Tuesday, 10 October 2017

#कुलू_मनाली_२००८ ( भाग :- २ )
=========================
पहाटेचा गार वारा, अंगाला चांगलाच झोंबत होता. झोपेमध्ये उबदार ब्ल्यांकेटच्या बाहेर चुकून जरी पाय आला. कि... ते, थंडगार वातावरण चांगलच जाणवायचं. मग तो पाय पुन्हा ब्ल्यांकेटच्या आत घ्यायचा. आणि पुन्हा एकदा, अंगाची वळकटी करून गुलाबी स्वप्नात रममाण व्हायचं. मनालीच्या, बर्फाळलेल्या पर्वतराजी मधील, हा आमचा शेवटचा मुक्काम होता. उद्या सकाळी, आवराआवर करून आम्हाला दिल्लीकडे रवाना व्हायचं होतं.
पुणे मनपा च्या, कामगार प्रशिक्षण वर्गाची सहल जवळ-जवळ संपल्यात जमा होती.
अमृतसर, चंडीगड, सिमला, कुलू, मनाली, रोहतांग पास फिरून झालं होतं. आणि, आता शेवटचं ठिकाण दिलवालोंकी " दिल्ली " आमची वाट पाहत होतं.
सकाळी लवकरच उठून, अंघोळ उरकून, आमच्या ब्यागा आवरून आम्ही हॉटेलच्या बाहेर येऊन थांबलो. जमाखर्चाचे सगळे हिशोब आटोपले, सरदारजी आणि त्याचा क्लीनर गाडीपाशी तयारच होते. पन्नास सिटर लग्झरी बस मधून, मनाली ते दिल्ली अशा प्रवासाला आमची सुरवात झाली.
सकाळचे साडेदहा वाजले होते. मनाली ते दिल्ली, हे अंतर एकूण ५७० किलोमीटर होतं. आणि, संध्याकाळपर्यंत आम्हाला दिल्लीमध्ये पोहोचायचं होतं. त्या दिवशीच, रात्री बारा वाजेपर्यंत आम्ही दिल्लीमध्ये पोहोचू असा अंदाज होता.
मनालीच्या बर्फाळलेल्या पर्वत रांगा पाहत एकदाचा आमचा प्रवास सुरु झाला. बसमध्ये, सुखकर्ता दुखहर्ता चे सूर घुमू लागलें. नंतर विडीयो वर, "हंगामा" हा हिंदी चित्रपट लावण्यात आला. प्रवास सुरु होऊन, साधारण एक तास झाला असावा. कुलू हे गाव अंदाजे पाच सहा किलोमीटरच्या अंतरावर राहिलं होतं.
एकतर, भयानक असे अरुंद रस्ते. आणि, समोरून येणाऱ्या गाड्यांच्या सुसाट ओवर टेकिंगच्या मस्तीमुळे, आमच्या मोटार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. समोरून येणाऱ्या गाडीला रस्ता देण्याकरिता त्याने गाडीचं पुढील एक चाक रस्त्याच्या खाली उतरवलं. तेथील रस्त्या कडेच्या मातीमध्ये बिलकुल दम नव्हता. आमच्या बसचं चाक, जसं त्या रस्त्या खालील मातीवर उतरलं. तशी, आमची बस. ग्यालरीच्या कट्यावर ठेवलेल्या, सिगरेटच्या पाकिटाला टिचकी मारून फेकून द्यावं. तशा पद्धतीने, दरीमध्ये धाड...धाड करीत, गडगडत, दरीमधील झाडं तोडत दीडशे फुट खोल दरीत जाऊन कोसळली. मी स्वतः, ड्रायवरच्या केबिन मध्ये बसलो असल्यामुळे, समोर घडत असलेला हा सगळा " हंगामा " मी उघड्या डोळ्याने पहात होतो.
बस दरीमध्ये कोसळत असताना, माझे डोळे पूर्णपणे मिटले गेले होते. मी माझ्या जगण्याचा विषयच सोडून दिला होता. आणि, बेधडक मृत्यूला सामोरा गेलो होतो. बंद डोळ्यासमोर काळोख आणि त्या किर्रर्र काळोखात फक्त गोल गोल वलयं मला दिसत होती.
धाड..धाड..धाड, आणि नंतर पूर्ण भयाण शांतात..!
