Sunday, 31 July 2016

माझ्या मनमिळाऊ स्वभावामुळे, माझी कोणाशीही पटकन दोस्ती होऊन जाते. कोणाला काही अडल्या नडल्या गोष्टी ते मला बिनधास्त विचारत असतात. त्यासोबतच, त्यांची सुख दुखः देखील ते माझ्याशी शेअर करत असतात.
मित्रांप्रमाणे, माझ्या काही मैत्रिणी सुद्धा आहेत. त्या सुद्धा, मला इतक्या जवळच्या आहेत. कि, ज्या गोष्टी एका पुरुषाबरोबर कोणी शेअर करणार नाही. अशा गोष्टी सुद्धा, त्या विवाहित मुली माझ्याबरोबर बिनदिक्कत शेअर करत असतात. तेवढा विश्वास आहे त्यांना माझ्यावर.
हल्लीच, माझ्या दोन मैत्रिणींची नुकतीच लग्नं झाली आहेत. नव्याची नवलाई, नव्याचे नऊ दिवस. अशा काहीशा थाटात सध्या त्यांचा वावर असतो. आम्ही सुद्धा.. मित्र, मैत्रिणी त्यांना मुद्दाम चिडवत असतो. काय मग..! कसं काय..! वगैरे, वगैरे..
पण त्याचा, त्या दोघींना कधी राग वगैरे येत नाही. त्या दोघींकडून, आमचं असलं काहीबाही बोलनं अगदी फ्रेंडली स्वीकारलं जातं.
तर परवा.. त्या दोन नवविवाहिता आमच्या गोतावळ्यात गप्पा मारत बसल्या होत्या.
अचानकपणे गप्पा मारता-मारता, त्या दोघीच.. एकमेकीशी चर्चा करू लागल्या.
दोघींच्या हातात, हातभार असा..भरगच्च हिरवा चुडा होता. आणि, त्या विषयावर त्यांचं गुऱ्हाळ सुरु झालं. आणि, त्यातीलच एकीने सहजच त्या दुसरीला विचारलं.
का गं.. तो हातामधील चुडा का बांधून ठेवला आहेस..?
त्यावर.. दुसरी विवाहिता बोलती झाली,
अगं चुडा वाढू नये ( म्हणजे हातातील बांगडी फुटू नये ) म्हणून सासू बाईंनी त्यांना असं दोऱ्याने बांधून ठेवायला सांगितलंय..!
त्यावर.. पहिली विवाहिता तिला म्हणाली, तू नाही गं तुझा चुडा बांधलास..?
तर, ती म्हणाली..
नाही गं, एकतर मला सासूबाई नाहीयेत. आणि, असं चांगलं वाईट सांगणारं कोणी जुनं जाणतं सुद्धा आमच्या घरात नाहीये. हिचं हे वाक्य पूर्ण होईपर्यंत, तिला मधेच थांबवत पहिली विवाहिता थोड्याशा लाडिक अंदाजाने उतावीळपणे तिला म्हणाली.
अगं पण.. रात्री, बांगड्यांचा आवाज येत नाही का..?
त्यावर, पहिली मैत्रीण म्हणाली.. काही नाही गं, बेडरूम मधील पंखा पाचवर करायचा. मग, कोणालाच कसलाच आवाज ऐकू येत नाही.
आणि.. हसत हसत, दोघींनी एकमेकींना टाळ्या दिल्या. आणि, पुन्हा एकदा बांगड्यांचा खळखळाट झाला..
त्या दोघी, आपसातल्या गप्पात इतक्या रममाण झाल्या होत्या. कि, त्यांच्या आजूबाजूला आम्ही सुद्धा आहोत. याचं त्यांना बिलकुल भानच राहिलं नव्हतं.
हे सगळं काही, त्या दोघींकडून इतक्या कमी वेळात घडून गेलं. कि नंतर, भानावर आल्यावर आम्हा सर्वांना पाहून. त्या दोघी, लाजेने चूर होऊन आम्हा मित्र मैत्रिणींच्या गोतावळ्यातून धूम ठोकून निघून गेल्या..!

तारुण्याने मुसमुसलेल्या, एखाद्या सुडौल बांध्याच्या तरुणीला पाहून. तिच्या सौंदर्याची तारीफ करत असताना.
नुकताच जवाणीत प्रवेश केलेल्या मुलांच्या तोंडी, हे वाक्य मला हमखास ऐकायला मिळतं.
" आयला.. कसली मस्त आंटी आहे राव..! "
आता, त्या महिलेला पाहून हे वाक्य म्हणत असताना. त्या मुलांच्या मनात, नेमका काय आणि कसल्या प्रकारचा विचार घोळत असतो. ते मला माहित नाही.
परंतु, याविरुद्ध..
एखाद्या.. भारदस्त, राजबिंड्या तरुण पुरुषाला पाहून. तरुण वयातल्या मुलींची, नेमकी काय प्रतिक्रिया असू शकेल..?
याची, काळजी लागून राहिली बघा मला..!!
माझ्या मुलाने, परवा मला नवीन दुचाकीची मागणी केली. मुलाची आवड आहे, नाही म्हणता येत नाही. आणि, नाही म्हणावं तर..
उद्या पुन्हा नवीन प्रश्नांचा मला भडीमार नको. माझ्यासाठी तुम्ही काय केलत..?
आपली ताकत, आणि आवड आहे. म्हणून, काहीवेळा हौसेखातर मुलांच्या सर्व गोष्टी आपल्याला मान्य कराव्याच लागतात. हे कोणालाच चुकलेलं नाहीये.
परंतु, त्याचबरोबर..
माझं मन, पुन्हा एकदा उत्तराखंडमधील त्या खडतर भागात जाऊन पोहोचतं, गरिबीच्या दाहीदिशा मला त्या भागात पाहायला मिळाल्या.
त्यातीलच एक मुख्य विषय, म्हणजे.. " पिट्टू "
त्या भागात.. केदारनाथ यात्रेदरम्यान, मी माझ्या मुलाच्या वयाचे बरेच पिट्टू मुलं त्याठिकाणी पाहिले. पण, त्यातील एकही पिट्टू मला तिशीच्या पुढील वयातील दिसला नाही.
याचं नेमकं काय कारण असावं..? हा विचार मला पडलाच नाही.
कारण, पन्नास साठ किलो वजनाच्या व्यक्तीने त्याच्याच वजनाच्या किंवा त्यापेक्षा जास्ती वजनाच्या लोकांना इतक्या खडतर चढाईसाठी आपल्या पाठीवर वाहून नेल्यावर. तो व्यक्ती, वयाच्या पन्नाशी पर्यंत धडधाकट राहू शकेल का..?
हा, फक्त विचार करण्याचा विषय आहे.
सकाळी आठ वाजले तरी, आपली ऐन तरुणाईतील मुलं आपल्या मखमली अंथरुणातून किंवा झोपेतून उठत नसतात. त्याचवेळी.. त्या उत्तराखंड भागातील मुलं, पहाटे.. चार वाजल्यापासून, आपल्या दैनंदिन रोजीरोटी करिता. पाठीवर, बांबुच बास्केट घेऊन आपल्या पोटाच्या आगीकारिता वजनी लोकांना पाठीवर घेऊन केदारनाथ पहाडाच्या कठीण चढाईसाठी कामाला लागलेली आपल्याला त्याठिकाणी पाहायला मिळतात.
अतोनात कष्ट आहेत हो. त्या मुलांना, ती " गधा मेहेनत " करताना पाहून. यात्रेदरम्यान, सुन्न होऊन मी अक्षरशः ढसाढसा रडलो होतो. नाही हो, नको त्या वयात नको ती कामं त्या मुलांना करावी लागतात. पण, ती मुलं हे सगळं आनंदाने स्वीकारत असतात.
त्या भागातील मुलांची हौसमौज कोण पुरवत असेल..? कारण, एकतर त्या भागात पैश्याची फार वानवा. त्यामुळे, वयाच्या ऐन उमेदीत मजामस्ती करण्याच्या वयात त्या मुलांना घराला हातभार लावण्याकरिता. कामा धंद्याला लागावं लागतं. हि फार मोठी शोकांतिका आहे.
काय करावं..?
शेवटी पापी पेट का सवाल आहे..!
तिथे, काम केलं तर पैसा मिळेल. नाहीतर, तरुण मुलांना कामाविना घरात फुकटचं कोणीच पोसणार नाही. नाहीतर, हे असलं वजनी काम नको. म्हणून, काही मुलं थेट पुण्या मुंबईची वाट धरतात. आणि, पैसे कमवायला घराबाहेर पडतात.
इथे आल्यावर तरी काय आहे हो. शिक्षण कमी असल्याने, त्यांना सर्रास कुठेतरी मोलमजुरीसाठी जावं लागतं. नाहीतर, हॉटेलमध्ये वेटर म्हणून तरी काम करावं लागतं. नशिबाचा फेरा कोणालाच चुकला नाही. पण कुठेतरी, मनाला चणचण लागून राहते.
असो.. माझ्या मुलाला मी नवीन बाईक घेऊन देणार आहे.
