Thursday, 8 November 2018


आपणाला वाटतं इतकं सोपं नाहीये. याचे दूरगामी परिणाम किती भयानक आहेत. ते मी फार पूर्वी माझ्या डोळ्याने पाहिलं आहे. कारण नसताना, एखाद्याला हकनाक त्रास होऊ शकतो.
होतं काय.. त्यामुळे काही उपद्व्यापी महिला आणि पुरुष.. या विषयाचा, गैरफायदा घेतल्याशिवाय राहणार आहेत का.? आणि नाहीच राहिले तर, त्यांना अटकाव तरी कोण करणार.?
आज, माझ्या पाहण्यातील.. एक फार जुनी घटना मला आठवत आहे..
आठ दहा मित्र मैत्रिणींचा एक छानसा ग्रुप होता.
आजची मुलं, मैत्री करताना, किंवा.. प्रेम करताना, जातपातविरहित विषय अवलंबत असतात. हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे, ते खर्या अर्थाने गुण्यागोविंदाने नांदत असतात, असं म्हणलं तर ते वावगं ठरू नये. परंतु.. काहीवेळेस, या मैत्रीचं रुपांतर प्रेमात सुद्धा होऊन जातं. आणि ते, पटकन कोणाच्या ध्यानात येत नाही. कारण प्रेम हे आंधळं असतं. पण हेच प्रेम, अगदी पराकोटीला जातं.
त्यावेळी, आपण आता लग्न करूयात. या विषयापर्यंत ते प्रेमी युगुल येऊन पोहोचतं.
पण या सर्व विषयांना मान्यता नसणाऱ्या त्या जुन्या जमान्यात..
अशाच एका घटनेमध्ये.. एक आंतरजातीय विवाह पार पडला. मुलाने त्याच्या घरच्यांना न जुमानता, त्या मुलीशी लग्न केलं. पण त्याच्या घरच्यांना हे काही मंजूर नव्हतं. त्यांनी मुलाला खूप समजावलं, पण मुलगा काही ऐकायला तयार नव्हता. शेवटी व्हायचं ते झालंच. हे दोघेही कोणाला न सांगता, लग्न करून मोकळे झाले. विषय संपत गेला. नव्याचे नऊ दिवस अगदी मजेत जात होते. काही काळ यांचा संसार अगदी मस्त चालू होता.
पण.. त्या दोघांच्याही दुर्दैवाने.. ती मुलगी सुरवाती पासूनच जरा " चौचाल " होती. म्हणजे, ती पूर्वीपासून तशीच होती. तिला तसली सवयच होती, असं म्हणायला काहीच हरकत नव्हती.
पण त्यावेळी, ते कोणाच्या ध्यानात येत नव्हतं. हा मुलगा सुद्धा तिच्या अदा पाहूनच घायाळ झाला होता. पण विषय असा असतो..
झालं गेलं गंगेला मिळालं, किंबहुना.. लग्न झाल्यावर तरी तिने गप्पं बसावं कि नाही..?
पण नाही, लग्न झालंय तरी सुद्धा.. ती नको तशी बेताल वागत होती. नको ते चाळे करत होती.
आणि.. हि दुनिया तर, फार मोठ्या नंबरचा चष्मा आहे.
हे प्रत्येकाच्या ध्यानात यायला हवंय..!
एके दिवशी.. या सर्व गोष्टींची कुणकुण त्या मुलाच्या कानावर आली. आणि एक-एक करत सगळे विषय त्याच्या समोर येऊ लागले. इतकंच नाही, तर.. आपल्या बायकोचे, आपल्या जुन्या ग्रुपमधील आणखी एका मित्र म्हणवणाऱ्या मुलाशी सुद्धा पूर्वी संबंध होते. हे सुद्धा त्या मुलाला कळून चुकलं. मग बाकी याचं डोकं काम करेनासं झालं.
हा मुलगा चांगला मोठ्या घरचा होता. मोठ्या पगारावर, मोठ्या हुद्यावर कामाला होता. आणि निव्वळ या प्रेम प्रकरणामुळे, तो.. त्याच्या आई वडिलांपासून दुरावला गेला होता.
आणि.. दुर्दैवाने, किंवा सुदैवाने म्हणा, या सगळ्या बातम्या त्याच्या आई वडिलांच्या कानावर सुद्धा गेल्या.
त्यामुळे.. त्यांच्या " भावकीत " सुद्धा यांची छी, थू व्हायला लागली..!
मग त्यांनी.. आपल्या एकुलत्या एका मुलाला विश्वासात घेतलं, आणि एक वेगळीच शक्कल लढवली. आता काहीही करून, या मुलीपासून त्यांना कायमचा सुटकारा हवा होता.
यांनी तिला गोडीगुलाबीने सोडचिठ्ठी मागितली.
पण ती मुलगी काही त्यासाठी तयार होईना. कारण, ती ऐकण्यातली नव्हतीच ना. मग त्या मुलाने, तिला विश्वासात घेऊन सांगितलं.
तुझे पहिले कोणाबरोबर प्रेम संबंध होते ते सुद्धा मला माहिती आहे. माझ्या अगोदर, तुझ्या जीवनात तो आला होता ना.? तुझे आणि त्याचे शारीरिक संबंध सुद्धा झाले होते, मग जा.. त्याच्याशीच लग्न कर, मला कशाला त्रास देतेयस.?
यासाठी.. मी तुला नगद दोन लाख रुपये देतो. तू तुझ्या पहिल्या प्रियकराला लग्नाची गळ घाल. आणि माझा पिच्छा सोड.!
ध्यानात घ्या.. पंधरा वर्षापूर्वीचे दोन लाख रुपये..!
किती मोठी लॉटरी लागली होती त्या ( बेअक्कल ) मुलीला.
