Thursday, 8 November 2018

पुणे देशातील एक नंबरचं शहर झालंय..?
शक्य आहे का राव हे, माझा जन्म याच पुण्यात झाला आहे. आज.. माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी भारतात एक नंबरला आहे. हे ऐकून कोणालाही आनंद होईल. निश्चितच मला सुद्धा त्याचा आनंद आहे. पण हा बेगडी आनंद साजरा करून काय हाशील होणार आहे.?
हो.. अगदी खरं बोलतोय मी, आजमितीला पुण्यात.. हजारो इमारती ग्राहकांच्या प्रतीक्षेत तिष्टत उभ्या आहेत. राजकारणी लोकांचा करोडो रुपयाचा माल त्यात अडकून पडला आहे. फ्ल्याट घ्यायला ग्राहक नाहीयेत. कारण माझा पुणेकर खूप गरीब आणि मध्यमवर्गीय आहे हो. तर मग, हे करोडो रुपये किमतीचे फ्ल्याट नेमके कोणासाठी बनवले गेले असावेत.?
तर दुसरीकडे.. इच्छा असून देखील काही लोकं स्वतःचं हक्काचं घर घेऊ शकत नाहीयेत. कारण पुण्यात घराच्या किमती अगदी आभाळाला भिडल्या आहेत.
माझ्या माहितीप्रमाणे हे सगळं षडयंत्र आहे, अशा फसव्या जाहिराती करून. खोटे अहवाल सादर करून, देशभरातील आणि जगातील लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घ्यायचं. आणि आपली पोळी कशी शेकली जाईल याकडे लक्ष द्यायचं.
अहो.. आजच्याला पुण्यात इतकं भयंकर प्रदूषण वाढलं आहे. कि इथे मोकळा श्वास घेणं सुद्धा दुरापास्त झालं आहे. वाहतूक कोंडीचा विषय तर न बोलालेलाच बरा. मग कोणत्या अर्थाने माझं पुणे एक नंबरला आहे.?
पूर्वी पुणे हे सायकलीचं शहर म्हणून ओळखलं जात होतं. पण आजच्याला आमच्या पुण्यात अगदी औषधाला सुद्धा सायकल सापडत नाहीये. माझ्यासारख्या काही होतकरू व्यक्तींनी, सायकल चालवण्याचा संकल्प केला. तर पुण्यातील ट्राफिकने, आमच्या स्वप्नांची राखरांगोळी करून टाकली. मग कोणत्या अंगाने पुणे देशात एक नंबरला आहे.?
पुण्यात पार्किंगला स्वतःची जागा नसली तरी, कारची सर्रास विक्री होत आहे. त्यामुळे टुरिस्ट गाड्या इतक्या वाढल्या आहेत कि सांगता सोय नाही. पर्यायाने..सगळे रस्ते यांच्या पार्किंगची ठिकाणं झाली आहेत.
" घरमे नही दाणा, और अम्मी पुरी पकाना. "
निव्वळ अशातली गत झाली आहे.
पुणे स्टेशन सारख्या परिसरात अजूनही दिवसा ढवळ्या वाटमारी होत असताना पाहायला मिळतेय. बेरोजगार युवकांची इथे भलतीच भरमार आहे. मग कोणत्या अर्थाने माझं पुणे एक नंबरला आहे.? कोणी जाणकार व्यक्ती या विषयावर प्रकाश टाकू शकेल का.?

No comments:

Post a Comment