पण, एका विशिष्ट प्रकारच्या आनंदाने या अभागी मुलांची ओंजळ अजून किती दिवस भरणार नाही..? या गोष्टीमुळे, माझं काळीज सतत तीळतीळ तुटत राहील.
यात, यत्किंचितही शंका नाही..!


जुनियर कॉलेजमध्ये,
मी पहिल्या वर्षाला असताना. एस.वाय.बी.ए. मध्ये शिकत असणारी. विद्या नावाची माझी एक मैत्रीण होती. गोरीगोमटी, जेमतेम उंचीची, सुडौल बांध्याची विद्या..
दिसायला खूपच सुंदर होती. पण बहुतेक, तिचं कॉलेजमध्ये नसणाऱ्या, आणि कुठेतरी चांगल्या ठिकाणी जॉबला असणाऱ्या एका मुलाबरोबर. तिचं प्रेमप्रकरण चालू होतं. असं माझ्या ऐकिवात होतं. परंतु.. त्यासंबंधी, माझ्याकडे काही ठोस पुरावा नव्हता.
तर.. हि विद्या, एक फेशन म्हणून. तिच्या दोन्ही पायाच्या अंगठ्या शेजारील बोटात. एक जोडव्या सारखी कसलीशी रिंग घालायची. एकदा, सहज म्हणून मी तिला विचारलं होतं.
विद्या, तुझ्या पायाच्या बोटात हि जोडवी आहेत का गं..?
तर म्हणाली.. नाही रे, माझं लग्न कुठे झालय..? ती एक फेशन आहे..!
असेल बुवा, नव्वदीच्या काळात मुली लवकर जीन्स पेंट सुद्धा घालत नव्हत्या. तर, त्या काळात इतकी साधी फेशन नक्कीच असू शकते. हे मी, त्यावेळी ताबडतोब कबुल केलं होतं.
पण..आज एक गंमतच झाली.
माझं सहज म्हणून लक्ष गेलं, माझ्या ओळखीतल्या एका मुलीच्या, मैत्रिणीच्या पायातील अंगठ्या शेजारील बोटात. विद्या घालायची तशीच सिंगल रिंग मला दिसली. मी सहज म्हणून, माझ्या मैत्रिणीला विचारलं. तुझी मैत्रीण विवाहित आहे का..? तर, ती नाही म्हणाली.
मग मी, तिला पुन्हा विचारलं,
ती विवाहित नाहीये.. तर, तिच्या बोटात ते जोडव्या सारखं काय आहे..?
माझा चिकित्सक प्रश्न ऐकून. शेवटी तिची मैत्रीनच मला म्हणाली..!
" हो.. आम्ही, गुपचूप लग्न करून घेतलं आहे..! "
गुपचूप लग्न केल्यामुळे, मोकळेपणाने मला मंगळसूत्र घालून फिरता येत नाही. म्हणून, लग्नाची काहीतरी आठवण म्हणून, अशावेळी आम्ही मुली पायातील बोटात अशी सिंगल रिंग घालत असतो.
त्या मुलीच्या या उत्तरावर..
माझं मन, पुन्हा एकदा पंचवीस वर्ष मागे गेलं. त्यावेळी, विद्याने सुद्धा अशीच काहीतरी गडबड केली असावी का..?
कारण, त्यानंतर.. दोनपाच वर्षांनी तिचं त्याच मुलाबरोबर धुमधडाक्यात लग्न झालं होतं..!
याविषयी, कोणाला काही जास्तीची माहिती आहे का हो..!!
बसलेली घडी विसकटून..
पुन्हा नव्याने.. ती घडी घातली, तर घालता येते..!
परंतु, एकसंध 'घडी' न आल्याने,
त्यावर.. बऱ्याच नव्या घड्या दिसू लागतात. काहीवेळा, ती घडी अगदी बरोबर सुद्धा असू शकते. परंतु, ते " कौशल्य " प्रत्येकाला जमेलच. असं सांगता येत नाही.
विंचवाचं बिर्हाड त्याच्या पाठीवर असतं.
तसा, मनुष्य सुद्धा रानोमाळ भटकू शकतो. पण, त्याला.. " जीवन ऐसे नाव " कदापि म्हणता येणार नाही. आणि.. त्यामुळे, तसं वागनं सुद्धा तो हमखास टाळत असतो.
" नवीन जीवाला, जन्म देता येतो. परंतुं, गेलेला 'जीव' परत आणता येत नसतो..! "
हे.. जीवनाचं खरं 'गणित' आहे..!
पळत्याच्या पाठीमागे लागण्यात काहीएक हाशील नसतं.
कितीहि पळालं तरी, आपण जागेवरच असतो. हि पृथ्वी सुद्धा गोल आहे, तिला सुद्धा अंत आहे.
तर आपण, पळून-पळून असे किती आणि कुठवर पळणार आहोत..?
त्याला सुद्धा, काही मर्यादा आहेत.
प्रयत्न नक्कीच करावेत. हातावर हात बांधून कधीच बसू नये. परंतु.. " हातचं " सोडून, पळत्याच्या पाठीमागे कधीच धाऊ नये..
" पळता.. आजवर, कोणाच्याच हाती लागलेला नाहीये..!! "

बरेच दिवसानंतर..
परवा, मला रात्रपाळीला कामाला जावं लागलं होतं.
मध्यरात्री.. आमचं काम संपल्यावर,
मी व माझे काही सहकारी, ऑफिस वरून आपापल्या दुचाक्यावर घरी जायला निघालो होतो. तर, त्या सुनसान रस्त्यावर.. आम्हाला कसली तरी हलचल जाणवली.
वीस पंचवीस वर्षांची, एक सुंदरशी बाहुली सारखी दिसणारी मुलगी. एका व्यक्तीच्या अंगाला झटत होती. तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून रात्रीच्या गस्ती पथकातील फौजदार होता. तो बिचारा चांगला गृहस्थ असल्याने. तिला समजावून घरी जायला सांगत होता. पण तिच्या अंगचे चाळे काही कमी होत नव्हते.
त्या मुलीचा पेहेराव पाहून, मी तर जाम हादरून गेलो होतो.
गुढग्याच्यावर पर्यंत असणारा तंग फ्रॉक तिने परिधान केला होता. इतक्या अंधाऱ्या रात्री सुद्धा, दिव्याच्या प्रकाशात तिच्या अंगात असणार्या त्या तलम आणि तंग फ्रॉक मधून. तिच्या शरीराचे, प्रत्येक बारकावे अगदी स्पष्टपणे माझ्या नजरेस पडत होते. ती मुलगी, अमली पदार्थाच्या अमलात होती. कि तिने, आणखीन काही वेगळी नशा केली होती, ते मला समजलं नाही. पण तिला त्या झालेल्या किंवा केलेल्या नशेमुळे, ठीकसं उभं सुद्धा राहता येत नव्हतं.
तिच्या पायात असणाऱ्या, महागड्या आणि उंच टाचेच्या चपला घालून तिला चालता येत नव्हतं. चपला घालून चालता येत नाहीये. म्हणून, तिने तिचे सेंडल आपल्या हातात घट्ट धरून ठेवले होते. भयानक नशेच्या अमलाखाली, रस्त्यावर झुकांड्या खात भयंकर " कामुक " नजरेने ती प्रत्येक व्यक्तीकडे पाहत होती. आणि, रस्त्यात दिसेल त्या व्यक्तीच्या गळ्यात पडायला पाहत होती. तिच्या अंगात, भीती अशी राहिलीच नव्हती.
माझ्या सोबत असणारी सगळी मुलं, अगदी जान जवान होती. पण, कोणीही तिला शिवायचं किंवा जवळ घ्यायचं धाडस केलं नाही.
त्या फौजदाराला.. ती, " हा माझा काका आहे " म्हणत होती..! तेवढी शुद्ध बाकी होती तिला.
नेपाळी मुलीसारखी दिसणारी ती मुलगी, तोडकं मोडकं हिंदी बोलत होती. त्यामुळे, ती मला भारतीय वाटत होती. नहीतर.. मी तिला केंव्हाच, जपानी किंवा चीनी म्हणून मोकळा झालो असतो..!
शेवटी.. एका व्यक्तीने, झटत झोंबत तिला तिच्या होस्टेलच्या गेट पर्यंत नेवून सोडलं. तरी सुद्धा, गेटच्या आतून ती आम्हाला हातवारे करत होती. हा सगळा फारच भयानक प्रकार होता.
ती मुलगी.. विनाकारण आपल्या गळ्यात पडेल, म्हणून माझे सोबती..
" चला बाबा इथून लवकर..! " असं म्हणत होते.
चुकण जर, त्याठिकाणी तद्दन फालतू मुलं असती. तर त्या मुलीचं काय झालं असतं..? किंवा, त्याठिकाणी पोलीस पथकाची गस्तीची गाडी आली नसती. किंवा आम्ही लोकं सुद्धा तिथे हजर नसतो. आणि चुकून, एकट्या दुकट्या नराधामच्या तावडीत ती मुलगी सापडली असती. तर, पुढे काय घडलं असतं, याची कल्पना सुद्धा न केलेली बरी.
