Tuesday, 29 May 2018

एक गाव असावाच..
***********************
शहरातल्या डांबरी पायवाटा तुडवून थकल्याने,
मातीच्या पायवाटेच्या हळुवार स्पर्शासाठी.
एक गाव असावाच....
कार मधून दिसणाऱ्या देवाचं रोज ओघवतं दर्शन घ्यावं लागतं,
मंदिरात भक्तिभावाने टाळ कुटत बसण्यासाठी.
एक गाव असावाच....
अंगावरती उडणारे अत्तारचे फवारे तर नित्याचेच,
अंगणातल्या शेणाच्या सड्याच्या मंद,धुंद सुवासासाठी.
एक गाव असावाच...
पोहे, उपमा, इडली, शिरा.. हि तर नित्याचीच न्याहारी,
शिळी भाकर आणि चटणी कांदा खाण्यासाठी.
एक गाव असावाच....
रोज-रोज त्याच टीव्ही मालिका पाहून जीव कंटाळून जातो,
जात्यावरच्या सुरेल ओव्या ऐकण्यासाठी.
एक गाव असावाच....
एसी कार मधून फिरायला सोकावलेल्या शरीराला,
बैलगाडीचे खाच खळगे उमजण्यासाठी.
एक गाव असावाच....
चिकन तंदुरी, तंदूर रोटी रोज तेच खाऊन मन अगदी विटतं,
गावरान कोंबडीचा झणझणीत रस्सा भूरकण्यासाठी. एक गाव असावाच....
उंची मद्य पिऊन नशा लपवत हाय बाय करीत जपून बोलावं लागतं.
हातभट्टीची बाटली ढोसून मनसोक्त बरळण्यासाठी,
एक गाव असावाच....
सुटा बुटातील किचकट पेहेरावाचा खूपच वैताग येतो,
मोकळी, ढाकळी लुंगी किंवा पायजमा लेऊन निवांत फिरण्यासाठी.
एक गाव असावाच....
मऊशार गादीवर तर रोजच झोपत असतो,
शेणाने सारवलेल्या ओसरीवर निवांत निजण्यासाठी.
एक गाव असावाच..
परवा ऑफिसमध्ये, एका मित्राबरोबर हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेलो होतो. समोरच्या टेबलवरच, आमच्या महानगरपालिकेतील चार महिला सुद्धा बसल्या होत्या. त्या महिला, आमच्या प्रभागात सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. मी त्यांना ओळखतो. पण, त्या मला काही ओळखत नाहीत. कारण, माझा बऱ्याच खात्यातील लोकांशी संपर्क येत असतो. तसा, त्यांचा जनसंपर्क फारच कमी. आपलं काम भलं, आणि आपण भलं अशा स्वभावाच्या त्या महिला होत्या.
झाडूकाम करणाऱ्या चतुर्थश्रेणीत असणाऱ्या महिलांना सुद्धा, आमच्या इथे चांगले पगार आहेत. तसं पाहायला गेलं तर, विदेशातील चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी आणि भारतातले कर्मचारी यांच्या वेतनाची कधीच बरोबरी होऊ शकत नाही. तो भाग निराळा आहे. कारण, भारतात अजूनही बरच अज्ञान आहे.
तर... विषय असा होता. ह्या महिलांना जरी, मोठ्या रकमेचे पगार असले. तरी, त्या पगारावर त्यांचा काहीएक अधिकार नसतो. हे मी, माझ्या अनुभवावरून सांगतोय. बहुतकरून, अशा महिलांचे पती महाशय सर्रास दारू पिणारे असतात. तर, त्यांची मुलं सुद्धा त्याच वळणावर गेलेली पाहायला मिळतात. पगार झाला, कि नवऱ्याचा आणि मुलांचा ससेमिरा त्या महिलांच्या सतत मागे लागलेला असतो. त्यामुळे, इच्छा असताना सुद्धा या महिलांना स्वतः अशी काहीएक हौसमौज करता येत नाही. सगळे पैसे, त्या घरच्यांच्या नरड्यात घातलतात. असं म्हंटल तर, ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
यांच्या वाट्याला, कायम दुखःच असतं. काम करून सुद्धा, त्यांना सुखाचा घास खायला मिळत नाही. अशी, बरीच उदाहरणं मी आजवर पाहिली आहेत. तरीही, त्या बिचार्या आपल्या संसाराचा रामरगाडा आनंदाने रेटत असतात.
पण... परवा त्या हॉटेलमध्ये, मला एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. त्या चार महिलांनी, प्रथम प्रत्येकी एक वडा सांबराची ऑर्डर दिली. ते संपल्यावर, त्यांनी लगेच मसाला डोसाची ऑर्डर दिली. माझं, चहा पिण्याकडे मुळीच लक्ष नव्हतं. नाश्ता करता-करता, त्यांच्या सुरेल गप्पा आणि हसणं खिदळनं चालू होतं. त्या त्यांच्याच विश्वात रममाण झाल्या होत्या, समोर असणाऱ्या बेगडी जनतेचं त्यांना काहीएक देणंघेणं नव्हतं. मी मात्र त्यांच्यातच पूर्णपणे समरस झालो होतो. पण मी, त्यांना त्याची किंचितही भनक लागू दिली नव्हती.
बऱ्याच दिवसांनी, आज मी त्यांना खूप प्रसन्न असलेलं पाहत होतो. स्वतः कमावलेल्या पैश्यावर, त्या मज्जा मारत होत्या. त्यांच्यासाठी, मज्जेची व्याख्या तरी नेमकी काय असावी..? ह्या, छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा त्यांना खूप लाखमोलाच्या आणि आनंदाच्या असतात. त्यांना जगण्याची नवी उर्मी देत असतात.
त्यांचा नाश्ता उरकला. त्यांची क्षुधाशांती झाली होती. नंतर त्यांनी गरमागरम चहा मागवला. एकात दोन नाही, तर.. प्रत्येकी एक असा चहा त्यांनी मागवला होता. चहा पिऊन झाल्यावर, बिल देवून प्रसन्न चेहेर्याने त्या तेथून निघून गेल्या. आज एक वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
आणि, त्यांच्या चेहेर्यावरची ख़ुशी पाहून. काहीही न खाता, माझं पोट मात्र गच्च भरलं होतं..!
माझ्यासमोर ठेवलेला हाफ कटिंग चहा सुद्धा, केंव्हाच थंड झाला होता..

