Tuesday, 10 October 2017

फेसबुकवर प्रसिद्धीस येऊन...कोणी, कोणी आणि काय, काय कमावलं..?
या माध्यमाचा वापर कसा करावा, याच्या प्रत्येकाच्या निरनिराळ्या व्याख्या आणि ठोकताळे आहेत. कोणी.. लोकांना मूर्ख बनवून पैसे कमवले. तर कोणी एकमेकांना गंडा घालत. मैत्रीच्या नावाला काळिमा फासला. तर काहींनी करू नये ती कामं सुद्धा केली. ज्याची मी इथे वाच्यता करू इच्छित नाही.
तर कोणी.. भगीरथ प्रयत्न करत, विशिष्ट कार्य हाती घेऊन. चालून आलेल्या संधीचं सोनं सुद्धा केलं.!
मी मात्र.. या माध्यमात येऊन फक्त चांगले मित्र कमावले.
कोणाची कधीही फसवणूक केली नाही. नावारूपाला आल्यावर, स्वतःच्या प्रसिद्धीचा खोटा प्रचार करून कोणाला गंडा घातला नाही. इथे येऊन, मी फक्त माणसं आणि माणसच कमावली.
आणि, जमेल तितकी मैत्री वृद्धींगत केली.
दहा बारा दिवसांपूर्वी, मी सौदागर सिनेमातील ताडी पासून बनणाऱ्या गुळा बाबतची चर्चा इथे घडवून आणली होती. त्यावेळी तो गुळ मला कुठे मिळू शकतो..? याची इत्यंभूत माहिती मला येथील मित्रांकडून मिळाली होती. ती पोस्ट वाचून, उदगीर येथे राहत असणाऱ्या Amit P Mukkawar या मित्राने. मला तो गुळ पोस्टाने पाठवून दिला. इथे येऊन मी हेच कमावलं बघा. धन्यवाद मित्र, या गोड गोड भेट वस्तूसाठी तुमचा मी खूप खूप आभारी आहे.
काल योगायोगाने.. दुपारी दोन वाजता. परतीच्या प्रवासाला असताना, मी रेणीगुंठा स्टेशनवर होतो. सहजच हा गुळ इथे मिळतोय का. ते पाहण्यासठी, मी तेथील मार्केटमध्ये दोनचार दुकानं फिरलो. पण, त्या ठिकाणी सर्वात मोठी अडचण होती, ती म्हणजे भाषेची. कदाचित त्या दुकानदाराला इंग्रजी समजत असेल, म्हणून..
मी त्या दुकानदाराला.. " पाल्म जिगरी " आहे का म्हणून विचारलं. तर, त्याला त्यातील काहीएक समजलं नाही. नंतर, मी त्याला गुळ दे म्हणालो.
तर त्याने, नेहेमीचा उसापासून बनवलेला पिवळा गुळ मला दाखवला.
आता, याला सांगायचा तरी कसं.?
आणि शेवटचा प्रयत्न म्हणून, मी त्याला म्हणालो.
काला गुड है क्या..?
तर एकदम तो म्हणून गेला. " ताडीगुळ " होणा..!
मी त्याला ताबडतोब माझा होकार कळवला. आणि लागलीच त्याने तो गुळ मला आणून दाखवला. उदगीरच्या मित्राने पाठवलेला गुळ आणि या दुकानात असणारा गुळ अगदी सारखा होता. हा गुळ म्हणजे, नारळाच्या करवंट्याच्या आकाराच्या लहान लहान गुळाच्या ढेपा असतात. आणि बहुतेक त्या नारळाच्या करवंट्या मध्येच बनवत असणार आहेत.
हा गुळ, दिसायला थोडासा काळसर किंवा चोकलेटी असतो. आणि चवीला म्हणाल तर खूपच गोड, आणि अगदी चोकलेट सारखा एक विशिष्ट फ्लेवर असतो.
जास्तीचं ओझं नको, म्हणून कालच्याला फक्त दोन किलो गुळ मी तेथून आणला.
आपला साधा उसाच्या रसापासून बनवलेला गुळ साठ रुपये किलो आहे.
आणि, हा ताडीगुळ एकशेवीस रुपये किलो आहे. पण, चवीला अगदी स्वादिष्ट आहे.
नाहीतर, मला पामराला या गुळाची माहिती आणि आस्वाद कोठून मिळाला असता...? 

No comments:

Post a Comment