Friday, 19 May 2017

जुने आणि कमी किमतीतील साधे मोबाईल, अगदी वर्षोनुवर्षे आणि आजही चालू आणि चांगल्या परिस्थितीत आहेत. आजही ते कित्येकांना पूर्वी होती तशीच सेवा पुरवत आहेत.
त्यामानाने.. नवीन, महागडे आणि मोठमोठ्या रॅम आणि जीबी असणारे मोबाईल. अगदी दोनच वर्षात धारातीर्थी पडत आहेत. हा सगळा..
" छोट्या जिवात, भरमसाठ बुद्दीमत्ता भरल्याचा परिणाम. "
आपलं मानव जातीचंही अगदी तसंच आहे. प्रत्येक गोष्ट आपण अगदी वेळेत, मर्यादेत आणि हिशोबात करत गेलो. तर, आपलं सुद्धा आयुर्मान नक्की वाढू शकतं.
अनुमान :- जास्ती लोड घेऊ नका..!
मोठ्या लोकांचं, सगळंच मोठं असतं..!
काय आणि कुठला तो जस्टीन बिबर,
तेवीस वर्षाचं ते कोवळं पोरगं. तुम्हाला खरोखर सांगतो, अगदी त्याच दिवशी मला ह्या पोर्याच्या नावाचा साक्षात्कार झाला. नाहीतर, त्या दिवसापर्यंत हे नाव माझ्या गावी सुद्धा नव्हतं. अशा एक्स्ट्रॉ माहिती बाबतीत, मी बराच मागास माणूस आहे बरं का.
त्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तर.. अगदी त्याचा मोडलेला पाय सांभाळत, कुबड्या घेऊन या इव्हेंटला हजर राहिला होता. ( बहुतेक जबाबदारी असावी. ;) ) बाकी, इतर बरेच लक्ष्मीपुत्र सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून हजर राहिले असतीलच. तो तर त्यांचा स्टेटस फंडा असतो ना.
अशा कार्यक्रमांना, यांना मुद्दाम हजेरी लावावी लागत असते. सचिनच्या मुलीने तर, त्याच्याबरोबर सेल्फी काढल्याचे फोटो सुद्धा वर्तमानपत्रात पहिल्या पानावर झळकले होते. मज्जा असते नाही एकेकाची..
या लाईव्ह शोला, सर्वात मोठं, ७५०००₹ रुपयाचं एक तिकीट होतं. तुम्हाला खरोखर सांगतो, हि सगळी अतिरिक्त पैसा कमावणाऱ्या लोकांची कामं आहेत. आपल्या सारख्या सर्वसाधारण लोकांनी या भागात कधी फिरकू सुद्धा नये. पैसा आला, कि धनवान लोकांना अशा गोष्टी सुचतातच.
यावरून.. मला एक जुनी घटना आठवली.
अचानक धनलाभ झालेला माझा एक मित्र. स्लम एरियात राहत असताना, त्याच्या बायकोला तो सायकलवर डबलसीट घेऊन माझ्या समोरून कित्तेक वेळा तरी गेला असेल.
त्यानंतर अचानक.. तो अतिश्रीमंत झाल्यानंतर, त्याची बायको आता कार शिवाय फिरत नाही. आणि.. किट्टी पार्टी शिवाय खेळत नाही.
त्यांची मुलं तर, आम्हाला अगदी ओळखेनासे झालेत.
" पैसा रे पैसा, तेरा रंग कैसा..? "
खरं तर..हातावरचं पोट असणारे तुम्ही आम्ही लोकं, अशा इव्हेंट अगदी स्वप्नात सुद्धा पाहू शकत नाही. आणि चुकून जर आपण स्वप्नात जरी त्या पाहिल्या तर..
रात्रभरातल्या झोपेत.. किमान दोनचार वेळा तरी दचकून आणि चावळून आपण झोपेतून नक्कीच जागे होऊत. हि अगदी सत्य परिस्थिती आहे. कारण.. आपल्या भारतामध्ये,
पंच्याहत्तर हजार रुपये इतक्या मोठ्या रकमेचं. काही लोकांचं वार्षिक उत्पन्न सुद्धा नाहीये.
तर मग, हा फुकाचा शाहानपना आम्ही का करतोय..?
किती मोठा गवगवा केला, कोठ्यावधी रुपयांचा चुराडा झाला, आणि, सरतेशेवटी बोंबाबोंब झालीच.
हा प्रकार मला काही नवीन नाही, माझ्या माहितीप्रमाणे सगळेच सिंगर लोकं याप्रकारची नकली गायकीची कामं सर्रास करत असतात. नाहीतर, भर चौकात भोकाड काढत बसल्यावर त्यांच्या गळ्याची वाट लागलीच म्हणून समजा. मध्यंतरी, आपल्या विदेशी म्युजिक वाल्या सैराट अजय-अतुल ने सुद्धा सर्वांना, याड लावत भर इव्हेंट मध्ये लोकांना येडं करून सोडलं होतं. काही लोकं तर म्हणाले.. मायकल जॅकसन सुद्धा अगदी असच करायचा. अजून किती दिवस आपण मुर्खात जमा होणार आहोत.?