काल संध्याकाळी.. सगळी कामं आटोपल्यावर,
मोकळी हवा खात मी आमच्या ऑफिसच्या गेटसमोर उभा होतो. गेटसमोरील बाजूस, एका महिलेच्या वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाचा बॅनर लावला होता.
मी.. त्या बॅनर वरील फोटो पाहून त्यावरील मजकूर वाचत होतो. आणि ते वाचून झाल्यावर, अचानक माझं लक्ष थोडं बाजूला गेलं. तर तिथे माझ्या समोरच,
एका बाईकवर.. एक थिल्लर बाई, एका मुलासोबत तोंडात गुठका चघळत बसली होती. आणि एकाएकी माझी आणि तीझी नजरानजर झाली.
त्या बाईने पाहिलं होतं, कि मी समोरील बॅनर पहात होतो. 
आणि त्यानंतर.. आता, मी तिच्याकडे पाहिलं आहे.
त्यावर.. माझ्याकडे पाहून ती बाई मला म्हणाली.
हा-हा माझाच है..!
म्हणजे.. तिला असं म्हणायचं होतं, कि तो बॅनर आणि त्या बॅनर वरील फोटो माझाच आहे.
बहुतेक ती बाई अनपढ आणि मूर्ख सुद्धा असावी. तिला वाटलं असावं. कि समोर लावलेला बॅनर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता लावला असावा. आणि समोरील बॅनर लावलेल्या महिलेच्या आणि माझ्या दिसण्यात काहीतरी साम्य असावं. त्यामुळे, हा व्यक्ती माझ्याकडे पाहात असावा.
हे म्हणजे असं झालं.. " मान ना मान, मैं तेरा मेहेमान "
निव्वळ मूर्ख बाई होती ती, माझ्यासोबत फुकट बॅटिंग करायला पाहात होती. शेवटी मी सुद्धा तिला एक गुगली बॉल टाकलाच. आणि तिला म्हणालो..
अगं.. तो वाढदिवसाचा नाही, वर्ष श्राद्धाचा बॅनर लागला आहे..!
तसं तिने, मागे वळून तो बॅनर पुन्हा एकदा पाहिला.
आणि.. बाईकवर बसलेल्या त्या पोराला जोरात चिमटा काढला. तसं त्या पोराने सुद्धा, जोरात बाईक दामटली, आणि ती जोडी क्षणार्धात अगदी दिसेनासी झाली..!


माझ्या ओळखीतले..
काही गुठ्का, तंबाखू आणि मावा खाणारे व्यक्ती,
दारू पिणाऱ्या व्यक्तींना नेहेमी बदनाम करत असतात, त्यांना नावं ठेवत असतात. पण त्यांना हे समजत नाही, कि.. अति प्रमाणात दारू पिणारा व्यक्ती, हा लिव्हर खराब होऊन मरणार असतो.
आणि.. लिव्हर हे आपल्या पोटाच्या आत असतं. ते बाहेर कोणालाही दिसत नसतं..!
त्याविरुद्ध.. गुठ्का किंवा मावा खाऊन होणारा रोग..
हा आपल्याला, अगदी समोरासमोर त्यांच्या तोंडावर दिसू शकतो. त्यामुळे, कोणत्याही जाहिरातीत दारूमुळे..
कोण, का आणि कसा मरतो, हे कोणी दाखवत नाही..!
पण.. सिगरेट आणि गुठखा खाऊन आपली काय परिस्थिती होते. ते अगदी खुलेआम दाखवत असतात. अगदी गुठ्का आणि सिगारेटच्या पाकिटावर सुद्धा, नको तसली घाणेरडी चित्र दाखवली जातात. सिनेमागृहात गेल्यावर, या आशयाच्या जाहिराती दाखवल्या नाही.. तर, मी तुम्हाला म्हनेने ती पैज हरेल. परंतु..
" दारूच्या कोणत्याच बाटलीवर असली भयानक चित्रं दाखवली जात नाहीत.! "
का.. याचं मला कोणी उत्तर देऊ शकेल का..?
मध्यंतरी.. माझा एक मित्र, गुठखा आणि मावा याच्या नियमित सेवनाने वयाच्या तिसाव्या वर्षीच आमच्यातून कायमचा निघून गेला. पण आजवर, दारू पिऊन आमच्यातला एका सुद्धा मित्राने इहलोकीची यात्रा संपवली नाहीये. दारू तरी लोकं चोरून पितात हो. पण.. गुठ्का, तंबाखू, मावा, सिगारेट.. हि व्यसनं, सर्वांसमोर अगदी बिनदिक्कत केली जातात. आणि लोकं विनाकारण दारूला बदनाम करतात..!
हे सगळं सांगून, मी दारूची जाहिरात करतोय. असं कोणीही समजू नये. दारू सुद्धा वाईटच आहे, पण तिच्या मोजक्या सेवनाला, दवा असं संबोधलं गेलं आहे. शास्त्रात सुद्धा तसं लिहून ठेवलं आहे. शास्त्रात.. दारूला सोमरस असं गोंडस नाव दिलं गेलं आहे.
जमल्यास.. गुठ्का खा, तंबाखू खा, मावा खा, किंवा सिगरेट प्या. किंवा.. अतिप्रमाणात दारू प्या, मला त्याचं काहीएक सोयरसुतक नाहीये. शेवटी, प्रत्येकाला आपलं हित समजत असतं.
दारू हि दवा आहे, गुठ्का पिचकारी.. आणि, सिगरेट धुवा आहे..!
हे सगळं लिहून मला कोणालाही दुखवायचं नाहीये, पण कसं आहे, मला राहवत नाही ना.
( टीप :- या पोस्ट मागचा मुख्य हेतू, माझे सर्व मित्र.. तंबाखूच्या व्यसनापासून दूर व्हावेत. आणि त्यांना उदंड आयुष्य लाभावं. हीच त्यामागची एक प्रामाणिक इच्छा..! )


फार जुनी घटना आहे..
नगरसेवकाच्या निवडणुकीत एक उमेदवार फार मोठ्या उच्चांकी मताने निवडून आला होता. त्यामागे कारण असं होतं.
निवडणुका म्हंटलं की पैशाचा बाजार हा आलाच. सगळे उमेदवार भरमसाठ पैसे वाटत होते. आणि काही हुशार मतदार, मिळेल तिकडून पैसे घेत होते.
पण त्यातील एक उमेदवार असा होता, जो रेशनकार्ड पाहून प्रत्येक मताला पाचशे रुपये देत होता. तो उमेदवार हे कार्य स्वतः करत होता. तो पैसे वाटायला ज्या ठिकाणी बसला होता. त्याठिकाणी त्याच्या शेजारी एक जाड्या मिठाचं पोतं ठेवलं होतं.
पैसे घेऊन झाले, की दुसऱ्या हाताने त्या पैसे घेणाऱ्या व्यक्तीला, तो पोत्यातील मीठ उचलायला लावायचा.
या गोष्टीचा असा परिणाम झाला, की.. ही एकप्रकारची शपथ आहे.
मिठाला जागलं पाहिजे..!
या विषयाचा सगळीकडे रीतसर प्रचार केला गेला. आणि तो उमेदवार मोठया मतांनी निवडून आला.
आजही.. मीठ या विषयाला लोकं किती घाबरतात. याचं हे जिवंत उदाहरण आहे..!

" पायात काटा रुतल्यावर, सुरवातीला आपण तो स्वतः काढण्याचा प्रयत्न करत असतो. कारण.. जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्ती हा जन्मजात एक सर्जन असतो.
पण.. पायात रुतलेला हा काटा कसा काढायचा आहे..?
ते माहित असून सुद्धा, जो व्यक्ती आपल्या हातात सुई घेऊन, काही विश्वासू व्यक्तींना आपल्या पायातील काटा काढायला सांगतो.
त्यावेळी.. चुकीचा उपचार होऊन.. त्या व्यक्तीला, नक्कीच " धनुर्वात " होऊ शकतो.
कारण, गाफील राहण्या इतपत चुकीची दुसरी कोणतीही गोष्ट नाही..! "
जो चुकतो तोच मनुष्य असतो..
नाहीतर, देवाची निर्मिती किंवा अस्तित्व कोणी सुद्धा मान्य केलं नसतं..!