त्यानंतर काय झालं ? ते मला सुद्धा आठवत नाही. मी बेशुद्ध होतो ? कि, मृत्यूच दरवाजा ठोठावून परत मागे फिरलो होतो ? ते सुद्धा समजलं नाही. मला जेंव्हा जाग आली, तेंव्हा पाहिलं तर. आमची बस एका भल्यामोठ्या झाडला तिरकी टेकून तिची दोन चाकं हवेत आणि दोन जमिनीवर अशा अवस्थेत अडकून पडली होती. आमची बस, ज्या झाडाला टेकून उभी होती. ते, त्या दरी मार्गामधील भलं मोठं असं शेवटचंच झाड होतं. मला जाग आली तेंव्हा, आमची पूर्ण बस रिकामी होती. त्यात कोणी सुद्धा दिसत नव्हतं. दरीच्या खालच्या बाजूस, बर्फाच्या गारेगार पाण्याच्या नदीचा खळखळता प्रवाह दिसत होता. मनात विचारांची घालमेल सुरु झाली होती. त्या झाडाला, जर हि बस अडकून थांबली नसती तर...?
थेट, त्या नदीमध्येच आम्हा सर्वांना जलसमाधी मिळाली असती..!
मी, कसा बसा बसच्या बाहेर आलो. बाहेर सगळीकडे आरडा ओरड चालू होती. विव्हळन्या, किंचाळण्याचे मोठमोठ्याने आवाज येत होते. खूप भयंकर प्रकार घडला असणार आहे. हे समजायला, मला वेळ लागला नाही. मी त्या अवाजांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. समोरची भयंकर परिस्थिती पाहून, धसका घेऊन, माझ्या जीवाचं बरं वाईट होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे, मी थोडासा भानावर आलो. आणि, मला जाणवलं कि, माझ्या डोळ्यात काही तरी ओघळतय..
हो.. रक्तच होतं ते. कपाळाच्या थोडंसं वर, डाव्या बाजूचा माझ्या डोक्याचा काही भाग, फाटून बाहेर येऊन खालील बाजूस लोंबत होता. नंतर मी पाहिलं तर..
माझी प्यांट, शर्ट, शूज.. सगळं काही रक्ताने माखलं होतं.
शेवटी मनाची तयारी केली, कारण ह्या जंगलामध्ये लवकर मदत मिळेल असं मला तरी वाटत नव्हतं. डोक्यातून रक्तस्राव वाढतच होता. तशा अवस्थेत, मी ती दरी चढायला सुरवात केली. दुपारी बाराची वेळ, उन्हाचा भयंकर चटका जाणवत होता. रुमालाने, जखम दाबून धरावी. याची सुद्धा, मला शुध्द राहिली नव्हती. मी माझ्याच धूनकित चाललो होतो. पूर्ण जगाचा मला विसर पडला होता.
हा.. 'जीव' वाचवायची संधी मला हातून घालवायची नव्हती.
तितक्यात, एक सहकारी मित्र माझ्या समोर आला. सुदैवाने, त्याला काहीच इजा झाली नव्हती. त्याने आपल्या खिशातील रुमाल काढला, आणि तो माझ्या डोक्यावरील जखमेवर दाबला. खरं तर, त्याने चाचपणीच केली होती. कि, माझ्या डोक्याला पूर्ण भोक वगैरे पडलय कि काय ? कारण, मी अगदी धुनकीमधेच आणि एकटाच चालत निघालो होतो. त्यामुळे त्या मित्राला तसा भास झाला होता. परंतु, सुदैवाने तसं काहीही झालं नव्हतं. मात्र, मला झालेली जखम खूपच खोल होती. फक्त, माझ्या डोक्याची कवटी फुटायचीच काय ते बाकी राहिली होती.
त्या तपासे नावाच्या मित्राने, मला थोडा धीर दिला. आणि, मला सावकाशपणे दरीतून वर जायला सांगितलं.
क्रमशः


No comments:

Post a Comment