एवढं सगळं घडतंय. तर, आपल्या घरात बसून युट्युबवर त्यांचे व्हिडिओ पाहा ना..! आम्ही तर तेच करतो बाबा. क्रिकेट सुद्धा, आम्ही फक्त टीव्हीवरच पाहत असतो. हे सगळं करण्याची माझी ऐपत नाहीये अशातला भाग नाही, विनाकारण नको तो मनस्ताप कशाला करून घ्या. आणि, मनातील भडभड व्यक्त करण्याचं याशिवाय दुसरं साधन सुद्धा नाहीये ना..!
नवीन " पुणेरी पाटी "
चितळ्यांच्या दुकानाचा, आणि आम्हा पुणेकरांच्या झोपेचा काडीमात्र संबंध नाही.
दुपारी.. एक ते चार या वेळेत, आम्ही वामकुक्षी करणारच..!
नल्ली निहारी ( न्याहारी )
******************************
निहारी.. आपल्या शुद्ध मराठी भाषेत, न्याहारी.
प्रामुख्याने.. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये बनवला जाणारा हा मांसाहारी पदार्थ आहे. निहारी किंवा न्याहारी या शब्दाची खरी उत्पत्ती, अरबी शब्द " नहार " यापासून झाली आहे. ज्याचा अर्थ, सकाळ किंवा दिवस या शब्दाशी जोडला जातो. जे कि.. सूर्योदय झाल्यावर, आपण सकाळचा नाश्ता करत असतो. त्यालाच, आपण न्याहारी असं म्हणतो. पूर्वी, न्याहारी करून कष्टकरी लोकं शेतात राबण्यासाठी जात असत. पूर्वीची न्याहारी, हि अगदी भरपेट असायची. म्हणजे, एकप्रकारे ते त्यांचं अगदी सकाळचं जेवणच असायचं. तर.. या पदार्थाला, निहारी किंवा न्याहारी हे नाव देण्यामागचं प्रमुख कारण सुद्धा हेच आहे. कि.. हे पकवान, अगदी सकाळी. न्याहारीला खाल्लं जात असतं.
ऐतिहासिक माहितीनुसार.. निहारी या पदार्थाचा उगम, मुघलसाम्राज्याच्या अस्ताच्या वेळी अठराव्या शताब्दीत जुन्या दिल्ली मधील जामा मस्जिद आणि दरियागंज या भागात झाला. अशी भारतीय दस्तावेजात माहिती आढळते.
लखनौचे नवाब, सकाळी लवकर उठून या न्याहारीचा आस्वाद घेत असत. आणि त्यानंतर, भरपूर आराम करून दुपारची नमाज आदा करण्यासाठी ते जात असत. त्यानंतर, राजाच्या या खवैय्या सवयीची माहिती लखनौच्या शाही खानसाम्या मार्फत प्रसिद्ध होऊन, इतर मुस्लीम नवाबांच्या मुदपाकखान्यात आणि आम जनतेत ती पसरली. आणि कालांतराने, हा पदार्थ आम जनतेत सुद्धा बनवला जाऊ लागला.
आणि.. तेंव्हापासून सकाळच्या नाश्त्याच्या रुपात, हा पदार्थ खाण्याची सुरवात झाली. आणि बघता बघता, जनमानसात हा पदार्थ भलताच लोकप्रिय झाला.
बांगलादेश सारख्या भागात, मुख्यता.. ढाका आणि चीटगाव या भागात हा पदार्थ फार पूर्वीपासून लोकप्रिय आहे. काही आचारी लोकं, संपूर्ण रात्र हा पदार्थ बनवण्यात घालवायचे. आणि सकाळी सूर्योदय झाल्यावर, नाश्ता म्हणून या पदार्थाचं सेवन करायचे. पाकिस्तान प्रांतात, या पदार्थाला राष्ट्रीय पदार्थ म्हणून घोषित करण्यात आलं आहे. आजही दिल्लीतील करीम सारख्या हॉटेलमध्ये. रात्रभर बनवलेली नल्ली निहारी, सकाळी नाश्ता म्हणून दर्दी खवय्यांना अगदी प्रेमाने परोसली जाते.
आणखीन एका माहितीच्या आधारे.. निहारी या पक्वानाला, पूर्वीच्या काळात औषध म्हणून सुद्धा खायला दिलं जायचं. सर्दी, खोकला आणि ताप. या आजारात, रुग्णाला हा पदार्थ खायला दिला जायचा.
निहारी हा मुख्यतः, दिल्लीमधील लोकांचा प्रमुख आहार होता. परंतु, भारताची फाळणी झाल्यावर पाकिस्तान एक स्वतंत्र देश म्हणून घोषित करण्यात आला. आणि त्यानंतर, हा पदार्थ बनवणारे मोठमोठे खानसामे, आश्रय शोधत.. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश येथे स्थलांतरीत झाले. ते आचारी लोकं ज्या ज्या ठिकाणी विस्थापित झाले. त्या त्या ठिकाणी, त्यांनी या पदार्थाची ओळख संपूर्ण जगाला करून दिली.
