Tuesday, 29 May 2018

एक गाव असावाच..
***********************
शहरातल्या डांबरी पायवाटा तुडवून थकल्याने,
मातीच्या पायवाटेच्या हळुवार स्पर्शासाठी.
एक गाव असावाच....
कार मधून दिसणाऱ्या देवाचं रोज ओघवतं दर्शन घ्यावं लागतं,
मंदिरात भक्तिभावाने टाळ कुटत बसण्यासाठी.
एक गाव असावाच....
अंगावरती उडणारे अत्तारचे फवारे तर नित्याचेच,
अंगणातल्या शेणाच्या सड्याच्या मंद,धुंद सुवासासाठी.
एक गाव असावाच...
पोहे, उपमा, इडली, शिरा.. हि तर नित्याचीच न्याहारी,
शिळी भाकर आणि चटणी कांदा खाण्यासाठी.
एक गाव असावाच....
रोज-रोज त्याच टीव्ही मालिका पाहून जीव कंटाळून जातो,
जात्यावरच्या सुरेल ओव्या ऐकण्यासाठी.
एक गाव असावाच....
एसी कार मधून फिरायला सोकावलेल्या शरीराला,
बैलगाडीचे खाच खळगे उमजण्यासाठी.
एक गाव असावाच....
चिकन तंदुरी, तंदूर रोटी रोज तेच खाऊन मन अगदी विटतं,
गावरान कोंबडीचा झणझणीत रस्सा भूरकण्यासाठी. एक गाव असावाच....
उंची मद्य पिऊन नशा लपवत हाय बाय करीत जपून बोलावं लागतं.
हातभट्टीची बाटली ढोसून मनसोक्त बरळण्यासाठी,
एक गाव असावाच....
सुटा बुटातील किचकट पेहेरावाचा खूपच वैताग येतो,
मोकळी, ढाकळी लुंगी किंवा पायजमा लेऊन निवांत फिरण्यासाठी.
एक गाव असावाच....
मऊशार गादीवर तर रोजच झोपत असतो,
शेणाने सारवलेल्या ओसरीवर निवांत निजण्यासाठी.
एक गाव असावाच..

No comments:

Post a Comment