लहानपणापासूनच, मला सैन्यात भरती होण्याचें 'डोहाळे' लागले होते.
दहावी पास झाल्यानंतर, मी तसा एकदा प्रयत्न सुद्धा केला होता. पण, भरती दरम्यान मी उंचीमध्ये मार खाल्ला. आणि, शेवटी तो नाद सोडून दिला.
कॉलेज मध्ये असताना, दुधाची तहान ताकावर भागवावी म्हणून. मी, एन.सी.सी. जॉईन केली.
दर रविवारी, सुट्टी दिवशी त्याकरिता मला कॉलेजला जावं लागायचं. पण, मला त्याचा कंटाळा येत नव्हता. उलट, आनंदच वाटायचा.. 
पहिल्या वर्षी, ट्रेनिंगचा एक भाग म्हणून आम्हाला रायफल चालवण्याकरिता मिलेट्री कॅम्प मध्ये नेलं होतं. एक तर माझा 'चिमुरडा' नाजूक जीव. आणि, त्यात ती थ्री नॉट थ्री ची जड रायफल.
पण, सैन्य दलातील प्रशिक्षकांनी मला धीर दिला.
आणि म्हणाले, छोटू... डरनेका नही. हम है ना..!
प्रत्येक प्रशिक्षनार्थ्याला, रायफलच्या पाच गोळ्या झाडायला मिळणार होत्या.
बाकी सर्व मुलं, अंगा पिंडाने मजबूत होती. पण, माझी मलाच नाहक काळजी लागून राहिली होती. काय होईल, आणि कसं होईल...?
आणि, सरते शेवटी माझा नंबर आला. आमच्या कंपू मध्ये, एकूण पाच मुलं होती. प्रत्येकाला एक-एक रायफल दिली गेली. रायफल मध्ये गोळ्या कशा सारायच्या, आणि.. रायफल कशी धरायची याचं शास्त्र शुद्ध प्रशिक्षण आम्हाला दिलं गेलं. पोटावर झोपलेल्या अवस्थेत, छातीवरील भाग थोडा वरील बजुस करत, रायफलला मानेखालील आडवं हाडूक आणि छातीच्या थोड्या वरील बाजूस असणार्या मांसल भागावर रायफलचा दस्ता घट्ट धरण्यास सांगितला. आणि, गोळ्या झाडण्याचा इशारा केला गेला.
छातीला एक जोरदार धक्का देत.. ठो ssss असा आवाज करत, बंदुकीतून गोळी सुटली.
आणि, समोर दूरवर असणार्या माणसाच्या प्रतीकृती वर ती गोळी जाऊन धडकली.
तितक्यात, कोठून तरी जोरात किंचाळण्याचा आवाज आला.
त्या आवाजाने, माझ्या तर गोट्याच कपाळात गेल्या. वाटलं, आमची गोळी चुकून कोणा व्यक्तीला लागली तर नाही ना ? माझ्या मनात नको त्या शंका येऊ लागल्या. पण तिथे, एक वेगळाच प्रकार घडला होता.
एका केडेटने... ताकतीच्या जोरावर जाऊन, रायफल छातीशी घट्ट न धरता थोडीशी हवेत धरली होती. आणि, गोळी सुटल्यानंतर रायफलचा दस्ता मागील बाजूस जोरात सरकून, त्याच्या फटक्याने त्याच्या मानेखालचं आडवं हाड तुटलं गेलं होतं.
ह्या घडलेल्या प्रकारामुळे, तो फौजी प्रशिक्षक खूपच चिडला होता.
त्या मुलाला, ताबडतोब अंबुलन्स मध्ये बसवून इस्पितळात नेलं गेलं.
हा नको तो उद्योग घडल्यामुळे, रागारागातच, तो आम्हाला म्हणाला..
भांचोत... पाच किलोकी रायफल ठीकसे नही पकड पाते.. पचास किलोकी 'लडकी' मिल जाये, तो कमर मे कसके पकडे रखोगे..!
मादरजात कहीके..
चलो, शुरू हो जावो, अब कि बार कोही गलती नही करेगा..!
माझ्याकडे अंगुली निर्देश करीत, तो फौजी मला म्हणाला..
छोटू.... उठा रायफल, और कर दे खाली..!
मी सुद्धा.. धाड s, धाड ss, धाड sss... आवाज काढत पूर्ण रायफल खाली केली. माझी रायफल खाली झाल्यावर. त्या फौजीने, माझा हात पकडत सर्व शिक्षनार्थीना उद्देशून तो म्हणाला.
चाहे, तबियत कम क्यू न हो... लेकीन अकल ठिकाणे होनी चाहिये.
वेल डन छोटू.. असं म्हणत माझ्या पाठीवर, त्याने शाब्बासकीची थाप ठोकली.
आणि माझं, 'फौजी' होण्याचं स्वप्नं साकार झालं..!


