Tuesday, 10 October 2017

लहान.. मुला, मुलींचं लैंगिक शोषण..!
खरं तर, आज डॉटर्स डे आहे, परंतु.. नाईलाजास्तव, नाही म्हणता मला हे सगळं काही लिहावं लागतंय. माणुसकीला, काळिमा फासणारा असा हा एक भयंकर प्रकार आहे.
वासनांध झालेल्या पुरुषांकडून अशा नालायक चुका हमखास घडून जातात. खरं तर, याला चूक म्हणण्यात काहीही अर्थ नाहीये. तसं पाहायला गेलं तर, हा एक फार मोठा घोर, क्रूर आणि निंदनीय असा अपराध आहे.
मला चांगलं आठवतंय..
मी इयत्ता नववी मध्ये असताना, आमच्या एक वर्गशिक्षिका सर्व मुला मुलींना एका विषयावर काही गोष्टी समजावून सांगत होत्या. तेंव्हा, त्या असं म्हणाल्या होत्या.
कि.. तुमच्या घरात आजच्या वयातील मुलामुलींनी.
म्हणजे भाऊ बहिणीने सुद्धा, रात्री झोपताना.. एकत्र, शेजारी झोपणं चांगली गोष्ट नाहीये.
तुम्ही आता मोठे आणि जाणते झाले आहात. लहान राहिला नाहीयेत..!
त्या बाईंना नेमकं काय सांगायचं होतं ते मला माहित नाही.
पण.. हे सगळं ऐकून, खरं तर माझ्या मस्तकाची शीर उठली होती. माझ्या मनात फार मोठा राग उफाळून आला होता. त्या बाईंना मला शिव्या द्याव्याश्या वाटत होत्या.
शेवटी काय आहे, जाणत्या वयातील मुलांना बहिण भावाचं नातं सुद्धा समजणार नाही का..?
परंतु, लहान तोंडी मोठा घास कसा घ्यावा..?
असं म्हणून, मी त्यावेळी माझ्या मनाचा कोंडमारा करून घेतला होता.
कारण, त्याकाळी जवळपास सगळीच कुटुंबं सिंगल रुममध्ये आपलं बिर्हाड थाटायचे. त्यामुळे, बहिण भावाने वेगवेगळं झोपावं. आणि आई वडिलांनी वेगळं झोपावं. असा काही विषय नव्हता. त्याकाळी सगळीकडे रूमची मारामारी, आमच्या बापाने मोठ्या हिकमतीने मिळवलेल्या त्या छोट्याशा दहा बाय बाराच्या रूम मध्येचे काय ते, आम्हाला राहायचं होतं.
आमच्या बाईंनी सांगितलेला विषय, माझ्या मनातून काही केल्या जात नव्हता.
आणि अवघ्या वर्षभरातच.. मला एक नको ती घृणास्पद बातमी ऐकायला मिळाली. मी राहत असलेल्या आसपासच्या भागातील, एका उच्च कुटुंबात एक भयंकर प्रकार घडला होता.
आई वडिलांना एकांत मिळावा. म्हणून, ते दोघे बेडरूममध्ये झोपत होते. आणि ते दोघे बहिणभाऊ, बाहेरील हॉलमध्ये एकत्र झोपत होते. ते दोघेही, साधारण नववी, दहावीच्या वयातील मुलं होती.
आणि त्या कोवळ्या वयात शेवटी घडू नये तेच घडलं.
सक्ख्या भावापासून.. त्या बहिणीला, गर्भधारणा झाली..!
वरील प्रकार घडल्यानंतर, अब्रू वाचवण्यासाठी त्या कुटुंबाने त्यांचं राहतं घर सोडून. ते कुठेतरी दुसरीकडे राहायला निघून गेले. ते पुन्हा कोणाला न दिसण्यासाठीच.
