Tuesday, 10 October 2017

आम्हा पुणेकरांना, मुंबई तशी नवीच..
कसले, कसले.. मोठाले कठडे असणारे फ्लायओव्हर ओलांडून आम्ही पुढे निघालो होतो. मित्राने, लालबागच्या राजाची माहिती विचारण्यासाठी, एका बाइकस्वार मुलाला आवाज दिला. त्याने सुद्धा, चालू गाडीवरच अगदी उत्स्फूर्तपणे सगळी यथोचित माहिती दिली. आणि भर्रकन तो पुढे निघून गेला. मुंबई मधील मराठी माणूस, पुन्हा एकदा मदतीला धावून आला.
पाहता, पाहता.. लालबागच्या गणपती उत्सवाच्या मेळ्यात आम्ही येऊन पोहोचलो. सर्वात पहिला आणि मोठा प्रश्न, गाडी पार्क कुठे करायची..? सगळीकडे हाउसफुल्ल..
त्या भल्यामोठ्या अक्राळविक्राळ ब्रिजच्या बाजूला, एक जागा आम्हाला मोकळी होताना दिसली. एक बंद पडलेली कार, काही टुकार मुलं तिला तेथून ढकलून चालू करण्याच्या प्रयत्नात होते. ती मुलं कार ढकलत पुढे निघाली, आणि.. त्या मोकळ्या झालेल्या जागी आम्ही गाडी पार्क करणार, तितक्यात विजेच्या चपळाईने एका मुंबईकराने त्याची कार तिथे पार्क केली. नशिबाने आयती मिळालेली जागा हातची निघून गेली. तिथेच बाजूला, पुलाखाली एक पोलीस व्हेन सुद्धा पार्क केली होती. आम्ही सुद्धा आमची गाडी तिच्या शेजारी चिकटवली. तितक्यात, तिथे एक पोटसुळा पोलीस आला. थोडं दरडावूनच त्यांनी आम्हाला तेथून गाडी काढायला लावली. रस्त्याच्या दुतर्फा, चारचाकी गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. तिथे उभा असणाऱ्या एका स्थानिक मुलाला, गाडी पार्किंग कुठे करावी..? अशी विचारणा केली. त्याने बाजूला असणाऱ्या एका गल्लीकडे हात केला. आणि म्हणाला.. आतमध्ये बरीच जागा आहे, तिथे लाऊन टाका. त्या गल्लीच्या तोंडाला, काही टुकार मुलं थांबून होती. मला वाटलं, गाडी आत नेताना आम्हाला ते हटकतील. पण तसं काहीएक घडलं नाही. बहुतेक, माझ्या हनुवटी वरील मुसलमानी दाढी योग्य ते काम करून गेली असावी.
त्या मोकळ्या जागेत, एक मोठी सोसायटी होती. तिथे भरपूर मोकळी जागा सुद्धा होती. तिथे आम्ही गाडी पार्क केली. मगाशी धक्का मारून चालू न झालेली कार सुद्धा आता तिथेच आली. आणि, आमच्या कारच्या पुढे ती गाडी सुद्धा निवांत विसावली. पहिला प्रश्न सुटला होता. आणि मोठ्या आनंदाने आम्ही तेथून बाहेर पडलो.
बाहेर ज्या ठिकाणी पोलिसाने आम्हाला गाडी लावण्यास प्रतिबंध केला होता. त्याच ठिकाणी, एक कार पार्क झाली होती. आणि तेच पोलीस महाशय, आणि त्याच्या सोबत असणारी एक महिला पोलीस त्या गाडीच्या चाकाला जामर लावत होते. या गुन्ह्याची हमखास पावती होती होणार होती. आम्ही सुद्धा, ती पावती अगदी आनंदाने फाडली असती. पण असो..
लालबाग पुलाच्या दुतर्फा, रिमझिम पडलेल्या पावसात. मनुष्य नावाच्या प्राण्यांच्या गर्दीचा चिखल झाला होता. आबालवृद्ध लोकांची भलतीच दाटी झाली होती. अगदी मुंगी पावलाने गर्दी पुढे सरकत होती. त्यात मध्ये मध्ये दुचाक्या टीव टीव करत होत्या. चालता-चालता, अंगातून घामाच्या धारा कधी व्हाऊ लागल्या ते सुद्धा आम्हाला समजलं नाही. मुंबईने आपला खेळ दाखवायला सुरवात केली होती.
