Wednesday, 7 November 2018

आमच्या घरी गणपती बनवण्याची कामं चालू होती. आणि, माझ्या मित्रांनी तर माझ्यामागे तगादा लावला होता. कि.. उद्या आपल्याला, वर्षाविहारा करिता लोणावळ्याला जायचं आहे. माझे वडील, खूप रागीट व्यक्ती. ट्रीपला जाण्याकरिता, त्यांना विचारायचं सुद्धा धाडस मला होत नव्हतं. आईला विचारलं.. तर, तिने सुद्धा कानावर हात ठेवले.
ते दिवस आठवले कि आता असं वाटतंय.. कि आपण, त्यांना इतकं का घाबरायचो..? आपल्या मनाप्रमाणे आपल्याला का जगता आलं नाही..? त्यावेळी, बर्याच गोष्टीमध्ये मन मारावं लागायचं.. का..? ते माहित नाही. बाप नावाच्या व्यक्तीची एक नाहक भीती माझ्या मनात घर करून बसली होती. शेवटी, जे होतं ते चांगल्या करिताच. असं म्हणून, मी ते दिवस रेटले.
आणि खरोखरच, माझे वडील आम्हाला प्रत्येक गोष्टीत आडकाठी का घालायचे ते समजून आलं.
शेवटी, मनाचा हिय्या केला. आणि, घरच्यांना न सांगताच मी मित्रांसोबत लोणावळ्याला जायला निघालो. लोणावळ्याला वर्षाविहारासाठी जाण्याची माझी हि पहिलीच वेळ होती.
सकाळी आठ वाजता पिंपरी रेल्वेस्टेशनला आलो. प्लेटफोर्मवर, तरुणाईची बरीच गर्दी जमा झाली होती. लोकलची वाट पाहत आम्ही तिथे उभे होतो. लोकल पुण्यावरून येणार होती.
लोकल आली.. तीच, अगदी तुडुंब भरून. लोकलमध्ये शिरायला काय, आत पाय ठेवायला सुद्धा जागा शिल्लक नव्हती. यादिवशी, ( १५ ऑगस्ट ) कोणताच व्यक्ती लोकलचं तिकीट काढत नाही. पुण्यातील जवळपास सगळेच वर्षाविहारी प्रवासी, लोकलने विनातिकीट प्रवास करत असतात. ( असं, त्यावेळी मला समजलं होतं. त्यात किती सत्यता आहे. ते, मला माहिती नाही. ) त्यामुळे, त्यादिवशी आम्ही मित्र सुद्धा विनातिकीट प्रवासीच होतो.
असल्या गर्दीमध्ये, धक्काबुक्की करून माझ्या काही मित्रांनी लोकलमध्ये शिरकाव केला.
पण, मला काही लोकलमध्ये चढता आलंच नाही. माझं एक मन म्हणत होतं.. चल, माघारी जाऊयात. घरी, खूप कामं पडली आहेत. तर दुसरीकडे.. वर्षाविहाराला जाण्यासाठी माझा जीव अडकला होता. माझ्याच विचारात मग्न, मी लोकलच्या दरवाजा शेजारीच उभा होतो.
आणि लोकलने, तिचा मोठ्ठा भोंगा वाजवला..... पोवव्व्व्व sssss
लोकल निघण्याची, ती सूचना होती.
तितक्यात, लोकलमध्ये गेलेल्या एका मित्राने.. खिडकीतून, मला बाहेर उभं असलेलं पाहिलं.
तो मला म्हणाला,
फक्त.. एक पाय पायरीवर ठेव. आणि, दरवाजाला लटक..!
त्याच्या सांगण्याप्रमाणे, मी सुद्धा तसच केलं. लोकल सुटली, चालत्या लोकल मधून खाली पडण्याची मला भीती वाटत होती. तितक्यात, कुठून तरी एक हात आला. आणि, माझ्या प्यांटच्या मागील बाजूस कंबरेला घट्ट आवळला गेला. तो जो कोणी होता, त्याने मला आतील बाजूस घट्ट ओढून धरलं होतं. पुढच्या स्टेशनला, थोडी धक्काबुक्की करून मी सुद्धा थोडा आतमध्ये शिरकाव केला. आता मी, त्या तुडुंब गर्दीमध्ये किमान दोन्ही पायावर तरी उभा होतो.
श्वास घेता येत नव्हता, इतकी भयानक गर्दी.
तळेगाव सोडल्यानंतर, पावसाची रिपरिप सुरु झाली. हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला होता. निसर्गाची किमया पाहून थक्क व्हायला होत होतं. आणि, बघता-बघता लोणावळा आलं.
प्रवाश्यांचा सगळा लोंढा, एकदमच लोकलच्या बाहेर पडला. आणि ती भली मोठी गर्दी, प्लेटफोर्मवर जमा झाली. मला, लोणावळ्यातील काहीच माहिती नव्हती. म्हणून, मी माझ्या मित्रांची साथ सोडत नव्हतो. उगाच चुकलो तर, सगळी गडबड होऊन बसायची...
दिवसभर, लोणावळ्यात मनसोक्त भिजलो. भुशी तलावाच्या पाण्यात मनसोक्त डुंबलो, वाहत्या पाण्याच्या पायरीवर बसून, गरमागरम... मक्याच्या कणसाचा, वडापावचा, भजीचा आस्वाद घेतला. खूप मज्जा केली. आणि संध्याकाळी, घरी परतण्यासाठी पाचच्या दरम्यान आम्ही पुन्हा रेल्वे स्टेशनला आलो.
