Tuesday, 10 October 2017

सुधीरच्या बायकोला..
एका मुलाच्या बाईकवर बसून जाताना पाहून. गणेशच्या अंगाची अगदी लाही लाही झाली होती. तो तडक सुधीरच्या घरी आला. सुधीर घरातच बसला होता.
घरात आल्याबरोबर, अगदी रागारागातच तो सुधीरला म्हणाला..
अरे.. तू इथे बसून काय करतोयेस..? वहिनी, तुझ्या शेजारच्या त्या जावेदच्या बाईकवर बसून निघाल्या होत्या. आणि, बाईकवर त्यांच्या बसण्याची पद्धत तर मला बिलकुल आवडली नाही. नुसता बघत काय बसलायेस..? तुला काही समजतंय कि नाही..?
त्यावर.. छद्मीपणे हसत, सुधीर गणेशला म्हणाला,
हो.. माहिती सुद्धा आहे, आणि मला सगळं काही समजत सुद्धा आहे..!
मग.. तू हे वेड्याचं सोंग का म्हणून घेतलं आहेस..?
काय करू..?
माझ्या बायकोला काही सगळं गाव ओळखत नाही. आज चुकून तुला ती दिसली म्हणून. नसती दिसली तर काय केलं असतस..? मारून टाकू का तिला..?
आमची मुलगी आता लग्नाला आलीय, मुलगा शेवटच्या वर्षाला आहे, आता नव्याने भांडणं करून संसाराला काडी लाऊन घेऊ का..? समाजात छी थू करून घेऊ का..?
तिला समजत नाहीये, म्हणून मी सुद्धा तिच्यापाठोपाठ मूर्ख होऊ का..?
हे सगळं ऐकून.. गणेश अगदी सुन्न झाला होता..!
पण त्याला बिलकुल राहवत नव्हतं. तो सुधीरला म्हणाला. आपण दोघे उद्या वहिनींच्या घरी जाणार आहोत. त्यांच्या आई वडिलांना मी सगळं काही सांगून टाकणार आहे. हे मला बिलकुल सहन झालं नाहीये. हरामखोरा.. तू हंडगा तरी नाहीयेस ना..?
उद्या कशाला.. चल ना, आत्ताच चल. माझी सासरवाडी सुद्धा जास्ती लांब नाहीये. तुला जे काही करायचं आहे, ते करून टाक.
गणेश अगदी सुन्न झाला होता.. तो सुधीरच्या निर्विकार चेहेऱ्याकडे एकटक पहात होता. सुधीरचा थंडपणा पाहून, त्याला अगदी खाऊ कि गिळू असं झालं होतं.
बाईकला किक मारली गेली..
सुधीरच्या नारायण पेठेतील सासुरवाडीत गाडी येऊन थांबली. दोन जिने चढत, सुधीर आणि गणेश त्या घराच्या दारात उभे राहिले. डोअर बेल वाजवली गेली..
दरवाजात नेमक्या कमल वहीनीच उभ्या होत्या. वहिनींना तिथे पाहून गणेश अगदी सैरभैर झाला होता. आणि, सुधीरची तर अगदी बोलतीच बंद झाली. अचानकपणे जावई घरी आल्याने. म्हातारे सासू सासरे अगदी अचंबित झाले होते. कमल वहिनींना सुद्धा प्रश्न पडला, आज हे इकडे कसे काय आले आहेत.? नक्कीच काहीतरी गडबड झाली असणार आहे.
सासरे म्हणाले.. या ना सुधीरराव, आज अचानकपणे कसं काय येणं केलत..? आणि गणेशराव, तुम्ही सुद्धा बऱ्याच वर्षांनी आलात. या ना, आत या.
ते दोघे घरात गेले, सुधीर त्याच्या सासऱ्यांना काहीतरी बोलणार. इतक्यात, सुधीरला थांबवत.. मधेच गणेश म्हणाला,
काका.. वहिनी सुद्धा इथे असतील, असं मला मुळीच वाटलं नव्हतं. पण आज मला एका गोष्टीचा सोक्षमोक्ष लाऊन टाकायचाय. मला तुमच्याशी तुमच्या मुलीविषयी काही बोलायचं आहे. गणेशच्या या वाक्यावर ते दोघे म्हातारा म्हातारी काहीसे दचकले.
नाही म्हणता, सुधीर सुद्धा खूप घाबरला होता. आता नेमका काय विषय घडणार आहे, या विचाराने तो थोडा चिंतीत सुद्धा झाला. कमल वहिनी मात्र अगदी बिनधास्त दिसत होत्या..
काका म्हणाले.. बोला ना काय झालं..!
कमल वहिनीकडे पाहत, गणेश म्हणाला.. काही नाही, आज एक एप्रिल आहे ना. तुमची थोडी गंमत करावी म्हंटलं.
आणि.. एवढं बोलून, गणेश जोरजोरात हसू लागला..
वहिनी चेहेऱ्यावर अगदी आश्चर्याचे भाव आणत, सुधीरला म्हणाल्या..
गणेश भाऊजी काय म्हतायेत रे हे, असली कसली गंमत. नेमकं काय झालंय ते सांगा पाहू मला..?
सुधीर म्हणाला.. अगं मी सुद्धा त्याला तेच सांगत होतो. विनाकारण ती लोकं घाबरतील. असल्या गमजा काही कामाच्या नाहीत. हे ऐकून,
पुन्हा एकदा, गणेश आणि सुधीर जोरजोरात हसू लागले. म्हातारा म्हातारी, सुद्धा त्या दोघांच्या हशामध्ये सामील झाले.
वहिनी म्हणाल्या.. गणेश भाऊजी, खरोखर मी खूप घाबरले होते हो. पुन्हा अशी मस्करी करत जाऊ नका बरं का..!
गणेशने.. एकवेळ, सुधीरकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात, त्याला फार मोठी याचकता दिसत होती. सुधीरचा हा बुळगेपणा पाहून, गणेश खूप संतापला होता. आपण कशासाठी आलो होतो. आणि इथे काय घडत आहे. हे पाहून त्याला मनोमन खूप दुखः झालं होतं. परंतु जे झालं ते चांगल्या करिताच झालं होतं. विनाकारण, म्हातारा म्हातारीला नसता त्रास झाला असता.
विषय निवळला होता, कमल वहिनी आता निर्भीडपणे सुधीरच्या डोळ्यात डोळे मिसळून पाहत होत्या. काहीही न घडल्या प्रमाणे. अगदी, निर्ढावलेल्या चोराप्रमाणे..!
तितक्यात, विषयाला वळण देत सुधीर म्हणाला.. मामी, अहो जावयाचं तोंड गोड करताय कि नाही. चार वाजत आले आहेत. काही चहा वगैरे ठेवताय कि नाही. गणेशला काहीच कळेनासं झालं होतं. पुढे काही बोलावं, तर आपल्यालाच वेड्यात काढतील. याची त्याला पुरेपूर जाणीव झाली होती.
गणेश अगदी सुन्न होऊन सुधीरकडे पाहत होता. त्याच्या कोडगेपणाला, मनातल्या मनात धुत्कारत होता.
अपूर्ण,

No comments:

Post a Comment