आजवर, रेव पार्ट्यामध्ये,
विविध प्रकारच्या नशा करून. अगदी कोवळ्या वयाच्या बऱ्याच मुली माझ्या हाती लागल्या होत्या..!
असं सांगणारा, माझ्या ओळखीतला एक मित्र तर कधीच मरून गेला होता.
पण, ती पाळंमुळं अजूनही.. या जमिनीत घट्ट रुतून बसली आहेत. ते, याची देहा मला पाहायला मिळालं. आणि चुकून, त्यापुढे त्या मुलीशी काही विपरीत घडलं असतं. तर, सगळा भोग त्या मुलांच्या माथी फुटला असता. मुलांना काय, एका क्षणाची खोटी असते. आणि समोर, बलात्काराची फार मोठी लाट असते. पण, सुदैवाने तसं काही घडलं नाही.
मुलींना आवर घालता आला पाहिजे हो.! हे सगळं, कल्पनेच्या पुढील विश्व आहे..!
एन्जॉयमेंट करायला कोणाची आडकाठी नाहीये. पण असं कृत्य कोणत्याही मुलीच्या हातून घडायला नको. असं माझं प्रामाणिक आणि परखड मत आहे.
माझ्या नजरेने..
होस्टेलमध्ये राहणाऱ्या ( सगळेच सारखे नसतील तरीही ) प्रत्येक मुला मुलींच्या पालकाने,
सावधान म्हणण्या पेक्षा, '" सतर्क " असणं फार जरुरी आहे..!
अवघ्या दीड वर्षात, हा सगळा खेळ घडला...!!
मुलींची प्रेम प्रकरणं.. ह्या विषयांना, आपल्या इथे फारशी किंमत किंवा महत्व दिलं जात नाही. तसं पाहायला गेलं तर.. असं करणं म्हणजे, एकप्रकारे त्या मुलींशी केलेली हि प्रतारणाच ठरत असते. असं म्हंटल तर, ते वावगं ठरू नये.
हे बोलनं, जितकं सोपं आहे. तितकंच स्वीकारानं किंवा त्याचं अंगीकरण करनं, मात्र फार कठीण आहे. आलीया भोगाशी, सगळेच सादर असतील. असं मुळीच सांगता येणार नाही..!
माधुरी दिसायला फारच सुंदर होती. पण त्याच बरोबर, सगळे उत्तम गुण सुद्धा तिच्या अंगी बाणले गेले होते. तिच्यासाठी, हि फार मोठी जमेची बाजू होती. कोणजाणे का, कसं आणि केंव्हा ती त्याच्या प्रेमात पडली. हे तिचं तिलाच उमजलं नाही. मुलींच्या, प्रेमाच्या बाबतीतल्या व्याख्या फार निराळ्या असतात. त्यांच्या मनाचा थांग आजपर्यंत कोणालाच लागला नाहीये. त्यात, सोळावं वरीस धोक्याचं जे असतं. त्या वयात तर, नको ते प्रकार त्यांच्या हातून घडत असतात. हे सर्वश्रुत आहेच..!
हि मात्र.. आता, एम.बी.ए. च्या शेवटच्या वर्षाला होती. उच्च कुटुंबातली खात्यापित्या घरची मुलगी. आणि.. त्याने तिच्यावर पक्कं गारुड केलं..
हा कोण आहे.? कसा आहे..?? काय करतो...??? कुठे राहतो....????
या कोणत्याच गोष्टीचा सारासार विचार न करता, त्याच्या सुंदर चेहेऱ्यावर ती जाम लट्टू झाली. आणि, अवघ्या सहा महिन्यात यांनी प्रेमाच्या आणाभाका घेत. लग्न करण्याचा निर्णय घेतला. तोवर, हि शेवटच्या वर्षाला पास होऊन एका खाजगी क्षेत्रात सर्विसला सुद्धा लागली. महिना, तीसेक हजाराची तिला नोकरी मिळाली होती. जणू काही, पिकलेला आंबाच त्या मुलाच्या झोळीत पडला होता.
आणि.. तो दिवस उजाडला..
कोणालाही न सांगता, यांनी परस्परच आपलं 'शुभमंगल' उरकून घेतलं.
मुलगी तशी फार धाडशी.. तिने, त्याच दिवशी फोन करून आपल्या घरच्यांना जे घडलं आहे ते कळवलं. घरच्या लोकांनी, ताबडतोब तिच्याकडे धाव घेतली. शेवटी काहीही झालं, तरी हि त्यांची एकुलती एक मुलगी होती. ती जिथे राहत आहे, त्या गावाचं नाव वरवर जरी चांगलं वाटत असलं. तरी, त्या घरापर्यंत पोहोचल्यावर तिच्या घरच्यांना काहीच सुचेनासं झालं.
एका जुनाट वाड्यात, दहा बाय बाराच्या दोन खोल्यांमध्ये तिझं भावी सासर सामावलं गेलं होतं. तिच्या घरातील तिचा स्वतंत्र बेडरूम सुद्धा त्याहून कैकपटीने मोठा होता. हे सगळं पाहून, तिच्या आई बापाच्या दुख्खाला तर पारावर राहिला नव्हता. रडारडीचा कार्यक्रम पार पडला. तेवढ्या घाईत सुद्धा, आईने मुलीला एका कोपऱ्यात घेऊन विचारपूस केली. तुला काही जबरदस्ती वगैरे झाली आहे का..? बघ, अजूनही वेळ गेली नाहीये. सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे करून देऊ. तू आमच्याबरोबर अशीच माघारी चल. तुझी चूक आम्ही पोटात घ्यायला तयार आहोत..!
पण.. पोरीने आपण स्वखुशीने हे सगळं केल्याचं मान्य केलं. सगळं काही रीतसर आणि कायदेशीर असल्याने कोणीच काहीच करू शकत नव्हतं. बापाने पोरीला विनवणी केली,
पोरी.. मी तुझं धुमधडाक्यात लग्न लाऊन देतो. तू घरी चल. पण, पोरीचा नन्नाचा पाढा सुरूच होता.
शेवटी, तिच्या भावाने शेवटच अस्त्र फेकलं..
तुला आमचं ऐकायचं नसेल, तर तुला आमच्या संपत्ती मधील एक छदाम सुद्धा मिळणार नाही..!
पण, हे अस्त्र सुद्धा तिथे नाकाम ठरलं.. तिने..ती अट सुद्धा अगदी आनंदाने स्वीकारली..
त्या भयंकर वेळी, तिच्यावर कोणतं भूत सवार झालं होतं. ते कळायला मार्ग नव्हता. नाउमेद होत, तिच्या घरचे लोक तेथून निघून गेले. महिन्या भराने, तिच्या भावाने एका स्टांप पेपरवर संपत्ती सोडीसाठी तिची स्वाक्षरी घेतली. तिनेही त्याला ती स्वखुशीने देऊ केली. आणि, आल्या पावलीच तो माघारी निघून गेला. तिला, कायदेशीररीत्या संपत्तीतून बेदखल केलं गेलं होतं.
महिन्यावर महिने जात होते, सासू सासरे, दीर नणंद आणि हिचा दिवटा नवरा. ह्या सर्वांचं कुटुंब तिच्या एकटीच्या पगारावर चालू होतं. सगळं घर, अगदी मस्त मजेत बसून खात होतं.
सकाळी सहा वाजता उठून, घरातलं आवरून घरातील लोकांचा स्वयपाक तिझा स्वतःच डब्बा हि सगळी तयारी करून, ती ऑफिसला जायची. संध्याकाळी आल्यावर, घरातली सगळी कामं करता करता तिला रात्रीचे बारा वाजायचे. पण, ती बिचारी हे सगळं आनंदाने स्वीकारत होती. नेमका काय जादूटोणा झाला होता..? ते मात्र कळायला मार्ग नव्हता. ती एकटीच, राबराब राबत होती.
ह्या सगळ्या धावपळीत, बघता बघता एक वर्षाचा कालावधी लोटला..
तिच्या भावाचं लग्न ठरल्याची गोड बातमी तिच्या कानावर आली. तिलाही खूप आनंद झाला. तिच्या भावाने, तिने केलेल्या लग्नाला दोषी ठरवत. " तिच्यामुळे मला आपल्या समाजात मुलगी मिळत नाहीये " असा हेका लावत.. आपलं छुपं प्रेमप्रकरण, यशस्वी केलं होतं. सगळा दोष, तीच्यावर टाकून तो मोकळा झाला होता. पण हिला, त्याचं काहीएक सोयरसुतक नव्हतं..
तिच्या अनुपस्तीतच, भावाने आपलं लग्न उरकून घेतलं. तरी सुद्धा हि अगदी शांत होती. रक्ताची नाती, एकाएकी कशी काय तुटतात..? कि हे सर्व काही पैश्याच्या मोहापाई होत असतं..?
त्याचा सोनेरी संसार, मार्गी लागला होता. नवा जोडा कोल्हापूरच्या देवदर्शनाला जायचा होता. ठरल्याप्रमाणे सगळा कार्यक्रम आटोपला. आणि देवदर्शन करून माघारी येत असताना..
