Thursday, 8 November 2018

परवा सकाळी, आमच्या ऑफिसमध्ये एक उच्चशिक्षित तरुण मुलगा, सॉक्स विकण्यासाठी आला होता. त्याच्या हातामध्ये सॉक्सचे दोनचार मोठाले गठ्ठे होते. आणि पाठीवर, सॉक्स भरलेली एक सॅग बॅग होती.
त्यात.. लहान, मोठे, बारीक, आखूड.. अशा विविध साईजचे बरेच सॉक्स होते.
आमच्या ऑफिसमध्ये शूज घालणारी बरीच मंडळी असल्याने, त्या मित्राचे भरपूर सॉक्स तिथे नेहेमी विक्री होत असतात.
नेहेमीप्रमाणे.. आज सुद्धा तो आमच्या ऑफिसमध्ये सॉक्स विक्री करण्यासाठी आला.
तो मुलगा, साठ रुपयाला तीन जोडी सॉक्स विकत होता. म्हणजे, वीस रुपयाला एक जोडी, तरी सुद्धा काही लोकं..
पन्नासला तीन जोड्या दे कि..!
असं म्हणून, त्याच्याशी हुज्जत घालत भाव करत होते. तो मुलगा सगळ्यांना म्हणत होता.
साहाब..एक जोडीके पीछे, मुश्कीलसे दो, तीन रुपये छुटते है..!
पण लोकं कसली ऐकतात हो,
तर.. तिथे असणाऱ्या काही लोकांनी, पन्नास रुपयाला तीन-तीन जोड्या सॉक्स विकत घेतले.
शेवटी.. माझ्या सोबत असणाऱ्या एका मित्राने सुद्धा, तीन जोड्या सॉक्स घेतले. आणि, त्याच्या हातावर पन्नास रुपये टेकवले. तसा तो मुलगा माझ्या मित्राला म्हणाला..
साहाब.. और दस रुपये दिजीये..!
मित्र म्हणाला.. तू सगळ्यांना पन्नास रुपयाला सॉक्स दिले. आणि मला साठला विकतोस होय.? हा सगळा प्रकार मी अगदी जवळून पहात होतो, मी तडक माझ्या मित्राला म्हणालो. त्याला अजून दहा रुपये दे.!
दहा रुपये, हि खूप छोटी रक्कम होती, दहा रुपयाला आज बाजारात अशी किती किंमत आहे.?
साधा वडापाव सुद्धा, पंधरा रुपयाला झाला आहे. मग इतर गोष्टी फारच दूर राहिल्या.
तर.. माझ्या मित्राने सुद्धा माझा मान राखत, पाकिटात हात घालून, लगेच त्याला एक्स्ट्रा दहा रुपये देऊ केले. तेंव्हा तो मुलगा म्हणाला..
साहेब.. तुम्ही हे दहा रुपये मला अगदी मनापासून देत असाल तर द्या, नाहीतर राहूद्यात..!
त्यावर मी त्याला म्हणालो.. अरे मित्रा, द्यायचे नसते तर हा प्रकार आम्ही केला नसता.
हा वार्तालाप घडल्यानंतर, तो मुलगा आम्हाला म्हणाला. तुमच्या सारखी फार कमी लोकं असतात. कि.. आम्ही मागून घेतल्यावर लगेच पैसे देऊ करतात.
पण, काही लोकं किती नालायक असतात. हे मी तुम्हाला सांगतो. आणि त्याने, त्याच्या सोबत घडलेली एक सत्यघटना आम्हाला सांगितली.
म्हणाला.. एकदा असेच सॉक्स विकत मी निघालो होतो.
सॉक्स विक्री करण्यासाठी, आम्हाला बरीच पायपीट करावी लागते. दिवसभरात साधारण, पंधरा ते वीस किलोमीटर अंतर आमचं चालणं होतं.
रस्त्यावर चालताना, सगळी लोकं एकमेकांच्या तोंडाकडे पाहात असतात. परंतु.. आम्ही मात्र, फक्त लोकांच्या पायाकडे पाहात असतो. कोणाच्या पायात शूज दिसला, कि लगेच त्याला सॉक्स विकत घेण्याची गळ घालतो. असा आमचा व्यवसाय आहे.
तर, त्यादिवशी.. बाईकवर असणाऱ्या एका व्यक्तीने मला थांबवलं. भावताव करून, माझ्याकडून एक डझन लेडीज सॉक्स विकत घेतले. आणि, एक डझन जेन्ट्स सॉक्स सुद्धा घेतले. मोठं गिर्हाईक झालं असल्याने, मी खूप खुश होतो.
त्या व्यक्तीने.. ते सगळे सॉक्स, त्याच्या बाईकच्या डिकीत ठेवले. त्याची बाईक चालूच होती. आणि.. डोळ्याची पापणी लवती न लवती तोच.. अगदी काही सेकंदात, बाईकला गियर टाकून तो मनुष्य सुसाट वेगाने माझे पैसे न देताच पळून गेला.
