Saturday, 12 May 2018

पॅड मॅन च्या रूपाने, 

अभिनेता अक्षय कुमार कडून, पुन्हा एकदा.. एक समाज उपयोगी अप्रतिम कलाकृती पाहायला मिळाली.
विषय अगदी छोटा आहे, पण या सिनेमात तो फारच प्रभावीपणे मांडला आहे. भारत हा अंधश्रध्दा या विषयाने अगदी ठासून भरलेला फार मोठा भूभाग आहे.
मी लहान असताना.. बाहेर बसणाऱ्या महिलांना, कावळा शिवला आहे असं म्हणायचे. आणि माझ्या लहान मनाला ते ताबडतोब पटून सुद्धा जायचं. पण मी जसजसा मोठा होत गेलो, तसतसं.. हे कोडं अगदी गडद होत गेलं. ठीक आहे, त्यावेळी घरोघरी शौचालयं नव्हती. त्यामुळे उघड्यावर शौचाला बसल्यावर महिलांना कावळा शिवून जात असावा. असा माझा समज. पण शेवटी मी सुद्धा या विचारा पर्यंत येऊन पोहोचलो. कि कावळा फक्त महिलांनाच का शिवतो..? आम्हा पुरुषांना का शिवत नाही..?
असे फालतू प्रश्न विचारल्याने.. लहानपणी मी माझ्या आईचे भरपूर गुद्दे खाल्ले आहेत.
आपल्या भारतात प्रत्येक गोष्टीत संकोच ठरलेला असतो. आमच्या शाळेतील मॅडम त्यांच्या साडीला खालील बाजूस फॉल लावायच्या. आता त्यांना कसं विचारायचं कि हा नेमका काय प्रकार आहे..? म्हणून मी आमच्या ओळखीतल्या एका तरुणीला विचारलं. तर ती मला म्हणाली.. तुला कशाला नको त्या चौकशा पाहिजेत रे..?
अरे पण हि तर अगदी साधी गोष्ट होती. कि फॉल लावल्याने त्याच्या वजनाने साडी वर उडत नाही. यात लाजण्या लपवन्यासारखं काही आहे का..?
पण नाही.. आपल्या इथे प्रत्येक नाजूक गोष्ट कायम दडवून ठेवल्याने. माझ्यासारख्या व्यक्तींना त्याबाबत नेहेमी कुतूहल जागृत होत आलं. आणि त्या संभाव्य विषयाची उकल मी मोठा झाल्यावर माझ्या मलाच शोधून घ्याव्या लागल्या होत्या.
अगदी सुरवातीला ज्यावेळी.. सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिराती दाखवल्या जात असत. त्यावेळी, तो पॅड कंबरे पाशी घट्ट बसावा म्हणून, त्याबरोबर एक रबरी गोलसर इलास्टिक बेल्ट सुद्धा दिला जायचा. त्या जाहिरातीत दाखवणाऱ्या मुलीचं लग्न ठरलेलं असतं. त्यावेळी तिला हे नॅपकिन वापरायला देताना तिची आई की कोण म्हणतं. उनको भी समजणे दो, हम भी मॉडर्न है..!
हे सगळं त्याकाळी टीव्हीवर दाखवल्याने मला माहिती आहे. त्यानंतर विशिष्ट प्रकारची गमिंग असलेले नॅपकिन बाजारात आली. पण मुख्य विषय हा होता. कि हे पॅड बाजारात येऊन सुद्धा आजच्या घडीला भारतातील फक्त बारा टक्के महिला याचा वापर करत आहे. आणि त्याचा इतका कमी टक्का असण्याचं कारण म्हणजे. भारतातील गरिबी, आणि भयंकर अज्ञान.
जुन्या काळातील कित्तेक महिला या विषयासंबंधी कापडाचा तुकडा वापरून आपलं काम चालवून घेत होत्या. त्यातील कित्तेक महिला त्याकाळी यौन आजाराने पिडीत झाल्या असतील. आणि त्यातच त्यांचा करून अंत झाला असेल. खरोखर सांगतो, हा विचारच न केलेला बरा. हेच सगळं या सिनेमात दाखवलं गेलं आहे.
अगदी अजून सुद्धा या विषयावर म्हणावी अशी मोकळी चर्चा होत नाही. किंवा असे विषय शक्य तितके टाळले जातात. पण कसं आहे, कोंबडं झाकल्याने दिवस उगवायचा थोडीच राहणार आहे.
असे विषय मुख्य प्रवाहात आलेच पाहिजेत. त्यामुळे याविषयीचा संकोच काही प्रमाणात का होईना कमी होण्यास मदत होऊ शकते. भारत हा देश म्हणजे लोकसंखेचा भस्मासुर आहे. तिथे अशा नवीन विषयांच्या शोधांना नक्कीच वाव आहे. आणि हेच सगळं त्या सिनेमातून आपल्या समोर प्रदर्शित करण्यात आलं आहे. गरज हि शोधाची जननी आहे. काही व्यासंगी लोक असे विषय पटकन आत्मसात करतात. आणि जगात आपली एक नवीन छाप सोडून जातात. हेच या सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्यात पॅड मॅन ची सगळी टीम यशस्वी झाली आहे.


No comments:

Post a Comment