त्यांच्या गाडीला मोठा अपघात झाला. गाडीत, एकूण चार जन बसले होते. तीन जन तर जागेवरच गेले. फक्त, हि नवी नवरीच त्या अपघातातून सुखरूप बचावली होती.
गावभर वाऱ्यासारखी बातमी पसरली, संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. एकुलता एक मुलगा अपघातात मरण पावला होता. आई बापाच्या काळजावर फार मोठा घाव झाला होता. एका वर्षात, दोन नको त्या घटना त्यांना पहाव्या लागल्या होत्या. सगळा गाव हळहळ व्यक्त करत होता. सोबतच.. हा सगळा तिचा " तळतळाट " आहे..! अशी दबक्या आवाजात चर्चा सुद्धा चालू होती. दुखः कवटाळून तरी किती दिवस बसणार..? एकीकडे असणारी गडगंज संपत्ती, आणि दुसरीकडे त्याला आता कोणीच वारसदार नव्हता.
एवढ्या मोठ्या खटल्यात, त्यांच्या रक्ताच्या नात्याची आणि वारसदार ही एकमेवच उरली होती. म्हणतात ना, पैसा पैश्याकडे धाव घेत असतो..!!
त्या उक्तीप्रमाणे, घरात खायला कोण नसताना. तिच्या वडिलांना भावकीतल्या जागेतून सहा कोट रुपयांचा हिस्सा मिळाला. तरणीताठी सून घरात पडून होती. मुलगा देवाघरी गेला, आता त्या पैश्याला काय काडी लावायची का..?
शेवटी यांनीच मोठं मन करून, त्यातील दोन कोट रुपये त्या पोरीच्या नावावर केले. आणि, तिला तिच्या माहेरी धाडून दिलं. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. पोर तरणी आहे, हवं तर तुम्ही तिचं लग्न लावून दिलत तरी आमची काहीएक हरकत नाही. असं म्हणून, जड अंतकरणाने सासऱ्याने सुनेचं घर सोडलं..
सगळ्या संपत्तीवर दावा सांगणारा तर या जगातून केंव्हाच निघून गेला होता.
" दाने दानेपर लिखा है खाणे वालेका नाम " या म्हणीप्रमाणे, तुम्ही कोणाच्या मुखातील घास काढून घेऊ शकत नाही. जे विधिलिखित आहे तेच घडत असतं. इतर कोणत्याही तळतळाटापेक्षा, स्त्रीचा शाप फार वाईट असतो. कधीही कोणत्याही स्त्रीचा तळतळाट घेऊ नये. इकडे बापाला सुद्धा त्याच्या मुलीचे हाल पाहवत नव्हते. शेवटी, मनाचा मोठेपणा दाखवत एकदा तो मुलीकडे गेला. आणि तिला म्हणाला.. माधुरी, ह्या खुराड्यात राहण्यापेक्षा तुम्ही दोघे नवरा बायको. आमच्या जवळपासच्या भागात राहायला का येत नाही. आम्हाला पाहायला सुद्धा आता कोणी उरलं नाहीये. हवं तर, तिथे जवळपासच मी तुला एखादं घर घेऊन देतो.
शेवटी बापाची इच्छा पोर टाळू शकत नव्हती. समजोता झाला, सुमारे सत्तर लाख रुपये घालून तिच्या बापाने तिला एक थ्री बीएचके फ्ल्याट घेऊन दिला.
जावयाला.. एक छानसं दुकान टाकून दिलं. व्यवसायाचे आणि घराचे सगळे हक्क त्यांनी स्वतःकडेच ठेवून घेतले. कारण, त्या मुलीच्या स्वभावाचा त्यांना अजूनही थांगपत्ता लागत नाहीये. उद्या चुकून हि लोकं सगळं काही फुकून मोकळे झाले तर काय घ्या..? हि पुसटशी भीती त्यांच्या मनामध्ये आहेच..
आता.. त्या उंची घरामध्ये, तिने तिचं सगळं कुटुंब आणून ठेवलं आहे. सगळे अगदी मस्त मजेत जीवनाचा आनंद उपभोगत आहेत. आता, ह्या सगळ्या कहाणीत.. " खोटा शिक्का कोणता, आणि खरा शिक्का कोणता..? "
हे.. तुमचं तुम्हीच ठरवा..!
~पंडित पॉटर~
एक तर, कोणताही व्यक्ती कितीही जीव लावला तरी लवकर जवळ येत नसतो.
त्यात, " पैसा " माणसाला दूर करत असतो.
हे गणित तर, मी कोणालाच सांगायला नको आहे. पैसा फार वाईट, त्या पैश्याकरिता सख्खा भाऊ भावाला ओळखत नाही. इतकी तर, उंच मजल त्या पैश्याने मारली आहे. त्यामुळे, बिचार्या बहिणींचा विषय तर काढायलाच नको..! नाहीतर, ओवाळणी पेक्षा भावाचं नातं तुटायची भीती जास्त.
म्हणून,
माझ्या कोणत्याही मित्रांबरोबर.. मी, " पैश्याचे " व्यवहार टाळत असतो.
परंतु, चुकून काहीवेळा असे व्यवहार घडत सुद्धा असतील. मी स्वतः, त्यातून गेलो आहे. त्याची झळ, मला सुद्धा पोहोचली आहे. म्हणून, मी मित्र तोडले नाही. व्यवहार टाळला..!
त्याकरीताच, हा लेखप्रपंच.
कोणताही मित्र, एखाद्या मित्राचे पैसे ठरवून.. किंवा " मुद्दाम " बुडवणार नसतो.
परंतु.. मोठ्या रकमेचा पैसा जिथे येतो, तिथे मोठमोठे व्यवहार सुद्धा असतातच.
शेवटी, पैसा आहे..
समोरून व्यवहारात धोका झाल्यावर. त्यात, त्या ठेवीदार मित्राचा सुद्धा नाईलाज असतो. त्यामुळे, आपसूकच ती झळ आपल्याला सुद्धा पोहोचते. मला सुद्धा एकदा असा फटका बसला आहे.
एवढं सगळं होईपर्यंत, " एक तर मैत्री ठेवा " नाहीतर, " व्यवहार " ठेवा..! "
बघा, जमेल तसा अवलंब करा..!
पण, मनुष्य जन्म एकदा आहे. आणि, पैश्यापेक्षा "मित्र" मोठा आहे. हे, कदापि विसरू नका.
एकवेळ, पैसा कामी येणार नाही. पण, मित्र नक्कीच कामाला येतील..!
हा माझा, चाळीस वर्षांचा अनुभव आहे..!
आपल्या घरातील, किंवा आपल्या जवळच्या नात्यामधील नातेवाईकाच्या घरामध्ये एखादं गोड गोबरं लहान मूल असेल.
तर.. त्या लहान बाळाचा, नकळत आपल्याला खूप लळा लागून जातो.
त्यावेळी, लाडाने त्याचा पापा ( पप्पी ) घेत असताना. आपण,त्याचे पापे इतके त्वेषाने घेत असतो. कि, आपल्याला त्यावेळी थोडक्यात असं मुळी भागातच नसतं..!
त्या बाळाचे.. आपण, फार मनभरून आणि मुखभरून पापे घेत असतो. त्या ठराविक वेळी,
" त्याचे गाल, आता.. खाऊ कि गिळू. "
आपल्याला.. अगदी असं झालेलं असतं. त्यावेळी, आपलं प्रेम इतकं ओतू चाललेलं असतं. कि, त्याचा गोरा गोबरा गाल, आपण आपल्या ओठाने जमेल तितका आपल्या तोंडाच्या आत ओढत असतो. काहीवेळा तर, आपण दात आणि ओठांच्या साहाय्याने त्याच्या गालाचे हलकेसे चावे सुद्धा घेत असतो.
जोवर.. ते बाळ रडून, किंवा आपल्याला हाताने झिडकारून आपल्याला प्रतिकार करत नाही. तोवर आपली हि लाडिक प्रक्रिया किंवा प्रतिक्रिया चालूच असते..!
परंतु.. हाच प्रकार, काही "अपवाद" वगळता. कितीही गुटगुटीत असणाऱ्या, एखाद्या अनोळखी बाळाच्या बाबतीत आपल्याकडून कदापी होत किंवा घडत नाही.
मी ज्याठिकाणी, मराठी टायपिंग शिकण्याचा कोर्स लावला आहे.
तेथे, मला टायपिंग शिकवणारे सर आणि मॅडम असे दोघे आहेत. हे अगदी, तरुण वयाचं नवदाम्पत्य आहे. दोघेही, दिसायला कमालीचे सुंदर आहेत. थोडक्यात, एक दुजे के लिये. ती, खूपच अनुरूप जोडी आहे.
आज, मी टायपिंग करत बसलो होतो. आणि, त्या दोघांमध्ये काहीतरी कुजबुज झाली.
सरांनी मॅडमला काही पैसे दिले. 
अनायषा, आता आखाड महिना सुरु झाला आहे. त्यामुळे.. बहुतेक, त्या दोघांमध्ये, त्यांच्या घरातील संध्याकाळच्या जेवणाचा विषय झाला असावा. आणि, काहीतरी 'रंगीत' भाजी खरेदी करण्याकरिता मॅडम ने सरांकडून पैसे घेतले असावेत. हे मी बरोबर ताडलं.
