Tuesday, 10 October 2017

स्टीलच्या ताटामध्ये केळीचं पान, केळीच्या पानावर पंचपक्वान..
जेवणाच्या ताटात, एकूण भाज्या नऊ. आता आपण त्यांचा समाचार घेऊ.
जाड जाड गवारीच्या शेंगांची भाजी, तळलेल्या वांग्याच्या चकत्यांची चमचमीत भाजी, तुरीच्या डाळीची वरणाची वाटी, मोठ्या भेंड्याची पातळसर भाजी, सोयाबीन भाताची तडका भाजी, कॉर्न सुपचा देशी तडका, सांबर, रस्सम सोबत आंबट सालीचा रस्सा..
सोबतच,
दह्याची वाटी आणि मेतकूटाचा घाट, लोणच्याच्या आंबटा सोबत देशी तुपाचा थाट. पुरी चपाती आणि भाता सोबत, बास्केट पापडाचा शुभ्र कुरकुरीत घास..
चला तर मग, आता.. आपण जेवायला सुरवात करूयात.
मर्यादित पुरी आणि चपाती सोबत सगळ्या भाज्यांचा खुसखुशीत समाचार घ्यावा.
त्यानंतर, अमर्याद अशा वाफाळलेल्या भातावर भरपूर मेतकूट पसरवून त्यावर साजूक तुपाच्या हव्या तेवढ्या धारा घालून. एकवेळ मस्तपैकी आपल्या कोमल हाताने तो भात हळुवार कुस्करून घ्यावा.
आणि मग, त्याच्या स्वर्गीय चवीचा एक एक घास आपल्या मुखामध्ये घालावा. सोबत चवीला, लोणचं आणि मलाईदार दह्याचा चमचा चाखावा. मधेच एखादा कुरकुरीत पापड दाढेखाली दाबावा.
तिरुमला मध्ये, जेवणाच्या बाबतीत स्वर्गीय सुख ज्याला म्हणतात, ते हेच..!
करतो तर मग, सुरवात. 
~~~~~~~~~~~~~~~~~~
वेंकट रमना गोविंदा, गोविंदा...!!


No comments:

Post a Comment