चला तर मग, आज या नवीन पदार्थाची आपण ओळख करून घेऊयात.
मांसाहारी पदार्थात नल्ली निहारी या पक्वानाला एका खास व्यंजनाचा दर्जा दिला गेला आहे. या डिशमध्ये खासकरून, बकऱ्याच्या पुढील पायाच्या नळ्या आणि मांसल भागाचा वापर केला जातो. हि डिश इतकी स्वादिष्ट बनते, कि तोंडात घातल्याबरोबर हे मटन चक्क विरघळू लागतं.
साहित्य :- अर्धा किलो नल्ली मटन, आणि पावशेर मांडीचं मटन. आलं लसून पेस्ट, एक उभा चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथंबीर, एक वाटी तूप आणि तेल, तीस ग्राम गव्हाचं पीठ, एक पाकीट तयार ( रेडीमेड ) निहारी मसाला. लकी, लझीझ, कोहिनूर या कंपन्यांनी तयार केलेले निहारी मसाले फारच स्वादिष्ट आणि स्वस्त सुद्धा आहेत. नाहीतर, यासाठी मसाला तयार करायची फार मोठी वेळखाऊ रेसिपी आहे.
कृती :- गेसवर.. कुकरमध्ये वाटीभर तेल आणि तुपाचं मिश्रण घालावं. त्यात उभा चिरलेला कांदा आणि आले लसून पेस्ट भाजून घ्यावी. त्यानंतर, त्यात वरील नळीच आणि मांसल मटन घालावं. सर्व जिन्नस एकत्र ढवळून घ्यावे. एक वाफ आल्यावर, त्यात तयार सुक्खा निहारी मसाला घालावा, आणि ग्लासभर पाणी घालावं. आणि, हे मिश्रण दहा मिनिटे ढवळून घेत शिजू द्यावं.
दहा मिनिटांनी, या मिश्रणावर मसालेदार तेलाचा तवंग सुटेल. तो तवंग एका वाटीमध्ये काढून घ्यावा. आणि त्या मटणात तांब्याभर पाणी घालून अर्धा तास मंद आचेवर हे मिश्रण शिजवून घ्यावं. या मिश्रणात कोणताही गाढा मसाला नसल्याने. हे मिश्रण अगदी पातळसर होतं. त्यामुळे, या भाजीला घट्टपणा येण्यासाठी. एका वाटीत तीस ग्राम गव्हाचं किंवा डाळीचं पिट घ्यावं. आणि त्या पिठाला पाण्यात पातळसर कालवून घ्यावं. आणि उकळी आलेल्या मटणाच्या भाजीत, या पिठाचं पातळ पाणी घालावं. ( हे पीठ भाजीतील सगळं तेल पिऊन टाकतं. त्यामुळे तर्री वेगळी काढून घ्यावी लागते. ) सर्व मिश्रण एकवेळ चांगलं ढवळून घ्यावं. साधारण पंधरा मिनिटे. हे मिश्रण उकळत ठेवावं. आणि अंगच्या वाफेवर पंधरा मिनिटे वाफवत ठेवून द्यावं. खुमासदार नल्ली निहारी तयार आहे. मटणाच्या नळीमधील मगज खूपच स्वादिष्ट आणि चवदार असतो.
हे पकवान, गरमागरम चपाती बरोबर डिशमध्ये सर्व करताना..
नल्ली निहारी डिशमध्ये वाढून झाल्यावर. त्यात, बाजूला काढून घेतलेली तेला तुपाची तर्री वरून घालावी. आणि चिरलेल्या कोथंबीरीने हि डिश सजवून घ्यावी. त्यामुळे, हा पदार्थ दिसतो सुद्धा खूप सुंदर, आणि चवीला सुद्धा खूप स्वादिष्ट लागतो.
( टीप :- ही डिश स्वस्त आणि मस्त आहे. घरात बनवून पाहायला हरकत नाही. कारण, सर्वच मित्रांना मी जेवणाचं आमंत्रण देऊ शकत नाही. :) )

O शेफ O
~PΔΠDIT PΩTTΣR~ 

Monday, 15 May 2017

फेसबुक हे एक फार मोठं प्रभावी माध्यम आहे.
याचा.. कोणी चांगल्याप्रकारे वापर करत असतो. तर काही लोकांना सवय असतेच. कि, चांगल्या माध्यमाचा वाईट वापर कसा करता येईल. असो, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय झाला.
तर मित्रानो.. इथे वावरताना, आपल्याला पाहायला कोणी नाहीये. असं मुळीच नसतं. इथे कित्तेक फेक खात्यांना, लोकांनी ट्रेस करून उघडं नागडं पाडलं आहे. तरी सुद्धा, काही लोकं आपले प्रताप सोडत नाहीत. खोटी नावं, खोट्या माहित्या, खोटे फोटो ठेवून आपली खाती चालवत असतात. पण या खोट्याच्या नादात. ते कधी एकदा जन्मभराची " खोट " खाऊन बसतात. हे त्यांचं त्यांनाच समजत नाही.
