Tuesday, 29 May 2018

परवा ऑफिसमध्ये, एका मित्राबरोबर हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेलो होतो. समोरच्या टेबलवरच, आमच्या महानगरपालिकेतील चार महिला सुद्धा बसल्या होत्या. त्या महिला, आमच्या प्रभागात सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. मी त्यांना ओळखतो. पण, त्या मला काही ओळखत नाहीत. कारण, माझा बऱ्याच खात्यातील लोकांशी संपर्क येत असतो. तसा, त्यांचा जनसंपर्क फारच कमी. आपलं काम भलं, आणि आपण भलं अशा स्वभावाच्या त्या महिला होत्या.
झाडूकाम करणाऱ्या चतुर्थश्रेणीत असणाऱ्या महिलांना सुद्धा, आमच्या इथे चांगले पगार आहेत. तसं पाहायला गेलं तर, विदेशातील चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी आणि भारतातले कर्मचारी यांच्या वेतनाची कधीच बरोबरी होऊ शकत नाही. तो भाग निराळा आहे. कारण, भारतात अजूनही बरच अज्ञान आहे.
तर... विषय असा होता. ह्या महिलांना जरी, मोठ्या रकमेचे पगार असले. तरी, त्या पगारावर त्यांचा काहीएक अधिकार नसतो. हे मी, माझ्या अनुभवावरून सांगतोय. बहुतकरून, अशा महिलांचे पती महाशय सर्रास दारू पिणारे असतात. तर, त्यांची मुलं सुद्धा त्याच वळणावर गेलेली पाहायला मिळतात. पगार झाला, कि नवऱ्याचा आणि मुलांचा ससेमिरा त्या महिलांच्या सतत मागे लागलेला असतो. त्यामुळे, इच्छा असताना सुद्धा या महिलांना स्वतः अशी काहीएक हौसमौज करता येत नाही. सगळे पैसे, त्या घरच्यांच्या नरड्यात घातलतात. असं म्हंटल तर, ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
यांच्या वाट्याला, कायम दुखःच असतं. काम करून सुद्धा, त्यांना सुखाचा घास खायला मिळत नाही. अशी, बरीच उदाहरणं मी आजवर पाहिली आहेत. तरीही, त्या बिचार्या आपल्या संसाराचा रामरगाडा आनंदाने रेटत असतात.
पण... परवा त्या हॉटेलमध्ये, मला एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. त्या चार महिलांनी, प्रथम प्रत्येकी एक वडा सांबराची ऑर्डर दिली. ते संपल्यावर, त्यांनी लगेच मसाला डोसाची ऑर्डर दिली. माझं, चहा पिण्याकडे मुळीच लक्ष नव्हतं. नाश्ता करता-करता, त्यांच्या सुरेल गप्पा आणि हसणं खिदळनं चालू होतं. त्या त्यांच्याच विश्वात रममाण झाल्या होत्या, समोर असणाऱ्या बेगडी जनतेचं त्यांना काहीएक देणंघेणं नव्हतं. मी मात्र त्यांच्यातच पूर्णपणे समरस झालो होतो. पण मी, त्यांना त्याची किंचितही भनक लागू दिली नव्हती.
बऱ्याच दिवसांनी, आज मी त्यांना खूप प्रसन्न असलेलं पाहत होतो. स्वतः कमावलेल्या पैश्यावर, त्या मज्जा मारत होत्या. त्यांच्यासाठी, मज्जेची व्याख्या तरी नेमकी काय असावी..? ह्या, छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा त्यांना खूप लाखमोलाच्या आणि आनंदाच्या असतात. त्यांना जगण्याची नवी उर्मी देत असतात.
त्यांचा नाश्ता उरकला. त्यांची क्षुधाशांती झाली होती. नंतर त्यांनी गरमागरम चहा मागवला. एकात दोन नाही, तर.. प्रत्येकी एक असा चहा त्यांनी मागवला होता. चहा पिऊन झाल्यावर, बिल देवून प्रसन्न चेहेर्याने त्या तेथून निघून गेल्या. आज एक वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
आणि, त्यांच्या चेहेर्यावरची ख़ुशी पाहून. काहीही न खाता, माझं पोट मात्र गच्च भरलं होतं..!
माझ्यासमोर ठेवलेला हाफ कटिंग चहा सुद्धा, केंव्हाच थंड झाला होता..

No comments:

Post a Comment