Tuesday, 10 October 2017

वीसेक वर्षांपूर्वी..
आमच्या रोजच्या बैठकीतल्या एका मित्राचा अपघाती मृत्यू झाला होता. बिचारा, काही कामानिमित्त घराबाहेर पडला. आणि एका अपघातात अगदी जागेवरच गतप्राण झाला होता. काहीच हालचाल करता आली नाही. भल्यामोठ्या ट्रकच्या चाकाखाली त्याचं डोकं आलं होतं. फारच भयानक प्रसंग होता तो. अपघात घडल्या नंतर, काही अपरिचित व्यक्तींनी. त्याचं निश्चल शरीर, पोस्ट मोर्टेम साठी इस्पितळात नेलं होतं.
अगदी काही वेळातच, कळेल तसं आम्ही सगळे मित्रमंडळी त्या इस्पितळात दाखल झालो.
पण..आम्ही करणार तरी काय होतो..?
फक्त.. त्याच्या जुन्या आठवणी काढणे, आणि त्यावर चर्चा करणे. एवढंच काय ते शिल्लक असतं.
बराच वेळ इस्पितळात थांबून, आम्ही सुद्धा फार कंटाळलो होतो. रात्रीचे नऊ वाजून गेले होते. मित्राचे सगळे नातलग सुद्धा जिकडे तिकडे झाले होते. आता, उरलेले सगळे सोपस्कार उद्याच पार पडणार होते. फक्त आम्ही मित्रच काय ते तिथे शिल्लक होतो.
शेवटी म्हणतात ना, कोणावाचून कोणाचं काहीच अडत नसतं. जीवनाचं हे रहाटगाडगं एकट्यानेच रेटायचं असतं. त्यावेळी आपल्या सोबत कोणीच नसतं.
जन पळभर म्हणतील हाय-हाय, मी जाता राहील कार्य काय..?
या जुन्या उक्तीप्रमाणे.. आम्ही सगळे अगदी शोकसागरात बुडालेलो होतो. आणि अशावेळी, दुखः विसरण्यासाठी सर्वांना हमखास वारुणीची आठवण येत असते. त्यामुळे, तो प्रसंग विसरता यावा. शेवटी कोण कोणाच्या आयुष्याला पुरलं आहे हो..?
काही वेळातच, एकमेकांना खुणवा खुणवी करून.. आम्ही चार पाच जन तेथून बाहेर पडलो.
आज फक्त एकाच गोष्टीचं दुखः वाटत होतं. कि आज, आम्ही चार पाच जन आमच्या त्या मित्राला डेड हाउस मध्ये सोडून, एकटेच " बसायला " निघून गेलो होतो.
काय करणार, वेळ परत तर येत नाही ना. आजही आम्हाला तो प्रसंग आठवला, तर माझ्या आणि आम्हा सर्व मित्रांच्या अंगावर अगदी काटा येतो.
रात्रीचे साडेनऊ वाजले होते.. थकलं भागलं शरीर घेऊन आम्ही मित्र बियरबार मध्ये बसलो होतो. सर्व मित्रांनी, आपापला हवा तो ब्रांड मागवला. मद्याचे ग्लास भरले गेले, आता सगळे जन मद्य सागरात बुडाले होते. ग्लासवर ग्लास रिचवले जात होते. मनातील भीती नष्ट होऊन सगळ्यांच्या अंगात आता थोडी तरतरी आली होती. सगळ्यांचे मेंदू गुंग झाले होते.
त्यामुळे.. आमच्या मनात फक्त दुखद भावना होत्या, पण दुखः मात्र थोडं हलकं झालं होतं. त्याबाबतीत, वारुणीचा हात कोणीच धरू शकणार नाही.
सगळ्या मित्रांचे साधारण दोन-दोन पेग झाले होते. आणि तितक्यात, भावनिक होत एक मित्र म्हणाला..
आयला.. आज, आपल्यासोबत दिल्या नाहीये राव..!
नाहीतर, त्याला सोडून आपण एकट्याने अशी कधीच पार्टीच केली नाही. आज खूप वाईट वाटतंय राव मला. असं म्हणून, तो भावनिकदृष्ट्या थोडा कमजोर झाला.
नाही म्हणता, दारू पिल्यावर आपल्या मनात काही प्रमाणात दुखः थोडं जास्तीच उचंबळून येत असतं. आणि, हीच खरी त्या वारुणीची कशिश आहे.
त्या मित्राच्या तोंडून हे वाक्य सरतं न सरतं, तोच.. अचानकपणे, त्या बियर बारच्या खिडकीतून एक कावळा ओरडल्याचा आम्हाला आवाज आला. पाहतो तर काय, तिथे फक्त कावळा ओरडत नव्हता. तर.. चक्क, त्या बारच्या उघड्या खिडकीत तो येऊन बसला होता. आणि, तिरकी मान करून चक्क आमच्याकडे पाहत होतो. कोणाच्या मनी ध्यानी नाही, पण मी मात्र फार मोठ्या विचारात बुडालो.
इतक्या रात्री, येवढ्या गजबजलेल्या ठिकाणी कावळा आलाच कसा..?
आम्हा सगळ्या मित्रांच्या डोक्यात अक्काबाई असल्याने. या विषयावर, कोणी जास्तीचा जोर दिला नाही. आणि, गमतीने आमचा एक मित्र म्हणाला.
आयला.. बहुतेक दिल्या आला वाटतं..!
असं म्हणून, आमच्यातील एका मित्राने एका ग्लासात, दारूचा एक पेग आणि चिकनचा एक पीस घेऊन खिडकीत त्या कावळ्या पाशी गेला.
तो पेग, आणि चिकनचा एक तुकडा त्याच्या समोर ठेवला. हे सगळं घडत असताना एक फार मोठं आश्चर्य म्हणजे, कावळ्या सारखा चतुर प्राणी माणसाला घाबरून जागचा हलला सुद्धा नाही. आमचा मित्र.. तो ग्लास आणि चिकनचा तुकडा ठेऊन माघारी फिरला.
आणि, अहो आश्चर्यम..!
त्या कावळ्याने, चक्क त्या दारूच्या ग्लासात आपली चोच बुडवली. आणि, चिकनचा तो तुकडा चोचीत घेऊन काव-काव करत तो उडून गेला.
बापरे.. हा प्रसंग पाहून, आम्हा मित्राचं अक्षरशः वेड पळून गेलं होतं. डोक्यातील नशा थिजून गेली होती. अक्षरशः आम्हा सर्वांचे धाबे दणाणले होते. कारण, असं काही घडेल याची आम्हाला सुतरा कल्पन नव्हती.
आता तुम्हीच सांगा.. असं कधी होऊ शकतं का..? किंवा तुमच्या सोबत असं कधी घडलं आहे का..? मानो, या ना मानो.. परंतु हि अगदी सत्य घटना आहे..!
आणि, आपली पितरं सुद्धा आपल्याकडे जेवायला येतात. हे सुद्धा तितकच खरं आहे.

No comments:

Post a Comment