माझ्या वॉलवर, माझी सगळी खरी माहिती मी लिहिलेली आहे. माझा आणि माझ्या कुटुंबाचा खरा फोटो आणि माझ्या कामाची सुद्धा सगळी खरी माहिती मी इथे ठेवली आहे. कारण, एक खोटं बोलल्यावर त्यामागे शंभर खोटी बोलावी लागतात. आणि हे अगदी खरं सुद्धा आहे. ते म्हणतात ना, सच्चेका बोलबाला, और.. झुटेका मुह काला..!
तर, फेसबुवर सगळी खरी माहिती लिहिण्याचा मला एक फायदा झाला. पण, तो फायदा प्रत्यक्ष माझ्यासाठी नव्हता. तर त्यामुळे, चक्क दुसऱ्या व्यक्तीला अप्रत्यक्षपणे असा फायदा झाला होता.
आमच्या पालिकेतील एक साहेब, एकदा कोकणात फिरायला गेले होते. त्याठिकाणी ते एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले असता. चुकून त्यांच्या खिशातील पैशाचं पाकीट खाली पडलं. आणि, ते काही त्यांना समजलं नाही. त्याच वेळी, नेमके माझे एक फेसबुक मित्र Hrishikesh Ramchandra Madal हे सुद्धा कोकणात फिरायला गेले होते. आणि योगायोगाने नेमकं ते पाकीट यांना सापडलं.
त्यांनी.. आजूबाजूला सर्वांना विचारलं, पण ते पाकीट माझं आहे..! असं म्हणणारा, एकही व्यक्ती त्यांना तिथे भेटला नाही. कारण, त्या पाकिटात पाकीट हरवलेल्या व्यक्तीचे सगळे महत्वाचे डॉक्युमेंट होते. चुकून जर कोणी.. हे पाकीट माझं आहे, असं खोटं बोलला असता. तर माझ्या मित्राने त्याला जागेवरच गारद केला असता. शेवटी, पाकिटातील सगळी कार्ड्स चाळत असताना त्यांना आमच्या पुणे महानगर पालिकेचं साहेबांचं ओळखपत्र दिसून आलं. त्यानंतर जास्ती चौकशी न करता तो विषय तिथेच सोडून, ट्रीप संपल्यावर ते पुण्याला निघून आले.
दुसऱ्या दिवशी सकाळीच मला त्यांचा मेसेज आला.. भाऊ तुमचा फोन नंबर द्या. थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. मी सुद्धा त्यांना माझा नंबर दिला, त्यांनी ताबडतोब मला फोन केला. आणि वरील घडलेला प्रसंग सांगितला.
आता खरं सांगायला गेलं तर, आमच्या पालिकेत जवळपास वीस हजार कर्मचारी आहेत. आणि ते पाकीट नेमकं कोणाचं असेल, आणि काय हा फार मोठा प्रश्न होता.
शेवटी मी त्यांना आयकार्ड वरील त्या संभाव्य व्यक्तीचं नाव विचारलं. आणि योगायोगाने, नेमके ते आमच्या विभागातीलच साहेब होते. हा विषय क्लियर झाल्यावर, मी आमच्या साहेबांना फोन लावला. आणि त्या विषयाची उलटतपासणी घेतली.
नमस्कार साहेब, परवा तुम्ही कोकणात फिरायला गेले होते का..? माझ्या या प्रश्नावर साहेब अगदी अवाक झाले, आणि म्हणाले. तुम्हाला कसं माहिती..?
त्यावर, मी अजून एक दुसरा बॉम्ब टाकला. कोकणात तुमचं पाकीट वगैरे हरवलं आहे का..?
आता बाकी आमचे साहेब अगदी सैरभैर झाले. कि या सगळ्या गोष्टी मला कशा माहिती पडल्या.
त्यावर साहेब म्हणाले.. पाकीट हरवलं आहे खरं. पण त्यात पैसे वगैरे काही नव्हते. पण सगळी महत्वाची कागदपत्र त्यात आहेत.
मग मी त्यांना सगळा खुलासा केला. आणि वरील घडलेला प्रसंग सांगितला. त्यावर साहेब खूप खुश झाले. कारण, आयकार्ड, पॅनकार्ड, व्होटर आयडी कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड काढणं काही सोपं काम नाही.
आमचे साहेब असले म्हणून काय झालं.. मी हृषीकेश यांना सांगितलं. मी तुमचा मोबाईल नंबर मी आमच्या साहेबांना दिला आहे. त्यांचा फोन आला, कि तुम्ही त्यांना तुमच्या ऑफिसमध्ये बोलावून घ्या. आणि मगच ते पाकीट त्यांच्या हवाली करा. नाहीतर माझ्या मैत्री प्रेमामुळे, तुम्ही ते पाकीट त्यांना घरपोच सुद्धा करताल.
शेवटी सगळे सोपस्कार पार पडले. आणि साहेबांना त्यांचं पाकीट मिळालं.
हृषीकेश ने चांगलं काम केल्याचं त्यांना समाधान मिळालं. आणि मी फेसबुकवर ठेवलेल्या खऱ्या माहितीचा चांगला उपयोग झाल्याचा सुद्धा पाहायला मिळालं.
