Tuesday, 31 October 2017

एकतर थंडी जाम पडलीय, आणि त्यात नेमका आज ड्राय डे..!
आणि नेमकी अशा वेळेसच माणसाला लावायची तल्लफ येते. तशी, मला सुद्धा आज तल्लफ झाली. वाईन शॉपमध्ये आल्यावर मी तिथे एक थांबा घेतला. तिथेच आसपास, काही लोकं घुटमळत उभी होती. मी एकवार बंद असलेल्या त्या दारूच्या दुकानाकडे पाहिलं. आणि थोडी तिरकी नजर केली असता. शेजारी असणाऱ्या पान टपरीवरच्या एका मुलाने माझी नजर ताडली.
नजरेनेच मी त्याला वाईन शॉपच्या दुकानाकडे खून केली. तर नजरेनेच तो मला इकडे या म्हणाला.. मी त्याच्यापाशी गेलो, माझा ब्रांड सांगितला.. गड्याने दीडशेची बाटली अडीचशे रुपयाला लावली होती.
त्याला म्हणालो.. खरच, आपल्या मराठी माणसांना धंदा करायची आक्कलच नसते राव.
अरे तू.. दीडशेचे दोनशे घे, बघ लगेच तुझा सगळा माल संपून जाईल.
अडीचशे मध्ये पन्नास कोर्टर विकशील तर दोनशेत शंभर कोर्टर खपतील.
हिशोब करून बघ.
आणि, हे सगळं तुझं कायमचं आणि हक्काचं गिर्हाईक होऊन जाईल.
त्याने मनातल्या मनात विचार केला, आणि म्हणाला.. ठीक आहे, घ्या दोनशे मध्ये..!
त्याचा आवाज जरा मोठा होता.. तो आवाज, आजूबाजूला घुटमळत असणाऱ्या दोन चार हौशी पिवय्यांनी ऐकला. आणि काय सांगायचं, मी राहिलो बाजूला. एका झटक्यात जागेवरच त्याच्या दहा बारा कोर्टर खपल्या. आणि, सर्वात शेवटी माझा नंबर लागला..
मी सुद्धा त्याला दोनशे रुपये दिले. तर कोर्टर सोबत त्याने मला चाळीस रुपये सुद्धा परत केले. म्हणाला.. काका, तुम्ही मुद्दल मध्ये घ्या.
आज तुम्ही, धंद्याचा गुरुमंत्र दिलात मला..!

Thursday, 26 October 2017

माझं जन्मगाव जरी, पिंपरी-चिंचवड असलं.
तरी.. माझं मूळगाव हे कराडपासून अवघ्या अकरा किलोमीटरवर असणारं निळेश्वर वडोली हे आहे. माझा जन्म पुण्यात झाला असल्याने, फक्त.. काही धार्मिक कार्य किंवा कोणाच्या सुखदुखात तेवढं माझं गावी हमखास जाणं होत असतं. लग्नसमारंभ आणि देवाची यात्रा या कार्यक्रमांना मी काहीतरी जुगाड करून त्याठिकाणी माझी हजेरी लावत असतो.
बरीच वर्ष झाली.. कामाच्या व्यापामुळे, मला आमच्या गावजत्रेला काही जाता येत नव्हतं. पण यावर्षी ते काम मी जमवलंच. आमची गावजत्रा, हि दसऱ्या दिवशी असते. सगळीकडे नवरात्रीत देवीचे घट बसत असतात. पण आमच्या गावात, हेच घट महादेवाचे ( म्हणजेच निळेश्वराचे ) बसत असतात.
पुणे भागात, परडीमध्ये घट बसवले जातात. पण आमच्या भागात हेच घट, पळसाच्या पानापासून बनवलेल्या पत्रावळीवर बसवले जातात. पत्रावळीवर असणाऱ्या मातीमध्ये विविध धान्य पेरून, त्यावर एक छोटा माठ ठेवला जातो. त्या माठामध्ये पाणी भरून ठेवतात, आणि त्याच माठापासून आपल्या देव्हार्यापर्यंत विड्याच्या पानाची माळ एका दोऱ्यात गुंफून लावली जाते. सातव्या दिवशी, धपाटे आणि उसळीचा नैवद्य दाखवला जातो. आणि आठव्या दिवशी घटाला नैवद्य म्हणून, गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या कडक अशा गोड पुऱ्या घटापाशी बांधल्या जातात. याला आमच्याकडे कडाकनी असं म्हणतात. या गोडसर आणि कडक कडाकनी चवीला खूपच स्वादिष्ट असतात.
आमचे नवरात्रीत असणारे उपवास फार कडक असतात. उपवासाच्या पहिल्या दिवशी, काहीही खाल्लं जात नाही. किंवा साधं पाणी सुद्धा घ्यायचं नसतं. नंतर दुसऱ्या दिवशी, सायंकाळी पाचनंतर महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक केला जातो. पिंडीवर केलेल्या अभिषेकाचं पेलाभर दुध अमृत म्हणून घ्यायचं. आणि त्यादिवशी फक्त ते पेलाभर दूधच प्यायचं. आणि तिथूनपुढे मग तुम्ही पाणी वगैरे पिऊ शकता. त्यानंतर.. तिसऱ्या दिवसापासून, नऊ दिवस फक्त फळं, ज्यूस आणि सुकामेवा खायचा. बाकी इतर.. खिचडी, वरई, भेंडी, भोपळा आणि इतर उपवासाचं काहीबाही असतं. ते काहीच खायचं नाही.
इतके कडक उपवास असल्याने, इच्छा असून सुद्धा कामाच्या व्यापाणे जमत नसल्याने. उभ्या आयुष्यात फक्त एकदाच मी आणि माझ्या सौने हे उपवास केले आहेत.
दसऱ्या दिवशी, आमच्या गावात गोड नैवेद्याची जत्रा असते. या जत्रेला " पेढ्याची जत्रा " असं म्हंटल जातं. यादिवशी, गावातील प्रत्येक व्यक्ती आपट्याच्या ( सोनं ) पानासोबत किलोभर का होईना पेढे घेऊन एकमेकांना वाटत असतात. त्यादिवशी गावामध्ये किमान तीसेक पेढ्याची दुकानं लागत असतील. यावेळी तर, आमच्या गावात मराठी बोलणारे बिहारी व्यापारी सुद्धा दिसले. संध्याकाळी सहाच्या दरम्यान, मुख्य मंदिरातून देवाची पालखी निघते. पालखी वाहायला मराठ्याची लोकं असतात. पालखी समोर गुरव असतो, तर पालखी सोबत दिवे घेऊन जायला बारा बलुत्याची लोकं असतात. पालखीमध्ये देवाचा मुखवटा, आणि देवाच्या पायातील वहान असते. पालखी निघाल्यावर, सर्व भाविक पालखीचं दर्शन घ्यायला एकच झुंबड करत असतात. हि पालखी, प्रथम गावाच्या वेशीवर नेली जाते. त्याठिकाणी सीमोल्लंघन करून ती पालखी पुन्हा एकदा गावातील मारुतीच्या मंदिरात विसावली जाते.
हे सगळं उरकल्यावर, गावातील एका मुख्य कार्यक्रमाला सुरवात होते. गावातील मुख्य चौकात सगळा गाव जमा होतो. मग तिथे, धार्मिक कामाकरिता निधी गोळा केला जातो. आणि गतवर्षीच्या जमाखर्चाचा हिशोब सांगितला जातो.
प्रत्येक गावकरी, सढळ हाताने देणगी देत असतो. या देणगीची कोणतीच पावती वगैरे दिली जात नाही. सगळा तोंडी हिशोब असतो.
यावर्षी, देणगीच्या माध्यमातून.. गावामध्ये नव्याने निर्माण होणारी शिवसृष्टी, अध्यायावत तालीम, सटवाई देवीचं मंदिर, गणपती मंदिर आणि निळेश्वर मंदिराच्या कामाकरिता देणगी जमा करण्यात आली. अवघ्या तासाभरात, गावातील अंतर्गत तंटा वगळता सुमारे पाच लक्षाचा रोख निधी जमा झाला.
त्यानंतर.. रात्री दहाच्या सुमारास, दिवट्याच्या उजेडात आणि हलगीच्या तालात वाजत गाजत पालखी निळोबाच्या मंदिरात विसावा घेते. आणि, इथेच यात्रेची सांगता होते.
निळेश्वराच्या मंदिरामागे, एक जुन्या काळातील विहीर आहे. पूर्वी याच विहिरीतल्या पाण्याने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक वगैरे केले जायचे. पण काळाच्या ओघात, मंदिरात येणाऱ्या गावकरी भाविकांनी. थोडा-थोडा करत निर्माल्य म्हणून जमलेला कचरा. त्या विहिरीत टाकायला सुरवात केली. आणि आजच्या घडीला, तीच विहीर अगदी उकीरड्या सारखी झाली आहे. त्या विहिरीतून भयंकर दुर्गंधीयुक्त दर्प येत असतो. मी सहजच काही लोकांच्या हे लक्षात आणून दिलं.
आणि म्हणालो.. दरवर्षी एवढी देणगी जमा होत आहे. तर, त्यातील लाख दोन लाख रुपये खर्च करून, त्या विहिरीला स्वच्छ करून घ्या. त्यातील गाळ काढून, थोडा खंदक घेऊन त्या विहिरीला पुनर्जीवित करा. तर एक जन मला म्हणाला..
नाही, आता ती विहीरच बुजवून टाकायची आहे..!
गावामध्ये गटातटाच्या राजकारणाला, नको तितका उत येत असतो. त्यामुळे आजच्या घडीला गावामध्ये फक्त मंदिरं, तालीम आणि शिवसृष्टी बांधायची चढाओढ चालू आहे. आणि जुन्या पुरातनकालीन विहिरी सारखा अनमोल ठेवा, काळाच्या पडद्याआड गुडूप होऊन जात आहे. नाही म्हणता, या गोष्टीचं दुखः मनामधून काही केल्या जात नाही.
निळोबाच्या नावानं चांगभले..
( सोबत :- आवळे बंधूंच्या हलगीच्या तालात वाजत गाजत निघालेल्या पालखीची, एक छोटीशी चित्रफित जोडत आहे. )