लोकल आली, प्रवासी बसायला इथूनच सुरवात होणार होती. तरी सुद्धा, भली मोठी गर्दी. एक तर, माझा छोटासा जीव. मला काही, धक्का बुक्की करून आतमध्ये जाताच आलं नाही. मला पुन्हा एकदा, लोकलच्या दरवाजामध्ये लटकून प्रवास करावा लागणार होता.
तितक्यात, माझ्या एका मित्राचं माझ्याकडे लक्ष गेलं. त्याने, गर्दीमधून रस्ता केला. मला हात दिला. आणि, संपूर्ण ताकतीनिशी ओढून त्याने मला आतमध्ये नेलं. गर्दीमुळे बऱ्याच मित्रांची फाटाफूट झाली होती. आणि, लोकल सुरु झाली. त्यामित्राने, खूपच मेहेनतीने मला आतमध्ये घेतलं होतं. दिवसभर, पावसामध्ये भिजल्याने माझ्या अंगामध्ये गारठा भरला होता. त्यात, माझ्या अंगावरील कपडे सुद्धा ओलेच होते. लोकलच्या आल्हाददायक वातावरणाने, माझ्या अंगामध्ये थोडी ऊब निर्माण झाली होती. पावसाची रिपरिप चालूच होती. लोकलच्या दरवाजामध्ये उभी असणारी मुलं, पाऊस अंगावर झेलत, खूपच मोठ्याने किंचाळून जल्लोष साजरा करीत होते. लोकलने वेग पकडला, एकामागून एक स्टेशनं मागे पडत चालली होती. मजल दरमजल करीत, लोकल देहूरोड मध्ये येऊन थांबली.
प्रवाशांची चढउतार झाली. आणि गाडीने, देहूरोड स्टेशन सोडलं. नेमकं काय झालं, ते समजलं नाही. त्या स्टेशन नंतर, वाटेमध्ये एक छोटासा भुयारी मार्ग होता. मी, ज्या डब्ब्यात बसलो होतो. तो डब्बाच, नेमका त्या भुयारी मार्गाच्या दगडी भिंतीला धाड-धाड करीत घासत-घासत पुढे गेला. काय झालं..? आणि, कशामुळे झालं..? ते, काहीच समजलं नाही.
पण, लोकलच्या दरवाजात उभी असणारी 'ती' मुलं आता तिथे उभी नव्हती. बोगद्यातला अंधार नाहीसा झाला. आणि एक मुलगा मोठ्याने ओरडला.. अरे माझा भाऊ कुठंय..?
तसा त्या ठिकाणी फार मोठा हल्लकल्लोळ माजला. आजूबाजूच्या मुलांनी, आरडाओरडा करायला सुरवात केली. सात-आठ मुलं लोकल मधून खाली पडली होती. लोकलची चैन ओढली गेली. पण, सुसाट वेगात असलेली लोकल आकुर्डी स्टेशनच्या अलीकडे जाऊनच थांबली.
नेमकं काय घडलं होतं, ते मला समजलं होतं. पडलेल्या मुलांपैकी, कोणीच वाचलं नसणार याची खात्री सुद्धा झाली होती. सर्व मुलांचा कपाळमोक्ष झाला होता.
राहून-राहून, माझ्या डोळ्यासमोर माझा मृत्यू मला स्पष्ट दिसत होता.
लोकल सुरु व्हायच्या अगोदर.. त्या मित्राने, शिताफीने मला त्या दरवाजातून आतमध्ये ओढून घेतलं नसतं तर..?
दुसर्या दिवशी, पेपरमध्ये बातमी आली. त्या रेल्वे अपघातात काहीतरी, पाच सहा मुलं मृत्युमुखी पडले होते. तेंव्हा, घरची लोकं आपल्याला अशा ठिकाणी का पाठवत नाहीत..?
त्याचा, मला उलगडा झाला होता. मी जिवंत आहे, याचं मला खूप अप्रूप वाटत होतं.
त्यानंतर, आजतागायत मी पंधरा ऑगस्ट या दिवशी कधीही लोणावळ्याला गेलो नाही.
आणि, कोणी निघाला असेल. तर त्याला सुद्धा जाऊन दिलं नाहीये.
थोडीशी मजा लुटण्याच्या नादात लोकलमध्ये जागा असताना सुद्धा. ती मुलं दरवाजात उभी राहिली होती. फक्त या एकमेव कारणामुळे त्या मुलांनी आपला अनमोल जीव गमावला होता.
त्या मुलांच्या आई वडिलांवर, तेंव्हा किती मोठं संकट कोसळलं असेल..?
लहानपणी, अनवधानाने आमच्या हाथून अशा चुका घडल्या आहे. तरी सुद्धा, सुदैवाने आम्ही सुखरूप आहोत. अशी वेळ, पुन्हा कोणावर येऊ नये. त्याकरिता हा लेखप्रपंच..
म्हणून सांगतो..गर्दीत गर्दी करून, कोणत्याही पर्यटनस्थळी जाऊ नका.
सोळा, सतरा, अठरा ऑगस्ट सुद्धा, चांगलेच दिवस असतात. लोणावळ्यात, त्या दिवशी सुद्धा भरपूर पाऊस पडत असतो. आणि मज्जा म्हणताल तर, लोणावळ्यात ती नेहेमीच असते..!

No comments:

Post a Comment