जेंव्हा मॅडम पैसे घेऊन क्लासच्या बाहेर निघाल्या होत्या. तेंव्हा, त्या जेमतेम क्लासच्या दरवाजा पर्यंत पोहोचल्या असाव्यात. तेवढ्यात, सर त्यांना म्हणाले.
.
" काहीतरी चांगलं कर हं..! "
सरांच्या या वाक्यावर, मॅडमने काहीएक न बोलता. त्यांना फक्त मानेने होकार दिला. आणि, त्या तेथून निघून गेल्या.
मानलं गड्या मी त्या बाईला..!
काही तरी चांगलं कर, म्हणजे आता आपल्याला नेमकं काय बनवायचं आहे..?
आणि, आपल्या नवऱ्याची नेमकी काय आवड आहे..?
ते.. त्यांना, ताबडतोब कळून गेलं होतं. ट्युनींग असावं तर असं..
नाहीतर,
त्याठिकाणी.. आमची सौ असती, तर.. लगेच मला म्हणाली असती.
" चांगलं म्हणजे, नेमकं काय बनवू..? " 
घरामध्ये कुत्रे पाळणाऱ्या श्वानप्रेमी लोकांना..!
आणि, त्या छंदावर..
प्रमाणापेक्षा जास्त, अतिरिक्त प्रेम करणाऱ्या व्यक्तींना.
त्यांच्या बायका.
" कुत्र्याची " किंमत देत असाव्यात. असा.. मला, दाट संशय आहे..!!
( काल.. अशाच एका दुक्खी मैत्रिणीने, तिचं दुःख माझ्यासमोर व्यक्त केलं. )
तमाम श्वानप्रेमी, क्षमस्व..!!
" कुचंबना.. "
=============
आगं चल कि म्होरं...!
अहो.. गर्दी बघताय नव्हं किती हाय ते..! पोराला काखंवर घिऊन हात लई अवघडलाय माझा.
मग.. जत्रा काय सोपी वाटली व्हय तुला..?
व्हय जी... मी हाय नव्हं, तुम्ही नका काळजी करू त्याची..!
तिला.. मुलगी म्हणावं कि बाई..? नेमकं तेच समजत नव्हतं..
गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकवाचा ठसठशीत टीळा, हातामध्ये हिरवा चुडा, नऊवारी लुगडं.
आणि.. इवल्याशा नाजूक पायात, बोटामध्ये असणारी जोडवी. हि सौभाग्य अलंकारं, तिच्या अंगावर असल्यामुळे. नकळत, कोवळ्या वयातच तिला 'बाईचा' दर्जा मिळाला होता. आणि, त्यात कहर म्हणजे, त्या नवरा म्हणवणाऱ्या तरुणाने, आपली मर्दुमकी गाजवत. ह्या पोरसवदा बाईला.
" चक्क, आई सुद्धा बनवून ठेवलं होतं..! "
मी.. मुलगी होते कि नाही..? हा प्रश्न, फक्त तिचा तिनेच आणि तोही स्वतःलाच विचारावा. इतकी भयंकर परिस्तिथी. एकतर, तिने आत्ता नुकताच तारुण्यात प्रवेश केला होता. आणि, त्याअगोदारच तिला आई सुद्धा व्हावं लागलं होतं.
तिच्या नशिबाने, तिच्याशी केलेली हि फार मोठी क्रूर थट्टा होती. आई बापाची आज्ञा झेलत. तिने नकळत्या वयात ह्या मुलाशी लग्न केलं असावं. पण, हे लग्न करत असताना.
तिला, हा नेमका काय प्रकार चालू आहे..? याची, बिलकुल खबरबात सुद्धा नसावी. इतक्या लहान वयात हे सगळं उरकलं गेलं होतं.
गर्दीमध्ये धक्केबुक्के खात, नवऱ्याच्या रेट्याला घाबरत, ती तशीच पुढे मार्गक्रमण करत होती. कसंबसं देवदर्शन आटोपलं, आता तिला जत्रेत फिरण्याची मज्जा अनुभवायची होती. त्या उंच फिरणाऱ्या हवाई झोक्यात झुलण्याची तिला तीव्र इच्छा झाली होती. म्हणून, तिच्यापुढे चालणाऱ्या नवऱ्याला तिने आवाज दिला..
धनी..!
त्याने मागे वळून पाहिलं, आणि मानेनेच तिला काय म्हणून विचारलं.
तिने सुद्धा, मानेनेच त्याच्याकडे हवाई झोक्यात बसण्याची ईच्छा प्रदर्शित केली. त्याची ईच्छा नसताना सुद्धा तो, नाक मुरडत तिकीट घरात गेला. आणि हवाई झोक्याची दोन तिकिटे विकत घेऊन आला. तिकिटं घ्यायला भलीमोठी गर्दी झाली होती. गर्दीच्या रेट्यात तो तसाच माघारी फिरला.
हवाई झोक्यात बसण्यासाठी काढलेलं तिकीट, गर्दीमुळे त्याच्या हातामध्ये चुरगळून कधीचं मलूल झालं होतं. इच्छा नसतानाही, तिचा नवरा चीडवेल्या अवस्थेत घामाने डबडबलेलं आपलं खारट शरीर घेऊन आता तिच्या मागोमाग चालत होता. भलीमोठी गर्दी उसळली होती. जत्रा रंगात आली होती..
तरुण बांडगुळ मुलं, गर्दीचा फायदा उठवत पोरी बायांना कुठं 'चाचपायला 'मिळतंय' का. याच्या शोधात होती. सगळं काही अगदी जत्रेसारखं आणि जबरा चालू होतं.
समोरची गर्दी आटत चालली, ह्या उभयतांची आकाश चक्रामध्ये बसण्याची वेळ जवळ आली होती. तसा, ह्या...बाई, मुलीच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. तसं पाहायला गेलं तर, हा झोक्यात बसण्याचा आनंद म्हणजे, काही दुबईची भ्रमंती नव्हती. पण गोर गरिबांकरिता, वर्षातून येणारी ही जत्राच काय ते दुबई आणि सिंगापूर...!
पुढील पाचच मिनिटामध्ये, त्यांना त्या हवाई झोक्यात बसायचं होतं. भल्यामोठ्या गर्दीमध्ये सगळीच लोकं घामाघुम झाली होती. त्या दमट वातावरणाचा, उकाडा सहन न झाल्याने. तिच्या कडेवर असणाऱ्या त्या लहानग्या बाळाने एकाएकी जोरात भोकाड पसरलं. तसा, तिच्या मागचा गडी तिचा नवरा तिच्यावर जोरदार ओरडला. नाहीतरी, त्याला ह्या हवाई झोक्याच्या सफरी मध्ये बिलकुल रस नव्हताच. आणि, दात ओठ खाऊन तो तिच्यावर खेकसला.
कामून बोंबलतय ते पोरगं..? काय होतंय त्याला..?
काय नाय जी.. थोडं गर्मीनं घाबारलय वाटतं..!
बघ जमतंय का ते... नायतर फिर माघारी, इनाकरण डोक्याला ताप नगो..!
विषय पाळण्यात बसण्याचा होता. भला मोठा पाळणा पाहून, तो बारका जीव घाबरला होता. कि आणखी दुसरं काही घडलं होतं. ते त्या, लहान जिवालाच माहिती.
पण ह्या माऊलीला, त्या झोक्यात बसायची फार इच्छा होती. आता, ह्या पोराचा आवाज बंद करायला काय करावं. ह्या विचारात ती असताना. तिला झटकन काही आठवलं..
तिने, जगाची तमा न बाळगता. आपल्या पोलक्याची खालील गुंडी तटकन सोडवली. आणि, उभ्या उभ्याच ते पोर आपल्या थानाला लावलं. ते बाळ सुद्धा, रडता-रडता बळेबळेच आईच्या थानाला चोकू लागलं.
घटका समीप आली होती. ते तिघेही पाळण्यापाशी उभे होते. पाळण्याच गेट उघडलं गेलं. तसे, दोघेही त्यांच्या बाळासोबत त्या पाळण्यात बसले. आता.. तो संपूर्ण पाळणा लोकांनी भरायचा होता. ह्यो बाबा लई तापट.. म्हणून, तिने पोराला थानापासून बिलकुल सोडवलंच नाही. हा तिच्याकडे, अजूनही रागाने पाहत होता. आणि हि.. त्याची नजर चुकवत, दुध पीत असणाऱ्या मुलाच्या अंगावर टाकलेला साडीचा पदर सावरत, चहुबाजूने दिसणारी रंगीबिरंगी जत्रा पाहण्याचा आनंद घेत होती. थोड्याच अवधीत, सगळी पाळणी एकदाची भरली गेली..
