Wednesday, 21 November 2018


आजच्या दिवशी आम्हाला.. अजमेर शरीफ दर्गा आणि पुष्कर येथील ब्रम्ह मंदिराला भेट देण्यासाठी जायचं होतं. सकाळी नऊ वाजता आमच्या प्रवासाला सुरवात झाली. जयपूर ते अजमेर हे एकूण एकशे तीस किलोमीटरचं अंतर. आणि अजमेर ते पुष्कर हे सोळा किलोमीटरचं अंतर होतं. अगदी सुरवातीला आम्ही, अजमेर शरीफ दर्गा येथे निघालो.
आमची पन्नास सीटर बस असल्याने, ती बस काही अजमेर दर्ग्याच्या आतील बाजूस येत नव्हती. म्हणून त्या बसला हायवेवर पार्क करून आम्हाला रिक्षा करुन दर्ग्या पर्यंत यावं लागलं. तिथे रिक्षा वाल्यांची एक वेगळीच पद्धत मला पाहायला मिळाली. एकदा भाडं ठरवलं, कि जाता येता त्याच रिक्षाने प्रवास करावा लागतो. नाहीतर ते विनाकारण आपल्याशी हुज्जत घालतात.
रिक्षात बसून, आम्ही दर्ग्याच्या दिशेने निघालो. आमची रिक्षा एका ठिकाणी थांबली..
आणि गल्ली बोळातून मार्गक्रम करत आम्ही दर्ग्याच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर आलो. दुरूनच प्रशस्थ असं त्या दर्ग्याच भव्य प्रवेशद्वार आम्हाला दिसत होतं.
दर्गारोड.. रस्त्याच्या दुतर्फा, हार फुलं आणि लोबान ( धूप ) विक्रीची दुकानं थाटली गेली होती. त्यातच काही जर्मलच्या विशिष्ट प्रकारच्या भांड्याची दुकानं सुद्धा दिसून येत होती. सायकलवर पाणी पुरीची विक्री करणारे छोटे व्यापारी दिसत होते. प्रत्येक दुकानात लोबान ( धूप ) प्रज्वलित केला असल्याने, सर्व परिसर सुगंधित झाला होता. दर्ग्याच्या परिसरात, फारच मोठ्या प्रमाणात अपंग भिक्षेकरी दिसून येत होते. त्यांची विकलांगता पाहून, काळजात अगदी चर्रर्र होत होतं. हा सगळा लवाजमा पाठीमागे सारत आम्ही पुढे निघालो होतो.
त्या दर्गा प्रवेशद्वारा समोर.. पादत्राणे काढायची फार मोठी व्यवस्था केली होती. एका चप्पल साठी दहा रुपये भाडं आकारलं जात होतं. आणि त्या चपला सुद्धा एका विशीष्ट प्रकारे गठ्ठा करून बांधून ठेवल्या जात होत्या. ते कसब पाहून मी खरोखर दंग झालो होतो.
काही वेळातच.. हार फुलं घेऊन, डोक्याला रुमाल गुंडाळून आम्ही दर्ग्यात प्रवेशित झालो. आणि एक मुजावर आमच्याकडे आला. आणि आम्हाला दर्शनासाठी घेऊन गेला. इथे एक गोष्ट बाकी लक्षात आली, कि एक मुजावर आपल्या जवळ आल्यावर दुसरा मुजावर आपल्याला दर्शनाला घेऊन जाण्याची जोर जबरदस्ती करत नाही. बरेच भाविक लोकं, आपल्या डोक्यावर फुलांची एक छोटीशी परडी घेऊन दर्शनाला जाताना दिसत होते. आम्ही आतमध्ये गेल्यावर, एक व्यक्ती पखालीने पाणी पुरवण्याचं काम करत होता. इथे फार वर्षांनी मला पखाल पाहायला मिळाली. ( पखाल म्हणजे, बकऱ्याच्या चामडी पासून बनवलेली, पाणी वाहण्याची चामडी पिशवी असते.)
गर्दीतून वाट काढत तो मुजावर आम्हाला दर्ग्यात घेऊन निघाला होता. भल्यामोठ्या गर्दीतून आम्ही मुख्य मजारीपाशी पोहोचलो. तिथे मुख्य मुजावाराच्या गळ्यात, भल्या मोठ्या लाल पिवळ्या नाड्यात गुंफलेल्या मोठ्या चावीचा एक जुडगा दिसून येत होता.
तिथे भक्तिभावाने फुलांची चादर अर्पण केली. भक्तिभावाने नमन करत आम्ही तेथून बाहेर पडलो. आतील बाजूस, हि सोनेरी रंगाची दर्गा फारच कलाकुसर केलेली दिसून येते. इथे असणारा जन्नती दरवाजा चांदीचा बनवला गेला आहे. सगळीकडे आरशाचे आणि हिऱ्याचे मनी लाऊन मस्त नकाशी तयार केलेली दिसून येते. आरशी काचामुळे, सगळीकडे झगमगाट पसरलेला असतो. सगळी दर्गा संगमरवरी असल्याने, त्याठिकाणी एक विशिष्ट प्रकारचा गारवा जाणवत होता.
बाहेरील बाजूस.. काही कव्वाल ख्वाजाच्या कव्वालीचे गायन करत होते. तिथे काहीवेळ व्यतीत केला. दर्ग्याच्या मागील बाजूस काही महिला अक्षरशः रडून रडून मन्नत मागत असताना दिसत होत्या. मी असं ऐकून आहे, कि हे देवस्थान नवसाला पावणारं आहे. आणि इथे मागितलेली मुराद नक्कीच पूर्ण होत असते. विशेष म्हणजे, नवस करायला आलेल्या महिलांमध्ये जास्तीकरून राजस्थानी हिंदू महिलांचा फार मोठा भरणा होता. मन्नत मागताना, लाल आणि पिवळ्या रंगाचा नाडा तिथे असणाऱ्या लोखंडी आणि संगमरवरी तावदानांना बांधला जात होता.
आणि तेथून बाहेर पडलो. बाहेर पडताना, तिथे मला एक भलीमोठी कढई दिसली, ज्यामध्ये.. दान केलेल्या वस्तू टाकल्या होत्या. त्यात.. तांदूळ, सुखामेवा, सोनं, चांदी, ते अगदी देशी-विदेशी चलनाची बंडलं सुद्धा दिसून आली. दर्शन आटोपलं, आता दुपारी आम्हाला.. पुष्कर येथे जायचं होतं. म्हणून जास्तीचा वेळ न दवडता. आम्ही तेथून ताबडतोब बाहेर पडलो..
क्रमशः

No comments:

Post a Comment