Reply1w
१९७७ साली..
माझ्या आई वडिलांसोबत, मला पहिल्यांदा मुंबईला जाण्याचा योग आला. आत्तापर्यंत, मी जे काही लिहिलं. ते सगळं, सांगोवांगीच होतं. आता, मला प्रत्यक्ष ते ठिकाण पाहायला मिळणार होतं. जिथे माझे आईवडील राहायचे.
तिच इमारत, तेच मंदिर. आणि, सगळा काही तोच माहोल. मी, अगदी भारावून गेलो होतो. लहान पनापासूनच, मी धार्मिक व्यक्ती. त्यामुळे, पहिलं त्या देवीच्या मंदिरात मी माथा टेकवला. आणि, इमारतीचा दादर चढून वर गेलो. वडिलांनी, त्या त्रिकोणी खोलीला असलेलं कुलूप उघडलं. वडिलांनी सांगितल्या प्रमाणे, अगदी तशीच ती खोली होती. बालिशपने, मी माझ्या वडिलांना म्हणालो.
आण्णा, घर छोटं आहे. पण, मस्त आहे कि ओ. आपण इथेच राहुयात का.!
वडील म्हणाले, अरे, आता हे घर आपल्याला विकायचं आहे.
थोड्याच वेळात, ते घर विकत घेणारा व्यक्ती तेथे आला. त्यावेळेस, पंचवीस हजार रुपयांना माझ्या वडिलांनी ते घर विकलं होतं.
जिन्यामध्ये उभा असताना, तिथे मला तळलेल्या माशांच्या वासाचा 'शुभ' समाचार मिळाला.
मी, वडिलांना म्हणालो. आण्णा... तिकडून, मासे तळलेल्याचा वास येतोय..!
पलीकडच्या घरातील लोकांना, आम्ही आल्याचा काहीच सुगावा नव्हता.
वडिलांनी, एक मोठा आवाज दिला..
सुमनsss.... ह्या आवाजाबरोबर, एक गोरी गोमटी सुंदर महिला त्या घरातून बाहेर आली. माझ्या वडिलांना पाहून, ती म्हणाली. अहो नाना, तुम्ही कधी आलात ?
( माझ्या वडिलांचं नाव नानासाहेब आम्ही त्यांना 'आण्णा' म्हणायचो. पण, इतर लोकांच्या लक्षात ते येत नव्हतं. त्यामुळे, जवळ-जवळ सगळेच लोक माझ्या वडिलांना नाना आणि आईला नाणी म्हणत असत. )
सुमन, माझ्या वडिलांची मुंबई मधील मानलेली बहिण.
वडील तिला म्हणाले, अगं आम्ही आत्ताच आलोय बघ. तितक्यात, त्या त्रिकोणी खोलीतून माझी आई आणि तिच्या पाठोपाठ मी सुद्धा बाहेर आलो.
आईला पाहून सुमन आत्या म्हणाली, नाणी तुम्ही पण आलात..! आणि, हा छोटा कोण आहे ?
वडील म्हणाले... हा आमचा धाकटा, 'पंडित' आहे.
आणि म्हणाले, तुझ्या घरात बनत असलेल्या माश्यांचा त्याला वास ( इथे, सुवास म्हणनं योग्य ठरणार नाही..  ) आलाय.
बघ, त्यामुळे तो किती खुश झाला आहे. आत्याने, मला घरात बोलावून तळलेले खरपूस मासे खाऊ घातले. त्यानंतर, आई,अण्णांनी सुद्धा तिथेच जेवण केलं. मस्त जेवण झाल्यामुळे, सुस्तावून मी तिथेच कलंडलो.
तोपर्यंत, आमच्या घराचा सौदा पक्का झाला होता. मिळालेली रक्कम घेऊन, आम्ही सुमन आत्याचा निरोप घेतला. आणि, मुंबईला कायमचा रामराम ठोकला.
मला चांगलं आठवतंय, त्यावेळेस आम्ही प्रवास करत असलेली मुंबई-पुणे जी रेल्वे कोणती होती. ती डबल डेकर होती. त्या गाडीचं नाव काय होतं ते मला आता आठवत नाहीये. पण बहुदा, ती सिंहगडच असावी. त्या डबल माळ्याच्या रेल्वेचं मला तेंव्हा खूपच कौतुक वाटलं.
रेल्वेत चढल्यावर.. घाईमध्ये, मी वरील असणाऱ्या आसनावर जाऊन बसलो.
गाडीमध्ये, म्हणावी अशी गर्दी नव्हती.. त्या वरील बाकड्यावर, माझ्या शेजारी माझ्याच वयाची एक सुंदरशी मुलगी सुद्धा बसली होती. तेंव्हा, माझा अवतार अगदी पाहण्यासारखा होता. माझ्या अंगावरील कपडे म्हणजे, शाळेतील खाकी हाफ पँट आणि पांढरा सदरा. पायात चप्पल सुद्धा घालत असतात. हा प्रकार, मला अजून तरी माहिती नव्हता.
त्यामानाने, ती मुलगी खूपच सुंदर असा पांढरा झुपकेदार फ्रॉक परिधान करून आली होती, पायामध्ये पांढर्याच रंगाचे सँडल होते. तिच्या हातामध्ये, कोणत्या तरी क्रीमच्या बिस्कीटचा पुडा होता. एक-एक करून.. ती, त्यातील बिस्किट्स खात होती. माझं, त्याकडे विशेष असं लक्ष नव्हतं. मी, माझ्याच मस्तीमधे होतो.
पण, त्या मुलीला वाटलं असावं. कि, या लहान मुलाला सुद्धा ह्यातील एक बिस्कीट द्यावं. म्हणून, तिने तो बिस्किटचा पुडा माझ्यासमोर धरला. मी, थोडसं मागे सरकून तिला मानेने नाही असं म्हणालो.
खालच्या सीटवरून, तिची आई आम्हाला पाहत होती.
तिने खालूनच आवाज दिला..
बाळा, घे कि रे बिस्कीट..!
तरी सुद्धा, मी काही धाडस केलं नाही. शेवटी खालून माझ्या आईने मला मानेने बिस्कीट घे म्हणून खुणावलं. तेंव्हा कुठे, मी त्यातील एक बिस्कीट घेतलं. मला, ते बिस्कीट खूपच आवडलं होतं. पुन्हा धाडस करून, मी त्या पुड्यातील अजून एक बिस्कीट घेतलं.
तेंव्हा, त्या मुलीच्या चेहेर्यावर आलेलं 'हास्य' मी अजून विसरलो नाहीये.
आज, ती मुलगी कोठे असेल ? काय असेल ? काही माहित नाही.
किती अवघड गोष्टी असतात नाही.
आज, मी होऊन सुद्धा त्या मुलीला शोध घेऊ शकत नाही. हे, वास्तव आहे.
पण तो क्षण, माझ्याकरिता अगदी अविस्मरणीयच.
नंतर, केंव्हा एकदा पिंपरी स्टेशन आलं ते मला सुद्धा समजलं नाही.
त्या चिमुरडीला, मी इवल्याशा हाताने बाय केलं. आणि, रेल्वेतून बाहेर पडलो.

उन्हाळा सुरु झाला.. कि सर्वात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दिसणारा विषय म्हणजे.
पाण्याचे टँकर..!
हे पाण्याचे टँकर तहानलेल्या गावांना आणि शहरी भागातील काही भागांना पाण्याचा पुरवठा करत असतात. तसं पाहायला गेलं तर, हा विषय फार गंभीर आहे. पाण्याची भीषण टंचाई कशामुळे निर्माण झाली..? हे पाहायला गेलो तर, सतरा प्रश्न आपल्या समोर आ वासून उभे राहतील.
असो.. मला त्याविषयी काही बोलायचं नाहीये.
पण कसं आहे,
जगाच्या दृष्टीकोनातून आजच्याला सर्वात महाग वस्तू कोणती असेल..?
तर, ती म्हणजे तेल.!
मग त्यात, सुरवातीला.. पेट्रोल त्यानंतर डीझेल आणि मग रॉकेल. अशी क्रमवारी लागते. बाकी ऑईल वगैरे सुद्धा आहेतच.
आजच्याला.. रॉकेल हा विषय काही खासा राहिला नाहीये. कारण रेशनकार्डवर सुद्धा हल्ली अगदी मोजक्या व्यक्तींनाच रॉकेल दिलं जातं. कारण, हल्ली कोणी इतकं गरीब उरलं नाहीये. कि त्याच्या घरात गॅस शेगडी किंवा गॅस सिलेंडर नसेल.
मग, सरकारी खजिन्यातून येणारी ती पेट्रोलियम द्रव्य वस्तू बाजारात आल्यावर नेमकं कोण घेत असेल. आणि ती खरेच येत असतील का..? हा संशोधनाचा विषय ठरावा..!
मी स्वतः.. लहान असताना, पेट्रोल आठ रुपयांनी विकत घेतलेलं मला चांगलं आठवत आहे. आता त्याचे ऐंशी रुपये झाले आहेत. आणि हा प्रताप.. अवघ्या, तीस पस्तीस वर्षात झाला आहे. जाऊदेत माझा मूळ मुद्दा हा सुद्धा नाहीये. आज मला एका वेगळ्याच विषयावर बोलायचं आहे. अजूनही प्रत्येक व्यक्तीला काय वाटतंय, कि..
त्यांचं हि बरोबर आहे. नगरपालिका आपल्याला पाणी अगदी घरापर्यंत आणून देतंय. त्यामुळे, त्याची कोणालाच किंमत नाहीये. झोपडपट्टी मध्ये तर, बाराही महिने पाण्याची होळी असते. तिथे राहात असणारे गर्दुल्ले किंवा बेवडे तोटीचे नळच चोरून नेतात. आणि मग काय, दिवसभर पाणी वहातच राहतं. सगळीकडे आनंदी आनंद असतो.
त्यात हे जे पाण्याचे टँकर असतात ना, ते सुद्धा डीझेल किंवा पेट्रोल वाहतूक करून झालेले, जुने गळके टँकर असतात. जे पाणी वाहतूक करताना, संपूर्ण रस्त्यावर पाण्याचा शिडकावा करत जात असतात. काही लोकांच्या हे ध्यानात येत नाही, कि.. एकवेळ पेट्रोल किंवा डीझेल आपल्याला मिळालं नाही. तर आपल्या जीवन पद्धतीत नेमका काय फरक पडणार आहे.?
पेट्रोल किंवा डीझेल मिळालं नाही तर, किमान आपण नक्कीच मरणार तरी नाही. पण पाणी मिळालं नाही तर.?
तर.. आपला मृत्यू अटळ आहे.!
पाणी इतकं स्वस्त नाहीये हो..तहान लागल्यावर पेट्रोल, डीझेल कामाला येत नाही. त्यासाठी आपल्याला पाणीच हवं असतं. डीझेल पेट्रोल नाही पुरलं तरी चालेल. पण हि वसुंधरा असेपर्यंत पाणी तेवढं सर्वांना पुरलं पाहिजे. त्याकरिता वेळीच पाण्याची किंमत करा. आणि ते जपून वापरा.
नाहीतर आहेच मग.. राम कृष्ण हरी..!!