यावर्षी.. मला ऑफर येऊन सुद्धा.
मी, माझ्या #कुबेर समूहाचा दिवाळी अंक वगळता. इतर कोणत्याच दिवाळी अंकाला माझे लेख दिले नाहीत. तसा मी काही फार मोठा आणि नामांकित लेखक वगैरे नाहीये. पण माझ्यापुरता तरी मी तसा ठीकठाक आहे. आणि मला ऑफर येतात म्हणजे, माझ्या लिखाणात काहीतर गमक असेलच ना.
शेवटी.. मला ऑफर केलेल्या एका दिवाळी अंकाच्या मालकाने मला विचारलं.
का हो.. तुम्ही अजून लेख पाठवला नाही..?
तर.. मी त्यांना म्हणालो, त्यामध्ये तुम्ही मानधनाचा काही उल्लेखच केला नव्हता हो. सांगा ना, त्या लेखाकरिता मला तुम्ही किती रुपये मानधन देणार आहात..?
तर ते गृहस्थ म्हणाले, नाही.. आम्ही मानधन देऊ शकत नाही.
त्यावर, मी त्यांना म्हणालो.. काहीतरी द्या, मला तुम्ही अगदी एक रुपाया दिला तरी चालेल. कारण, लेखन करणं आणि त्याला विकणं हा माझा व्यवसाय नाहीये. आणि कसं आहे, फुकट दिलेल्या वस्तूची किंवा साहित्याची कोणी जास्तीची कदर करत नाही. हे तुम्ही सुद्धा जाणून असाल.
पण बघा ना.. लोकं किती कोत्या विचारसरणीचे असतात. मी त्यांना फक्त एक रुपाया मागितला होता. तो सुद्धा ते देऊ शकले नाहीते.
जे कि.. दिवाळी अंकात, जाहिराती मिळवून हीच मंडळी वर्षाला लाखो रुपये कमवत असतात. सगळा धंदा करून ठेवलाय या लोकांनी. खरोखर दिवाळी अंक वाचणारे वाचक किती असतील.. हे सांगता येणार नाही. पण दरवर्षी, संपूर्ण भारतवर्षात हजारो दिवाळी अंक प्रकाशित होत असतील.
माझे मित्र श्री Prashant Joshi भाऊ मला म्हणाले. कि आमचे साहेब, म्हणजे, श्री धनंजय मुंडे साहेब, दरवर्षी दहा ते पंधरा लाख रुपयांच्या जाहिराती या दिवाळी अंकांसाठी देत असतात. आणि दरवर्षी माझ्याकडे या दिवाळी अंकांचा अगदी खच पडलेला असतो.
हे दिवाळी अंक म्हणजे, काही व्यक्तीच्या उदरनिर्वाहाचं साधन झालं आहे. असं म्हंटल तर ते वावगं ठरू नये. आपल्या ओळखीचा फायदा उचलत, जाहिराती मिळवायच्या. सोशल मिडीया मधील नवोदित लेखकांकडून फुकटात लेख मिळवायचे. आणि आपली तुंबडी भरायची. हा काही लोकांनी धंदा सुरु केला आहे. तुम्ही तिकडे काहीही करा हो. पण मिळणाऱ्या पैशातून किमान काही रक्कम तरी त्या नवोदित लेखकांना देत चला. त्यांना सुद्धा लेखन करायला हुरूप येईल. अशा व्यक्तींनी थोडा मनाचा मोठेपणा दाखवायला काय हरकत आहे..?
त्यामुळे.. तमाम नवोदित लेखक, कवी, विडंबनकार, चारोळीकार, व्यंगचित्रकार मंडळींना माझं एकच सांगणं आहे. कोणालाही आपलं साहित्य फुकटात देऊ नका. भले त्यामुळे आपल्याला नावलौकिक मिळायला थोडा अवधी लागेल. पण जेंव्हा आपण नावारूपाला येऊ. तेंव्हा, आपल्या भोवती बऱ्याच लोकांचा गराडा असेल. हे माझं सत्यवचन आहे.
धन्यवाद, सर्व मित्रांना दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!

