Thursday, 26 October 2017

यावर्षी.. मला ऑफर येऊन सुद्धा.
मी, माझ्या #कुबेर समूहाचा दिवाळी अंक वगळता. इतर कोणत्याच दिवाळी अंकाला माझे लेख दिले नाहीत. तसा मी काही फार मोठा आणि नामांकित लेखक वगैरे नाहीये. पण माझ्यापुरता तरी मी तसा ठीकठाक आहे. आणि मला ऑफर येतात म्हणजे, माझ्या लिखाणात काहीतर गमक असेलच ना.
शेवटी.. मला ऑफर केलेल्या एका दिवाळी अंकाच्या मालकाने मला विचारलं.
का हो.. तुम्ही अजून लेख पाठवला नाही..?
तर.. मी त्यांना म्हणालो, त्यामध्ये तुम्ही मानधनाचा काही उल्लेखच केला नव्हता हो. सांगा ना, त्या लेखाकरिता मला तुम्ही किती रुपये मानधन देणार आहात..?
तर ते गृहस्थ म्हणाले, नाही.. आम्ही मानधन देऊ शकत नाही.
त्यावर, मी त्यांना म्हणालो.. काहीतरी द्या, मला तुम्ही अगदी एक रुपाया दिला तरी चालेल. कारण, लेखन करणं आणि त्याला विकणं हा माझा व्यवसाय नाहीये. आणि कसं आहे, फुकट दिलेल्या वस्तूची किंवा साहित्याची कोणी जास्तीची कदर करत नाही. हे तुम्ही सुद्धा जाणून असाल.
पण बघा ना.. लोकं किती कोत्या विचारसरणीचे असतात. मी त्यांना फक्त एक रुपाया मागितला होता. तो सुद्धा ते देऊ शकले नाहीते.
जे कि.. दिवाळी अंकात, जाहिराती मिळवून हीच मंडळी वर्षाला लाखो रुपये कमवत असतात. सगळा धंदा करून ठेवलाय या लोकांनी. खरोखर दिवाळी अंक वाचणारे वाचक किती असतील.. हे सांगता येणार नाही. पण दरवर्षी, संपूर्ण भारतवर्षात हजारो दिवाळी अंक प्रकाशित होत असतील.
माझे मित्र श्री Prashant Joshi भाऊ मला म्हणाले. कि आमचे साहेब, म्हणजे, श्री धनंजय मुंडे साहेब, दरवर्षी दहा ते पंधरा लाख रुपयांच्या जाहिराती या दिवाळी अंकांसाठी देत असतात. आणि दरवर्षी माझ्याकडे या दिवाळी अंकांचा अगदी खच पडलेला असतो.
हे दिवाळी अंक म्हणजे, काही व्यक्तीच्या उदरनिर्वाहाचं साधन झालं आहे. असं म्हंटल तर ते वावगं ठरू नये. आपल्या ओळखीचा फायदा उचलत, जाहिराती मिळवायच्या. सोशल मिडीया मधील नवोदित लेखकांकडून फुकटात लेख मिळवायचे. आणि आपली तुंबडी भरायची. हा काही लोकांनी धंदा सुरु केला आहे. तुम्ही तिकडे काहीही करा हो. पण मिळणाऱ्या पैशातून किमान काही रक्कम तरी त्या नवोदित लेखकांना देत चला. त्यांना सुद्धा लेखन करायला हुरूप येईल. अशा व्यक्तींनी थोडा मनाचा मोठेपणा दाखवायला काय हरकत आहे..?
त्यामुळे.. तमाम नवोदित लेखक, कवी, विडंबनकार, चारोळीकार, व्यंगचित्रकार मंडळींना माझं एकच सांगणं आहे. कोणालाही आपलं साहित्य फुकटात देऊ नका. भले त्यामुळे आपल्याला नावलौकिक मिळायला थोडा अवधी लागेल. पण जेंव्हा आपण नावारूपाला येऊ. तेंव्हा, आपल्या भोवती बऱ्याच लोकांचा गराडा असेल. हे माझं सत्यवचन आहे.
धन्यवाद, सर्व मित्रांना दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!

No comments:

Post a Comment