Saturday, 26 May 2018

#परमाणु ( द स्टोरी ऑफ पोखरण )
*********************************
आणि बुद्ध हसला..!
११ मे १९९८ रोजी, भारताने अणुबॉम्ब परीक्षण यशस्वी करून, जगासमोर एक वेगळं आव्हान आणून ठेवलं. हा दिवस.. संपूर्ण भारत वर्षांत, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस ( National Technology Day ) म्हणून साजरा केला जातो.
खरं तर या गौरवशाली विषयवार फार पूर्वीच सिनेमा यायला हवा होता. कारण, हे अणुबॉम्ब परीक्षण म्हणजे. भारत देशाच्या मुकुटात एक मानाचा तुरा होता. या सफल मोहिमेत मोलाची कामगिरी बजावणारे भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेब, त्यांची टीम. आणि तत्कालीन पंतप्रधान श्री. अटल बिहारी वाजपेयी यांचा सिंहाचा वाटा होता.
या सिनेमा मागची कथा तशी फारच रंजक आहे. एक भारतीय आय.ए.एस. ऑफिसर अश्वत रैना ( जॉन अब्राहम ) अणुबॉम्ब चाचणी संदर्भात, आपला प्रोजेक्ट सादर करतो. आणि नेहेमीप्रमाणे, यादव नामक एक दुसराच व्यक्ती या विषयाचं श्रेय लाटतो. पण अर्धवट माहितीच्या आधारे केली गेलेली हि चाचणी सपशेल फेल होते. आणि या अणुबॉम्ब चाचणीमुळे संपूर्ण जगाचं आणि त्यातल्या त्यात अमेरिकेचं भारतावर खूप बारीक लक्ष असतं.
अमेरिका आणि पाकिस्तानचे एजंट भारतात छुप्या रीतीने ठाण मांडून बसलेले असतात. भारतीय सेनेच्या कामगीरीवर त्यांची फारच करडी नजर असते. शिवाय, अमेरिकन सेटलाईट सुद्धा पोखरण भागात खूपच बारीक लक्ष ठेऊन असतं.
तीन वर्षाच्या शांतते नंतर, हिमांशू शुक्ला ( बोमन इराणी ) यांना ऑफिसर अश्वत रैना यांची आठवण होते. ते त्यांना आपल्या भेटीसाठी पाचारण करतात, त्यांना घरी आलेला कॉल सुद्धा खूप गुप्ततेचा असतो. त्यानंतर.. अमेरिकन सेटलाईट आणि अमेरिकन गुप्तचर यंत्रणेच्या हातावर तुरी देत, भारतीय शास्त्रद्यांनी आणि आर्मीने संयुक्तपणे जी मोलाची कामगिरी बजावली. आणि, अत्यंत नाजूक परिस्थिती मध्ये अणुबॉम्ब चाचणी यशस्वी केली त्याला अक्षरशः तोड नाहीये.
हे सगळं चित्रित होत असताना, आणि आपण ते प्रत्यक्ष पाहत असताना. आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. सर्व कलाकारांनी आपली भूमिका अगदी चोख बजावली आहे. हा सिनेमा दोन सव्वादोन तास आपल्याला खुर्चीवर अगदी खिळवून ठेवतो. फारच अफलातून असा हा सिनेमा बनवला गेला आहे. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे, हा सिनेमा शेवटापर्यंत आपली पकड मजबूत ठेवण्यात कमालीचा यशस्वी झाला आहे. यात कंटाळवाणा असा एकही सीन नाहीये.
इथे काही घटना लिहिणं मी मुद्दाम टाळत आहे. सगळं काही लिहिलं तर, तुम्हाला सिनेमा अगदी पोकळ वाटेल.
आपण एक भारतीय आहोत, आणि भारताने केलेल्या या अद्वितीय कामगिरीचे एक अप्रत्यक्ष साक्षीदार असल्या नात्याने.
हा सिनेमा प्रत्येक भारतीयाने आवर्जून पाहिलाच पाहिजे.

No comments:

Post a Comment