तर मित्रांनो.. वेळ काही सांगून येत नसते. कधी कोणत्या मार्गाने चांगल्या गोष्टी घडतील त्याचा नेम नाही. त्यामुळे, नेहेमी खऱ्याची कास धरा. खरं कधीच वाया जात नाही.
माझ्या हनुवटीवरील, ह्या मुसलमानी पद्धतीच्या दाढीचा आज अजून एक प्रताप मला पाहायला मिळाला..
आज.. माझ्या बायकोला बाईकवर डबल सिट घेऊन मी बाहेर निघालो होतो. वाटेत, दोन भाईजान लोकांनी आम्हाला पाहिलं. आणि ते दोघे आम्हाला पाहून कुतूहल मिश्रित गालातल्या गालात हसले. त्यानंतर थोडं पुढं गेल्यावर, पुन्हा दोन भाईजान मित्रांनी आम्हा दोघांना बाईकवरून जाताना पाहिलं. आणि ते दोघे सुद्धा आमच्याकडे कुतूहलाने पाहू लागले.
शेवटी ही मला म्हणालीच..
का हो.. हे भाईजान लोकं आपल्याकडे एवढ्या कुतूहलाने का बरं पाहत असतील..?
घडलेला हा विषय माझ्या लगेच ध्यानात आला होता, म्हणून मी तिला सांगितलं.!
माझ्याकडे पाहून त्या भाईजान लोकांना वाटत होतं,
की..
आपल्या या अनोळखी भाईजानने, मराठ्याची बाई पटवली वाटतं. आणि, तिला घेऊन तो बिनधास्त फिरतोय सुद्धा.

Saturday, 13 May 2017

जसे चोर असतात, तशा चोरणी सुद्धा असतात बरं का...!
 
त्याचा प्रत्यय.. मला मागे एका लग्नात आला. मध्यंतरी माझ्या मित्राच्या मुलाचं लग्न होतं. मंगलाष्टकं सुरु होण्या अगोदर. 
स्टेजवर.. काही प्रतिष्ठित नागरिक आणि स्थानिक नगरसेवक यांना यजमानांकडून आमंत्रित करण्यात आलं होतं. शुभमंगल सावधान झालं. यथासांग सगळा शुभविवाह पार पडला. 
या शुभ कार्यासाठी, आमच्या गावातील स्थानिक नगरसेविका, आणि, शहराच्या माजी महापौर सुद्धा आल्या होत्या. 
एक संस्कार म्हणून, वधुवराला आशीर्वादित करायला स्टेजवर जात असताना. त्या, आपल्या पायातील चप्पल स्टेजच्या खालील बाजूस काढून स्टेजवर गेल्या होत्या. 
आणि, लग्न उरकल्यावर खाली येऊन पाहतात तर काय, त्यांच्या चपलेला कोणीतरी " पाय " दाखवला होता. 
आता, लगीनघाई मध्ये ती चप्पल गडबडीत कोणी घालून गेलं होतं. कि, ती चप्पल खरोखर चोरीला गेली होती..? ते काही समजू शकलं नाही. पण, चप्पल तर जागेवरून नाहीशी झाली होती.

घडलेल्या या प्रकरणामुळे.. लग्नात, सजून धजून न बोलावलेले काही भुरटे चोर आणि चोरणी देखील येत असतात. याचा मला याची देहा अनुभव आला. कारण, लग्नात आलेल्या आप्त व्यक्ती असा प्रकार कधीच करणार नाहीत. हे मला चांगलं ठाऊक आहे.
खरं तर असं व्हायला नको होतं. शेवटी, आमच्या स्थानिक नगरसेविकेला अनवाणीच आपल्या कार पर्यंत जावं लागलं. जाऊदेत, होतं असं कधी कधी.
 
पण खरोखर, त्यांची चप्पल जर चोरीला गेलीच असेल. तर.. हा प्रताप करून, ती चोरणी मात्र खूप खुश झाली असेल. 
कारण, नगरसेविकेच्या पायातील चप्पल काय स्वस्तातील असणार आहे का..? 
आणि त्यात, त्या बाई माजी महापौर सुद्धा होत्या. 
त्यामुळे, या प्रकरणा नंतर त्यांच्या चोर महिलांच्या ग्रुपमध्ये, ती बाई अगदी छाती फुगवून सगळ्या चोरनींना सांगत फिरत असेल. 
मी काही, कोण्या साध्या सुध्या बाईची चप्पल चोरली नाहीये. महापौर बाईची चप्पल चोरली आहे. काय आहे, प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकाची वेगवेगळ्या प्रकारची स्टेटस असतातच नाही का.

लग्नात.. एक गंमत म्हणून, आपल्याकडे नवऱ्या मुलाचा बूट चोरायची पद्धत असते. पण यावेळी बाकी, आमच्या माजी महापौर बाईंना त्यांची चप्पल गमावून हे लग्न साजरं करण्याची आगळी वेगळी मौज हकनाकच स्वीकारावी लागली. आणि, त्यासोबतच.. लग्नसमारंभात स्टेजवर जाताना पायातली चप्पल कधीही काढायची नाही. हा एक नवीन धडा सुद्धा त्यांना मिळाला. 

