Saturday, 12 May 2018

माझ्या एका मित्राला दोन मुलं होती. भरपूर काबाडकष्ट करून त्याने मुलांना चांगलं शिक्षण देऊन लहानाचं मोठं केलं. थोडाफार पैसा जमा करून, गुंठाभर जागा घेऊन, त्याने.. एक, दोनमजली घर बांधलं. सगळं काही अगदी मस्त चालू होतं. योग्य वेळ आल्यावर, त्याने मोठ्या मुलाचं लग्न ठरवलं. नेहेमीप्रमाणे, गावातल्या मुली गरीब आणि चांगल्या असतात. म्हणून त्याने सुद्धा मुलाला, गावातील एक सुशील मुलगी पाहून तिच्याशी त्यांचं लग्न लाऊन दिलं.
एकत्र कुटुंबात असल्याने, यांचं जेवण खावन एकत्रच व्हायचं. आणि.. झोपायला जे ते आपापल्या वेगवेगळ्या रूम मध्ये जायचे. सगळं काही अगदी व्यवस्थित चालू होतं. मित्राच्या मुलाला, पंधरा एक हजाराची नोकरी होती. घर भाडं किंवा इतर काही खर्च नसल्याने, ते त्याला पुरतं सुद्धा पडत होतं. पण काहीच कारण नसताना, त्या मुलीने मात्र नवर्याच्या मागे एकच तगादा लावला होता.
मला वेगळं राहायचं आहे..!
पुण्या सारख्या ठिकाणी सिंगल रूमला पाच हजार रुपये भाडं आहे. आणि स्वतःचं हक्काचं घर असताना, तो मुलगा घराच्या बाहेर कसा पडेल..? आणि ते त्याला परवडणार तरी होतं का.?
या एकमेव विषयावरून सासू सुनेत नेहेमी वादंग घडायचे.
दिवस पुढे सरत होते, आणि एकदाचे सुनबाईला दिवस गेले. घरात आनंदाला पारावर उरला नाही. आठव्या महिन्यात ओटीभरण करून, बाळंतपण करण्यासाठी सुनबाईला माहेरी धाडण्यात आलं.
महिनाभरात.. तिने एका गोड मुलाला जन्म दिला.
सगळं घर मुलाला पाहून आलं. त्यांच्या घरात हा पहिलाच नातू. सगळे खूपच आनंदी होते.
सव्वा महिन्याने.. हे सगळे सुनबाईला आणायला गावी गेले. तर सुनबाई काही घरातून निघायला तयार नाही. तिने एकच हेका लावून धरला होता. मला एकत्र कुटुंबात राहायचं नाही. आणि मुलाचे आईवडील मुलाला वेगळं राहू देत नव्हते.
शेवटी.. हे गेले तसे मोकळ्या हाताने घरी परत निघून आले. मुलाने त्याच्या बायकोला खूप विनवण्या केल्या. पण बाई काही ऐकायला तयार नाही. या वादावादीत दोनचार महिने उलटून गेले.
तो मुलगा दर पंधरा दिवसाला बायको मुलाला भेटायला गावी जायचा. तिला घरी येण्याची गळ घालायचा. पण तिचा बाकी नन्नाचा पाढा सुरूच असायचा.
एके दिवशी.. तो मुलगा अगदी मनाचा हिय्या करून गेला. कि आज कोणत्याही परिस्थितीत बायकोला घरी घेऊन यायचंच.
जावई घरी आला, त्याचा पाहुणचार झाला. आणि त्याने पुन्हा विषयाला हात घातला. तर मुलगी म्हणाली तुम्ही कुठेही भाड्याने घर घ्या, मी आत्ता लगेच तुमच्या सोबत येते. तर मुलगा म्हणायचा, तू पहिलं आपल्या घरी चल, मग तिथे गेल्यावर आपण पुढील बंदोबस्त करूयात. पण मुलगी काही ऐकायला तयारच नाही. मुलीच्या आई वडिलांनी, भावाने तिला खूप समजाऊन सांगितलं. पण ती काही तिचा हट्ट सोडायला तयार नाही. शेवटी मुलाने घरातून काढता पाय घेतला. त्याच्या डोक्यात बरीच गणगण सुरु होती.
रागारागात तो बाईकवर बसून घरी निघाला, आणि घरी येताना महामार्गावर त्याचा फार मोठा अपघात झाला. कोणती तरी मोठी गाडी त्याला उडवून निघून गेली होती. हा रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात एकटाच निपचित पडला होता. एकीकडे त्याची बाईक पडली होती. हा भयंकर प्रसंग पाहून, कोणीही त्याच्या मदतीला येईना.