आता नव्यानेच, तिरुमला येथे सर्व प्रकारचे दर्शन पास देणं कायमचं बंद केले आहेत. ऑनलाईन बुकिंग करून आलेल्या व्यक्तींना ठरलेल्या वेळात. तासाभरात दर्शन मिळून जातं. पण फ्री लाईन मध्ये दर्शन घेणं खूपच कठीण झालं आहे. खूप गर्दी असल्याचा भास निर्माण करून, भाविकांना बारा, पंधरा तास दर्शन बारीच्या बराकीमध्ये कैद्यासारखं विनाकारण कोंडून ठेवलं जातं.
बराकीमध्ये.. एका काळ्या बोर्डवर, आपण तिथे आहोत त्या दिवसाची तारीख आणि वेळ लिहिलेली असते. आणि आज दर्शन बारीसाठी थांबणाऱ्या भाविकांना दर्शन कधी मिळेल. ती तारीख आणि संभाव्य वेळ सुद्धा लिहिलेली असते. ती तारीख, साधारणपणे दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीची असते.
त्यातल्या त्यात एक गोष्ट अगदी बरी झाली आहे. बायोमेट्रिक मोफत दर्शनाचा पास मिळाल्यावर, तुम्ही त्या बराकीतून बाहेर पडून ज्या वेळचं दर्शन मिळालं आहे. त्या दिवशी त्याच वेळेला दर्शनासाठी पुन्हा येऊ शकता. मधल्या वेळात, तुम्ही त्या भागात तुमचं इतर फिरणं वगैरे सुद्धा करू शकता. आता पूर्वीसारखं, बराकीमध्ये कोंडून राहावं लागत नाही.
तरीसुद्धा दक्षिणेतील काही भाविक, त्या बराकीत राहणंच पसंत करतात. त्यापासून त्यांना फायदा एकच. बाहेर रूम बुक करून त्यांचा राहायचा ताप आणि खर्च वाचतो. शिवाय, फ्री दर्शन करणाऱ्या भाविकांसाठी देवस्थानाने खाण्यापिण्याची अगदी मोफत सोय सुद्धा केलेली असते.
आणि.. दर्शन सुद्धा अगदी दिलेल्या वेळच्या दोनचार तास अगोदरच होऊन जातं. पण नाही म्हणता, चोवीस तास नाही, तर किमान दहा बारा तास नक्कीच खर्ची पडतात. तेवढी सहनशीलता आपल्या अंगी असेल, तर तिथे असणाऱ्या बराकीमध्ये निवांत झोपून राहावं. दर्शन बारी सुरु झाली, कि झोपेतून उठून पुढे चालू लागायचं. त्या भागातील लोकांना, आता याची सवय झाली असल्याने. ती लोकं बराकीत येताना सगळा बोऱ्या बिस्तरा सोबत घेऊनच येत असतात. आणि बराकीतील पायऱ्यांवर मस्तपैकी पहुडले जातात.
इथे रूम बुकिंगचा सुद्धा एक वेगळाच त्रास आहे. तिथे बऱ्याच प्रकारच्या रूम भाविकांना मिळत असतात. अगदी पन्नास रुपयांपासून ते पाच हजार रुपया पर्यंतच्या भाड्याच्या रूम्स तिथे उपलब्ध असतात. पण ग्रुप बुकिंगसाठी आपण मोठ्या रूम्स मागितल्या. कि सगळ्या रूम्स संपल्या आहेत असं आपल्याला सांगितलं जातं. प्रत्यक्षात त्या रूम्स मोकळ्याच असतात. आणि मग विनाकारण छोट्या रूम घेऊन आपल्याला दाटीवाटीने राहावं लागतं.
हे सर्व होत असताना, बाहेर काही एजंट लोकं आपल्याला भेटतात. आणि काळ्या बाजारात देवस्थानातील मोठ्या रूम मिळवून देण्याची सोय करतात. पंधराशे रुपयाची रूम, पाच ते सहा हजार रुपयांना ते आपल्याला देऊ करतात. आणि पन्नास रुपयांची रूम चक्क पाचशे ते हजार रुपयाला देत असतात. हे सगळं काही, आतील कामगार लोकांचे लागेबांधे असल्या शिवाय होऊ शकणार आहे का..? सांगा ना, त्याशिवाय हे होऊ शकणार आहे का..?
हे सगळं करण्यामागचं गणित काय असावं..? तर तिथे घडत असणारा आर्थिक व्यवहार. तिरुमला देवस्थानाने तिथे असणारी कोणतीच मिळकत कोणाला विकत दिलेली नाहीये.
तिथे असणारी.. हॉटेल्स, चहाचे ठेले, कपडे आणि टोप्यांचे स्टोल्स सगळं काही भाडेतत्वावर दिलं आहे. आणि दरवर्षी त्याचे नव्याने लिलाव केले जातात. हे लिलाव सुद्धा काही साधे नसतात.
रोडच्या कडेला असणाऱ्या चहा, कॉफीचे स्टोल्स.. दरवर्षी वीस ते पन्नास लाखाच्या घरात लिलाव केले जातात. तर मग, मोठमोठ्या हॉटेल्समध्ये किती पैसा गुंतवावा लागत असेल. याची कल्पनाच न केलेली बरी. आणि, इतक्या मोठ्या रकमा देऊन लिलाव घेतले जातात. तर मग, ते पैसे व्याजासहित वसूल होण्यासाठी. भाविक मंडळी तिथे थांबलीच पाहिजे. भाविक जास्तीकाळ थांबले नाहीत, तर यांचे धंदे तरी कसे होणार..?
दुसरं तिसरं काही नाही, फक्त हे एकमेव आर्थिक कारण आहे. ज्यामुळे, भाविक लोकांना तिथे वेठीस धरलं जात आहे. पण खरं सांगतो, हे चांगलं नाहीये. नाही म्हणता, काही लोकांना या गोष्टी लगेच समजतात, आणि पर्यायाने ते भाविक इथे येनं टाळतात. आणि त्याचं मुख्य उदाहरण म्हणजे, हल्लीच माझ्या ऐकण्यात आलं आहे. कि, बालाजीच्या दरवर्षी होणाऱ्या उत्पन्नात हल्ली बरीच घट येत चालली आहे.
नाभिक ( न्हावी ) लोकांचा विषय तर फारच निराळा आहे.
बालाजीला येणारा जवळपास प्रत्येक भाविक आपली डोक्यावरील केसं देवाला अर्पण करत असतो. पुरुषांचा विषय सोडा, पण या धार्मिक कामात स्त्रिया सुधा बिलकुल मागे नसतात.
यामागचं मुख्य कारण म्हणजे, या जगात सौंदर्या सारखं दुसरं दान नाही.
डोक्यावरील केस म्हणजे, स्त्री आणि पुरुषांची सुंदरता असते. त्यामुळे, सर्वात मोठा त्याग किंवा दान म्हणजे आपली केस असतात. ( यामुळेच, आपले आईवडील गेल्यावर. आपण त्यांना आपल्या डोक्यावरील केसं अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत असतो. ) नाही म्हणता, या केसांपासून सुद्धा बालाजी देवस्थानाला भरपूर मिळकत होत असते.
आजपर्यंत.. भारतवर्षात कमीतकमी नोकरीचे तास म्हणजे आपण आठ तास मानतो. पण बालाजी देवस्थानात या नाभिक लोकांना फक्त सहा तासांची ड्युटी आहे. इथे केस कापण्यासाठी, दिवस आणि रात्रीतील चार पाळ्यांमध्ये काम चालत असतं. त्यामुळे, साहजिकच बऱ्याच व्यक्तींना तिथे रोजगार मिळाला आहे. यावेळी तर, प्रथमच मला तिथे नाभिक महिला सुद्धा दिसून आल्या.
सहा तासामध्ये.. एक नाभिक साधारणपणे, सत्तर ते ऐंशी लोकांचं मुंडन करतो. आणि मुंडन करणाऱ्या प्रत्येक भाविकाडून " ख़ुशी ख़ुशी " म्हणत. तो कमीतकमी वीस रुपये तरी नक्कीच मिळवतो. म्हणजे, नाही म्हणता एक नाभिक दिवसाला कमीतकमी हजार ते दीड हजार रुपये वर कमाई करतो. शिवाय त्याला मिळणारा पगार वेगळाच.
या नाभिक मंडळींना सुद्धा, देवस्थानाकडून सुरवातीलाच चाळीस पन्नास हजार रुपयांच्या घरात पगार आहेत. खरं सांगायला गेलं तर. हि नाभिक मंडळी सुद्धा कामाला लागताना. काहीतरी चिरीमिरी देऊनच कामाला लागत असतील. यात बिलकुल शंका नाही.
हि नाभिक मंडळी, मुंडन करणाऱ्या भाविकाने पैसे दिले तरच अगदी व्यवस्थितपणे त्याचं केशवपन करतात. नाहीतर, पैसे न दिल्यास. त्या भाविकाच्या डोक्यावर वस्तऱ्याने दोनचार वार तरी ते नक्कीच करतात. खरं सांगायला गेलं तर, सगळेच सारखे नसतात. पण त्यातील काही नाभिक. हि, वरकमाई घेणं टाळताना सुद्धा मी पाहिलं आहे. पण, अशा प्रामाणिक लोकांची संख्या तिथे फारच कमी आहे.
प्रसादाच्या लाडूच्या बाबतीत सुद्धा तेच.
देवस्थाना मार्फत, एका भाविकाला दर्शनपास मागे दोन लाडूंचा प्रसाद मिळत असतो. ते दोन लाडू काही आपल्याला पुरेसे पडत नाहीत. मग त्याच ठिकाणी आपल्याला एक नवीन एजंट भेटतो. आणि.. ऐंशी ते शंभर रुपयां पर्यंत एक लाडू. असे, हवे तितके लाडू तो आपल्याला देऊ करतो.
हे सुद्धा, देवस्थानाच्या आतील कामगारांचे आणि या एजंट लोकांचे लागेबांधे असल्याशिवाय होऊ शकतं का..? त्यामुळे, दोन पाच वर्षांपूर्वी देवस्थाना मार्फत पन्नास रुपयाला एक लाडू, याप्रमाणे हवे तितके लाडू भाविकांना द्यायला त्यांनी सुरवात केली होती.
पण, अवघ्या दोन तीन वर्षातच हि योजना बंद पडली. आता, हि योजना बंद पडण्यामागे नेमकं काय गौडबंगाल असेल..? ते मात्र मला कधीच समजलं नाही.
यंदा.. माझ्या काही मित्रांनी, ऐंशी रुपयाला एक असे हवे तितके लाडू त्या ठिकाणाहून काळ्या बाजारात खरेदी केले. पूर्वी प्रसाद म्हणून मिळणारा लाडू, अक्षरशः दोन हातात मावत नव्हता.पण आता मिळणारा लाडू एका हातात सहज मावून जातो.
आपण धार्मिक लोकं, देवाचा पैसा कसा लाटावा..?
या विचाराने असं दुष्कृत्य कधीच करणार नाही. कारण आपल्या मनामध्ये एक धार्मिक भीती दडून बसलेली असते. आणि ते खरं सुद्धा आहे. कारण परमेश्वराच्या लाठीमध्ये आवाज नसतो. तो अशा लोकांना बरोबर शासन करत असतो. तरी सुद्धा पैशाला हपापलेली लोकं अशा गोष्टी करायला बिलकुल मागेपुढे बघत नाहीत.
शेवटी.. " करावे तसे भरावे " हा नियम कोणालाच चुकला नाही.

