Thursday, 8 November 2018


कोल्हापुरातील.. मटन खानावळी, आणि तिथे असणाऱ्या तमाम हॉटेल्स बाबत हि विशेषण अगदी तंतोतंत लागू पडतं. तिरुपती वरून कोल्हापूरला येताना, कोल्हापुर रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडल्यावर.. आम्ही, राजपुरुष हॉटेलमध्ये उतरत असतो.
तर.. तिकडे चालत जाताना, मला एक चाणाक्ष रिक्षावाला भेटला. #राजपुरुष हे हॉटेल रेल्वेस्थानकापासून अगदी जवळ आणि चांगलं सुद्धा आहे. आम्ही चालतच तिकडे निघालो होतो, तर तो रिक्षावाला मला म्हणाला..
राजपुरुषला जाणार असाल, तर माझ्या रिक्षात चला. मला काही भाडं वगैरे देऊ नका. तुम्ही तिथे रूम घेतल्यावर मला शंभर रुपये कमिशन मिळून जाईल.
जमतंय कि मग, पाच मिनिटाच्या अंतरात आपल्या पासून कोणाचा तरी फायदा होतोय. आणि त्यात आपलं सुद्धा काही नुकसान नाही. अशा पद्धतीने, कोल्हापुरात सुद्धा मला एक चाणाक्ष #पुणेकर मिळाला.
रूममध्ये अंघोळी उरकल्या, बाहेर पडलो.. रंकाळा परिसरात थोडासा फेरफटका मारला, आणि आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनाला निघालो. खरं तर, कोल्हापुरात माझा फार मोठा फेसबुक मित्रपरिवार आहे. पण.. आल्यासरशी सर्वांना भेटायला वेळ देता येत नाही, म्हणून मी कोल्हापुरात गेल्यावर फेसबुकवर पोस्ट वगैरे करणं मुद्दाम टाळत असतो. तरी सुद्धा.. #नियर_बाय हा ऑप्शन पाहून खातरजमा करण्यासाठी एका कोल्हापुरी मित्राचा मला फोन आलाच.
दादा कोल्हापुरात आहात का..?
त्यांच्याशी थोडी बातचीत केली. घाईमुळे भेट काही होणार नव्हती. जमल्यास भेटू म्हणालो, पण ते काही जमलं नाही.
महालक्ष्मी मंदिरात कितीही गर्दी असली, तरी..माझ्या एका फेसबुक मित्राकरवी, मला तिथे व्हीआयपी दर्शन सुद्धा मिळत असतं. पण मी ते मुद्दाम टाळत असतो. एकदा त्यांच्या मार्फत असंच व्हीआयपी दर्शन घ्यायला गेलो. आणि दर्शन बारीत असणाऱ्या लोकांच्या शिव्या शाप ऐकून आलो. त्यामुळे तेंव्हापासून तो विषय मी नेहेमी टाळत असतो. ( त्या मित्राचं नाव मी इथे मुद्दाम टाकत नाहीये, नाहीतर इतर मित्र त्यांना त्रास द्यायचे.  ) तिरुमला येथे.. बालाजीच्या दर्शनाला आठ दहा तास लाईनीत उभं राहता येतंय. तर मग.. महालक्ष्मीच्या दारात तासभर थांबायला काय हरकत आहे.?
हॉटेल राजपुरुष मधील शुद्ध शाकाहारी जेवणाची थाळी फारच प्रसिद्ध आहे, असं मला तिथे गेल्यावर समजलं. तिथे पोर्चमध्ये, काही महिला जेवण कधी तयार होईल याची वाट पहात होत्या. पण, सातच्या आत तिथे काहीच मिळत नाही असं समजलं.
तिकडे काहीही असो, पण.. कोल्हापुरात गेल्यावर #शाकाहारी जेवण करणं मला काही पटत नाही. कोल्हापूर म्हणजे, अस्सल #मांसाहार. हे गणित माझ्या डोक्यात अगदी फिट्ट झालं आहे. कोल्हापुरात घरगुती खानावळी आणि हॉटेल्सची बिलकुल कमतरता नाहीये.
कुंभार गल्लीमध्ये तर.. अगदी दोन घरं सोडली कि एक खानावळ आहे म्हणतात. पण मी स्वतः कुंभार असून सुद्धा, त्या गल्लीत अजून गेलो नाहीये.