आणि.. त्या आकाश चक्राने, हळू म्हणता म्हणता.. जोरजोरात गिरक्या मारायला सुरवात केली. झोक्याच्या मंदधुंद हळुवार हिंदकोळ्यानी, त्या चिमुकल्या आईचा जीव बहरून गेला होता. पाळणा वरखाली होत असताना, आपल्या पोटामध्ये एक विशिष्ट प्रकारचा गोळा येत असतो. आणि तो सर्वांना हवाहवासा वाटत असतो. त्यामध्ये, एक वेगळ्याच प्रकारचा आनंद असतो. अशावेळी, आपण घाबरलो जरी नसलो. तरी एकमेकांना, घट्ट बिलगून कवेत घ्यायची संधी कोणीही दवडत नसतो. पण.. तिच्या फुटक्या नशिबामुळे इथे सुद्धा ती अगदी एकाकी पडली होती. तिचा निरुत्साही नवरा, तोंडात तंबाखूचा तोबरा भरून एकटक रागाने बाहेरच्या बाजूस पाहत होता.
जाऊदेत मरुदेत म्हणून, तिने त्या खेळाचा पूर्ण आनंद उपभोगला. ती आपल्या बाळाला घट्ट बिलगून, त्या खेळण्याचा आनंद उपभोगत होती. तिच्या मनातली हौस एकदाची पूर्ण झाली होती. ह्या ठराविक काळामध्ये, तिच्या मुलाने सुद्धा तिला काहीच त्रास दिला नव्हता. त्यामुळे ती सुद्धा खूप आनंदित झाली होती. आणि त्यात बोनस म्हणून कि काय, खेळ संपल्यावर तो पाळणा सुद्धा नेमका वरील बाजूस थांबला होता. हळूहळू पाळणा खाली येईपर्यंत, अजून बराच वेळ जाणार होता. वरील बाजूने, सगळी जत्रा तिच्या नजरेस पडत होती. दूरवर असणारा मंदिराचा कळस सुद्धा तिच्या नजरेस पडला. तिने तिथूनच त्या परमेश्वराला भक्तिभावाने हात जोडले. वरून दिसणारी लोकांची गर्दी तिला खूप छान वाटत होती. ती एकटीच गालातल्या गालात हसत, आनंद साजरा करत होती. तिझा जीव अगदी हरखून गेला होता. तिच्यासाठी हा सगळा आनंदोत्सवच होता.
त्या प्रसन्न वातावरणात पंधरा वीस मिनिटे निघून गेली होती. हवेतील गारवा तिला सुंदर अनुभती देत होता. जसजसा पाळणा खाली येऊ लागला. तसं तिने.. स्वतःला सावरत, आणि त्या लहानग्याला आवरत आपलं स्तन त्या लहानग्याच्या मुखातून बाहेर काढलं. आणि, आपल्या काचोळीचं बटन एका हाताने लाऊन घेतलं. पाळणा खाली आला, त्याचं गेट उघडलं गेलं. तिने हलकेच, आपल्या तानुल्याला हलवत झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला. पण, ते मूल काहीच हालचालच करत नव्हतं..
तिच्या मांसल वक्षामुळे.. दुध पीत असताना, त्या लहान बाळाच्या नाकावर अतिरिक्त ताण येऊन ते गुदमरून गेलं होतं. तिच्या घट्ट बिलगण्याने, आणि.. झोक्याच्या वरखाली होण्याने. छातीमध्ये धस्स होऊन, ते बाळ त्या पाळण्यात झोपूनच देवाघरी गेलं होतं.
कॉलेज लाइफ मध्ये, आम्हा सात आठ मित्रांचा खूप खुशालचेंडू ग्रुप होता.
आम्ही सगळेच मित्र, मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने. आम्हा सर्वांचंच मस्त ट्युनिंग जुळलं होतं.
तर.. आम्हा सर्व मित्रांमध्ये, आमचा एक मित्र दिसायला फारच सुंदर होता.
एक पुरुष दुसऱ्या पुरुषाची तारीफ करतोय. म्हणजे, तुम्हाला त्याच्या सौंदर्याची नक्कीच कल्पना आली असावी.
तर.. तो चिकना मित्र सोडून. आम्ही सगळे मित्र, कॉलेजमधील सुंदर दिसणाऱ्या मुलींवर लाईन मारायचो. पण हा मित्र, आमच्या सोबत असताना म्हणा, किंवा एकटा असताना म्हणा. त्या सुंदर मुलींना, हा बिलकुल भिक घालायचा नाही. मला.. त्याच्या या गोष्टीची फार कमाल वाटायची.
म्हणून, सहजच एकदा मी त्याला छेडला..
काय रे.. आम्ही सगळे, ठरवून एका-एका मुलीवर लाईन मारतोय. आणि, तू त्यापैकी कोणत्याच मुलीकडे साधं पाहत सुद्धा नाहीस..?
त्यावर तो मला म्हणाला..
हे बघ कसं आहे, तुम्ही लोकं ज्या मुलींवर लाईन मारत आहात. त्या मुलींवर, आपल्या कॉलेज मधील जवळपास सगळीच मुलं लाईन मारत असावीत. आणि, एवढ्या मोठ्या गर्दीत तुमचा नंबर कधी लागणार..?
मला एक गोष्ट सांग, दोन महिन्यात तुमच्यापैकी एकाने तरी, मला ' गोड ' बातमी कळवली आहे का..! त्या मुलींपाठीमागे, भली मोठी लाईन लागली आहे. आणि तुम्ही लोकं सुद्धा, मुर्खासारखे त्या लाईनीत उभे आहात. तुम्हाला वाटतय का, तुमचा नंबर लागेल म्हणून..?
ह्या चिकण्या पोराचे चिकणे बोल ऐकून, मी तर पक्का गारद झालो होतो. नाही म्हणता, त्याच्या बोलण्यात तथ्य सुद्धा होतं. बोलण्या बोलण्यात, त्याने आम्हाला मुर्खात जमा करून टाकलं होतं.
शेवटी.. मीच त्याला हटकलं, आणि म्हणालो...
पण एक गोष्ट मझ्या ध्यानात येत नाहीये. तू एवढा चीकना चोपडा आहेस. मग तुला कधी वाटलं नाही का. कॉलेजमध्ये तुझी सुद्धा एखादी गर्ल फ्रेंड असावी म्हणून.
त्यावर, छद्मीपणे हसत तो मला म्हणाला..
आपला फंडा फार निराळा आहे. ज्या मुलींकडे, तुम्ही लोकं ढुंकून सुद्धा पाहत नाही. आपण, त्या मुलींना पटवतो. कधीही, कमी गर्दीत लक्ष द्यायचं. एक तर, मी दिसायला सुंदर आहे. त्यामुळे, त्या जेमतेम मुली मला अलगद पटून जातात. आणि तुम्ही लोकं, विनाकारण त्या चिकण्या पोरींच्या मागे टाईम वेस्ट करता..
त्याची कुटनीती ऐकून, माझ्या डोक्याला झिणझिण्या आल्या होत्या.
तितक्यात.. आमच्या समोरून, एक जेमतेम दिसणारी काळी सावळी मुलगी त्याला पाहून एक मादक स्माईल देत पुढे निघून गेली.
तेंव्हा, हा मला म्हणाला..
दोन महिन्यात.. हि दुसरी आहे बघ, पहिली वाली तुला नंतर कधी तरी दाखवतो..!!
विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या, पुरुषांना किंवा महिलांना.
त्या ठराविक काळापुरता,
नवबहराचा..फार मोठा प्रेमांकुर फुटत असतो. त्यावेळी, परस्परांना मिळालेल्या त्या चौर्य प्रेमभेटी. त्यांना खुप हव्या हव्याशा, आणि अत्यंत जवळच्या वाटत असतात.
परंतु.. कितीही झालं तरी, सरतेशेवटी आपल्या घरातलं..
" आपलं " ते आपलंच असतं..
बाकी सगळं काही, निव्वळ " क्षणभंगुर " ठरतं..!!
आपण परिधान केलेली अंतरवस्त्र..
हि, सहजासहजी कोणालाही दिसत नसतात.
किंवा,
कोणीही..अगदी ठरवून, त्यांचं थेट प्रदर्शन करत नसतं.
तरी सुद्धा,
त्यांची खरेदी करत असताना.
आपण,
ते.. शक्य तितके महागडे, आणि " फॅन्सी " असेच खरेदी करत असतो..!!

Saturday, 23 July 2016

चारधाम यात्रा, ( प्रवास वर्णन ) भाग :- पंचवीस.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सर्दी खोकल्याने, मी अजून सुद्धा जाम होतो. त्यामुळे, औषध पाणी घेऊन विक्स लाऊन मी बिछान्यावर पडलो. आमचा लॉज अगदी नदीकिनारी असल्याने, नदीचा खळखळाट रात्रभर ऐकू येणारच होता. नंतर काहीवेळाने मला झोप लागली, आणि अचानक कसल्याशा हालचालीने मला जाग आली. आमच्या रुममध्ये, विशिष्ट प्रकारची कंपनं मला जाणवत होती. हा नक्कीच भूकंपाचा प्रकार असावा, किंवा नदीच्या वाढत्या पातळीमुळे तसा भास झाला असावा. ते काहीही असो, आता मात्र मला काही झोप लागणार नव्हती. घड्याळात पाहिलं पहाटेचे तीन वाजले होते. अजून दोनतीन तास कटायचे होते. मी तसाच बिछान्यावर पडून राहिलो. आणि विचार करता करता मी कधी एकदा झोपी गेलो ते माझं मलाच समजलं नाही.