समाप्त 

ll विना वेंकटेशा ननाथो ननाथा, सदा वेंकटेशा स्मरामि स्मरामि ll

तर मग हे नक्की वाचा, तुम्हाला त्रास सुद्धा होणार नाही. आणि काही गोष्टी सुद्धा तुम्हाला समजतील. कारण, तिरुपती बालाजी देवस्थानातील मुजोरगिरी काही केल्या संपत नाहीये.
हि पोस्ट थोडी मोठी आणि दोन भागात आहे, पण माहिती जबरदस्त आहे. हि माहिती, तुम्हाला पैसे देऊन सुद्धा वाचायला मिळणार नाही.
खरं तर.. तिरुपती बालाजी, हे माझं आराध्यदैवत आहे.
गेली वीस वर्ष, सातत्याने मी बालाजीच्या दर्शनाला अगदी नित्यनेमाने जात आहे.
वीस वर्षातील.. सुरवातीची आठ दहा वर्ष तर, मी चक्क वर्षातून तीन ते चार वेळा बालाजीच्या दर्शनाला गेलो आहे.
एवढंच काय, त्यावेळी मी एक संकल्प सुद्धा सोडला होता.
कि एका वर्षी, वर्षभर महिन्यातून एकदा मी हि वारी करेन. पण माझा हा संकल्प, काही तडीस गेला नाही. पण आज ना उद्या, मी हा संकल्प नक्कीच पूर्णत्वास नेणार आहे.
या वीस वर्षात.. तिरुपतीला गेल्यावर, जेमतेम दोन तीन वेळाच. रेणीगुंठा ते तिरुमला हा प्रवास मी बसने केला असेल. नाहीतर, रेणीगुंठा येथून बसने सप्तगिरी पर्वताच्या पायथ्याला अलीपिरी येथील पादमंडपात उतरून. तेथून पुढे सप्तगिरी पर्वतावर मी पायी वारी केली आहे.
गेल्यावर्षी.. तिरुमला येथे पायी जाण्यासाठी, श्रीनिवास मंगापुरम येथील नवीन रस्त्याची मला एका मित्राकडून माहिती मिळाली. तिथे सुद्धा, बालाजी रायाचं नितांत सुंदर असं एक मंदिर आहे.
त्यामुळे.. गेल्यावर्षी पासून, मंगापूरम येथून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या.
" श्रीवारी मेट्टू " येथील नव्या रस्त्याने मी तिरुमला येथे पायी जात आहे.
रेणीगुंठा ते अलीपिरी, हे अंतर साधारण तेरा किलोमीटर आहे. आणि रेणीगुंठा ते श्रीनिवास मंगापुरम ( श्रीवारी मेट्टू ) हे अंतर, एकूण एकोणतीस किलोमीटर आहे.
हे अंतर, आपण सरकारी बसने किंवा भाड्याच्या जीपने सुद्धा पार करू शकतो. तिथून पुढे, पायी यात्रा सुरु करण्याअगोदर. या दोन्ही पायी यात्रेच्या मार्गावर आपल्या सोबत असणाऱ्या अवजड सामानाची, देवस्थानच्या मदतीने अगदी विनामूल्य आणि सुरक्षित अशी वाहतूक केली जाते. त्यांचा नियम एकच असतो, सगळ्या ब्यागा कुलुपबंद असाव्यात. त्यामुळे, चालत जाताना आपल्याला अंगा खांद्यावर बोजा वाहायची गरज पडत नाही. त्या संस्थानाने दिलेली हि सुविधा. अगदी वाखाणण्याजोगी आहे. यात तिळमात्र शंका नाही.
अलीपिरी मार्गे तिरुमला येथे जाण्यासाठी, पायी यात्रा करताना. तीन हजार पाचशे पन्नास पायऱ्या आणि काही पायी रस्ता सुद्धा आहे. असा एकूण, अकरा किलोमीटरचा टप्पा भाविकांना पार करावा लागतो.
या पायी यात्रेला, साधारणपणे पाच ते सहा तास लागतात.
परंतु, श्रीनिवास मंगापूरम येथील रस्त्याने तुम्ही गेलात. तर हा साधारण तीन किलोमीटरचा रस्ता आहे. या रस्त्याने तुम्ही अवघ्या एक ते दीड तासात तिरुमला येथे पोहोचता. या दोन्ही बाजूने होणारा पायी प्रवास खूपच आनंददायी, प्रसन्न आणि अवीट गोडीचा असतो.
या यात्रेदरम्यान, पायी प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंची कोणतीही गैरसोय होऊ नये. म्हणून, पायी यात्रा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला यात्रेच्या प्रवासादरम्यान मध्यभागात " दिव्यदर्शन " नामक एक दर्शन पास अगदी मोफत दिला जातो.
तो पास, तुम्हाला अशा ठिकाणी दिला जातो. जेथून त्या पायवाटेवरून बाहेर पडून तुम्ही एखाद्या वाहनाने तिरुमला येथे जाऊ शकत नाही. काही केल्या, तुम्हाला वर पर्यंत चालतच जावं लागतं. अशी विशिष्ट व्यवस्था त्यांनी करून ठेवली आहे. पायी यात्रा करून, पास मिळालेल्या व्यक्तीला दर्शनाला जाण्यासाठी. पारंपारिक वेश परिधान करणं किंवा वेळेचं असं कोणतच बंधन नसतं. पास मिळाल्या पासून, चोवीस तासाच्या आतमध्ये आपण कधीही हे दिव्यदर्शन घेऊ शकतो.
परंतु.. गेल्या दोनेक महिन्यापासून. या दोन्ही मार्गावरील पायी यात्रा करणाऱ्या यात्रेकरूंना सुद्धा काही जाचक नियम आणि आटी लावण्यात आल्या आहेत.
अलीपिरी मार्गे, रात्री बारा वाजल्यापासून भाविकांना दिव्यदर्शन पास द्यायला सुरवात केली जाते. तिथून पुढे, चौदा हजार भाविकांचा टप्पा पूर्ण झाला. कि त्यादिवशी, तिथून पुढे पायी येणाऱ्या भाविकांना दिव्यदर्शन पास दिला जात नाही.
आणि.. श्रीवारी मेट्टू मार्गे, सकाळी सहा वाजल्यापासून दिव्य दर्शनाचे पास दिले जातात. ते सहा हजार भाविकांचा टप्पा पूर्ण झाला. कि हे पास देणं बंद केलं जातं.
असे दोन्ही बाजूने मिळून, दिवसभरात फक्त वीस हजार पायी यात्रा करणाऱ्या भाविकांनाच दिव्यदर्शन पास दिले जातात. खरोखर हा फार मोठा अन्याय आहे.
कारण.. पायी जाणारे काही भाविक, हे प्रत्येक पायरीवर हळदी कुंकवाचं पाणी लावत. किंवा, कापूर प्रज्वलित करत जात असतात. आणि, हे काम म्हणावं इतकं सोपं नाहीये. कारण, एकेवर्षी आम्ही उभयतांनी सुद्धा, अलीपिरी मार्गे प्रत्येक पायरीवर कापूर प्रज्वलित करत. हि पायी वारी पूर्ण केली आहे.
तिरुमला येथील ट्रस्टी लोकांनी, स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी चक्क देवाला सुद्धा वेठीस धरलं आहे. देव आपला दगड होऊन बसला आहे. पण तो हे सगळं पाहत आहे. हे त्या ट्रस्टी लोकांना समजत नाहीये. देवस्थानाच्या माध्यमातून, ते चिक्कार पैसा लाटत असतील. दर तीन वर्षांनी तेथील ट्रस्टी बदलत असतो. तिथे ट्रस्टी होण्यासाठी, फार मोठी रस्सीखेच चालू असते. ट्रस्टी होण्याच्या निवडणुकीसाठी तेथे बराच पैसा आणि मनुष्यबळ खर्च करावं लागतं. पण ट्रस्टी झाल्यानंतर, केवळ तीनच वर्षात, तो संभाव्य ट्रस्टी अब्जाधीश होऊन बाहेर पडत असेल. हि अगदी, काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.
शेवटी काय.. जिथे माल आहे, तिथे भ्रष्टाचार असणारच..!
पण एवढं करून, ते ट्रस्टी सुखी असतीलच. असं छाती ठोकपणे सांगता येत नाही. शंभर दुखणी आणि लफडी त्यांच्या मागे लागलेली असतात. हे एक निर्विवाद सत्य आहे.
श्रीवारी मेट्टू मार्गे, सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच यात्रेकरूंना पायी प्रवासासाठी सोडलं जातं. त्यानंतर, संध्याकाळी सहा वाजल्यापासून पायी यात्रा करू इच्छिणाऱ्या यात्रेकरूंना डोंगर चढण्यास मज्जाव केला जातो.
कारण, या पायवाटेच्या आजूबाजूला घनदाट जंगल आहे. आणि या जंगलात बरीच हिंस्र श्वापदं सुद्धा आहेत. त्यामुळे इथे हा निर्बंध ठेवण्यात आला आहे. मध्यंतरी त्या भागात, एका बिबट्याने काही यात्रेकरूंवर जीवघेणा हल्ला सुद्धा केला होता. पण सुदैवाने त्यातील कोणालाही जास्तीची इजा झाली नाही. हि सगळी त्या भगवंताचीच कृपा.
त्यामामाने, अलीपिरी मार्गे पायी यात्रा करणाऱ्या यात्रेकरूंसाठी चोवीस तास रस्ता खुला असतो. अलीपिरी मार्ग चढण्यास जरी कठीण आणि वेळकाढू असला. तरी, या रस्त्याने पायी जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या जास्ती आहे. कारण, एकतर हे ठिकाण रेणीगुंठा आणि तिरुपती पासून अगदी जवळ आहे. आणि हा पायी रस्ता फार सुरक्षित सुद्धा आहे. या पायवाटे मध्ये, रस्त्यावर जागोजागी फूड स्टोल, पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय आहे. शिवाय जागोजागी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालयं सुद्धा आहेत. त्यामुळे बहुतकरून यात्री लोकं, अलीपिरी मार्गे जाणच पसंत करत असतात. या पायी यात्रेमध्ये दक्षिण भारतातील गोरगरीब लोकांचा जास्तीचा भरणा असतो.
त्यामागील मुख्य कारण म्हणजे, एकतर त्यांचा बसने जाण्याचा खर्च वाचतो. शिवाय, आगाऊ बुकिंग न करता. त्यांचं दर्शन सुद्धा अगदी मोफत होतं. आणि लाडूचा प्रसाद सुद्धा मोफत मिळतो.
वरील नवीन अटी निर्माण करून, बालाजी देवस्थानाने गोरगरीब भाविकांच्या भावनांना फार मोठी हानी पोहोचवली आहे. याची फळं त्यांना नक्कीच भोगावी लागतील.
क्रमशः

