अगदी सुरवातीला, मी.. तांबडा आणि पांढरा रस्सा जिभेला चटका सहन होईल असा ओरपला, नंतर.. तिन्ही चपात्यांचा मटन आणि अंडा मसाल्या सोबत खंगरी समाचार घेतला. आणि सरते शेवटी मसाले भातावर तडाखा मारला.
खरं तर.. शंभर रुपयात आजच्याला काय येतय हो..? त्यामुळे मला आणखीन एक मटणाची वाटी हवी होती. पण नेमकं मटन संपलं असल्याने, माझी जिव्हा मला आवरती घ्यावी लागली. जास्ती हायफाय पण नाही, आणि अगदीच साधं सुद्धा नाही. अशा पद्धतीची हि घरगुती खानावळ वजा हॉटेल आहे.
मी.. मांसाहाराचा निस्सीम भक्त असल्याने, मला हे जेवण आवडलं नाही, किंवा खूपच साधं होतं, असं मुळीच म्हणता येणार नाही. शेवटी, अन्न हे #पूर्णब्रह्म आहे.
त्यामुळे.. कोल्हापुरात आल्यावर, माझी नवनवीन हॉटेल्स आणि मटन खानावळीची माझी शोध मोहीम अशीच चालू राहील..
पुन्हा कधी येणं झाल्यावर, नवीन ठिकाणचा समाचार घेऊ. आणि वेळ काढून, सगळ्या कोल्हापुरी मित्र मैत्रिणींची महेफील सुद्धा जमवू..!