शेवटी कोणीतरी धाडस केलं, आणि त्याला दवाखान्यात पोहोचवलं. पण कसलं काय, डोक्यातून बराच रक्तस्त्राव झाल्याने. पोरगं जागेवरच खलास झालं होतं.
हा काही साधासुधा धक्का नव्हता, सगळं घर शोकसागरात बुडालं, जानजवान मुलाचा मृत्यू झाला होता, तरुण मुलगी विधवा झाली होती. आणि एक चार महिन्याचं मुल बापासाठी पोरकं झालं होतं. हा प्रसंग माझ्या मित्राला काही झेपला नाही. आणि या प्रकारा नंतर, अवघ्या महिन्याभरात.. माझ्या मित्राला ब्रेन हॅमरेजचा फार मोठा झटका आला. आणि, तो सुद्धा कोमात गेला. त्याच्या उपचारासाठी अगदी पाण्यासारखा पैसा खर्च केला. पण काही उपयोग झाला नाही. शेवटी तीनेक महिन्यांनी ब्रेन डेड झाल्याने त्याला सुद्धा डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
कारण अगदी छोटं होतं..
मुलांना वेगळं राहायचं आहे ना, मग सोडून द्या त्यांचा विषय..!
देवाने, जन्म दिलेल्या प्रत्येक प्राणिमात्रांच्या दाणा पाण्याची सोय करून ठेवली आहे. किडा मुंगी सुद्धा जगत असते, तर मग.. हि तर हातपाय असणारी धड धाकट मुलं आहेत.
पण काहीवेळा पुत्रप्रेम आड येतं. आणि असे प्रसंग घडतात. मुलींनी सुद्धा फार हट्ट करण्यात काहीच अर्थ नाहीये. आपल्या नवऱ्याची परिस्थिती नसेल, तर थोडं सेटिंग होईपर्यंत तिने सुद्धा त्याला सांभाळून घेतलं पाहिजे.
जास्ती तानल्यावर रबर सुद्धा तुटतं हो. मग हि हाडामासाची लवचिक नाती तुटायला, असा कितीसा वेळ लागणार आहे.?
त्यामुळे.. मी इथे सर्वांना सांगू इच्छितो. तुमची मुलं तुम्हाला कायम आपल्या जवळ हवी असतील. तर त्यांच्या मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट करू नका. हवं असेल, तर त्यांना वेगळा संसार थाटू द्यात. त्याची परिस्थिती नसेल, तर अगदी मोठ्या मनाने त्यांना पैशा पाण्याची मदत करा. त्यांचा रागराग करू नका. शेवटी ते तुमच्या पोटचं पोर असतं.
कोणीही कोणाच्या आयुष्याला पुरलं नाहीये. प्रत्येकाला आज ना उद्या मरायचं आहे. पण, अशा अचानकपणे झालेल्या एग्झीट सगळं घरदार बसवून जातात. त्यामुळे, कोणावरही जास्ती जोर जबरदस्ती करू नका. त्यांना मुक्त वावरायचं आहे तसं वावरू द्या. चटका बसल्यावर, शेवटी ते आपल्याच आश्रयाला येणार असतात. मुलं मोठी झाल्यावर त्यांना हवा तसा विहार करूद्यात. त्यांच्या मनाविरुद्ध, त्यांना खुराड्यात कोंडून ठेऊ नका. आणि स्वतःच्या जीवाला सुद्धा, घोर लाऊन घेऊ नका..!
मुलं लहानाची मोठी करत असताना..
आई वडिलांना किती त्रास होत असतो, ते मला माहित आहे. त्यामुळे, त्या फुलासारखं वाढवलेल्या मुलाला, काही आईवडील तो कितीही मोठा झाला तरी. त्याला आपल्या सोबतच ठेऊ इच्छित असतात. पण काही वेळा, घरात आलेली नवीन सुनबाई, या गोष्टींना कधी राजी असते, तर कधी नसते. त्यामुळे, काही ठिकाणी या विषयाचे शेवट चांगले होतात. तर काही ठिकाणी वरील घटना पाहायला मिळतात.

No comments:

Post a Comment