आज.. महिलांना पुरुषांच्या बरोबरीने, पन्नास टक्क्यांचं आरक्षण मिळालं आहे.
अर्थात, त्या सुद्धा आता खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहात आल्या आहेत. असं म्हंटल तर ती अतिशयोक्ती ठरू नये..
पोलीस खातं, लघु उद्योग, विदेशातील नोकऱ्या, बँकेतील नोकऱ्या..
अशा कित्तेक ठिकाणी, आता बऱ्याच महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करत आहेत. खरं तर, हि फार विशेष आणि अभिनंदनीय गोष्ट आहे. काही महिला तर, या कार्यक्षेत्रात अगदी पुरुषांच्या सुद्धा पुढे निघून गेल्या आहेत.
माझ्या उमेदीच्या काळात,
साधारण पंचवीस वर्षांपूर्वी. मी ज्या ठिकाणी प्रायवेट सेक्टरमध्ये काम करत होतो.
त्याठिकाणी कामाला असणाऱ्या मुली, अगदी बुजऱ्या अशा असायच्या. अगदी शिष्टाचार राखत शिस्तबद्धपणे कामाला येणे. आणि, काम संपल्यावर घरातील कोणीतरी वडील मंडळी त्यांना घरी न्यायला येत असत. त्यांच्यासोबतच गपगुमान त्या घरी निघून जात असत.
तेंव्हा खूप बंधनं होती, आणि त्यावेळी लोकं सुद्धा अगदी धडाची नव्हती. त्यामुळे, सहसा घरातील महिलांना कोणी कामाला पाठवायला धजावत नसत.
तेंव्हा.. मी एका खाजगी कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला होतो.
तिथे.. साधारण, तीसेक एक लोकं कामाला होती. आणि विशेष म्हणजे, त्याकाळी त्या कंपनी मधील कोणत्याच व्यक्तीने विमा पोलिसी काढली नव्हती. अगदी मी सुद्धा नाही.
आता.. एवढे कामाला कर्मचारी आहेत म्हंटल्यावर, इथे आपल्याला भरपूर विमा पोलिसी मिळतील. या आशेने, एक महिला विमा एजंट आमच्या कंपनीत आली.
आणि, सुरवातीला नेमकी ती मलाच भेटली.
तिने मला सांगितलं, मी विमा एजंट आहे. तुमच्या कंपनीतून मला काही विमा पोलिसी मिळतील का..? मी त्यांना म्हणालो, तुम्ही एक काम करा. आमच्या मेनेजर साहेबांना भेटा, त्यांच्या मर्जीशिवाय इथे कोणतच पान हालत नाही.
आणि त्या महिलेला मी आमच्या मेनेजरची केबिन दाखवली.
बाई दिसायला अगदी खास असल्याने, मेनेजरने.. सुरवातीला त्या बाईंना कंपनी मधील कामगारांच्या एकदम पाच विमा पोलिसी मिळवून दिल्या. त्यामुळे ती बाई भलतीच खुश झाली.
आणि, त्यानंतर दर महिन्याला आमच्या कंपनीत तिची हमखास चक्कर होऊ लागली.
दोन पाच महिन्यांनी.. आमच्या मेनेजरने तिला अचानक पोलिसी देण्याचं बंद केलं. तिला बिचारीला काही समजेना. नेमकं काय झालय..?
एके दिवशी ती महिला कंपनी मध्ये आली. आणि, मला म्हणाली.. मेनेजर साहेब आहेत का..?
मी म्हणालो.. आहेत ना, त्यांच्या केबिनमध्ये बसले आहेत.
ती महिला, त्यांच्या केबिनमध्ये गेली. आणि त्यानंतर त्या मेनेजरने फोन करून मला सुद्धा केबिनमध्ये बोलावून घेतलं. मला म्हणाले, बस रे तू इथे..!
ती महिला त्यांना म्हणाली.. साहेब माझी काही चूक झाली आहे का..? मला आता तुम्ही विमा पोलिसी देत नाहीयेत. माझं काही चुकलं असेल तर सांगा..!
त्यावर आमचा मेनेजर त्या बाईंना म्हणाला..
बाई.. तुम्ही " सर्विस " नीट देत नाही हो..!
अशी, आमच्या कामगारांची तक्रार आहे बरं का. माझं काहीच म्हणनं नाहीये.
ती.. सर्व्हिस नीट देत नाहीये, म्हणजे मी नेमकं काय करू ते मला समजलं नाही..!
तो.. काय आहे माहिती का, सर्व्हिस अशी द्यायची ना, कि कस्टमर फेल झालच नाही पाहिजे.
ती.. म्हणजे मी नेमकं काय करू.?
तो.. तुम्ही फक्त सर्व्हिस नीट द्या हो, मी तुम्हाला भरपूर कस्टमर देईल.
ती.. अहो पण नेमकं काय करू ते तरी मला सांगा ना, मला काहीच समजत नाहीये.
ती बाई सुद्धा खूप भोळी होती. हा नालायक माणूस काय म्हणत आहे. ते तिला समजतच नव्हतं.
" सर्व्हिस " या शब्दाचा तिला अर्थच समजत नव्हता. शेवटी, सहन न झाल्याने वैतागून मी त्या ठिकाणाहून माझ्या केबिनमध्ये निघून गेलो.
त्यानंतर, काही वेळाने ती बाई सुद्धा केबिनच्या बाहेर आली. माझ्या केबिनमध्ये येऊन मला भेटली. आणि म्हणाली..
ते साहेब काय म्हणत आहेत, ते बिलकुल समजत नाहीये हो मला..!
मी त्या बाईंना म्हणालो..
मेडम, तुम्ही इतक्या भोळ्या कशा काय..? तुम्हाला माणसं ओळखता येत नाहीत का..? आणि नसतील येत, तर तुम्ही या क्षेत्रात काम तरी कशाला करताय..?
ती म्हणाली.. मला काहीच समजत नाहीये हो.
मी म्हणालो.. तुम्ही एक काम करा, घरी गेल्यावर तुमच्या मिस्टरांना वरील घटना सांगा. ते काय म्हणतायेत ते पाहा. आणि मला तसा फोन करा. हे ऐकून मान डोलवत ती बिचारी, मला हो म्हणून निघून गेली.
चार पाच दिवसांनी.. मला तिचा फोन आला,
म्हणाली.. मी माझ्या मिस्टरांना वरील प्रकार सांगितला. तर त्यांनी, रागारागात माझ्या मुस्कटात एक झापड लगावली. त्यामुळे, मी तीनचार दिवस आजारीच होते. आज थोडं बरं वाटतंय, म्हणून तुम्हाला फोन केला.
मी म्हणालो, मग.. तुम्हाला काही उलघडा झाला कि नाही..?
ती म्हणाली, नाही हो..!
शेवटी मीच त्या बाईला म्हणालो..
अहो..तुम्ही, ज्याला व्यवसाय म्हणताय ना. त्याला काही लोकं धंदा सुद्धा म्हणतात.
आणि, व्यवसायवाली बाई असं कोणी म्हणत नाही. डायरेक्ट, धंदेवाईक बाई असं लोकं म्हणून जातात. " धंदेवाली " या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे कि नाही..?
वासनांध व्यक्तींना, फक्त बाई हवी असते. मग ती कोणत्याही क्षेत्रात काम करत असो. फक्त एक भोगविलासी वस्तू म्हणून ते तिच्याकडे पाहत असतात. बाकी, व्यवसाय वगैरे त्यांना काही समजत नसतो. आमचा मेनेजर तुम्हाला उगाचच विमा पोलिसी देत होता का. त्यापाठीमागे त्याचा सुद्धा काही स्वार्थ असेल कि नाही..?
माझं बोलणं संपल्यावर, त्या महिलेने पुढे एकही शब्द न बोलता फोन ठेऊन दिला. आणि, त्यानंतर पुन्हा कधीही ती आमच्या कंपनीत विमा पोलिसी काढण्यासाठी आली नाही. आणि, कालांतराने मी सुद्धा ते काम सोडून दिलं.
आत्ताच पाचेक वर्षापूर्वी, आमचा तो मेनेजर, अगदी हालहाल होऊन मेला. त्याच्या दोन्ही मुली पळून गेल्या. बायकोने सुद्धा त्याला सोडून दिला होता. एकटाच मेला, शेवटी काय आहे.

" कर्म तशी फळं. "

काल काही कामानिमित्ताने,
मी.. एच.डी.एफ.सी. बँकेत गेलो होतो.
माझं तेथील काम आटोपलं, आणि बाहेर येऊन पाहतो. तर.. जोरदार पावसाला सुरवात झाली होती. मग काय, बँकेच्या बाहेरील पेसेजमध्ये येऊन मी उभा राहिलो.
तिथे बाजूलाच, त्या बँकेचं ए.टी.एम. मशीन सुद्धा होतं. आणि मी नेमका त्या ए.टी.एम. च्या दरवाजाला खेटून उभा होता. काही वेळाने, तिथे कामाला असणाऱ्या एका सिक्युरिटीने मला दरवाजातून बाजूला सरकायला सांगितलं.
निळ्या पेहेरावातील तो सिक्युरिटी गार्ड, बिहारी बाबू होता. अंगात निळा ड्रेस, डोक्यावर गोलसर टोपी, गालावर काळ्या केलेल्या भरगच्च मिशांचा गोलसर मोठासा पुंजका. उंचापुरा आणि काटक शरीरयष्टीचा असा तो सिक्युरिटी गार्ड होता.
तो सिक्युरिटी गार्ड, दिसायला जरी अगदी काटक असला. तरी तो, साधारण पंचावन्नच्या आसपास असावा.
पाऊस पडतच होता.. आता तो सिक्युरिटी गार्ड अगदी माझ्या शेजारी येऊन उभा राहिला होता.
तितक्यात.. त्याच्या पाठीमागून एक मजबूत शरीरयष्टीचा दुसरा बिहारी बाबू आला. आणि त्याने, मागील बाजूने येऊन या सिक्युरिटी गार्डचा हाताने जोरात दंड दाबला.
आणि म्हणाला..
क्या हो जवान..!
खरं तर, दंड पिळवटला गेल्याने, तो सिक्युरिटी फार चिडला होता. पण त्याला रागाने काही बोलता येत नव्हतं. शेवटी, राग कसा व्यक्त करावा. म्हणून.. तो म्हातारा सिक्युरिटी गार्ड त्या दुसऱ्या बिहाऱ्याला म्हणाला.
जवान दिखता हुं मै तुम्हे.. तो करवा दो अपने बहेनसे मेरी शादी..!
हा प्रसंग घडल्यानंतर, त्या दोघांमध्ये पुन्हा एकदा जोरदार हशा पिकला. बहुतेक.. त्या भागातील लोकं, अशा घरगुती विनोदांना फारसं सिरीयसली घेत नसावेत. पण चुकून, त्याजागी.. आपला कोणी मराठी माणूस असता.
तर, त्या सिक्युरिटी गार्डचं किमान थोबाड तरी नक्कीच फुटलं असतं..! 