काय करणार, हा विषय काही साधासुधा नव्हता. ते निघून गेल्यावर पुढे काय घडलं..? ते मात्र आम्हाला कधीच समजलं नाही. आणि आम्ही सुद्धा त्याचा कधीही पाठपुरावा केला नाही.
लहान मुलींचं लैंगिक शोषण होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या व्यक्ती. या, प्रामुख्याने आपल्याच घरातील असतात. हे फार मोठं दुर्दैव आहे. आणि हे सगळं, फार मोठ्या निष्कर्षाप्रत अपना सर्वांसमोर आलं सुद्धा आहे. आपल्या घराशेजारी राहणाऱ्या ओळखीतल्या किंवा अनोळखी व्यक्ती. घरातीत..भाऊ, मामा, काका, वडील, आजोबा अशा कित्तेक जवळच्या म्हणवणाऱ्या नातवाईकांकडून असे निंदनीय अपराध आजवर घडले आहेत.
आठ दहा वर्षांपूर्वी.. मी राहात असणाऱ्या ठिकाणी.. एका सहा वर्षाच्या मुलाला. शाळेतून तुला घेण्यासाठी मला पाठवलं आहे. असं सांगून, त्या अनोळखी मुलाने त्या लहान मुलाला खाऊ देण्याचं आमिष दाखवून. माळरानात आडबाजूला नेऊन, त्या लहान मुलाकडून मुखमैथुन करून घेतलं. आणि, कार्यभाग उरकल्यावर त्या मुलाला माळरानात एकटच सोडून तो अपराधी मुलगा फरार झाला होता. इकडे त्या मुलाची आई त्याला शाळेत शोधतेय, पण तिचा मुलगा काही गवसत नव्हता. शेवटी तो पिडीत लहान मुलगा. घाबरलेल्या अवस्थेत, रडत रडत हमरस्त्यावर आला.
एका व्यक्तीने, शाळेतील गणवेशात असणाऱ्या त्या मुलाला पाहिलं. आणि आपल्या सोबत त्याला घेऊन त्याला त्याच्या शाळेत आणून सोडलं.
ते लहान मुल इतकं अजाण होतं. कि घरी आल्यावर, त्याच्या आई वडिलांनी त्याला विचारलं. तू कुठे गेला होतास..? तुझ्यासोबत नेमकं काय झालं होतं..?
त्या मुलाने त्याच्या सोबत जे काही घडलं होतं. ते सगळं काही त्याच्या आईवडिलांना सांगून टाकलं. कारण त्याला, त्या गोष्टीची बिलकुल समजच नव्हती ना. पण त्याला कोणत्या व्यक्तीने नेलं होतं, ते बाकी त्याला काही सांगता आलं नाही. त्यावेळी, त्याच्या आईवडिलांनी फार मोठा धसका घेतला होता. खरं सांगायला गेलं तर, हा प्रकार माझ्यासाठी अगदी नवीन होता. मुली तर मुली, पण काही लोकं मुलांना सुद्धा सोडत नाहीत. हा म्हणजे, क्रूरपणाचा अगदी कळसच झाला.
अशा कित्तेक नाजूक आणि घरगुती गोष्टी फक्त लाजेपायी, आणि समाजाला घाबरून कधीही बाहेर पडल्या नाहीत. आणि त्यामुळेच, अशा कित्तेक अजाणत्या नाजूक कळ्या, अवेळीच कुस्करल्या गेल्या.
नव्वदच्या सुमारास.. तेंव्हा एका साप्ताहिकात, एक बातमी छापून आली होती. त्या प्रकरणात, एका बापानेच आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते.
आणि शेवटी, या विषयाला वाचा फुटल्यावर. निर्लज्जपणे तो व्यक्ती म्हणाला होता..
" पोर माझी, फळे ताजी "
हे वाचून तर, माझ्या तळपायाची आग अगदी मस्तकात गेली होती. अशा क्रूरकरम्यांना डायरेक्ट फाशीच दिली पाहिजे हो.