परंतु.. घडल्या प्रकारामुळे, आमचे यजमान मित्र बाकी खूपच चिंताग्रस्त झाले होते.




(Y)
काही महिला आणि पुरुष, खरोखर कमाल असतात राव..!
एका वेळेला, ते चक्क दोन-दोन जीव खेळवत असतात. असते एखाद्याची आवड, किंवा मजबुरी असते म्हणा. खरं तर, हे ज्याचं त्याचं कौशल्य आहे. आणि त्या बाबतीत माझं काहीएक म्हणनं नाहीये. पण एक गोष्ट आहे.. किमान महिलांसाठी तरी, दोन दगडावर पाय ठेवणे, हि फार मोठी तारेवरची कसरत आहे. बिचारी चुकून त्या तारेवरून ( सापडली ) खाली पडली. कि, तिची विकेट फिक्स असते. पण अनुभवाने, त्या सुद्धा यात पीएचडी करून मोकळ्या झालेल्या असतात.
सापडायचं तर लांबच राहिलं, त्या रंगेहात घावत सुद्धा नाहीत. ;)
खरं सांगायला गेलं तर.. या कामात, आमचे पुरुष मंडळी भलतेच आघाडीवर असतात.
कारण, त्यांना कसली भय ना चिंता. माझ्या या वक्तव्यावर काही महिला नक्कीच चिडतील,
पण बायांनो चिडू नका. आपल्या इथे, फक्त पन्नास टक्के आरक्षण आहे.
दुर्दैवाने.. भारतात तरी स्त्रीला म्हणावी अशी मोकळीक नाही..!
खरं तर अशा गोष्टींपासून मी फार दूर असतो. तरी सुद्धा, माझी लोकप्रियता आणि स्त्रीप्रीयता पाहून. माझी बायको, कधीतरी कान्हाडोळा करून माझ्याकडे पाहत असते. तो तर, बायकांचा स्वभावाच असतो म्हणा. पण.. कर नाही, त्याला डर कशाला..?
परंतु, माझ्या माहितीतील वरील महिलांचे पती आणि त्या पुरुषांच्या बायका सुद्धा,
मनात खळबळ माजल्यावर..
त्यांना.. तिरक्या नजरेने, किंवा संशयाने पाहत असतील का..?
लैच, डेंजर-डेंजर प्रश्न पडतात राव मला..! ;) :)
नाण्याला जशा दोन बाजू असतात...
तशाच आपल्या मनातील विचारांना सुद्धा दोन बाजू असतात. आणि बरेचदा, या दोन बाजू कधी अनेक होतील त्याचा सुद्धा अचूक अंदाज बांधता येत नाही.
आजवर.. हे वृद्धाश्रम वगैरे विषय माझ्या फक्त वाचनातच होते. किंवा फारफार तर, सिनेमात पाहण्यात आले होते. माझा त्या भागात कधी जाण्याचा योग सुद्धा आला नाही. किंवा, अशा पिडीत व्यक्तींना भेटण्याचा सुद्धा योग आला नाही. किंवा, वृद्धाश्रमात असणाऱ्या कोण्या व्यक्तीच्या पाल्ल्याला सुद्धा भेटण्याचा योग आला नव्हता. पण, काल परवा मला तसा योग सुद्धा आला.
माझ्या मित्राने.. एक व्यक्ती मला दाखवला, त्या व्यक्तीने त्याच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवलं होतं. आता खरं सांगायला गेलं तर, अशा केसेस फार अभावानेच पाहायला मिळतात. कारण, आपण लोकांनी अजून तरी माणुसकी सोडली नाहीये.
तर.. कुतूहल म्हणून मला त्या व्यक्तीला भेटायची किंवा त्याच्याशी बोलायची तीव्र इच्छा झाली. आणि, माझ्या मित्राला मी तशा प्रकारचं साकडं सुद्धा घातलं.
माझा मित्र म्हणाला, तुझ्या मनात ज्या काही शंका कुशंका आहेत. त्या तू त्याला बिनधास्तपणे विचारून घे. तो फारच नंगड माणूस आहे. आता, आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारा व्यक्ती काही साधा सुद्धा असणार आहे का..?
शेवटी, माझ्या मित्राने माझी आणि त्या व्यक्तीची भेट घालून दिली. माझा मित्र त्याला म्हणाला, अरे साकेत.. तुला, माझ्या मित्राला काही विचारयाचे आहेत.
तर तो स्वतःच म्हणाला..
कोणत्या विषयावर, आपल्या नेहेमीच्या का..? वृद्धाश्रम..!
माझ्या मित्राने, त्याला मानेनेच आपला होकार कळवला. आणि, तो स्थूल व्यक्ती मला म्हणाला. विचारा हो, काय विचारणार आहात..?
मी त्या व्यक्तीला म्हणालो.. तुमचे आईवडील वृद्धाश्रमात आहेत असं मी माझ्या मित्राकडून ऐकलं आहे. तुम्ही सुद्धा राहायला पुण्यात आहात, आणि तुमचे आईवडील सुद्धा पुण्यातीलच एका वृद्धाश्रमात असतात. तुम्हाला, हे थोडं ऑड वाटत नाही का..?