हे सगळं का कमी, म्हणून.. तरुण वयातीली काही खोडसाळ मुलं. मोठमोठ्याने भोंगे वाजवून, वातावरण किर्रर्र करत होते. तर मधेच काही मुलं, एकमेकांच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवत मानवी रेलगाडी बनवून.. " गणपती बाप्पा मोरया " च्या आरोळ्या देत. लोकांना धक्काबुक्की करून पुढे निघून जात होते. काही तरुण मुली, रस्त्यावर विकत मिळणाऱ्या.. आवळा, चिंच आणि कसलेसे आंबट जिन्नस चट्टा पट्टा आवाज काढत तोंडात कोंबत होत्या. एकमेकांना आवरत सावरत, आम्ही मुख्य दर्शनाच्या रांगेपर्यंत येऊन पोहोचलो. माझ्या मित्राच्या ओळखीतले एक पोलीस मित्र आमची वाट पाहत तिथे उभे होते. त्यांच्या पोलीस व्हेन खाली, आमची पादत्राणे आम्ही काढून ठेवली.
आणि, राजाच्या दर्शनाला निघालो.
दर्शनाला जात असताना, वाटेत.. उंचापुरा, भारदस्त आणि डोक्याला रुमाल बांधलेला ड्रम मास्टर, शिवमनी आम्हाला दिसला. त्याला बाय करत, पुढे दर्शन रांगेत आम्ही सामील झालो. पंधरा मिनिटाची अथक धक्काबुक्की सहन करत, आम्ही लालबागच्या राजापाशी येऊन पोहोचलो. यावर्षी.. राजाच्या पाठीमागे, कासवाची अगदी मनमोहक अशी आरास केली होती. ती अगदी उठून दिसत होती. दरवर्षी.. राजाच्या मूर्तीत किंचित सुद्धा फरक पडत नाही. लालबागच्या राजाला, संतोष कांबळी जरी साकारत असतील. तरीही, मूर्तिकार खातू यांची पुन्हा एकदा प्रकर्षाने आठवण झाली. दुरूनच मनोभावे राजाच्या पाया पडलो. राजा सुद्धा सर्व भक्तांवर आशीर्वादाची उधळण करत होता. उभ्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत जगभरातून आलेल्या सर्व भाविकांची दर्शनाची तहान भागवत होता.
ते पोलीस मित्र, आम्हाला पुढे नेऊन दर्शन देण्याच्या तयारीत होते. पण भल्या मोठ्या गर्दीपुढे, ते सगळं आम्हाला नकोसं वाटत होतं.
पावसाने आणि घामाने चिंबलेलं शरीर घेऊन आम्ही त्या गर्दीतून बाहेर पडलो. एका शरबती ठेल्यावर थंड.? पेप्सीचा आस्वाद घेतला. तिथे सुद्धा एक मुलगा, त्याच्या मित्राला.. तुझ्या मानलेल्या बहिणीशी माझी ओळख करून दे ना.! अशी गळ घालत होता. ती मुलगी सुद्धा कमालीची रूपवती होती. देवाला आल्यावर सुद्धा, मुंबईकर मुलं एकही संधी सोडत नसतात. हे पुन्हा एकदा पाहण्यात आलं. गर्दीचा कंटाळा आला होता, काही ठिकाणी अंधाराचा फायदा घेत, काही व्यक्ती कोपरा पाहून लघुशंका करून मोकळे होत होते. तर नव्याने व्यसनं शिकणारी मुलं, त्याच अंधारात उभे राहून मुताचा घाणेरडा वास सहन करत सिगारेटच्या धुराचे लोट हवेत सोडत होते. एखाद किमी अंतर, गर्दी आणि गोंगाट तुडवत आम्ही आमच्या गाडीपाशी येऊन पोहोचलो. गाडी सुद्धा अगदी सुखरूप होती. मगाशी त्या गल्लीच्या समोर उभी असणारी टुकार मुलं. तिथे नव्याने येणाऱ्या गाड्यांना, काही पैसे घेऊन गाड्या पार्क करून देत होते, बहुतेक त्यांची गणपती विसर्जनाची तयारी ( सोय ) चालू असावी.
रात्री दीड वाजता, आम्ही मुंबईला रामराम केला. आणि, पाहटे साडेचार वाजता रामप्रहरी आम्ही पुण्यात सुखरूप येऊन दाखल झालो.

No comments:

Post a Comment