Thursday, 8 November 2018

माझ्या एका मित्राच्या मुलाला, वयाच्या पाचव्या वर्षांपर्यंत बोलता असं येतच नव्हतं. नुसता हाताने बोलायच्या खुणा करायचा. त्या उभयतांनी लाख उपाय केले. पण काहीही उपयोग झाला नाही. डॉक्टरांना विचारलं.. तर ते म्हणायचे. त्याला म्हणावा असा त्रास नाहीये. जीभ थोडी जड आहे. बोलेल अस्ती-अस्ती..
पण शेवटी, त्यांच्या घरचा तो कुलदीपक. " मुखबधीर " निघाला तर काय करायचं..?
या चिंतेने, त्या दोघा उभयतांना अगदी ग्रासलं होतं.
शेवटी एक उपाय निघाला..
माझा एक मित्र त्यांना म्हणाला. तुम्ही याला, आमच्या बरोबर चौकामध्ये बसायला पाठवून द्या. चार मुलात राहिल्यामुळे सवईने तो नक्कीच बोलायला लागेल.
आणि, काही दिवसात त्याचा चांगला (?) परिणाम सुद्धा दिसून आला.
आता.. चौकात बसणारी मुलं काय शहाणी असणार आहेत का. बारा गावाची बारा पोरं. बोलताना त्यांच्या तोंडात, शब्दागणिक शिवी हि ठरलेली असायची. आणि, आता हा लहान बालक या उनाड पालकांच्या गोतावळ्यात जमा झाला होता. त्या मुलांची शिकवणच घाणेरडी हो, त्याचा व्हायचा तसा परिणाम त्या मुलावर झाला. ती मुलं त्याला बोलायला असं शिकवायची..
म्हण.. त्या काकाला हरामखोर म्हण.. म्हण ना, म्हण बाळा....!!
काही दिवसानंतर..
प्रयत्न करून.. तो लहान मुलगा बोलायला आणि शिव्या देण्यात चांगलाच वाकबगार झाला.
आता, हळू-हळू त्याला समज सुद्धा यायला लागली होती.
म्हणजे, कोणाला.. कधी,कशी आणि नेमकी कोणती शिवी द्यायची. कोणाशी कसं बोलायचं. याची, त्याला पूर्णपणे समज आली होती. आता तो कोणाचीच हयगय करत नव्हता...
कोणी मुलगा चुकला, कि तो त्याला जागेवरच यथेच्छ शिव्या देत होता. आणि, त्या मुलांना त्याचं काहीच सुख दुखः वाटत नव्हतं. कारण, हि त्यांचीच शिकवण होती.
आता तो लहान मुलगा, त्याच्या घरी सुद्धा थोडं-थोडं बोलू लागला होता. नाही म्हणता, त्याच्या घरच्यांना सुद्धा आता बरं वाटू लागलं होतं.
लाडात वाढलेला एकुलता एक मुलगा, त्यामुळे त्याची आई सुद्धा त्याच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यायची. पण.. ह्या मुलाच्या डोक्यावरून कधी पाणी गेलं. म्हणजे, त्याला खाण्याचा खूपच आग्रह झाला. तर तो, त्याच्या आईला सुद्धा खूप घाण-घाण शिव्या देऊ लागला. " आयघाले बास म्हणलं ना तुला..! " किती खायला घालशील.?
( त्याच्या बोबड्या भाषेत तो अशा प्रकारच्या शिव्या घरी सुद्धा देवू लागला )
कधी नाही, ते अशी वाक्य मुलाच्या तोंडून ऐकून त्याची आई सुद्धा हैराण व्हायची.
नंतर-नंतर त्याच्या शिव्या देण्याचं प्रमाण खूपच वाढलं. आता तर ते पोरगं त्याच्या बापाला सुद्धा ऐकत नव्हतं. आणि शेवटी वैतागून, त्याचा बाप माझ्या मित्राला म्हणाला..
आयला, हे मुकं होतं तेच बरं होतं...!!

No comments:

Post a Comment