Tuesday, 24 October 2017

वाहन चालवण्याच्या बाबतीत, मी खूप शिस्तबद्ध व्यक्ती आहे..
माझ्या कामामध्ये चारचाकी, आणि.. कामावर जाताना दुचाकी, अशा दोन्ही प्रकारच्या गाड्या मी रोजच चालवत असतो. पण त्या दोन्ही गाड्या, मी अगदी पद्धतशीरपणे चालवत असतो.
आपल्यापासून, दुसऱ्या कोणाला त्रास किंवा हानी होऊ नये. हे त्यामागचं एकमेव आणि प्रामाणिक उद्धिष्ट असतं.
बाईक चालवताना.. मी फक्त एकच चूक करत असतो. ती म्हणजे,
मी बाईक चालवताना, माझ्या कानामध्ये हेडफोन घालत असतो. भले हे नियमबाह्य जरी असेल. पण माझ्या माहितीप्रमाणे, त्याला चूक म्हणता येणार नाही.
कारण.. कानात असणारा तो हेडफोन, फक्त माझ्यासाठी.. चुकून कोणाचा फोन आलाच तर घेण्यासाठी मी तो वापरत असतो. ते सुद्धा, बाईक रस्त्याच्या बाजूला घेऊन.
तर, काल संध्याकाळी.. कामावरून सुट्टी झाल्यावर पुण्यावरून पिंपरीत घराकडे येत असताना. कासारवाडीच्या पुलावरून, डावी बाजू धरून मी बाईकवरून सावकाशपणे निघालो होतो. तर माझ्या मागून, रस्ता मोकळा नसताना सुद्धा, विनाकारण रस्ता मागण्याच्या घाईत. एक मूर्ख कॅब चालक ( ड्रायव्हर ) विनाकारण पाठीमागून मोठमोठ्याने हॉर्न वाजवत होता.
त्याच्यासमोर असणारा कारचालक.. त्याला काही बाजू देत नव्हता. आणि, मी तर काय पुलाचा कठडा तोडून पलीकडे जाण्याइतपत शक्तिमान सुद्धा नव्हतो.
तरी सुद्धा.. त्याचं पाठीमागून सतत हॉर्न वाजवणं चालूच होतं. शेवटी वैतागून, मी त्याला हातानेच इशारा करून विचाराता झालो.
" आता.. मी नेमकं काय करू बाबा..? "
मला तर भयंकर राग आला होता, पण करता काय..
तितक्यात.. उजव्या बाजूस असणाऱ्या कार चालकाने, त्याचा थोडासा स्पीड वाढवला. आणि, त्याच्या मागोमाग थोडा स्पीड घेत, माझ्या शेजारी ती संभाव्य कार आल्यावर. मी त्याच्याकडे, एक रागीट तिरका कटाक्ष टाकला. तर त्याने.. लगेच माझी चूक मला दाखवून दिली. स्वतःच्या कानाला हात लाऊन, माझी खिल्ली उडवत तो मला सांगू इच्छित होता.
" कानात हेडफोन घातल्याने, तुला काही समजत नाहीये..! "
प्रत्यक्षात मी चूक नव्हतो, माझ्या बाईकला दोन साईड मिरर आहेत. त्यामुळे, माझं लक्ष पुढे सुद्धा आणि पाठीमागून येणाऱ्या गाड्यांवर सुद्धा असतं. शिवाय, हेडफोनवर मी गाणी सुद्धा ऐकत नाही. आणि मी माझी बाजू धरून एका बाजूने सावकाशपणे पुढे निघालो होतो.
" तर मग.. या, छीचोर्या पोऱ्याचं मी का म्हणून ऐकून घेऊ..?
पण.. मनामध्ये विचार करता करता, शेवटी.. ती कार, तो भर्रकन माझ्यापुढे घेऊन निघून गेला.
पण.. काल, माझं नशीब मात्र फार जोरावर होतं..!
तो कारचालक पुढे तर निघून गेला, पण त्यापुढे नेमका.. नाशिक फाट्यावर रेड सिग्नल लागला होता. सायंकाळी आठची वेळ, रस्त्यावर बरीच गर्दी होती, त्यामुळे.. तो काही माझ्या नजरेच्या टप्प्यात येत नव्हता. कारण, मी त्याच्या गाडीच्या थोडा पुढे होतो. मी एकवार, मागे वळून त्याच्या गाडीचा नंबर पाहिला.
" आणि.. मेल्याचं नशीब फुटलं,
ती गाडी.. नेमकी बाहेर गावची होती. नाही म्हणता, तो गडी किंवा गाडी आमच्या गावातली जरी असती. तरी सुद्धा, मी त्याला नडलो, आणि.. वेळप्रसंगी, लढलो आणि फोडलं सुद्धा असतं.
कारण, मी सुद्धा इथला जन्मजात गाववाला आहे. कोणी, ऐरा गैरा " पाववाला " नाही. आणि कसं आहे, न केलेल्या चुकीला आपल्याकडे बिलकुल क्षमा नाही.
मग भले, पुढे काहीका होईना..!
माझी नजर, माझ्या बाईकच्या साईड मिरर मधेच होती. सिग्नल सुरु झाला. आणि, तो कारचालक सुद्धा अगदी माझ्या बरोबर पाठीमागील बाजूस आला होता. आणि, थोडा पुढे होऊन मि त्याला मुद्दाम अडवा गेलो. तो अजूनही, माझ्या पाठीमागेच होता. आणि अचानकपणे..
योग्य वेळ साधून, मी एकदम जोरात ब्रेक मारला..!
तसा तो सुद्धा जरा बावचळून गेला. आणि कचकन ब्रेक मारत गडबडला सुद्धा. कारण, तो ड्रायव्हर सुद्धा नवाच होता. शेवटी, मी सुद्धा एक कसलेला ड्रायव्हरच आहे ना. माझी नजर कशी फेल होणार..! मी पुन्हा एकदा, थोडं अंतर ठेऊन त्याला हलकासा कट मारला. आता, मला करायची होती. ती माझी खेळी संपली होती. माझं काम उरकलं होतं. आता बाकी, तो सुद्धा फार चिडला होता..!
मी.. हे सगळं करण्याचं कारण म्हणजे..
हा प्रकार घडत असताना, किंवा मी तो जाणूनबुजून घडवत असताना. नकळत, त्या ड्रायव्हरचं लक्ष माझ्या बाईकच्या नंबरप्लेटवर गेलं असणार. कारण, नंबर प्लेटवरून सुद्धा समोरच्या व्यक्तीची आपल्याला कुंडली समजते बरं का. हा माझा वैयक्तिक पुणेरी अनुभव आहे. आणि, त्याची नजर माझ्या बाईकच्या मागील बाजूवर पडल्या बरोबर..
माझ्या बाईकच्या पाठीमागे असणाऱ्या मडगार्ड वरील.. स्टीकर युक्त " मनसेचा " झेंडा, आणि त्याखालोखाल असणाऱ्या " शिवसेनेच्या " डरकाळी फोडणाऱ्या वाघावर नक्कीच गेली असणार.
हे मी, पक्कं ताडून होतो.
" भले.. त्या दोघा भावांनी एकमेकांशी फारकत घेतली असेल. पण माझ्यासाठी, अजूनही ते दोघेही एकसमान आणि एकदिल आहेत..! "
आता ठोका एक, जोरदार जय महाराष्ट्र..!
झालं.. आता बाकी तो सुद्धा फार चिडला होता, माझं काम फत्ते झालं होतं. आणि आता, तो चिडून मागून जोरजोरात हॉर्न वाजवायला लागला होता. आणि, मला सुद्धा नेमकं तेच हवं होतं.
तसा.. मी सुद्धा त्याला माझ्या उजव्या हाताने इशारा करून, त्याला पुढे बोलवून घेतलं.
जसा तो घाईघाईने माझ्या नजरे बाजूला अगदी समोरासमोर आला. तशी मी, त्याला पहिली एक जोरदार शिवी हासडली..
का रे आयघाल्या.. पोट भरायला पुण्यात आलायेस ना, मग तुला एवढी मस्ती कशाला..?
कसं आहे माहितीये का.. आपण एन्ट्री जर दमदार मारली ना.. कि समोरचा व्यक्ती, आपले हावभाव पाहून लगेच जागेवर हागतो. परंतु, त्याकरिता फक्त नियम एकच आहे.
" ती एन्ट्री तेवढी, आपल्याला जोरदार मारता आली पाहिजे..! "
पहिलेच त्याने.. माझ्या बाईकच्या मागचे दोन " दबंग " सिम्बॉल पाहिले होते. त्यावेळीच त्याच्या डोक्यात खळ खट्याकचे आवाज घुमलेच असणार आहेत. आणि त्यात, मी माझ्या हेल्मेटची काच वर केल्यावर,
माझा रावडी दाढीधारी चेहेरा त्याला दिसल्यावर. त्याची तर जागेवरच फाटली.
मग लागला, माझ्याशी हळुवार बोलायला..
मग काय.. बोलताना तो कमजोर पडल्या बरोबर, मी त्याच्यावर शाब्दिक रित्या अगदी नको तसा चढ-चढ चढलो. आणि शेवटी.. माझा शेवटचा पत्ता मी टाकला..
" मादरजात, तू पहिली गाडी साईडला घे "
हे वाक्य ऐकल्यावर मात्र.. घाबरून, त्याने त्याच्या गाडीचा स्पीड भयंकर वाढवला. आणि पलीकडच्या सर्व्हिस रोडने, तो पिंपरीच्या दिशेने पुढे सुसाट पळून गेला. आणि त्याचवेळी, नेमकं मला अंडरग्राउंड रोडने माझ्या घरी जायचं होतं.
तसा काही मी लई भांडखोर मनुष्य नाही. किंवा, रागे भरून लगेच मी त्याच्या मागे सुद्धा लागणार नव्हतो. पण, कसं आहे. बाहेरून पुण्यात आलेल्या मंडळींना " पुणेकर " हे शिस्त लावतातच..!
हेच मला, त्याला दाखवून द्यायचं होतं.
पूर्वीपासून, आम्हा पुणेकरांना कोणी मिळमिळीत म्हणत असतं. तर कोणी, घाटी म्हणत असतं. आमच्यावर पुणेरी पाट्याच्या बहाण्याने बरेच विनोद सुद्धा करत असतात. पण आम्हाला त्याचा कधी राग येत नाही. आम्ही या सगळ्या गोष्टी, अगदी खिलाडूवृत्तीने घेत असतो.
परंतु, आम्ही पुणेकर, जेवढे मवाळ आहोत ना..
त्यापेक्षा कैकपटीने, अगदी जहाल " कडू "सुद्धा आहोत बरं का..!
पुण्यात.. पोटापाण्याच्या विषयाने आल्यावर, कोणीही या गोष्टीची नक्कीच खबरदारी घ्यावी. आम्ही पुणेकर.. स्वतः होऊन, कोणाच्या वाटेला बिलकुल जात नसतो. पण चुकून जर कोणी आमच्या अंगावर आला. तर त्याला.. शिंगावर घ्यायला सुद्धा आम्ही मागेपुढे पाहत नसतो.