आणि.. पिकलेला आंबा झोळीत पडावा, तशी ती मुलगी या विषयाला अगदी राजीख़ुशी तयार झाली.
हे सगळं घडण्या मागील भुलभुलैय्या विषय काय होता..?
जुना प्रियकर, आणि.. दोन लाख रुपये मिळणार होते..!
पैशाच्या मोहाला, आणि आपल्या उघड्या पडलेल्या " पितळाला " कसबसं सावरत, त्या मुलीने या विषयाला आपली मंजुरी दर्शवली. आणि.. सरकारी इतमामात, अगदी रीतसर पद्धतीने हा काडीमोड प्रकरण पार पडला..!
आता, दुसऱ्या अध्यायाला सुरवात झाली..!
त्या मुलीने.. आता, आपल्या जुन्या प्रियकराच्या घरी नव्याने चकरा मारायला सुरवात केली. सुरवातीला, त्याच्या घरगुती फोनवर तिचं बोलून झालं.
तुझ्यामुळे माझा घटस्पोट झाला आहे. आता आपण दोघे लग्न करूयात..मला आता दुसरा कोणताच मार्ग दिसत नाहीये..!
पण.. लग्न झालेल्या मुलीशी हा कसा काय विवाह करणार..?
कारण.. या दोघात, पूर्वी जे काही घडलं होतं. ते सगळं काही दोघांच्या संमतीने आणि एक गरज किंवा आवड म्हणून घडलं होतं. आणी आता.. हे सगळं घडून, किमान चार पाच वर्षाचा काळ लोटला होता. शिवाय, हि तर लग्न करून मोकळी झाली होती. आणि हा मात्र अजून अविवाहित होता. पण, त्या मुलीने याचा पिच्छा काही सोडला नाही.
ती मात्र..याला रोजच्या रोज धमकावत होती. शेवटी.. तिच्या धमक्यांना भिक न घालता, या मुलाने तिला स्पष्ट नकार दिला. आणि.. इथूनपुढे माझ्या विषयात तू ढवळाढवळ करू नकोस, अशी स्पष्ट ताकीद सुद्धा दिली.
पण ती मुलगी खूपच पुढची निघाली. तिने या संपूर्ण कुटुंबाला धमकी दिली. कि मी तुमच्या मुलाविरुद्ध बलात्काराची तक्रार नोंदवणार आहे. आणि सगळ्यांना आतमध्ये घालणार आहे.
नको त्या वयात, चालून आलेल्या.. क्षणिक, शारीरिक, आनंदी उपभोग संधीचा शेवट असा होईल. याची त्याला, त्यावेळी मुळीच कल्पना आली नसेल.
शेवटी त्या मुलीने, या मुलाविरुद्ध पोलिसात बलात्कार केल्याची तक्रार नोंदवली.
आणि.. या छोट्याशा .? चुकीमुळे..
त्या मुलाला विनाकारण.? झेलची हवा खावी लागली.
पुढे लाख सोपस्कार करून लाखो रुपये खर्च करून, शेवटी.. ती केस रफादफा करण्यात आली.
हा विषय निराळा.
पण.. दोघांच्या संमतीने घडलेल्या विषयाचा फालतू उहापोह केल्याने, त्या मुलाच्या नावामागे एक बलात्कारी पुरुष नावाचा शिक्का जोडला गेला. कदाचित काही काळाने त्यांचा समाज सुद्धा या गोष्टी विसरून गेला असता.
पण त्यामुळे, मुलाच्या अंगावर पडलेले डाग धुतले जाणार होते का.?
किंवा.. ती मुलगी समाजात वर तोंड करून चालू शकणार होती का.?
मुलाची बाजू जरी असली.. तरी त्याला सुद्धा लाज अब्रू आहेच कि. तर मग, मुलींचा विषय किती अवघड असेल.? मुलीचा विषय म्हणजे निव्वळ काचेचं भांडं..
पण गुन्हेगाराच्या बाबतीत विचार करायला गेलो तर.. गुन्हा सिद्ध होवो अथवा न होवो. एकदा सजा भोगून आल्यावर, क्लीन चीट मिळून त्याचा काहीही फायदा होत नसतो.
आपला समाज फक्त शिक्षा झालेली पाहात असतो. पण त्यातून निर्दोष मुक्तता झाली, या विषयाला कोणीच महत्व देत नसतं.
त्यामुळे असं कोणतंही दूषकृत्य करताना. त्याचे दूरगामी परिणाम आपल्याला कोणत्या प्रकारे भोगावे लागतील.? ते सांगता येत नाही. याचा विचार करणं फार महत्वाचं आहे.
कालांतराने..
त्या मुलीकडे ( आता, ती म्हातारी झाली असेल. किंवा गेली सुद्धा असेल. ) पाहताना, लोक मनात तरी म्हणत असतीलच कि. कधीकाळी हिच्यावर बलात्कार झाला होता..!
या विषयाचा अजून एक पैलू आहे..
कधी कधी तर, खोटे नाटे आरोप करून असे प्रकार मुद्दाम घडवून, काही महिला आणि पुरुषांकडून आपल्या ठराविक एखाद्या व्यक्तीवरील आपल्या राग सुद्धा काढला जातो.
पण.. असं करण्यामुळे,
एखाद्याच्या आयुष्याचा आपण बाजार मांडत आहोत. त्यांचं वाटोळं करत आहोत. हे त्यांच्या ध्यानात येत नाही.
फक्त सूड भावनेने पेटून, अशा कारवाया केल्या जातात. त्यामुळे.. प्रत्येक स्त्री, पुरुषाने असे विषय खूपच डोळसपणे हाताळायला शिकलं पाहिजे.

No comments:

Post a Comment