Tuesday, 29 May 2018

१९७७ साली..
माझ्या आई वडिलांसोबत, मला पहिल्यांदा मुंबईला जाण्याचा योग आला. आत्तापर्यंत, मी जे काही लिहिलं. ते सगळं, सांगोवांगीच होतं. आता, मला प्रत्यक्ष ते ठिकाण पाहायला मिळणार होतं. जिथे माझे आईवडील राहायचे.
तिच इमारत, तेच मंदिर. आणि, सगळा काही तोच माहोल. मी, अगदी भारावून गेलो होतो. लहान पनापासूनच, मी धार्मिक व्यक्ती. त्यामुळे, पहिलं त्या देवीच्या मंदिरात मी माथा टेकवला. आणि, इमारतीचा दादर चढून वर गेलो. वडिलांनी, त्या त्रिकोणी खोलीला असलेलं कुलूप उघडलं. वडिलांनी सांगितल्या प्रमाणे, अगदी तशीच ती खोली होती. बालिशपने, मी माझ्या वडिलांना म्हणालो.
आण्णा, घर छोटं आहे. पण, मस्त आहे कि ओ. आपण इथेच राहुयात का.!
वडील म्हणाले, अरे, आता हे घर आपल्याला विकायचं आहे.
थोड्याच वेळात, ते घर विकत घेणारा व्यक्ती तेथे आला. त्यावेळेस, पंचवीस हजार रुपयांना माझ्या वडिलांनी ते घर विकलं होतं.
जिन्यामध्ये उभा असताना, तिथे मला तळलेल्या माशांच्या वासाचा 'शुभ' समाचार मिळाला.
मी, वडिलांना म्हणालो. आण्णा... तिकडून, मासे तळलेल्याचा वास येतोय..!
पलीकडच्या घरातील लोकांना, आम्ही आल्याचा काहीच सुगावा नव्हता.
वडिलांनी, एक मोठा आवाज दिला..
सुमनsss.... ह्या आवाजाबरोबर, एक गोरी गोमटी सुंदर महिला त्या घरातून बाहेर आली. माझ्या वडिलांना पाहून, ती म्हणाली. अहो नाना, तुम्ही कधी आलात ?
( माझ्या वडिलांचं नाव नानासाहेब आम्ही त्यांना 'आण्णा' म्हणायचो. पण, इतर लोकांच्या लक्षात ते येत नव्हतं. त्यामुळे, जवळ-जवळ सगळेच लोक माझ्या वडिलांना नाना आणि आईला नाणी म्हणत असत. )
सुमन, माझ्या वडिलांची मुंबई मधील मानलेली बहिण.
वडील तिला म्हणाले, अगं आम्ही आत्ताच आलोय बघ. तितक्यात, त्या त्रिकोणी खोलीतून माझी आई आणि तिच्या पाठोपाठ मी सुद्धा बाहेर आलो.
आईला पाहून सुमन आत्या म्हणाली, नाणी तुम्ही पण आलात..! आणि, हा छोटा कोण आहे ?
वडील म्हणाले... हा आमचा धाकटा, 'पंडित' आहे.
आणि म्हणाले, तुझ्या घरात बनत असलेल्या माश्यांचा त्याला वास ( इथे, सुवास म्हणनं योग्य ठरणार नाही..  ) आलाय.
बघ, त्यामुळे तो किती खुश झाला आहे. आत्याने, मला घरात बोलावून तळलेले खरपूस मासे खाऊ घातले. त्यानंतर, आई,अण्णांनी सुद्धा तिथेच जेवण केलं. मस्त जेवण झाल्यामुळे, सुस्तावून मी तिथेच कलंडलो.
तोपर्यंत, आमच्या घराचा सौदा पक्का झाला होता. मिळालेली रक्कम घेऊन, आम्ही सुमन आत्याचा निरोप घेतला. आणि, मुंबईला कायमचा रामराम ठोकला.
मला चांगलं आठवतंय, त्यावेळेस आम्ही प्रवास करत असलेली मुंबई-पुणे जी रेल्वे कोणती होती. ती डबल डेकर होती. त्या गाडीचं नाव काय होतं ते मला आता आठवत नाहीये. पण बहुदा, ती सिंहगडच असावी. त्या डबल माळ्याच्या रेल्वेचं मला तेंव्हा खूपच कौतुक वाटलं.
रेल्वेत चढल्यावर.. घाईमध्ये, मी वरील असणाऱ्या आसनावर जाऊन बसलो.
गाडीमध्ये, म्हणावी अशी गर्दी नव्हती.. त्या वरील बाकड्यावर, माझ्या शेजारी माझ्याच वयाची एक सुंदरशी मुलगी सुद्धा बसली होती. तेंव्हा, माझा अवतार अगदी पाहण्यासारखा होता. माझ्या अंगावरील कपडे म्हणजे, शाळेतील खाकी हाफ पँट आणि पांढरा सदरा. पायात चप्पल सुद्धा घालत असतात. हा प्रकार, मला अजून तरी माहिती नव्हता.
त्यामानाने, ती मुलगी खूपच सुंदर असा पांढरा झुपकेदार फ्रॉक परिधान करून आली होती, पायामध्ये पांढर्याच रंगाचे सँडल होते. तिच्या हातामध्ये, कोणत्या तरी क्रीमच्या बिस्कीटचा पुडा होता. एक-एक करून.. ती, त्यातील बिस्किट्स खात होती. माझं, त्याकडे विशेष असं लक्ष नव्हतं. मी, माझ्याच मस्तीमधे होतो.
पण, त्या मुलीला वाटलं असावं. कि, या लहान मुलाला सुद्धा ह्यातील एक बिस्कीट द्यावं. म्हणून, तिने तो बिस्किटचा पुडा माझ्यासमोर धरला. मी, थोडसं मागे सरकून तिला मानेने नाही असं म्हणालो.
खालच्या सीटवरून, तिची आई आम्हाला पाहत होती.
तिने खालूनच आवाज दिला..
बाळा, घे कि रे बिस्कीट..!
तरी सुद्धा, मी काही धाडस केलं नाही. शेवटी खालून माझ्या आईने मला मानेने बिस्कीट घे म्हणून खुणावलं. तेंव्हा कुठे, मी त्यातील एक बिस्कीट घेतलं. मला, ते बिस्कीट खूपच आवडलं होतं. पुन्हा धाडस करून, मी त्या पुड्यातील अजून एक बिस्कीट घेतलं.
तेंव्हा, त्या मुलीच्या चेहेर्यावर आलेलं 'हास्य' मी अजून विसरलो नाहीये.
आज, ती मुलगी कोठे असेल ? काय असेल ? काही माहित नाही.
किती अवघड गोष्टी असतात नाही.
आज, मी होऊन सुद्धा त्या मुलीला शोध घेऊ शकत नाही. हे, वास्तव आहे.
पण तो क्षण, माझ्याकरिता अगदी अविस्मरणीयच.
नंतर, केंव्हा एकदा पिंपरी स्टेशन आलं ते मला सुद्धा समजलं नाही.
त्या चिमुरडीला, मी इवल्याशा हाताने बाय केलं. आणि, रेल्वेतून बाहेर पडलो.

No comments:

Post a Comment