Thursday, 8 November 2018

काही बिहारी लोकं, स्मशान भूमीच्या बाहेर भोला पान चघळत बसले होते. त्यांच्यामध्ये, दबक्या आवाजात काहीतरी बातचीत चालू होती. कुतूहल म्हणून, मी त्यांच्यापाशी गेलो.
आणि, त्यांना इथे बसण्याचं कारण विचारलं..
त्यातील एकजन म्हणाला, 'अस्थी' लेनेके वास्ते रुखे है..!
मी जास्तीची विचारपूस केली असता, फारच धक्कादायक माहिती माझ्यासमोर आली.
युपी, बिहार वरून मोलमजुरी करिता, बरीच लोकं पुण्यात येत असतात. शिक्षण नसल्यामुळे, आणि त्यांच्या गावात रोजगाराची संधी उपलब्ध नसल्याने, इथे पुण्या मुंबईत येऊन मोलमजुरी करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नसतो. आणि, शहरात आल्यावर लवकरात लवकर काम कुठे मिळत असेल.? तर, ते म्हणजे बांधकाम व्यवसायात.. अशा ठिकाणी, लोकांची नेहेमीच कमतरता भासत असते. त्यामुळे, मागेल त्याला काम. हे ब्रीदवाक्य फक्त इथेच सत्यात उतरतं.
मोठमोठ्या इमारती बांधत असताना. तिथे, छोटे मोठे अपघात हे नेहेमी घडत असतात.
पण, कधी-कधी एखाद्या मोठ्या अपघातामध्ये एखाद्याचा मृत्यू सुद्धा ओढवतो. किंवा, कोणाचा नैसर्गिक मृत्य सुद्धा ओढवू शकतो. अशा वेळेस, नेमकं काय केलं जात असावं..?
मी आता तुम्हाला जे काही सांगणार आहे, ते सगळं, आपल्या कल्पनेच्या पलीकडलं आहे..!
अशावेळी आपण स्वतः पहिली काय तजवीज करू. कि, त्या मृत व्यक्तीला त्याच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था कशी करून देता येईल, त्याचं पाहू.
पण इथे, ते शक्य नसतं. कारण, एकतर हि लोकं पोटापाण्यासाठी मुळातच इतक्या लांबून आलेली असतात. कि, निव्वळ पुण्यात यायलाच त्यांना तीन-तीन दिवस लागतात. तर तिथपर्यंत, मयत व्यक्तीला न्यायचा कसा..? आणि, न्यायचाच म्हणलं तर, इतक्या लांब मयत नेण्याचा अम्बुलंसचा खर्च कोण करणार..? हि, फार मोठी आर्थिक समस्या त्यांच्यासमोर असते. त्याकरिता असं काही घडलं, कि..हि लोकं, पहिलं त्या व्यक्तीच्या घरी कळवतात. कि असं-असं अघटीत झालं आहे. इतक्या लांबून कामाला आला आहे म्हणल्यावर, मयत व्यक्तीच्या सोबत, त्याच्या जवळच्या नात्यातील कोणीतरी असतंच. त्याच्याशी सल्ला मसलत करून, त्या मयत व्यक्तीचं क्रियाकर्म परस्पर इथेच आटोपून घेतलं जातं. आणि, त्याच्या अस्थी घेऊन ती मंडळी त्याच्या घरी प्रयाण करतात.
हे सगळं ऐकून माझं डोकं अगदी सुन्न झालं होतं. मयत व्यक्तीचं शेवटच मुखदर्शन व्हावं म्हणून, काही लोकं अगदी विदेशातून येत असतात. पण इथे मात्र, स्वदेशात असून सुद्धा काहींना मयत व्यक्तीचं अंत्यदर्शन करता येत नाही. यापेक्षा मोठी शोकांतिका नसावी.
इथवर सगळं ठीक आहे, पण..गावी असणाऱ्या लोकांचे काय हाल होत असतील..?
त्या अस्थी पाहून, तेथील... महिलांनी, पुरुषांनी नेमकं कसं ठरवायचं. कि, ह्या आपल्याच पतीच्या, मुलाच्या, भावाच्या, बापाच्या अस्थी आहेत म्हणून..?
किती भयंकर प्रकार आहे.. मला तर या गोष्टीची कल्पना सुद्धा करवत नाहीये. मयत व्यक्तीचं, शेवटचं दर्शन व्हावं म्हणून. काही लोक, अंत्यविधीचा कायक्रम थोडा पुढे ढकलतात. का तर, इथून पुढे तो व्यक्ती आता कोणालाच दिसणार नसतो. परंतु, ज्या लोकांच्या डोळ्यादेखत घरून कामासाठी गेलेल्या व्यक्तीच्या अस्थीच त्याच्या घरी पोहोचत असतील. तर, त्यांनी त्यावर कसा विश्वास ठेवायचा.?
मी माझ्याच विचारात मग्न असताना. तेवढ्यात, एका आवाजाने माझी तंद्री भंग पावली.
त्यातील एक व्यक्ती म्हणाला...
देखो भाई हो गया क्या.. पांच बजे कि गाडी है..!
समोरून, सीताराम लाल कपड्यामध्ये बांधलेल्या मडक्यामध्ये गरमागरम अस्थी घेऊन येत असताना मला दिसला. एक विषय संपला होता.
त्या व्यक्तीचं प्रतिक म्हणून, त्याच्या 'अस्थी' आता दूरच्या प्रवासाला निघाल्या होत्या.!

No comments:

Post a Comment