आजकाल, काही लोकं आईवडील नाहीयेत म्हणून दुखः व्यक्त करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि तुम्ही तर,
त्यावर तो जाडा व्यक्ती.. एकदा जोरदार खळखळून हसला. आणि मला म्हणाला,
कोणीच कोणाच्या आयुष्याला पुरलेला नसतो..! आणि, जे असं म्हणतात ना, मला आईवडील हवे होते. त्याला माझ्याकडे घेऊन या. भडव्याच्या गांडीवर फटके मारून मी त्याला विचारतो.
ते हयात असताना, त्यांच्याकरिता तू काय योगदान दिलं होतंस.?
खरं बोल नाहीतर जागेवर मरशील..! सोप्या वाटतात तुम्हाला या गोष्टी..?
माझी बायको आणि आई.. दोघीही एक नंबरच्या कजाग बायका. हि कमावती, आणि आईवडील दोघेही पेन्शनर. कोणाचा माज कसा मोडायचा..?
या दोन बायकांच्या कटकटीतून सुटका करून घेण्यासाठी, मला दारूचा सहारा घ्यावा लागला. सुदैवाने.. आज मी बेवडा वगैरे नाहीये. कारण मी तेवढा शहाणा सुद्धा आहे. आणि, त्या व्यसनाचं मी छंदात रुपांतर करून घेतलं आहे..! सोप्या वाटतात तुम्हाला या गोष्टी..?
मी लहान असताना, माझ्या आई वडिलांनी मला सुद्धा पाळणाघरात ठेवलं होतं. का, तर.. ते दोघेही त्यावेळी कामाला जायचे. सरकारी नोकर होते ना. त्यावेळी माझ्या आईला, माझ्या आज्जीला घरी आणून ठेवता येत नव्हतं का..? तिच्या अंगात सुद्धा खूप मस्ती. सासूबरोबर तिचं बिलकुल पटत नव्हतं. अहो पण मी काय केलं होतं..? माझ्या प्रेमापोटी तरी तिने आजीला घरी आणायला हवं होतं. पण नाही.. तिने तिचा हेका पुढे लावला. आणि मला लहनपणी पोरकं करून ठेवलं. लहानपणी मला पैसा काय करायचा होता..? मान्य आहे, हे सगळं ते माझ्यासाठीच करत होते. पण त्यावेळी मला त्याची समज होती का..? कित्तेक वेळा आईच्या आठवणीने मी पाळणाघरात एकटाच रडत बसलो आहे. महाशय, टाळी एका हाताने वाजत नाही. सोप्या वाटतात तुम्हाला या गोष्टी..?
मी निरुत्तर होऊन सगळं काही ऐकत होतो. कारण, त्या व्यक्तीच्या सगळ्या गोष्टी मला पटत होत्या. मी शून्यात गेलेला पाहून मला तो व्यक्ती म्हणाला..!
हे सगळं करून मी खूप आनंदी आहे असं तुम्हाला वाटत असेल. तर ती तुमची सर्वात मोठी चूक आहे. हे सगळं करत असताना, मी माझ्या आईला अगदी रोजच्या रोज भेटायला जात असतो. माझ्या मुलाला सुद्धा मी सांगून ठेवलं आहे. आज्जीकडे आठवड्यातून एकदा तरी जाऊन येत जा. आता माझी बायको तिच्याकडे जात नाही. जाऊदेत, उद्या तिला सून आल्यावर या सगळ्या गोष्टींची कल्पना येईलच. पण त्याकरिता मी माझा आज का खराब करून घेऊ..?
वृद्धाश्रमात माझी आई अगदी सुखी आहे. माझ्या घरात माझी बायको सुखी आहे, आई आज्जीला भेटून आम्ही बापलेक सुखी आहोत. अजून काय पाहिजे, सगळं काही मस्त आहे.
 पण तुम्हाला एक सांगू का..!
सोप्या वाटतात तुम्हाला या गोष्टी..?
बरेचदा.. माझ्या असं पाहण्यात आलं आहे. कि,
ट्रकच्या, बसच्या किंवा एखाद्या कारच्या पाठीमागील बाजूस किंवा काचेवर रेडियमच्या अक्षरात लिहिलेलं असतं..
एकच वादा, फक्त.. अमुक, तमुक दादा.
श्री. पै. अमुक, तमुक आमदार / खासदार.. दादा, आबा, भाऊ, तात्या.. आणि बरच काही.
असं संपूर्ण नावात लिहिलेलं मला पाहायला मिळतं. कदाचित, हे सर्व तुम्ही सुद्धा पाहिलं असावं.
खरं पाहायला गेलं तर.. गाडीच्या मागील काचेवर, किंवा ट्रकच्या मागील बाजूस. जी काही नावं लिहिलेली असतात. ती बहुत करून, आपल्या घरातील बच्चेकंपनीची असतात. खरं तर, त्याची आपल्याला सुद्धा आवड असते. आणि लहान मुलांना तर त्याचं फार मोठं अप्रूप असतं.