Saturday, 26 May 2018

#परमाणु ( द स्टोरी ऑफ पोखरण )
*********************************
आणि बुद्ध हसला..!
११ मे १९९८ रोजी, भारताने अणुबॉम्ब परीक्षण यशस्वी करून, जगासमोर एक वेगळं आव्हान आणून ठेवलं. हा दिवस.. संपूर्ण भारत वर्षांत, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस ( National Technology Day ) म्हणून साजरा केला जातो.
खरं तर या गौरवशाली विषयवार फार पूर्वीच सिनेमा यायला हवा होता. कारण, हे अणुबॉम्ब परीक्षण म्हणजे. भारत देशाच्या मुकुटात एक मानाचा तुरा होता. या सफल मोहिमेत मोलाची कामगिरी बजावणारे भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेब, त्यांची टीम. आणि तत्कालीन पंतप्रधान श्री. अटल बिहारी वाजपेयी यांचा सिंहाचा वाटा होता.
या सिनेमा मागची कथा तशी फारच रंजक आहे. एक भारतीय आय.ए.एस. ऑफिसर अश्वत रैना ( जॉन अब्राहम ) अणुबॉम्ब चाचणी संदर्भात, आपला प्रोजेक्ट सादर करतो. आणि नेहेमीप्रमाणे, यादव नामक एक दुसराच व्यक्ती या विषयाचं श्रेय लाटतो. पण अर्धवट माहितीच्या आधारे केली गेलेली हि चाचणी सपशेल फेल होते. आणि या अणुबॉम्ब चाचणीमुळे संपूर्ण जगाचं आणि त्यातल्या त्यात अमेरिकेचं भारतावर खूप बारीक लक्ष असतं.
अमेरिका आणि पाकिस्तानचे एजंट भारतात छुप्या रीतीने ठाण मांडून बसलेले असतात. भारतीय सेनेच्या कामगीरीवर त्यांची फारच करडी नजर असते. शिवाय, अमेरिकन सेटलाईट सुद्धा पोखरण भागात खूपच बारीक लक्ष ठेऊन असतं.
तीन वर्षाच्या शांतते नंतर, हिमांशू शुक्ला ( बोमन इराणी ) यांना ऑफिसर अश्वत रैना यांची आठवण होते. ते त्यांना आपल्या भेटीसाठी पाचारण करतात, त्यांना घरी आलेला कॉल सुद्धा खूप गुप्ततेचा असतो. त्यानंतर.. अमेरिकन सेटलाईट आणि अमेरिकन गुप्तचर यंत्रणेच्या हातावर तुरी देत, भारतीय शास्त्रद्यांनी आणि आर्मीने संयुक्तपणे जी मोलाची कामगिरी बजावली. आणि, अत्यंत नाजूक परिस्थिती मध्ये अणुबॉम्ब चाचणी यशस्वी केली त्याला अक्षरशः तोड नाहीये.
हे सगळं चित्रित होत असताना, आणि आपण ते प्रत्यक्ष पाहत असताना. आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. सर्व कलाकारांनी आपली भूमिका अगदी चोख बजावली आहे. हा सिनेमा दोन सव्वादोन तास आपल्याला खुर्चीवर अगदी खिळवून ठेवतो. फारच अफलातून असा हा सिनेमा बनवला गेला आहे. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे, हा सिनेमा शेवटापर्यंत आपली पकड मजबूत ठेवण्यात कमालीचा यशस्वी झाला आहे. यात कंटाळवाणा असा एकही सीन नाहीये.
इथे काही घटना लिहिणं मी मुद्दाम टाळत आहे. सगळं काही लिहिलं तर, तुम्हाला सिनेमा अगदी पोकळ वाटेल.
आपण एक भारतीय आहोत, आणि भारताने केलेल्या या अद्वितीय कामगिरीचे एक अप्रत्यक्ष साक्षीदार असल्या नात्याने.
हा सिनेमा प्रत्येक भारतीयाने आवर्जून पाहिलाच पाहिजे.

Saturday, 12 May 2018

राझी..