आज प्रवासाची काही घाई नव्हती, म्हणून आम्ही थोडं उशिरा म्हणजे सात वाजता उठलो. हॉटेलमधील एका वेटरला थोडे अतिरिक्त पैसे देवू केले. आणि त्याच्याकडून अंघोळीसाठी गरम पाणी मागवून घेतलं. वातावरण अगदी स्वच्छ झालं होतं. काल रात्री, इथे मुसळधार पाऊस पडला असेल असं कोणीच म्हणून शकणार नाही. इतकं स्वच्छ वातावरण होतं. कालची काळरात्र सुखरूप कटली होती. यातच सगळं काही आलं. अंघोळी उरकल्यावर, सगळं सामान घेऊन आम्ही हॉटेलच्या बाहेर पडलो. सगळं समान गाडीवर लादलं. आज दिवसभरात, आम्हाला चमोली ते हरिद्वार हे दीडशे किलोमीटरचं अंतर कापायचं होतं. त्यामुळे प्रवासाचा अतिरिक्त असा ताण नव्हता. परतीच्या प्रवासात रुद्रप्रयाग करून आम्ही पुढे निघालो. त्यांनतर, देवप्रयाग येथील अलकनंदा आणि भागीरथी नदीचा अनोखा संगम बघितला. वेळेअभावी, त्या संगमात पवित्र स्नान आम्हाला करता आलं नाही. पुढील प्रवासात, ऋषिकेशच्या अलीकडे असणारं निलकंठेश्वर नामक ठिकाणाला आम्ही भेट देवून आलो. अशी आख्यायिका आहे, कि समुद्र मंथनातून निघालेलं विष जेंव्हा शिवजींनी प्राशन केलं. त्यावेळी, त्यांच्या कंठामध्ये फार जहाल जळजळ होऊ लागली. तेंव्हा, या पहाडावरील थंड ठिकाणी विश्राम करण्यासाठी शिवजी आले होते. ते पवित्र ठिकाण पाहून आम्ही पुढे निघालो, वाटेमध्ये गंगा नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये, काही क्लबने वाटर राफ्टींग चे केम्प आयोजित केले होते. ती राफ्टींग करणारी तरुण मुलं मुली सुद्धा आमच्यासोबत रबरी बोटीमध्ये नदीतून झुलत ऋषिकेशला येऊन पोहोचत होते.
ऋषिकेशला पोहोचलो, तोवर रात्रीचे सहा वाजून गेले होते. हृषिकेश हे ठिकाण मला म्हणावं इतकं आवडलं नाही. राम झुला, लक्षमण झुला आणि गंगेच्या किनारावर असणारं बारा ज्योतिर्लिंग मंदिर हि ठिकाणं सोडली, तर मला.. मी निव्वळ पुण्यातल्या कोरगाव पार्कमध्ये आल्याचा भास होत होता. हृषिकेश मध्ये, ओशो रजनीश यांचा आश्रम असल्याने. संपूर्ण रस्त्यावर, फिरंगी लोकांची आवक जावक सुरु होती. प्रत्येक पावलागणिक एक तरी विदेशी नागरिक दिसतच होता. आणि त्या विदेशी गोऱ्या मुलींच्या पाठीमागे गोंडा घोळत फिरणारे, चित्र विचित्र पोशाख आणि केशभूषा केलेले आपले भारतीय तरुण पाहायला मिळत होते. त्यातील काही भाग्यवान मुलांनी त्या मुलींना आपल्या जाळ्यात ओढलेलं सुद्धा पाहायला मिळत होतं. ऋषिकेश पाहून झाल्यावर, आम्ही पुन्हा एकदा आमच्या जीपमध्ये बसलो,
ऋषिकेश ते हरिद्वार हे पंचवीस किमी अंतर आहे. जाताना वाटेमध्ये एक अभयारण्य सुद्धा लागतं. आमची गाडी त्या भागातून जाताना तेथील एक पोलीस आम्हाला म्हणाला. थोडं सावकाश जावा, जंगलात रोडवरून हिंस्र प्राणी फिरत असतात. प्राणी कसले घेऊन बसलात. साधा कुत्रा सुद्धा आम्हाला त्या मार्गात आढळला नाही. मात्र काही छुप्या ठिकाणी बैठक मारून काही पीताड लोकांचे दोनचार ग्रुप मात्र आम्हाला तिथे आढळले.
शेवटी, रात्री दहा वाजता आम्ही हरिद्वार येथे येऊन पोहोचलो. आमच्या चारधाम यात्रेची याठिकाणी सांगता झाली होती. सुखरूपपणे प्रवास घडवल्या बद्धल आम्ही सर्वांनी पवारचे आभार मानले. त्याचे उरलेले पैसे त्याला चुकते केले. सर्व मित्रांनी, त्याच्याशी गळाभेटी केल्या. प्रत्येकाने यथाशक्ती त्याला बक्षिशी देऊ केली. त्याने सुद्धा त्याचा खुशीने स्वीकार केला. गेल्या आठ दिवसात आम्हाला एकमेकांचा खूप लळा लागला होता. जड अंतकरणाने, पवारने आम्हाला अलविदा केला. आणि पवारचा मोबाईल खणाणला..
पवारच्या चेहेर्यावरील भाव पाहून, काहीतरी अघटीत घडलं असावं, हे मला ताबडतोब समजलं. पवारला मी काय झालं म्हणून विचारलं, तर म्हणाला..
आपण, चमोली मध्ये काल ज्या ठिकाणी मुक्काम केला होता. तिथे ढगफुटी झाली आहे..! निसर्गाचा भयंकर प्रकोप ऐकून मी पुन्हा एकदा नखशिखांत हादरलो होतो. आणि, आम्ही तशा प्रसंगात अडकलो नाही, म्हणून थोडा सुखावलो सुद्धा.
मला शेवटचा हात मिळवून पवार पुढे निघून गेल्यावर त्याने पुन्हा मागे वळून काही पाहिलं नाही. मी मात्र त्याची गाडी माझ्या नजरेआड होईपर्यंत त्याला पाहत होतो. जशी त्याची गाडी दिसेनाशी झाली, तसा मी सुद्धा माघारी फिरलो. सुखरूप यात्रा घडवल्या बद्धल परमेश्वराचे आभार मानले. आणि रात्रीच्या जेवणासाठी आम्ही सर्वांनी हॉटेल अमृतसर च्या दिशेने आमचा मोर्चा वळवला..!
समाप्त.
चारधाम यात्रा, ( प्रवास वर्णन ) भाग :- चोवीस.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
बद्रिनाथाच्या मंदिरातून, आमचा काही पाय निघत नव्हता. दुपारी तीन वाजता, मंदिराची कपाटं पुन्हा एकदा कोणत्यातरी धार्मिक विधीकरिता बंद करण्यात येणार होती. त्यामुळे, मंदिरातील आणि मंदिराच्या आवारातील सर्व भाविकांना त्या परिसरातून बाहेर काढण्यात आलं. जास्तीत जास्ती भाविकांना तीनच्या आता दर्शनाचा लाभ घेता यावा, याकरिता मंदिरातील व्यवस्थापकांची एकच धावपळ चालू होती. सगळी गर्दी पांगायला लागली होती. शेवटी आम्ही सुद्धा मंदिरातून काढता पाय घेतला. मंदिराच्या बाहेर असणाऱ्या दुकानातून आवश्यक आणि आवडीच्या वस्तू खरेदी करून आम्ही तेथून बाहेर पडलो.
रुद्राक्ष.. या वस्तू विषयी, आजवर माझ्या मनामध्ये भरपूर कुतूहल होतं. हि रुद्राक्षाची फळं, खरोखरीच असतील का..? या गोष्टीचं मला पूर्ण ज्ञान नव्हतं.
कारण, बर्याच लोकांच्या तोंडून मी असं ऐकून होतो. कि.. खरे रुद्राक्ष आपल्या पर्यंत येतच नाहीत. आपल्याला जे रुद्राक्ष दिले जातात, ते.. प्लास्टिकच्या सहाय्याने बनवलेले असतात. परंतु, बद्रीनाथ या ठिकाणी नेपाळहून आणि हिमालयाच्या अरण्यातून काही व्यापाऱ्यांनी रुद्राक्षाची ताजी फळं आणून त्याठिकाणी विक्रीसाठी ठेवली होती.
थोडासा आंबूस वास असणारी काळपट रंगाची रुद्राक्षाची फळं तिथे मला पाहायला मिळाली. पन्नास रुपयाला एक फळ.. म्हणजे, एक 'रुद्राक्ष' तिथे विक्रीसाठी उपलब्ध होता. ते व्यापारी, आपल्यासमोर हे फळ सोलून देत होते. त्या फळाच्या आतमध्ये, किती मुखी रुद्राक्ष दडला आहे..? ते, तुमच्या नशिबावर अवलंबून असतं. एक आवड म्हणून, मी तेथून काही रुद्राक्षाची फळं विकत घेतली, आणि तेथून पुढे निघालो.
