Thursday, 8 November 2018

उसनवारी घेतलेल्या पैशावरून एक किस्सा आठवला.
माझ्या ओळखीतल्या एका व्यक्तीला, उसनवारी पैसे घेण्याची खूप घाण सवय होती.
सवय तर घाण होतीच. पण.. घेतलेले पैसे तो कोणाला वेळेवर परत सुद्धा करत नसायचा. विषय अगदी हजार पाचशे रुपयाचा असायचा. त्यामुळे कोणी जास्तीचं मनावर घेत नसायचं. आणि अर्थातच, त्यामुळे याचं बाकी खूप फावायचं. तो, रोजच्या रोज नवीन ओळखी करून त्यांना टोप्या घालतच राहायचा. त्याचं काम अगदी राजरोसपणे चालू होतं.
पण एकदा काय झालं..!
एका व्यक्तीने त्याच्या भूलथापांना बळी पडत, उसने म्हणून त्याला पाच हजार रुपये दिले. या गोष्टीला बरेच दिवस उलटून गेले. पैसे परत देण्याची वेळ होऊन गेली. तरी सुद्धा हा गडी पैसे द्यायचं काही नाव घेईना.
शेवटी त्या व्यक्तीने याला दमदाटी सुरु केली. तरी सुद्धा हा काही त्याला बधत नव्हता.
शेवटी तो समोरील व्यक्ती सुद्धा वैतागला, आणि.. एकदा या पैशापायी त्याने भर चौकात त्याच्या कानाखाली जाळ काढला.
त्यावर समोरील व्यक्तीची प्रतिक्रिया होती..
पैसे देतो म्हणलं होतं ना..! मग मारायचं काय कारण होतं.? लेट होईल म्हणलं होतं, नाही म्हणलं होतं का.?
आता मी तुला पैसे देत नसतोय..!
आणि जर तुला तुझे पैसे हवे असतील, तर.. चारचौघात मी सुद्धा तुझ्या मुस्कटात मारून मगच पैसे देणार. जमत असलं तर सांग, मला बी या गोष्टीचा लै बेक्कार राग आहे. मला काही इज्जत आहे की नाही.? तुला मी आत्ताच मारला असता. माझे हात काय XXX गेले नाहीत.
असल्या फालतू माणसाकडून कोण मार खाऊन घेईल.?
आणि या फालतू विषयावरून मारामारी करून पोलीस चौकीच्या पायऱ्या झिजवण्यात काहीच हाशील नव्हतं. असा विचार करत, त्या व्यक्तीने आपल्या पैशावर कायमचं पाणी सोडलं.
पण..तो गडी मात्र आजही, नवनवीन शक्कल लढवून नवनवीन लोकांकडून पैसे उकळण्याचे धंदे करतच आहे. आणि विशेष म्हणजे त्यात त्याला जय सुध्दा आहे..!

No comments:

Post a Comment