प्रसिद्ध दिग्दर्शक, मेघना गुलझार यांनी हा सिनेमा सिनेरसिकांच्या भेटीला आणला आहे.
हरिंदर सिक्का, यांच्या " कॉलिंग सेहमत " या कादंबरीवर हे संपूर्ण कथानक उभं राहिलं आहे. भारत पाकिस्तान या विषयावर काही वाचायला, ऐकायला किंवा पाहायला मिळणार असेल. तर, हि संधी कोणीच दवडू इच्छित नसतं. प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी हा फार मोठा कळीचा मुद्दा असतो.
भारत वर्षात आजवर शेकडो गुप्तहेर व्यक्ती निर्माण झाल्या असतील. ज्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावत देश सेवेसाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलं असेल. त्यातील सर्वच व्यक्ती ज्ञात असतील असं नाही. काही व्यक्ती तर, आपल्या मागे कोणताच सुगावा किंवा मागमूस न ठेवता काळाच्या पडद्याआड गेले असतील. अशा व्यक्तीचं बलिदान हे अगदी व्यर्थ ठरलं जातं. कारण, त्यांनी केलेली कामगिरी सांगायला कोणीच उपलब्ध नसतं. पण ते.. देश सेवेसाठी खऱ्या अर्थाने हुतात्मा आणि पुण्यात्मा झालेले असतात.
पण सुदैवाने त्यातील काही व्यक्ती, हे सर्व उपद्व्याप करून सुद्धा, पुन्हा मायदेशी सुखरूप परततात. त्यावेळी ते एक जिवंत कहाणी बनून राहतात.
खरं सांगायला गेलं तर.. या गुप्तहेर लोकांची माहिती कधी उघड केली जात नाही. नाहीतर, त्यांच्या जीविताला धोका उद्भवू शकतो. पण काही काळ लोटल्यावर, सदर व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेल्यावर. कोणतेही ठोस धागेदोरे न उलघडता, त्या विषयांवर काही तथाकथित माहित्या उपलब्ध करून, असे विषय हाताळले जातात.
राझी हा सिनेमा सुद्धा अशाच एका व्यक्तिरेखेवर आधारित आहे. पण नेहेमीचे पुरुषी मक्तेदारी असणारे मुद्दे खोडून काढत, यावेळी प्रमुख पात्रात, गुप्तहेर म्हणून एका स्त्रीने तिचं कर्तुत्व पणाला लावलं आहे. त्यामुळे हा सिनेमा, आपल्याला फारच हवाहवासा वाटून जातो.
या सिनेमाला १९७१ च्या युद्धाची पार्श्वभूमी आहे. गाझी अटॅकच्या विषयावार घडणारं हे संपूर्ण कथानक आहे. पाकिस्तानात व्यापार करणारा एक भारतीय मुस्लिम व्यक्ती, ज्याच्या नसानसात देशप्रेम वाहणाऱ्या त्यांच्या तीन पिढ्या इथे दाखवल्या केल्या गेल्या आहेत. त्यातील हि तिसरी पिढी, या सेहमतच्या नावे अधोरेखित केली गेली आहे.
हा व्यापारी, रजत कपूर.. पाकिस्तानातील एका उच्चभ्रू अशा फौजी कुटुंबात आपल्या मुलीचं, सेहेमतचं लग्न करून एक भारतीय गुप्तहेर बनवून पाठवून देतो.
तिथे ती आपल्या जीवावर उदार होऊन, पाकिस्तानात करत असलेली हेरगिरी, आणि त्याचं.. तिच्या घरातील लोकांना त्यांची भनक लागू न देणं, आणि इतर काही करामती पाहताना अंगावर अगदी रोमांच उभे राहतात. सिनेमा सुरवातीपासून आपली मजबूत पकड ठेऊन राहतो. परंतु, सिनेमाचा शेवट खूपच गुंतागुंतीचा आणि चमत्कारिक दाखवला आहे.
धर्माच्या किंवा व्यक्तीच्या अगोदर देश फार महत्वाचा असतो, हे त्रिकालाबाधित सत्य या सिनेमात दाखवलं गेलं आहे. पण ते सत्य पाहताना, मनाला फार मोठा चटका लाऊन जातं. भारतीय अधिकारी जीवाची बाजी लावत, शत्रूच्या गोटात जाऊन काय-काय करत असतात. त्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. त्याकरिता असे चित्रपट पाहणं हे फार गरजेचं आहे.
सेहमत सारख्या एवढ्या मोठ्या कर्तृत्ववान महिलेला, शेवटी.. अगदी हतबल आणि एकाकी दाखवलं गेलं आहे. ते काही माझ्या मनाला पटलं नाही. पाकिस्तानात एवढी मोठी कामगिरी करून आलेली महिला. नंतरच्या आयुष्यात सुद्धा खूपच सुपरफास्ट दाखवायला हवी होती. हे पूर्णतः माझं मत आहे.
आलीया भट आणि विकी कौशल यांनी प्रमुख भूमिकेत फारच सुंदर अदाकारी केली आहे. बाकी एकुणात, सिनेमा अगदी उत्कृष्ट आहे..!


पॅड मॅन च्या रूपाने, 

अभिनेता अक्षय कुमार कडून, पुन्हा एकदा.. एक समाज उपयोगी अप्रतिम कलाकृती पाहायला मिळाली.
विषय अगदी छोटा आहे, पण या सिनेमात तो फारच प्रभावीपणे मांडला आहे. भारत हा अंधश्रध्दा या विषयाने अगदी ठासून भरलेला फार मोठा भूभाग आहे.
मी लहान असताना.. बाहेर बसणाऱ्या महिलांना, कावळा शिवला आहे असं म्हणायचे. आणि माझ्या लहान मनाला ते ताबडतोब पटून सुद्धा जायचं. पण मी जसजसा मोठा होत गेलो, तसतसं.. हे कोडं अगदी गडद होत गेलं. ठीक आहे, त्यावेळी घरोघरी शौचालयं नव्हती. त्यामुळे उघड्यावर शौचाला बसल्यावर महिलांना कावळा शिवून जात असावा. असा माझा समज. पण शेवटी मी सुद्धा या विचारा पर्यंत येऊन पोहोचलो. कि कावळा फक्त महिलांनाच का शिवतो..? आम्हा पुरुषांना का शिवत नाही..?
असे फालतू प्रश्न विचारल्याने.. लहानपणी मी माझ्या आईचे भरपूर गुद्दे खाल्ले आहेत.
आपल्या भारतात प्रत्येक गोष्टीत संकोच ठरलेला असतो. आमच्या शाळेतील मॅडम त्यांच्या साडीला खालील बाजूस फॉल लावायच्या. आता त्यांना कसं विचारायचं कि हा नेमका काय प्रकार आहे..? म्हणून मी आमच्या ओळखीतल्या एका तरुणीला विचारलं. तर ती मला म्हणाली.. तुला कशाला नको त्या चौकशा पाहिजेत रे..?
अरे पण हि तर अगदी साधी गोष्ट होती. कि फॉल लावल्याने त्याच्या वजनाने साडी वर उडत नाही. यात लाजण्या लपवन्यासारखं काही आहे का..?
पण नाही.. आपल्या इथे प्रत्येक नाजूक गोष्ट कायम दडवून ठेवल्याने. माझ्यासारख्या व्यक्तींना त्याबाबत नेहेमी कुतूहल जागृत होत आलं. आणि त्या संभाव्य विषयाची उकल मी मोठा झाल्यावर माझ्या मलाच शोधून घ्याव्या लागल्या होत्या.
अगदी सुरवातीला ज्यावेळी.. सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिराती दाखवल्या जात असत. त्यावेळी, तो पॅड कंबरे पाशी घट्ट बसावा म्हणून, त्याबरोबर एक रबरी गोलसर इलास्टिक बेल्ट सुद्धा दिला जायचा. त्या जाहिरातीत दाखवणाऱ्या मुलीचं लग्न ठरलेलं असतं. त्यावेळी तिला हे नॅपकिन वापरायला देताना तिची आई की कोण म्हणतं. उनको भी समजणे दो, हम भी मॉडर्न है..!
हे सगळं त्याकाळी टीव्हीवर दाखवल्याने मला माहिती आहे. त्यानंतर विशिष्ट प्रकारची गमिंग असलेले नॅपकिन बाजारात आली. पण मुख्य विषय हा होता. कि हे पॅड बाजारात येऊन सुद्धा आजच्या घडीला भारतातील फक्त बारा टक्के महिला याचा वापर करत आहे. आणि त्याचा इतका कमी टक्का असण्याचं कारण म्हणजे. भारतातील गरिबी, आणि भयंकर अज्ञान.
जुन्या काळातील कित्तेक महिला या विषयासंबंधी कापडाचा तुकडा वापरून आपलं काम चालवून घेत होत्या. त्यातील कित्तेक महिला त्याकाळी यौन आजाराने पिडीत झाल्या असतील. आणि त्यातच त्यांचा करून अंत झाला असेल. खरोखर सांगतो, हा विचारच न केलेला बरा. हेच सगळं या सिनेमात दाखवलं गेलं आहे.
अगदी अजून सुद्धा या विषयावर म्हणावी अशी मोकळी चर्चा होत नाही. किंवा असे विषय शक्य तितके टाळले जातात. पण कसं आहे, कोंबडं झाकल्याने दिवस उगवायचा थोडीच राहणार आहे.
असे विषय मुख्य प्रवाहात आलेच पाहिजेत. त्यामुळे याविषयीचा संकोच काही प्रमाणात का होईना कमी होण्यास मदत होऊ शकते. भारत हा देश म्हणजे लोकसंखेचा भस्मासुर आहे. तिथे अशा नवीन विषयांच्या शोधांना नक्कीच वाव आहे. आणि हेच सगळं त्या सिनेमातून आपल्या समोर प्रदर्शित करण्यात आलं आहे. गरज हि शोधाची जननी आहे. काही व्यासंगी लोक असे विषय पटकन आत्मसात करतात. आणि जगात आपली एक नवीन छाप सोडून जातात. हेच या सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्यात पॅड मॅन ची सगळी टीम यशस्वी झाली आहे.