हिंदू शास्त्राप्रमाणे, धार्मिक कार्यात अन्न दानाला फार मोठं महत्व दिलं गेलं आहे. त्याकरिता अशा धार्मिक ठिकाणी, अन्नदान फार मोठ्या प्रमाणात केलं जातं. चारधाम यात्रेत, यमुनोत्री आणि गंगोत्री हि दोन ठिकाणं सोडली. तर, केदार आणि बद्री येथे आम्हाला भंडार्याचा लाभ मिळाला.
बद्रीनाथ धामावर, फार मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याच आयोजन केलं गेलं होतं. पंचपक्वान्नाचे जेवण, त्याठिकाणी सर्व भाविकांना आवडीने खाऊ घालत होते.
आणि काही भाविक.. त्या मोला महागाच्या अन्नाची नासाडी करत होते.
येवढ्या दुर्गम भागात, तुम्हाला पंचपक्वान्नाचे जेवण पैसे देऊन तरी मिळणार आहे का..? याची कोणालाच जान नसते. जेवण, आणि त्यासोबत छोट्या ग्लासमधील बिसलेरी पाणी सुद्धा त्या भंडाऱ्यात भाविकांना अगदी मोफत देण्यात येत होतं.
शिवाय, ज्या भाविकांना जेवण करायचं नाहीये. त्यांच्याकरिता.. चहा, कॉफी, बिस्कीट आणि काही नमकीन पदार्थ सुद्धा तिथे वाटण्यात येत होतं.
त्या श्रद्धाळू भाविकांची सेवा पाहून, मी फारच कृतकृत्य झालो. त्या अन्न्दात्यांना तोंडभरून आशीर्वाद दिले. आणि, तिथे जवळच असणाऱ्या भारतातील शेवटच्या 'माना' नावाच्या गावाला भेट द्यायला आम्ही गेलो. माना गाव, आणि तेथील बरीचशी माहिती मी पुन्हा कधीतरी विस्तृतपणे लिहीन.
वेळ कसा निघून जातो पाहा ना, दिवस बुडालेला कळत नव्हता. पाच वाजून गेले होते. आज, यात्रेचा सातवा दिवस होता. त्यामुळे, काही मित्रांचं म्हणणं झालं, कि आपली यात्रा किंवा त्याचे ठराविक तीन दिवस अजून बाकी आहेत. तर, आपले थोडे जादाचे पैसे खर्च होतील. पण आपण, इतक्या लांब आलोच आहोत. तर हेमकुंड साहिब आणि त्याच रोडवर असणाऱ्या फुलोंकी घाटी या ठिकाणांना भेटी देवून येऊयात. फुलोंकी घाटी म्हणजे,
आपल्या साताऱ्यात.. जे, कासचं पठार आहे ना. अगदी तशाच प्रकारची फुलांची घाटी त्याठिकाणी आहे. पण, ती फुलं उमलायचा ठराविक एक कालावधी असतो. आणि, ती फुलं उमलायची वेळ आत्ता तर नव्हतीच.
शेवटी आमचं..गुरुद्वाराला भेट देऊन येऊयात असं ठरलं.
पण, सखोल चौकशी केल्यावर समजलं, कि हेमकुंड साहिब येथे जाऊन येण्यासाठी. किमान दोन दिवस खर्ची पडतील. चारधाम पेक्षा खडतर चढाई त्याठिकाणी आहे. आणि सतत होत असणाऱ्या स्नो फॉलमुळे त्या यात्रेत अनंत अडचणी येत असतात.
मला तर.. चारधाम यात्रा झाल्यानंतर, कुठेही फिरायचं नव्हतं. कारण, येथील वातावरण फार लहरी आहे हो.
आम्ही, चारधाम यात्रा सुरु करण्याअगोदर बद्रीनाथ येथे जोरदार ढगफुटी झाली होती. त्यामुळे, माझं मुख्य उद्धिष्ट पूर्ण झाल्यामुळे, मला लवकरात लवकर या भागातून बाहेर पडावंसं वाटत होतं. विनाकारण, विषाची परीक्षा कशाला घ्या नाही का.
पवार सुद्धा.. हेमकुंडाला चला म्हणून आमच्या मागे लागला होता. कारण, त्याला त्याचे अतिरिक्त पैसे मिळणार होते. पण शेवटी, मी त्याला विचारलं तू पहिला तिथे जाऊन आला आहेस का..? तर, तो नाही म्हणाला. मग मी म्हणालो, तूच कधी तिकडे कधी गेला नाहीयेस. मग आम्हाला तरी कशाला नेतोस..! जाऊदेत, आल्या पावली माघारी चल बाबा. शेवटी.. नाही हो करता, आम्ही पुन्हा आल्या रस्त्याने माघारी निघालो. पुन्हा एकदा मागे वळून बद्री विशाल कि जय म्हणून आम्ही परमेश्वराच्या आणि त्या देवभूमिच्या पाया पडलो. आणि परतीच्या प्रवासाला सुरवात केली.
संध्याकाळचे सहा वाजले होते, जोशी मठाच्या आसपास आम्ही पोहोचलो होतो. शक्य तितकं अंतर कापून या भागातून बाहेर पडायचं मी ठरवलं होतं. त्यामुळे, जोशीमठ येथे मुक्काम न करता. काल रात्री आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो, त्या चमोली गावात मुक्काम करायचं निश्चित झालं. जोशी मठाचा परिसर सोडला, तसा मुसळधार पाऊस सुरु झाला. हा पाऊस काही आमचा पिच्छा सोडत नव्हता. चमोली अजून पन्नास किमी दूर होतं. अजून बऱ्यापैकी स्वच्छ दिसत होतं, त्यामुळे आम्ही प्रवास सुरु ठेवला होता. पुन्हा कालच्या ठिकाणी थांबण्यासाठी त्या धर्मशाळेत तसं कळवायला हवं होतं. पण चुकून आम्ही त्या हॉटेल मधील विझिटिंग कार्ड घ्यायला विसरलो होतो.
बरीच फोनाफोनी केल्यावर, पवारचा एक मित्र तिथेच मुक्कामी आहे असं आम्हाला समजलं. त्याला विचारलं, तर तो म्हणाला.
आज.. हि सगळी धर्मशाळा फुल झाली आहे. तुम्ही मागेच कुठेतरी थांबण्याची व्यवस्था करा.
शेवटी एकदाचं.. आम्ही चमोली गावात येऊन पोहोचलो. बराच वेळ लॉजची शोधाशोध केली, पण सगळीकडून नकार ऐकू येत होता. शेवटी, एका ठिकाणी आम्हाला लॉज मिळाला, पण त्या मालकाने अडवणूक करून आमच्याकडून एका रूमचे दीड हजार रुपये घेतले. अडला नारायण, आता काय करता.
यात्रा सुखरूप झाली होती, त्यामुळे आम्ही पैश्याचा विषय मनावर घेतला नाही. आणि पटकन आम्ही त्या रूम ताब्यामध्ये घेतल्या.
आमचं सगळं सामान रूम मध्ये टाकलं, थोडे फ्रेश झालो. आणि त्या लॉज मालकाच्या हॉटेलमध्ये जेवायला आलो. पलीकडच्या टेबलवर एक ड्रायव्हर जेवायला बसला होता. डोक्यात अक्काबाई टाकूनच तो बसला होता. आणि, तो एकटाच काहीतरी बडबडत होता. तो काय म्हणतोय.. ते मी, जरा कान देवून ऐकलं. तर,
तो भयाण काही तरी बोलत होता. म्हणत होता,
" केदारनाथ परिसरात आणि टेहेरी भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली आहे. पुढील सगळे रस्ते बंद झाले आहेत..! "
आणि.. ढगफुटी मध्ये, आकाशातून पावशेरभर वजनाच्या गारांचा सुद्धा वर्षाव झाला आहे. आणि त्यामुळे, एका गावातील शंभर बकर्या आणि सहा गुराखी मृत्युमुखी पडले आहेत.
मला.. त्या बेवड्याच्या बोलण्याचं काही खरं वाटत नव्हतं. म्हणून, आम्ही टीव्हीवर येणाऱ्या बातम्या लाऊन पहिल्या,
बातमी.. शंभर टक्के खरी होती. आता मात्र, बाकी मित्रांना मी येथून लवकर बाहेर का पडायचं म्हणतोय, त्याचा अंदाज आला.
एवढी भयानक बातमी ऐकून, माझे सगळे मित्र सैरभैर झाले होते. खुद्द, हॉटेल मालक सुद्धा चिंतातूर झाला होता.
म्हणाला, यात्रा सुरु झाल्यापासून ढगफुटीची हि पाचवी वेळ आहे. अजून कितीवेळा ढगफुटी होणार आहे. ते परमेश्वरालाच माहिती.
त्याच्या अशा बोलण्याने, आम्ही सुद्धा थोडे दचकून गेलो. संपूर्ण रात्र कटायची होती. पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता.
शेवटी, कसेबसे दोन-दोन घास आम्ही पोटात ढकलले. आणि गपगुमान, आपापल्या रूम मध्ये झोपी जाण्याचा प्रयत्न केला.
क्रमशः