Sunday, 22 October 2017

हे, टाईमपास गीत ज्यावेळी बाजारात आलं. त्यावेळी, या गाण्याची मला काहीच माहिती नव्हती.
नाही म्हणता, या गाण्याचं श्रेय लाटत बऱ्याच व्यक्तींनी प्रसिद्धी सुद्धा मिळवली. तर काही व्यक्तींना जनतेच्या रोषाला सुद्धा सामोरं जावं लागलं.
एकेदिवशी, मी कामावरून घरी आलो.
आणि माझ्या बायडीने, अगदी हौशेने मला त्या ओरीजनल गाण्याचा विडीओ दाखवला.
नाही म्हणता, मला तो विडीयो आवडला जरी नसला. तरी सुद्धा, बायकोला कळू नये म्हणून.
मी सुद्धा तिला म्हणालो. एक नंबर गाणं आहे गं.
त्यावर ती मला म्हणाली.. हे गाणं कोणी लिहिलं आहे, ते तुम्हाला काही माहिती आहे का..?
मी म्हणालो.. नाही गं, या गाण्याचा आणि त्याच्या कवीचा माझ्याशी काडीमात्र संबंध नाहीये.
तर म्हणाली.. तुमचा काही भरवसा नाही बाबा. तुमच्या ओळखीतल्या एखाद्या कवी मित्राने हे गीत आपल्यावर लिहिलं असेल. तर काही सांगता येत नाही.
त्यावर, मी थोडावेळ अवाक झालो. हा काय विषय असावा..? म्हणून.. तेच गीत, मी पुन्हा एकदा कान देऊन आणि मन लाऊन ऐकलं. आणि मी चक्क जागेवर उडालोच. माझ्या बायकोच्या मनात आलेली शंका अगदी रास्तच होती.
माझी बायको तशी काही जास्ती ढेपसी नाहीये, पण खात्यापित्या घरची असल्याने थोडी जाडजूड नक्कीच आहे. शिवाय, मी टकल्या आणि माझा आवडता विषय चकल्या हे तर सर्वांना माहितीच आहे. लिंबू हा विषय प्रतीकात्मक जरी असला, तरी..माझ्या मुलाचा चुलतभाऊ सुद्धा चांगलाच लंबू आहे. आणि शेवटची सर्वात दुर्मिळ गोष्ट म्हणजे..
आमच्या प्रतीकला सुद्धा, आम्ही सगळे लाडाने #सोनू म्हणत असतो...!

Friday, 13 October 2017

आज.. महिलांना पुरुषांच्या बरोबरीने, पन्नास टक्क्यांचं आरक्षण मिळालं आहे.
अर्थात, त्या सुद्धा आता खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहात आल्या आहेत. असं म्हंटल तर ती अतिशयोक्ती ठरू नये..
पोलीस खातं, लघु उद्योग, विदेशातील नोकऱ्या, बँकेतील नोकऱ्या..
अशा कित्तेक ठिकाणी, आता बऱ्याच महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करत आहेत. खरं तर, हि फार विशेष आणि अभिनंदनीय गोष्ट आहे. काही महिला तर, या कार्यक्षेत्रात अगदी पुरुषांच्या सुद्धा पुढे निघून गेल्या आहेत.
माझ्या उमेदीच्या काळात,
साधारण पंचवीस वर्षांपूर्वी. मी ज्या ठिकाणी प्रायवेट सेक्टरमध्ये काम करत होतो.
त्याठिकाणी कामाला असणाऱ्या मुली, अगदी बुजऱ्या अशा असायच्या. अगदी शिष्टाचार राखत शिस्तबद्धपणे कामाला येणे. आणि, काम संपल्यावर घरातील कोणीतरी वडील मंडळी त्यांना घरी न्यायला येत असत. त्यांच्यासोबतच गपगुमान त्या घरी निघून जात असत.
तेंव्हा खूप बंधनं होती, आणि त्यावेळी लोकं सुद्धा अगदी धडाची नव्हती. त्यामुळे, सहसा घरातील महिलांना कोणी कामाला पाठवायला धजावत नसत.
तेंव्हा.. मी एका खाजगी कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला होतो.
तिथे.. साधारण, तीसेक एक लोकं कामाला होती. आणि विशेष म्हणजे, त्याकाळी त्या कंपनी मधील कोणत्याच व्यक्तीने विमा पोलिसी काढली नव्हती. अगदी मी सुद्धा नाही.
आता.. एवढे कामाला कर्मचारी आहेत म्हंटल्यावर, इथे आपल्याला भरपूर विमा पोलिसी मिळतील. या आशेने, एक महिला विमा एजंट आमच्या कंपनीत आली.
आणि, सुरवातीला नेमकी ती मलाच भेटली.
तिने मला सांगितलं, मी विमा एजंट आहे. तुमच्या कंपनीतून मला काही विमा पोलिसी मिळतील का..? मी त्यांना म्हणालो, तुम्ही एक काम करा. आमच्या मेनेजर साहेबांना भेटा, त्यांच्या मर्जीशिवाय इथे कोणतच पान हालत नाही.
आणि त्या महिलेला मी आमच्या मेनेजरची केबिन दाखवली.
बाई दिसायला अगदी खास असल्याने, मेनेजरने.. सुरवातीला त्या बाईंना कंपनी मधील कामगारांच्या एकदम पाच विमा पोलिसी मिळवून दिल्या. त्यामुळे ती बाई भलतीच खुश झाली.
आणि, त्यानंतर दर महिन्याला आमच्या कंपनीत तिची हमखास चक्कर होऊ लागली.
दोन पाच महिन्यांनी.. आमच्या मेनेजरने तिला अचानक पोलिसी देण्याचं बंद केलं. तिला बिचारीला काही समजेना. नेमकं काय झालय..?
एके दिवशी ती महिला कंपनी मध्ये आली. आणि, मला म्हणाली.. मेनेजर साहेब आहेत का..?
मी म्हणालो.. आहेत ना, त्यांच्या केबिनमध्ये बसले आहेत.
ती महिला, त्यांच्या केबिनमध्ये गेली. आणि त्यानंतर त्या मेनेजरने फोन करून मला सुद्धा केबिनमध्ये बोलावून घेतलं. मला म्हणाले, बस रे तू इथे..!
ती महिला त्यांना म्हणाली.. साहेब माझी काही चूक झाली आहे का..? मला आता तुम्ही विमा पोलिसी देत नाहीयेत. माझं काही चुकलं असेल तर सांगा..!
त्यावर आमचा मेनेजर त्या बाईंना म्हणाला..
बाई.. तुम्ही " सर्विस " नीट देत नाही हो..!
अशी, आमच्या कामगारांची तक्रार आहे बरं का. माझं काहीच म्हणनं नाहीये.
ती.. सर्व्हिस नीट देत नाहीये, म्हणजे मी नेमकं काय करू ते मला समजलं नाही..!
तो.. काय आहे माहिती का, सर्व्हिस अशी द्यायची ना, कि कस्टमर फेल झालच नाही पाहिजे.
ती.. म्हणजे मी नेमकं काय करू.?
तो.. तुम्ही फक्त सर्व्हिस नीट द्या हो, मी तुम्हाला भरपूर कस्टमर देईल.
ती.. अहो पण नेमकं काय करू ते तरी मला सांगा ना, मला काहीच समजत नाहीये.
ती बाई सुद्धा खूप भोळी होती. हा नालायक माणूस काय म्हणत आहे. ते तिला समजतच नव्हतं.
" सर्व्हिस " या शब्दाचा तिला अर्थच समजत नव्हता. शेवटी, सहन न झाल्याने वैतागून मी त्या ठिकाणाहून माझ्या केबिनमध्ये निघून गेलो.
त्यानंतर, काही वेळाने ती बाई सुद्धा केबिनच्या बाहेर आली. माझ्या केबिनमध्ये येऊन मला भेटली. आणि म्हणाली..
ते साहेब काय म्हणत आहेत, ते बिलकुल समजत नाहीये हो मला..!
मी त्या बाईंना म्हणालो..
मेडम, तुम्ही इतक्या भोळ्या कशा काय..? तुम्हाला माणसं ओळखता येत नाहीत का..? आणि नसतील येत, तर तुम्ही या क्षेत्रात काम तरी कशाला करताय..?
ती म्हणाली.. मला काहीच समजत नाहीये हो.
मी म्हणालो.. तुम्ही एक काम करा, घरी गेल्यावर तुमच्या मिस्टरांना वरील घटना सांगा. ते काय म्हणतायेत ते पाहा. आणि मला तसा फोन करा. हे ऐकून मान डोलवत ती बिचारी, मला हो म्हणून निघून गेली.
चार पाच दिवसांनी.. मला तिचा फोन आला,
म्हणाली.. मी माझ्या मिस्टरांना वरील प्रकार सांगितला. तर त्यांनी, रागारागात माझ्या मुस्कटात एक झापड लगावली. त्यामुळे, मी तीनचार दिवस आजारीच होते. आज थोडं बरं वाटतंय, म्हणून तुम्हाला फोन केला.
मी म्हणालो, मग.. तुम्हाला काही उलघडा झाला कि नाही..?
ती म्हणाली, नाही हो..!
शेवटी मीच त्या बाईला म्हणालो..
अहो..तुम्ही, ज्याला व्यवसाय म्हणताय ना. त्याला काही लोकं धंदा सुद्धा म्हणतात.
आणि, व्यवसायवाली बाई असं कोणी म्हणत नाही. डायरेक्ट, धंदेवाईक बाई असं लोकं म्हणून जातात. " धंदेवाली " या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे कि नाही..?
वासनांध व्यक्तींना, फक्त बाई हवी असते. मग ती कोणत्याही क्षेत्रात काम करत असो. फक्त एक भोगविलासी वस्तू म्हणून ते तिच्याकडे पाहत असतात. बाकी, व्यवसाय वगैरे त्यांना काही समजत नसतो. आमचा मेनेजर तुम्हाला उगाचच विमा पोलिसी देत होता का. त्यापाठीमागे त्याचा सुद्धा काही स्वार्थ असेल कि नाही..?
माझं बोलणं संपल्यावर, त्या महिलेने पुढे एकही शब्द न बोलता फोन ठेऊन दिला. आणि, त्यानंतर पुन्हा कधीही ती आमच्या कंपनीत विमा पोलिसी काढण्यासाठी आली नाही. आणि, कालांतराने मी सुद्धा ते काम सोडून दिलं.
आत्ताच पाचेक वर्षापूर्वी, आमचा तो मेनेजर, अगदी हालहाल होऊन मेला. त्याच्या दोन्ही मुली पळून गेल्या. बायकोने सुद्धा त्याला सोडून दिला होता. एकटाच मेला, शेवटी काय आहे.
" कर्म तशी फळं. "

Wednesday, 11 October 2017

आमच्या येथील एका हॉटेलमध्ये, माझ्या मुलाचा एक मित्र. व्हेजिटेरियन डिश पार्सल घेण्यासाठी गेला होता. सगळं मेनूकार्ड पाहून झाल्यावर, त्याला..
" पनीर टिक्का " हि भाजी आवडली..!
त्या मुलाच्या घरामध्ये.. कोणी, जास्तीचं तिखट खात नाही. त्यामुळे, ऑर्डर देताना, त्याने ऑर्डर घेणाऱ्या व्यक्तीला तशी सूचना सुद्धा केली होती.
" लेस स्पाईसी " हं..!
भाजी तयार झाली, मुलाचा मित्र ती घरी घेऊन गेला. जेवणाला सुरवात झाली. आणि, त्या भाजीचा घास तोंडात घातल्या बरोबर. त्यांच्या घरातील प्रत्येकाच्या तोंडातून जाळ आणि धूर निघाला.
भाजी भलतीच तिखट झाली होती. त्यामुळे, घरातले सगळे परेशान झाले.
शेवटी वैतागून, त्याची आई त्याला ओरडली. आणि म्हणाली,
" एवढी तिखट भाजी तुला कोणी आणायला सांगितली होती..! "
शेवटी, त्या मुलाला त्याची चूक ध्यानात आली.
त्याने इंग्रजीत " लेस स्पाईसी " असं सांगितलं होतं. पण ऑर्डर घेणाऱ्या व्यक्तीने, ते..चुकून,
" लई स्पाईसी " असं ऐकलं होतं..!