पद्मावत.. नाही, पद्मावती..!
संजय लीला भन्साळीने दाखवून दिलेली, हि एक अप्रतिम कला आणि लीला आहे.
भारत वर्षात.. प्रत्येक गोष्ट हि विरोधाला विरोध म्हणून फार मोठ्या प्रमाणात भूषवली जाते.
खरं तर या सिनेमाचं नाव.. " पद्मावती " हेच असायला हवं होतं.
प्रत्येक वाचक व्यक्तीसाठी, इतिहास हा अत्यंत रटाळवाणा विषय आहे, माझ्या माहितीप्रमाणे फारच कमी लोकांना त्यात मनापासून रस असावा. इतिहास जाणून घेण्यासाठी एवढी मोठी जाडी भरडी पुस्तकं कोणी वाचावी..? हा सर्वात मोठा आणि कळीचा मुद्दा आहे. पण इतिहास हा शेवटी इतिहास असतो. आणि थोड्या प्रमाणात का होईना, त्याचा प्रत्येकाला अभ्यास हा असायलाच हवा. आणि ते प्रत्येक देशवासीयांसाठी अनिवार्य सुद्धा आहे.
किमान त्याकरिता तरी, असे ऐतिहासिक सिनेमे निर्माण झालेच पाहिजे. आणि ते सर्वांनी पाहिले सुद्धा पाहिजेत. असं माझं प्रामाणिक मत आहे.
मेवाडच्या राजा राणीचा प्रणय प्रसंग चोरून पाहणाऱ्या व्यक्तीमुळे, येवढा मोठा इतिहास घडेल. याची कोणाला सुतराम सुद्धा कल्पना आली नसेल. शेवटी सगळ्या गोष्टी, स्त्री आणि तिचं सौंदर्य यापाशीच येऊन थांबतात. आणि हा विषय अगदी आजतागायत चालू आहे.
राणी पद्मावती आणि राजपूत राजा रत्नसिंह यांचा प्रणय प्रसंग चोरून पाहणारा व्यक्ती. खुद्द त्यांचा राजगुरु असतो. पद्मावतीच्या रूपाने त्या ब्रम्हचारी गुरूंना सुद्धा घायाळ केलेलं असतं. त्यामुळे त्याच्याकडून हे दुष्कृत्य घडतं. आणि या चौर्य कर्मात पकडला गेल्यावर, राणी पद्मावतीच्या आदेशानुसार त्याला मेवाड प्रांतातून हद्दपार केलं जातं. क्रोधाच्या अग्नीत जळफटून गेलेला गुरुदेव, झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी. आल्लाउद्दीन खिलजीला जाऊन मिळतो. आणि, त्याच्यापाशी राणी पद्मावतीच्या सौंदर्याची मनभरून तारीफ करतो.
आणि राणीच्या सौंदर्याचं गुणगान ऐकून, निव्वळ ती सौंदर्यवती आपली व्हावी. या इर्षेपायी अल्लाउद्दीन खिलजी मेवाड प्रांतावर स्वारी करतो, असा सरळ आणि सोपासा हा इतिहास आहे.
पद्मावत मध्ये, दीपिकाचं राणी पद्मावतीच्या रुपात अप्रतिम असं सौंदर्य दाखवण्यात सिनेनिर्माता यशस्वी झाला आहे. शिवाय, युद्धकौशल्य पारंगत अशी राणी आणि तिची महती दाखवण्यात सुद्धा ते कमालीचे यशस्वी झाले आहेत. एक अप्रतिम सौंदर्य लाभलेली राणी, तसेच एक युद्ध निपुण धुरंधर राजकारणी स्त्री म्हणून सुद्धा राणी पद्मावती कडे पाहण्याची एक वेगळीच उंची या सिनेमाने गाठली आहे. भले राजपूत पुरुष एकवचनी असतील, पण वेळ आल्यावर कुट नीती सुद्धा वापरावी लागते. हि अचाट बुद्धी त्या राणी पद्मावतीच्या अंगी दाखवण्यात आली आहे.
बंदिवान झालेल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, आणि.. छुप्या रणनीतीने अचूक डावपेच कसे आखले जावेत. याचं पुरेपूर ज्ञान राणी पद्मावती यांच्याकडे होतं..
आपल्या नवऱ्यावर जीवापाड प्रेम करणारी पद्मावती, महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा आपलं शील भ्रष्ट होऊ नये. यासाठी निकराने लढा देत.. राज्यातील लहान मुली, तरुणी, विवाहिता, गर्भवती स्त्रिया, वृद्ध महिला ते खुद्द राणी पद्मावतीने पुकारलेला आणि स्वीकारलेला जोहर अगदी वाखाणण्याजोगा आहे. शील रक्षणासाठी, आजच्याला एवढी मोठी किंमत कोणी खचितच मोजावी. असा हा कठीण विषय आहे.
रणवीर सिंग आणि, शाहीद कपूर यांनी सुद्धा सिनेमात अगदी दमदार भूमिका सादर केल्या आहेत. परंतु, हा सगळा सिनेमा एकट्या दीपिकाने खाऊन टाकला आहे.
राजपूत संघटना, किंवा.. करणी सेना, यांनी या सिनेमा विरुद्ध पुकारलेलं बंड खरोखरच बिन बुडाचं होतं. कोणत्याही विषयाचं अर्धवट ज्ञान हे फारच घातक असतं.
एक इतिहास म्हणून, मेवाडचा जोहर मी ऐकून होतो. पण राणी पद्मावतीचा हा सगळा इतिहास, आजवर मला सुद्धा माहित नव्हता. पण या सिनेमामुळे, एक जुना जाणता विषय, आज माझ्या मनाला फार मोठा चटका लाऊन गेला. सिनेमाचं पद्मावती हे नाव रद्द करून, त्याला पद्मावत हे नाव देण्याने. त्या महान राणीचं, खरोखर एका मुत्सद्दी राजामध्ये रुपांतर झालं आहे. असं म्हंटलं तर ते वावगं ठरू नये.
( टीप :- सिनेमा टू डी मधेच पाहा. थ्री डी मध्ये, खूपच अंधार-अंधार वाटतो. )