मी तर म्हणतो, एकट्या कोल्हापुरात जेवढ्या मटन खानावळी आणि हॉटेल्स असतील. तेवढी सगळी मिळून उभ्या महाराष्ट्रात सुद्धा नसतील. आणि हे का कमी म्हणून, कोल्हापुरात चिक्कार रस्सा मंडळं सुद्धा आहेतच. म्हणून मी हौसेने म्हणत असतो. पर्यटना सोबतच.. #कोल्हापूर म्हणजे, मांसाहारी खवय्येगिरी करणाऱ्या व्यक्तींसाठी मटणाच्या हॉटेलांचा सुद्धा #महापूर आहे.
जेवण करायला.. कोल्हापुरातील एक मित्र आम्हाला, रंकाळ्या शेजारील #मिनी_वसंत_घरगुती_खानावळ येथे घेऊन गेला.
मी.. आजवर #गंधार किंवा #पद्माला बरेचदा जेवण केलं आहे. पण या मित्राच्या, मित्राचा आग्रह आम्हाला काही मोडवेना. आणि आम्ही त्या छोटेखानी हॉटेलमध्ये दाखल झालो.
थोडं #मोकळं व्हावं म्हणून, त्या हॉटेल मालकाला टॉयलेट कुठे आहे म्हणून विचारलं. तर म्हणाला.. एक दुकान सोडल्यावर गल्लीतून पुढं जावा. तिथं हाय बघा..!
हे बाकी आपल्याला खास आवडलं, लाजाय लपायचं बिलकुल कामच नाही. सरळ सरकारी शौचालयाचा रस्ता दाखवायचा.
या मिनी वसंत हॉटेलमध्ये खूपच स्वस्त जेवण होतं. वेगवेगळ्या मेन्यू प्रमाणे.. नव्वद, शंभर आणि एकशे तीस रुपयाला मर्यादित मटन थाळी येथे उपलब्ध होती. शिवाय.. पन्नास साठ रुपयाच्या घरात, इतर पदार्थ सुद्धा उपलब्ध आहेत.
इथे असणाऱ्या एकशे तीस रुपयाच्या थाळीमध्ये, मटन खिमा दिला जातो. रात्रीचे दहा वाजले होते, मटन खिमा उपलब्ध नसल्याने, आम्हाला नाईलाजाने शंभर रुपयावाली थाळी घ्यावी लागली..
छोट्याशा ताटात, एका मोठ्या डिशमध्ये मटन आणि रस्सा होता. मटन अगदी जास्ती सुद्धा नाही, आणि फारच कमी सुद्धा नाही. पण अस्सल खादाड व्यक्तीला ते मटन नक्कीच पुरेसं नाही. हे मात्र तितकच खरं, दुसऱ्या वाटीत अर्धा अंडा मसाला होता, तर बाकी दोन वाटयामध्ये तांबडा आणि पांढरा रस्सा होता. दोन मोठाल्या कोल्हापुरी चपात्या, आणि मसाला राईस. असा एकंदरीत, साधा आणि सुटसुटीत पाहुणचार होता.
चवीचा विषय म्हणाल.. तर, घरगुती विषय असल्याने जास्ती भडक, तिखट किंवा जळजळ होणारं असं जेवण नव्हतं. अगदी सुरवातीला, मी.. तांबडा आणि पांढरा रस्सा जिभेला चटका सहन होईल असा ओरपला, नंतर.. तिन्ही चपात्यांचा मटन आणि अंडा मसाल्या सोबत खंगरी समाचार घेतला. आणि सरते शेवटी मसाले भातावर तडाखा मारला.
खरं तर.. शंभर रुपयात आजच्याला काय येतय हो..? त्यामुळे मला आणखीन एक मटणाची वाटी हवी होती. पण नेमकं मटन संपलं असल्याने, माझी जिव्हा मला आवरती घ्यावी लागली. जास्ती हायफाय पण नाही, आणि अगदीच साधं सुद्धा नाही. अशा पद्धतीची हि घरगुती खानावळ वजा हॉटेल आहे.
मी.. मांसाहाराचा निस्सीम भक्त असल्याने, मला हे जेवण आवडलं नाही, किंवा खूपच साधं होतं, असं मुळीच म्हणता येणार नाही. शेवटी, अन्न हे #पूर्णब्रह्म आहे.
त्यामुळे.. कोल्हापुरात आल्यावर, माझी नवनवीन हॉटेल्स आणि मटन खानावळीची माझी शोध मोहीम अशीच चालू राहील..
पुन्हा कधी येणं झाल्यावर, नवीन ठिकाणचा समाचार घेऊ. आणि वेळ काढून, सगळ्या कोल्हापुरी मित्र मैत्रिणींची महेफील सुद्धा जमवू..!


No comments:

Post a Comment