Saturday, 12 May 2018

बाईक किंवा मोपेड अगदी बेदरकारपणे चालवणाऱ्या मुलांचा मला नेहेमी त्रागा असतो.
आणि मी तर, त्यांचा खूपच रागराग करत असतो. पण मध्यंतरी, म्हणजे दोन पाच दिवसांपूर्वी तशा पद्धतीच्या काही थिल्लर मुलांचा मला चांगुलपणा सुद्धा दिसून आला. त्याकरिता हा लेखप्रपंच.
एका ठिकाणी.. काही कामासाठी, मी माझ्या मित्राबरोबर गेलो होतो. बराच वेळ झाला तरी, माझ्या मित्राचं काम काही संपेना, पण मला त्या ठिकाणावरून परत माघारी यायचं होतं. कारण पुढे, माझं काहीतरी तातडीचं काम होतं.
शेवटी मी.. मित्राची मोपेड घेतली, आणि माघारी निघालो.
मी जेंव्हा मोपेड स्टार्ट केली.. तेंव्हा, वरच्या बाजूला पेट्रोलचा इंडिकेटर.. गाडीत पेट्रोल कमी आहे असा सिग्नल मला दाखवत होता. मला साधारण तीन चार किलोमीटरचं अंतर कापायचं होतं. म्हणून मी गाडी रेमटत तसाच पुढे निघालो. विशेष म्हणजे.. गाडीत पेट्रोल टाकावं म्हणलं तर, माझ्या जाण्याच्या रस्त्यावर वाटेत कुठेही पेट्रोल पंप सुद्धा नव्हता. शेवटी मी तसाच पुढे निघालो, स्पीडमध्ये गाडी मधेमधे झटके मारतच होती.
आणि, शेवटी व्हायचं ते झालच..!
मला पोहोचायच्या इच्छित स्थळाच्या, साधारण एक किलोमीटर अलीकडे माझी गाडी बंद पडली. बापरे.. आता आली का पंचायत..!
आता झक मारत मला ती मोपेड ढकलत न्यावी लागणार होती. आणि मी गाडी ढकलत पुढे निघालो. गाडी ढकलून, काही वेळातच मी अगदी घामाघूम झालो होतो. तर समोरील बाजूस माझ्या पुढे काही अंतरावर.. मला ओव्हरटेक करून पुढे गेलेला एक थिल्लर मुलगा, त्याच्या मोपेडवर बसून मोपेड भुर्र भुर्र करत तिथे थांबला होता.
अत्यंत काळासावळा असा मुलगा, त्याच्या डोक्यावर मशरूम कट स्टाईलची केशरचना होती. तोंडात गुठका नसेल, तर तो कसला थिल्लर आलाय.?
जसा मी चालत चालत त्याच्याजवळ जाऊन पोहोचलो.. तसा, तोंडातील गुठ्क्याची पिचकारी रोडवर शिंपडत तो मला म्हणाला.
ओ काका.. टो देऊ का..?
खरं सांगायला गेलं तर, टो.. या प्रकारची, मला भयंकर भीती वाटते, त्यामुळे.. मी त्या तरुणाला अगदी नम्रपणे नको म्हणालो. आणि पुढे निघालो.
माझा नकार ऐकला, तसा तो वाऱ्याच्या वेगाने भुर्रकन पुढे निघून गेला.
त्यानंतर.. अगदी दुसऱ्याच मिनिटाला.. अगदी तसाच थिल्लर दिसणारा दुसरा एक मुलगा आला. आणि अगदी माझ्या शेजारी समांतर त्याची मोपेड घेऊन तो मला म्हणाला.
काका, बसा गाडीवर.. मी गाडीला पायाने धक्का देतो..!
मी त्याला सुद्धा नम्रपणे नकार दिला.
आणि म्हणालो, अरे बेटा, मला अगदी जवळच म्हणजे पुढच्याच चौकात जायचं आहे.
तर, तो मुलगा म्हणाला. मला सुद्धा तिकडेच जायचं आहे. काका विनाकारण त्रास करून घेऊ नका.
बसा तुम्ही.. मी अगदी सावकाशपणे पायाने धक्का देतो..!
मी नको-नको म्हणतोय तरी तो मुलगा त्याचा हट्ट काही सोडेना.
शेवटी नाईलाज झाला, आणि मी माझ्या गाडीवर बसलो, त्या मुलाने सुद्धा, अगदी हळुवारपणे माझ्या मोपेडला धक्का देत, मला माझ्या इच्छित स्थळी नेऊन सोडलं.
माझा नाहक त्रास वाचला होता, त्यामुळे.. मी त्या मुलाला खूप मोठा धन्यवाद दिला.
तसा तो मुलगा अगदी आनंदाने मला हात करत, पुन्हा एकदा वेड्या वाकड्या पद्धतीने गाडी चालवत सुसाट वेगाने पुढे निघून गेला.
तेंव्हापासून मी एक गोष्ट माझ्या मनात पक्की ठरवली आहे. सरसकट थिल्लर मुलांना बिलकुल नावं ठेवायची नाहीत.
कारण.. दिसायला दिसणारी काही थिल्लर मुलं सुद्धा, नक्कीच सुज्ञ असतात..!

No comments:

Post a Comment