दिलीप कुमार ( युसूफ खान ) जेंव्हा सुपरस्टार होते, त्यावेळचा हा किस्सा आहे.
त्यांची एक बहीण, अजमेर दर्ग्याची फार मोठी भक्त होती. दर महिन्याला, त्यांचा तिथे एक खेटा ठरलेला असायचा.
तिथे जाण्या येण्यात.. त्यांची अजमेर मध्ये राहात असणाऱ्या एका बड्या व्यक्तीशी ओळख झाली.
त्यांच्या मुलाला सुद्धा सिनेमाचं फार वेड आहे, असं सांगत माझ्या मुलाला तुमचे बंधू सिनेमात काम करण्याची संधी देतील का..? अशी त्यांनी विचारणा केली.
दिलीप कुमारच्या बहिणीने, त्या व्यक्तीला ताबडतोब आपला होकार कळवत, तडक त्या मुलाला आपल्या सोबत घेतलं. आणि मुंबई गाठली.
तो गोरा गोमठा उंचापुरा देखणा मुलगा काही दिवस दिलीप कुमार यांच्या घरातच राहायला होता. तो मुलगा बरेच दिवस त्यांच्या बंगल्यात होता. रोज तो त्यांना मिळालेले पुरस्कार पहायचा. आणि आपल्याच स्वप्नात हरवून जायचा.
एके दिवशी, अचानकपणे त्या मुलाची आणि दिलीप कुमार यांनी भेट झाली. त्यावर त्याची ओळख करून घेतल्यावर ते त्या मुलाला म्हणाले.
" चांगल्या घरची लोकं, सिनेमात कामं करत नाहीत..! "
तू दुसरं काहीतर कर, पण सिने क्षेत्राचा नाद सोडून दे. हा सगळा भुलभुलैय्या आहे.
त्यानंतर.. नाऊमेद होऊन तो मुलगा पुन्हा आपल्या घरी निघून गेला. पण त्याने आपल्या मनात जोपासलेलं वेड कायम ठेवलं. त्यानंतर त्याने, सिने क्षेत्राचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला.
आणि बॉलीवूड मध्ये यशस्वी पदार्पण केलं. आपल्या अदाकारीने, सिने क्षेत्रात आपल्या नावाचा एक अनोखा ठसा उमटवला.
जर त्या मुलाने, दिलीपकुमार यांचे बोल ऐकून या क्षेत्राला रामराम केला असता. तर आजच्याला, एका जातिवंत अभिनेत्याचा अभिनय पाहायला आपण सर्वजन मुकलो असतो. अशा या दिग्गज नायकाचं नाव आहे.
अन्नू कपूर यांच्या डायरीतून.

बाईक किंवा मोपेड अगदी बेदरकारपणे चालवणाऱ्या मुलांचा मला नेहेमी त्रागा असतो.
आणि मी तर, त्यांचा खूपच रागराग करत असतो. पण मध्यंतरी, म्हणजे दोन पाच दिवसांपूर्वी तशा पद्धतीच्या काही थिल्लर मुलांचा मला चांगुलपणा सुद्धा दिसून आला. त्याकरिता हा लेखप्रपंच.
एका ठिकाणी.. काही कामासाठी, मी माझ्या मित्राबरोबर गेलो होतो. बराच वेळ झाला तरी, माझ्या मित्राचं काम काही संपेना, पण मला त्या ठिकाणावरून परत माघारी यायचं होतं. कारण पुढे, माझं काहीतरी तातडीचं काम होतं.
शेवटी मी.. मित्राची मोपेड घेतली, आणि माघारी निघालो.
मी जेंव्हा मोपेड स्टार्ट केली.. तेंव्हा, वरच्या बाजूला पेट्रोलचा इंडिकेटर.. गाडीत पेट्रोल कमी आहे असा सिग्नल मला दाखवत होता. मला साधारण तीन चार किलोमीटरचं अंतर कापायचं होतं. म्हणून मी गाडी रेमटत तसाच पुढे निघालो. विशेष म्हणजे.. गाडीत पेट्रोल टाकावं म्हणलं तर, माझ्या जाण्याच्या रस्त्यावर वाटेत कुठेही पेट्रोल पंप सुद्धा नव्हता. शेवटी मी तसाच पुढे निघालो, स्पीडमध्ये गाडी मधेमधे झटके मारतच होती.
आणि, शेवटी व्हायचं ते झालच..!
मला पोहोचायच्या इच्छित स्थळाच्या, साधारण एक किलोमीटर अलीकडे माझी गाडी बंद पडली. बापरे.. आता आली का पंचायत..!
आता झक मारत मला ती मोपेड ढकलत न्यावी लागणार होती. आणि मी गाडी ढकलत पुढे निघालो. गाडी ढकलून, काही वेळातच मी अगदी घामाघूम झालो होतो. तर समोरील बाजूस माझ्या पुढे काही अंतरावर.. मला ओव्हरटेक करून पुढे गेलेला एक थिल्लर मुलगा, त्याच्या मोपेडवर बसून मोपेड भुर्र भुर्र करत तिथे थांबला होता.
अत्यंत काळासावळा असा मुलगा, त्याच्या डोक्यावर मशरूम कट स्टाईलची केशरचना होती. तोंडात गुठका नसेल, तर तो कसला थिल्लर आलाय.?
जसा मी चालत चालत त्याच्याजवळ जाऊन पोहोचलो.. तसा, तोंडातील गुठ्क्याची पिचकारी रोडवर शिंपडत तो मला म्हणाला.
ओ काका.. टो देऊ का..?
खरं सांगायला गेलं तर, टो.. या प्रकारची, मला भयंकर भीती वाटते, त्यामुळे.. मी त्या तरुणाला अगदी नम्रपणे नको म्हणालो. आणि पुढे निघालो.
माझा नकार ऐकला, तसा तो वाऱ्याच्या वेगाने भुर्रकन पुढे निघून गेला.
त्यानंतर.. अगदी दुसऱ्याच मिनिटाला.. अगदी तसाच थिल्लर दिसणारा दुसरा एक मुलगा आला. आणि अगदी माझ्या शेजारी समांतर त्याची मोपेड घेऊन तो मला म्हणाला.
काका, बसा गाडीवर.. मी गाडीला पायाने धक्का देतो..!
मी त्याला सुद्धा नम्रपणे नकार दिला.
आणि म्हणालो, अरे बेटा, मला अगदी जवळच म्हणजे पुढच्याच चौकात जायचं आहे.
तर, तो मुलगा म्हणाला. मला सुद्धा तिकडेच जायचं आहे. काका विनाकारण त्रास करून घेऊ नका.
बसा तुम्ही.. मी अगदी सावकाशपणे पायाने धक्का देतो..!
मी नको-नको म्हणतोय तरी तो मुलगा त्याचा हट्ट काही सोडेना.
शेवटी नाईलाज झाला, आणि मी माझ्या गाडीवर बसलो, त्या मुलाने सुद्धा, अगदी हळुवारपणे माझ्या मोपेडला धक्का देत, मला माझ्या इच्छित स्थळी नेऊन सोडलं.
माझा नाहक त्रास वाचला होता, त्यामुळे.. मी त्या मुलाला खूप मोठा धन्यवाद दिला.
तसा तो मुलगा अगदी आनंदाने मला हात करत, पुन्हा एकदा वेड्या वाकड्या पद्धतीने गाडी चालवत सुसाट वेगाने पुढे निघून गेला.
तेंव्हापासून मी एक गोष्ट माझ्या मनात पक्की ठरवली आहे. सरसकट थिल्लर मुलांना बिलकुल नावं ठेवायची नाहीत.
कारण.. दिसायला दिसणारी काही थिल्लर मुलं सुद्धा, नक्कीच सुज्ञ असतात..!