चोवीस जोड्या सॉक्स म्हणजे, जवळपास पाचशे रुपयाचा माल होता. आता काय करावं.?
मी तर.. चालतच निघालो होतो, त्याचा पाठलाग तरी कसा करावा.? पळत जाणं सुद्धा शक्य नव्हतं. मी या विचारात असताना. दोनचार बाईकवाल्या व्यक्तींना, मी विनंती वजा हात सुद्धा केला. पण कोणीच थांबला नाही. शेवटी.. कर्मधर्म योगाने, समोरून एक पोलीसवाला मला येताना दिसला. मी त्यांना हात केला. तसे ते थांबले.
घडलेला सगळा प्रकार मी त्यांना सांगितला, म्हणालो.. तो मनुष्य कोरेगाव पार्क रोडने, कल्याणीनगरच्या दिशेने गेला आहे. त्या पोलिसाने, ताबडतोब त्याला आपल्या बाईकवर बसवलं, आणि त्या दिशेने ते दोघे सुसाट निघाले.
पुढे.. कल्याणीनगर ( हॉटेल वेस्टीन ) चौकात, बाराही महिने ट्राफिक जाम असतं. तसं त्यावेळी सुद्धा होतं. आणि त्या गर्दीमध्ये, बाईक वरून खाली उतरून तो मनुष्य याने लगेच ताडला. पोलिसाने सुद्धा त्याची बाईक बाजूला पार्क केली. त्या व्यक्तीपाशी गेला, आणि.. पहिली, त्याच्या गाडीची चावी काढून घेतली. आणि त्याला बाईक बाजूला घ्यायला लावली. बाईक बाजूला घेतल्यावर, तो पोलीस.. त्या व्यक्तीला म्हणाला..
तुला, एक हजार रुपयाची दंडाची पावती करावी लागणार आहे..!
तो मनुष्य म्हणाला, मी का म्हणून दंडाची पावती करू.?
पण, तो पोलीस सुद्धा खूप चलाख होता. तो त्याला अगदी रागातच म्हणाला,
तू.. बंड गार्डन चौकात सिग्नल तोडून आला आहेस. इतक्या लांब तुझा पाठ्लाग करत यायला मी काही मूर्ख आहे का.?
त्या हुशार पोलिसाने हवेत सोडलेला बाण अगदी निशाण्यावर लागला होता. बहुतेक तो हरामखोर व्यक्ती सिग्नल तोडूनच पुढे आला असावा. आणि, हा कांड करून पुढे गेला असावा.
मग काय.. झक मारत त्या व्यक्तीला एक हजार रुपये दंडाची पावती करावी लागली.
शिवाय.. या मुलाचा मुद्देमाल सुद्धा त्याला परत द्यावा लागला. घडलेला हा सगळा प्रकार, आजूबाजूला असणारी लोकं सुद्धा पाहात होते. म्हणून तो व्यक्ती त्या सॉक्स विक्रेत्या मुलाला सॉक्स न देता पैसे देऊ लागला. तर तो मुलगा म्हणाला..
मला तुम्हाला माल विकायचा नाहीये. पैसे नको, माझे सॉक्स मला परत द्या..!
तो पोलीसवाला चांगला माणूस होता. त्याने त्या मुलाला पुन्हा बंड गार्डन चौकात आणून सोडला. आणि आपल्या कामाला निघून गेला.
हे सगळं ऐकल्यावर.. मी त्या मुलाला म्हणालो, सॉक्स घेतल्यावर त्या व्यक्तीच्या कानाखाली तू आवाज का नाही काढलास.? तर म्हणाला..
साहाब.. पेट भरणे के लिये यहां आये है, झगडा करणे के लिये नही..!
त्या मुलाच्या या उत्तरावर, मी अगदी निरुत्तर झालो. इलाहाबादी असून सुद्धा, तो मुलगा फारच सौम्य वाटत होता.
तर.. माझ्या सर्व मित्रांना या दिवाळीत मी हा एकच संदेश देणार आहे.
उंची मॉलमध्ये जाऊन, आपण फारच उंची आणि महागड्या वस्तू खरेदी करत असतो. खरेदी करताना, त्या वस्तू ओरीजनल आहेत कि नाही.? ते सुद्धा आपल्याला माहिती नसतं, फक्त छापील ब्रँड पाहून, भरपूर रोकडा मोजून आपण त्या वस्तू खरेदी करत असतो.
तर आजपासून.. असे छोटेमोठे विक्रेते, काही वस्तू विक्री करायला तुमच्याकडे आले.
तर.. त्यांच्याकडे असणाऱ्या वस्तू तुम्ही नक्की विकत घेत चला.
मोठमोठे #शॉपिंग_मॉल वाले, भरपूर #माल कमवून बसले आहेत.
जरा.. गोर गरिबांची #दिवाळी सुद्धा साजरी होऊद्यात..!

No comments:

Post a Comment