Tuesday, 10 October 2017

#कुलू_मनाली_२००८ ( भाग :- ५ )
=========================
अपघाताच्या काही ठळक आठवणी.
त्यावेळी आमच्या सोबत प्रशिक्षण वर्गाला असणारा एक मित्र, जो खालील फोटोत निळा शर्ट घालून, एका मोठ्या शिळेसमोर दोघे उभे आहेत. आमच्या पुणे मनपा मध्ये, तो मुकादम म्हणून कामाला होता. त्या सुमारास, मोबाईलच्या किमती खूप महाग होत्या. माझ्याकडे तर, त्यावेळी. रिलायन्स ग्रुपचा आगदी साधा मोबाईल होता. फक्त बोलचाल करण्यासाठी त्याचा वापर व्हायचा. आणि, सहलीदरम्यान फोटो शूट करण्यासाठी माझ्या मेहुण्याकडे असणारा, डिजिटल केमेरा मी माझ्या सोबत घेऊन गेलो होतो.
तर.. या मित्राने, त्यावेळी खास ट्रीपला जाण्यासाठी म्हणून एक नवीन चायना मोबाईल खरेदी केला होता. त्यावेळी, इतर मोबाईल महाग असल्याने. चायना मोबाईलचं फार मोठं फ्याड होतं.
कारण, स्वस्तात मस्त, असे..त्यामध्ये बरेच फंक्शन होते.
पण.. तो मोबाईल फोन, फोटो काढायला खूप वेळ घ्यायचा.
टू, टू, टू, टू... असा आवाज करत, पाचेक सेकंदाने तो फोटो टिपायचा. पण त्यावेळी सुद्धा आम्हा मध्यमवर्गीय लोकांमध्ये या मोबाईलला सुद्धा फार मोठी मान्यता होती.
चलता है.. वक्त वक्त कि बात है.
तर.. या अपघात दरम्यान, आमचे चार मित्र जीवानिशी गेले. आणि काही अपंग होऊन जीवन व्यतीत करत आहेत. दुर्दैवाने.. त्यापैकी एक, मी सुद्धा आहे. परंतु, या अपघातात माझ्या या मित्राला फार मोठी दुखापत झाली.
माकड हाडाच्या आसपास असणारा, त्याचा मज्जारज्जूच तुटला गेला होता. आणि त्यामुळे, हा मित्र दोन्ही पायांनी कायमचा अपंग झाला. शेवटी.. मेडिकल अनफिट म्हणून, नाईलाजाने त्याच्या बायकोला कामावर घेण्यात आलं. असं, माझ्या ऐकिवात आहे.
नऊ वर्ष झाली, त्याला भेटायला जाऊ जाऊ म्हणून आजवर मी काही त्याला भेटायला गेलो नाही. आता नक्की वेळ काढतो. आणि त्याला एकदा भेटूनच येतो. जिंदगी इतकी साधी आणि सोपी नाहीये. कधी काय होईल. काहीच सांगता येत नाही.
एवढ्या मोठ्या अपघातातून आम्ही सुखरूप बचावून आलो होतो. अर्थात आम्ही फारच नाशिवान ठरलो. पण इथे आल्यावर, आमच्यापैकी वाचून आलेल्या एका मित्राने गळफास लाऊन आपल्या जीवनाची यात्रा संपवली. त्याच्यासोबत काय घडलं ते देवच जाणो. पण इथे आल्यावर अवघ्या वर्षभरातच त्याने हे नको ते अघोरी कृत्य केलं.
त्या सहलीमध्ये.. आमच्यासोबत, जगताप या आडनावाच्या दोन व्यक्ती होत्या. एक ड्रायव्हर होते आणि दुसरे पाणीपुरवठा विभागात कामाला होते.
पाणीपुरवठा विभागात कामाला असणारे जगताप. फार मोठे साईभक्त होते. ते ज्या भागात राहायला होते, तेथील भागात ते " बाबा " म्हणूनच प्रसिद्ध होते. त्यांचा स्वतःचा असा फार मोठा भक्तवर्ग होता. त्यांचे काही भक्त त्यांना या सहलीला जाऊ देत नव्हते. कदाचित त्या भक्तांना या भागातील इत्यंभूत माहिती असावी. पण सोबत कामाला असलेल्या आडनाव बंधूच्या आग्रहामुळे ते बाबा सहलीला आले. आणि या अपघातात, त्यांना मृत्यूने कवटाळले.
हा सदमा, आमच्या जगताप ड्रायव्हरला काही सहन झाला नाही. या अपघातात, जगताप ड्रायव्हरला सुद्धा छातीला जबरदस्त मार लागला होता. कुलू वरून आल्यावर आम्ही दोघे रुबी हॉलमध्ये एडमिट असताना, जगताप माझ्यापाशी येऊन खूप रडायचा. आणि, मला म्हणायचा..
जगताप बाबा सहलीला नव्हते येत राव, मीच त्यांना चला चला म्हणून मागे लागलो. आता मी, त्यांच्या घरच्यांना काय तोंड दाखवू. त्यांच्या ऐवजी, देवाने मला वर नेलं असतं तर लय बरं झालं असतं..!
असं म्हणून... तो त्याचा शोक व्यक्त करायचा.
पण मी त्याला खूप धीर द्यायचो,
अरे.. हे सगळं विधिलिखित असतं म्हणून सांगायचो. पण तो काही ऐकायचा नाही. नंतर नंतर मी त्याला भेटणं टाळू लागलो. तो माझ्याकडे येऊ लागला. कि मी लगेच झोप आल्याचं सोंग घ्यायचो. त्याचं दुखः पाहून, आणि ऐकून नाही म्हणता मला सुद्धा फार भीती वाटायची. त्यानंतर, आठेक दिवसांनी आम्हाला दवाखान्यातून रजा मिळाली.
त्यानंतर जवळपास.. दोन महिने मला सक्तीची विश्रांती घ्यावी लागली.
यानंतर.. चार पाच वर्षांनी, पुण्यात सिक्स सीटर गाडीने कुठेतरी जात असताना. जगतापच्या बायकोचा एक छोटासा अपघात झाला. खरं तर, वहिनींना जास्तीचा मार लागला नव्हता. पण, बायकोचा अपघात झाला आहे, असं समजताच. त्या कमजोर दिलाच्या जगतापला.. जागेवरच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आणि त्यातच त्याचा शेवट झाला. फारच कमी वयात, एका होतकरू मित्राची एग्झीट झाली होती. शेवटी, अपघातात झालेली दुखापत आणि तो सदमा त्याचा जीव घेऊनच राहिली.
काही व्यक्ती, नको त्या गोष्टीचा जास्ती विचार आणि बाऊ करत असतात. ते नाहक दुखः जीवाला लाऊन घेत असतात. आणि मग, सरतेशेवटी आपल्याला या अशा नको त्या घटना पाहायला मिळतात.
त्याकरिता.. उद्याचा विचार करत बसू नये. आपला आज कसा व्यवस्थितपणे जाईल. याकडे, सर्वांनी लक्ष देणं फार महत्वाचं आहे. कारण, जीवन हे अगदी क्षणभंगुर आहे. त्याला.. आणखीन कमी करून घेण्यात काय हाशील आहे..?
क्रमशः
👍

No comments:

Post a Comment