Thursday, 8 November 2018

सुरवातीच्या काळात, मी.. एका खाजगी कंपनी मध्ये सुपरवायजर म्हणून कामाला होतो. तिथे, हा विनोदी प्रसंग घडला होता.
सकाळी नऊची वेळ असावी.. आमच्या ऑफिसमध्ये कामाला असणाऱ्या टेलिफोन ऑपरेटर अजून आल्या नव्हत्या. त्यामुळे, बाहेरून येणारे सगळे फोन कॉल्स माझ्याच टेबलवर येत होते.
त्यादिवशी सकाळच्या पारी.. असाच एक फोन आला.
मी तो फोन उचलला,
हॅलो, कोण बोलतय ? पलीकडून, एक मुलगी बोलत होती.
हेल्लो, तुकाराम वाचमीन हायेत का ?
आमच्या इथे, तुकाराम नावाचा कोणी वॉचमेणच काय.. त्या नावाचा, कोणी कामगार सुद्धा नव्हता. त्यामुळे सुरवातीला मी सुद्धा थोडा गोंधळून गेलो. समोरून बोलणारी मुलगी, थोड्या ग्रामीण भाषेत बोलत होती. बहुतेक आसपासच्या भागातील खेडेगावात राहणारी ती मुलगी असावी.
आणि नेमकं, त्यादिवशी कंपनी मध्ये मला म्हणावं असं काम सुद्धा नव्हतं. म्हणून, मला जरा त्या मुलीची फिरकी घ्यावीशी वाटली.
मी त्या मुलीला म्हंटलो, एक मिनिट थांबा हां.. मी, तुकारामला बोलावून घेतो.
आणि, मी मुद्दामच मोठ्याने आवाज दिला. तुकाराम, तुझ्यासाठी एका महिलेचा फोन आहे..!
थोड्यावेळाने, पुन्हा मी स्वतःच रिसिव्हरवर रुमाल ठेऊन तिच्याशी बोलायला सुरवात केली.
हेल्लो, कोण बोलतंय..?
( ती लटक्या आवाजात ) हेल्लो मी बोलतेय.. किती दिवस झाले, तुम्ही फोन का नाय केला मला..?
आगं कामामुळे वेळ मिळत नाही बाई, कामाचा लय ताप वाढलाय. तुला खोटं वाटल, चार दिवस मी घरी गेलोच नाही, दोन वाचमेण कामाला येईनाच झालेत.
( ती लटक्या आवाजात ) ते सगळं खरं आहे, पण.. आता किती दिवस झाले, तुम्ही मला भेटले पण नाय..!
हो ना... सांग ना, कधी भेटायचं आपुन, मला सुद्धा फार भेटावं असं वाटतंय.
( ती लटक्या आवाजात ) उध्याच्याला भेटताल का..?
हो भेटू कि, पण कुठं भेटायचं ?
( ती लटक्या आवाजात ) मागच्या वेळेस आपण कुठं भेटलो..? तिथच...!!
आता बाकी, मला प्रश्न पडला. तिला नेमकं काय उत्तर द्यावं.?
कारण, ते ठिकाण फक्त त्या #तुकारामालाच माहित होतं, या #पांडुरंगाला नाही..!
थोडा विचार करून मी पुन्हा म्हंटल.. आगं पण कुठं..?
आता मात्र, तिला सुद्धा थोडी शंका आली.
आणि ( थोड्या घाबर्या आवाजात ) ती मला म्हणाली. खरं सांगा तुम्ही कोण बोलताय...?
मी म्हटलं, आगं बाई... मी, तुझा तुकारामच बोलतोय.
( थोड्या घाबर्या आवाजात ) ती म्हणाली, नाय बया मला तुमी कुणी तरी वेगळेच वाटताय..!
मी म्हणालो, आगं नाही... मी तुझा तुकारामच बोलतोय.
त्यावर ( थोड्या लटक्या आवाजात ) ती म्हणाली, मग सांगा बरं माझं नाव काय आहे.?
आता मात्र, मला तिने पक्कं कोड्यात पाडलं होतं. कोड्यात काय, चक्क पकडलच होतं..
आणि, मी एकदम म्हणून गेलो... #सोने.. ( त्याकाळी मुलींचं सोनी नाव ठेवायची लई फॅशन अली होती. ) असं का म्हणून तू मला विचारायला लागलीस.?
माझा खेळ संपला होता, माझा निशाना काही बरोबर लागला नव्हता. आणि घाबर्या आवाजात ती मला म्हणाली.
नाय बया.. तुमी कोण तरी वेगळेच दिसताय..!
शेवटी, मला सुद्धा हसू आवरलं नाही.. आणि, मोठ्याने हसत मी तिला म्हणालो.
हॅलो ताई.. तुमचा रोंग नंबर लागला होता. मलाही काही काम नव्हतं, म्हणून तुमची थोडी गंमत केली.. माझ्या या वक्तव्यावर, ती मुलगी सुद्धा थोडी हसली,
आणि, फोन कट झाला..!

No comments:

Post a Comment