आजकाल.. शाळेमधून थोड्या जाणत्या झालेल्या लहान मुलींना सुद्धा, थोड्याफार प्रमाणात जमेल तितकं जुजबी लैंगिक शिक्षण दिलं जातं. किंवा, त्या विषयाची त्यांना नकळत जान करून दिली जाते.
कि.. अनोळखी मुलांशी किंवा पुरुषांशी जास्ती लगट करू नका.
जुनी घडलेली काही उदाहरणं समोर ठेऊन, घरातील कर्त्या पुरुष मंडळींशी किंवा आपल्या आप्तां मधील थोर मोठ्या मुलांशी नातेवाइकांशी थोडं सांभाळून वागा. असं त्यांना शिकवलं जात असतं. हि शिकवण म्हणजे खरोखर काळाची गरज आहे. पण आता, त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात सुधारणा होणं गरजेचं आहे. सर्व मुलामुलींना, अगदी प्रॉपर लैंगिक शिक्षण दिलं गेलं पाहिजे. आपल्याकडे सगळं काही अर्धवट ज्ञान असतं. पण, त्यामुळे होतंय काय.
हे सगळं शिकवत असताना. त्या कोवळ्या जीवाला नेमकं हेच समजत नाही. कि आपण आता नेमका कोणावर विश्वास ठेवावा, आणि कोणावर नाही..?
कारण, त्यांची बुद्धी तेवढी प्रगल्भ नसते ना. आणि याचा व्हायचा तसाच परिणाम होतो.
आजवर, कित्तेक व्यक्तींना तो अनुभायला सुद्धा मिळाला असेल..!
लहान मुली, आपल्या नात्यातल्या किंवा ओळखीतल्या पुरुष मंडळी पासून अगदी दबकून आणि अंग चोरून राहात असतात. त्यांच्या विषयी तिच्या मनामध्ये एक अनाहूत भीती दडलेली असते. खरं सांगतो, काही हरामखोर नराधमांमुळे, समस्त पुरुषवर्ग बदनाम झाला आहे.
आणि पर्यायाने, तो.. आपल्या मुली, नाती, भाच्या, पुतण्या, आप्तेष्टांच्या मुली, मुलं यांच्या प्रेमाला खऱ्या अर्थाने मुकला आहे. यामुळे एक अर्थाने, मनातील भावनिक नातं कुठेतरी संपत चाललं आहे.
मध्यंतरी याच विषयवार, प्रारंभ नावाचा मराठी सिनेमा येऊन गेला होता.
त्यामध्ये, पित्याकडून स्वतःच्या मुलीवर झालेले लैंगिक अत्याचार दाखवले गेले होते. त्या निर्मात्याला हे सगळं दाखवून नेमका कोणत्या विषयाचा " प्रारंभ " करायचा होता. ते मात्र मला कधीही समजलं नाही. असे सिनेमे मुलींनी पाहिल्यार, वाढत्या वयातील मुलीच्या मनामध्ये.
आपल्या पित्याविषयी प्रेम उरेल का..?
समज आणि गैरसमज.. यामध्ये, फक्त " गै " या एकमेव शब्दाचं अंतर आहे. त्याकरिता, अशा अपराध करणाऱ्या व्यक्तींची कधीच " गय " केली जाऊ नये. कारण यामुळेच, समस्त पुरुषवर्ग वेठीस धरला जात आहे. अपराधी म्हणून घोषित केला जात आहे. पण, हेच समज आणि गैरसमज मधील एका शब्दाचं अंतर.
कधी-कधी काही नाती टिकवायचा सुद्धा प्रयत्न करतं. नाही म्हणता, कधी-कधी कोणाला पोरकं सुद्धा करून टाकतं. तर कधी, रक्ताच्या नात्याला काळिमा फासायला सुद्धा मागेपुढे पहात नाही.

No comments:

Post a Comment