Tuesday, 10 October 2017

घरचं झालं थोडं, आणि व्याह्याने धाडलं घोडं.. या उक्तीप्रमाणे, एक शैक्षणिक मनोरंजन म्हणून. मी माझा काही वेळ फक्त फेसबुक या माध्यमासाठी देत होतो. पण यावर्षी, काही गोष्टींची देवाणघेवाण करण्यासाठी. शेवटी मला, व्हाट्सएप सुद्धा डाऊनलोड करावंच लागलं. त्यानंतर.. हे माध्यम सुद्धा, मला घट्ट चिटकून बसलं.
नाही म्हणता.. इथे सुद्धा, काही चांगल्या आणि विनोदी साहित्या सोबतच. सुंदर-सुंदर व्हिडीओ क्लिप्स सुद्धा मला पाहायला मिळू लागल्या. आणि त्याचबरोबर, नको तसले पांचट विनोद किंवा लाईव्ह अपघात, खून करतानाच्या लाईव्ह घटना सुद्धा पाहायला मिळू लागल्या.
एकतर, मी फार कमजोर दिलाचा माणूस आहे. असलं काही वाईट साईट माझ्याच्याने बिलकुल पाहवत नाही.
पण आलेल्या क्लिप्स डाऊनलोड केल्याशिवाय, समोरच्या व्यक्तीने आपल्याला नेमकं काय पाठवलं आहे.? ते समजत नाही. हा एक फार मोठा ताप होता. त्यामुळे, अशा क्लिप्स पाठवणाऱ्या ठराविक मित्रांना मी हात जोडून विनंती करायचो. कि.. कृपा करून मला अशा प्रकारच्या व्हिडियो क्लिप्स पाठवत जाऊ नका.
हा एक विषय झाला, त्यानंतर.. काही मित्र, मला अशा क्लिप्स सुद्धा पाठवायचे.
ज्यामध्ये, काही तरुण मुलंमुली आपली शारीरिक भूक भागवण्यासाठी. लपूनछपून कुठेतरी शेतात, किंवा आडबाजूला कामक्रीडा करत आहेत. असे गुपचूप टिपलेले क्षण, तर काहीवेळा.. त्या कामातुर प्रेमी युगुलाला, रंगेहात पकडून. त्यांच्याकडून बळजबरीने नको त्या गोष्टी करवून घेणाऱ्या. किंवा.. त्या प्रेमी मुला मुलीला बेदम मारहाण करणे. अशा क्लिप्स सुद्धा मला पाहायला मिळाल्या.
हा निर्लज्जपणाचा कळस पाहून, खरोखर माझ्या मस्तकाची शीर उठायची.
अरे.. साधी गोष्ट आहे, त्यांना पटलं त्यांनी केलं. ते सगळं काही, त्यांच्या एकमेकांच्या संमतीने चालू असतं ना. त्यात तुम्हाला आम्हाला नाक कोणी खुपसायला सांगितलं आहे..?
त्या मुलाला बेदम मारतील काय, आणि.. त्या मुलीचे धिंडवडे काय उडवतील.
चूक झाली आहे, तर त्यांना समज द्या, आणि सोडून द्या. तुम्ही कायदा कशाला हातात घेताय..?
विदेशात, खुलेआम आणि अगदी सार्वजनिक ठिकाणी सुद्धा अशा गोष्टी सर्रास घडत असतात. पण तिथे, त्याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नसतं. एक गंमत म्हणून तो सीन पाहून, ती लोकं पुढे निघून जात असतात. तर मग आपल्या इथेच लोकांना काय धाड भरली आहे..?
आपल्या इथे, ओपन सेक्स करणं हे सभ्यपणाचं लक्षण मानलं जात नाही. किंवा कायद्याने आपल्याला तशी परवानगी दिली नाहीये.
तर मग.. रस्त्यावर उभं राहून, खुलेआम लघुशंका आणि शौच करण्याची कायद्याने आपल्याला परवानगी दिली आहे का..?
लाज वाटायला पाहिजे, आम्हाला मिळालं नाही. म्हणून त्याला किंवा तिला मारण्यात कोणती मोठी मर्दुमकी आहे..?
अरे.. थू आहे असल्या नामर्दपणावर..!

#एक_मराठा_लाख_मराठा. हि घोषणा देणाऱ्या, सर्व शिवप्रेमींनी सुद्धा इथे लक्ष द्या.
दोनेक वर्षांपूर्वी, सर्व शिवभक्तांना मी एक जाहीर आवाहन केलं होतं. 
कि, शिरवळ येथील महामार्गालगत असणारी शिवकालीन दगडी पाणपोई शेवटच्या घटका मोजत आहे. त्या पुरातण दगडी पाणपोईची फार मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. शिरवळ मधील स्थानिक कार्यकर्ते, त्या दगडी पाणपोईला टेकवून आपापल्या वाढदिवसाचे मोठमोठाले कापडी बॅनर लावत असतात. परंतु, शिवकालीन वारसा असणाऱ्या त्या पाणपोईच्या डागडुजीसाठी कोणत्याच शिवभक्तांनी किंवा स्थानिक नागरिकांनी आजवर प्रयत्न केले नाहीत. याचं मला मनोमन वाईट वाटतं.
सरकारच्या नाकर्तेपणामुळे, आज ती शिवकालीन दगडी पाणपोई शेवटच्या घटका मोजत आहे. असं म्हंटल तर ते वावगं ठरू नये.
काल.. योगायोगाने, मी कराडला जात असताना. वाटेमध्ये, श्रीराम वडेवाले यांच्या हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी आम्ही थांबलो होतो. त्यावेळी, शेजारील मोकळ्या जागेत,
#श्री_शिवप्रतिष्ठान_हिंदुस्थान_शिरवळ. या ग्रुपने लावलेला खालील बेनर मला दिसला.
शिरवळ मधील सर्व शिव भक्तांचा हा संकल्प पाहून. मला मनोमन त्यांचा खूप हेवा वाटला. आणि माझी छाती अगदी अभिमामाने फुलून आली. माझ्या राजांना, रायगडावर पुन्हा एकदा त्या सुवर्ण सिंहासनावर विराजमान झालेलं आम्हाला पाहायला मिळणार. या जाणीवेने मी खूपच सुखावलो.
आणि, त्याच सोबत समोरील बाजूस असलेल्या त्या जीर्ण पाणपोईची दुरावस्था पाहून नाही म्हणता मनोमन दुःखी सुद्धा झालो. ती पाणपोई, आजही आहे त्याच भग्नअवस्थेत आहे.
तर, त्या शिरवळकर ग्रुपला आणि माझ्या तमाम शिवभक्तांना माझं एकच हात जोडून सांगणं आहे.
मित्रांनो.. त्या शिवकालीन पाणपोईच्या जीर्णोद्धार करण्याची काहीतरी व्यवस्था करा. तिची डागडुजी करून, तीथे पाणपोई म्हणून एखादा वॉटर प्युरीफायर बसवून घ्या. महाराजांची आठवण म्हणून, येनाजाणारे यात्री क्षणभर का होईना, तिथे थांबून पाण्याचे दोन अमृतमयी घोट नक्कीच प्राशन करतील. आणि, या न त्या कारणाने सर्व शिवभक्तांना महाराजांचे आशीर्वाद सुद्धा लाभतील. मित्रांनो.. या कामासाठी जास्तीचा खर्च येणार नाहीये. शिवाय.. या पुण्य कामासाठी, तुम्हाला भरपूर प्रायोजक सुद्धा नक्कीच मिळतील. एकदा हे काम तुम्ही हाती तरी घ्या.
आणि हि पाणपोई त्यांनी आपल्या रयतेसाठीच सुरु केली होती.
तुम्ही, सर्वप्रथम हा छोटासा उपक्रम हाती घ्या. त्यानंतर, रायगडावर बत्तीस मण सोन्याचं सिंहासन विराजमान होण्यासाठी लाखो शिवभक्त आपला आपल्या कष्टाचा पैसा, या शुभ कार्यासाठी नक्की आणून देतील. याची मला मनोमन खात्री वाटते.
नाहीतर, दुर्लक्ष केल्यास हि शिवकालीन पाणपोई योजना धारातीर्थी पडायला वेळ लागणार नाही. जुना शिवकालीन वारसा जतन करा, नाहीतर.. आठ पदरी रस्त्याच्या नावाखाली. हि पवित्र स्मृती, कधी एकदा आपल्या नजरेआड जाईल. याचा तुम्हा आम्हाला तपास सुद्धा लागणार नाही.
जय भवानी, जय शिवराय..!!
( सर्व शिवभक्तांना एक नम्र विंनती, हि पोस्ट फेसबुक आणि व्हाटसएप वर जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून, हे काम कोणत्याही परिस्थितीत फत्ते झालच पाहिजे. )