काही रिक्षावाले.. त्यांच्या रिक्षाच्या मागे, फक्त.. " आई वडिलांचा आशीर्वाद " किंवा " गद्दार " असं नाव लिहून एका मुठीत आवळलेला सुरा त्या नावात खुपसलेला असतो. हे सगळं का ते मला माहिती नाही. पण ते लिहितात तर खरं..
बाहेर राज्यातील, खास करून पंजाब प्रांतातील गाड्यांवर..
सोनू के पप्पा दि गड्डी. किंवा.. सोनिये तू राह तक, मै आ रहा हुं.
किंवा.. अशाच आशयाची वेगवेगळी नावं लिहून आपल्या मुलाचं, बायकोचं आणि आपलं स्वतःचं नाव त्या गाडीवर लिहून काही लोकं खुश होत असतात. वरील, या सर्व गोष्टी मला आणि माझ्या मनाला फार भावतात बरं का.
खरं तर.. आपल्या गाड्यांवर, तिर्हाईत लोकांची नावं लिहिण्यात काय हाशील आहे हो..?
या.. आमदार, खासदार, नगरसेवक लोकांची आपण कितीही नावं लिहिली. किंवा, त्यांचं कितीही लांगूलचालन केलं. तरी, हे.. नकली देव मंडळी आपल्या नवसाला कधी पावणारी असतात का..? तर मग, यांच्या नावाचा येवढा उदोउदो का आणि कशासाठी करा..?
मित्रांनो..मी जे सांगतोय, ते तुम्हाला पटतंय का पाहा.
खरं तर.. आपल्याकडे असणाऱ्या गाड्या या, आपल्या आई बापाच्या पुण्याईने आपल्याला मिळालेल्या असतात. वेळप्रसंगी, स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन. किंवा, आपल्या आवडी करिता, आईने तिच्या अंगावरील आवडते दागिने मोडून ती गाडी आपल्याला विकत घेतलेली असते. किंवा, काहीतरी खटपट करून, आपल्या गाड्यांचे हफ्ते ते लोकं भरत असतात. आपल्याला बाकी, या गोष्टींची बिलकुल भनक नसते. आणि ते ती लागू सुद्धा देत नाहीत.
तर मग, तुम्हाला असं वाटत नाही का. कि येवढ्या खस्ता खाऊन, ज्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलं आहे. आणि, त्यांनी घेऊन दिलेल्या त्या गाडीच्या पाठीमागे. आपण.. आपल्या आई वडिलांचंच नाव लिहायला पाहिजे. थोडा विचार करा मित्रांनो.
मी तर म्हणतो.. तुम्ही आपल्या गाडीवर, आपल्या आई बापाचं नाव लिहून,
त्यापुढे.. आई वडिलांची कृपा, आशीर्वाद, किंवा पुण्याई असं लिहायला काय हरकत आहे. मराठीत नाही, तर इंग्रजीत तरी लिहा. अरे.. एकदा तुम्ही असं लिहून तर पाहा.
ते वाचून, तुमच्या आई बापाची छाती अभिमानाने अगदी फुलून नाही गेली. तर, मी तुम्हाला म्हणाल ते हारेण.
मित्रांनो, आपल्या अडी अडचणीच्या काळात. आपले आईवडीलच आपल्या मदतीला धावून येत असतात. लागेल तितका पैसा ओततात, लागेल ती मदत करतात.
त्यावेळी.. कोणताही आमदार किंवा खासदार आपल्या मदतीला धावून येणार नसतो.
ज्याचा मान त्याला द्यायला शिका.
ती लोकं सुद्धा, तुमची आदर्श असतील. तर त्यांना जेवढ्यातल्या तेवढ्यात सीमित ठेवा.
कारण,
" मार्ग दाखवणाऱ्या पेक्षा, जन्म देणारा कधीही श्रेष्ठ असतो..! "
दुनिया ज्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. तो मार्ग तुम्हाला योग्य दिशा दाखवेल कि नाही. ते मला सांगता येत नाही. पण आपले " आईबाप " आपल्याला कधीही वेगळ्या आणि वंगाळ मार्गावर भरकटू देणार नाही. याची तर मला शंभर टक्के खात्री आहे. आणि अशी मी तुम्हाला ग्वाही सुद्धा देतो. त्यामुळे, प्रथम आपल्या आई वडिलांचा आदर सत्कार करा.
कारण, ते होते म्हणून आपण आहोत. हे आपण कदापि विसरता कामा नये.
मटन किमा ( खिमा )
************************
मटन किमा हा एक असा प्रकार आहे, जो कि सर्व आबालवृद्ध लोकांना पटकन आपलंस करून टाकतो. जी लोकं मटन खात नाहीत, ती लोकं सुद्धा या मटणाच्या भाजीला चुकून खाऊ शकतात. कारण, यामध्ये मटणाचे पीस दिसत नसतात, असतो तो त्याचा बारीक केलेला किमा.
किम्यासाठी मटन घेताना, मटणाच्या दुकानदाराला बजावूनच ते मटन घ्यावं. अन्यथा ती दुकानदार लोकं, बकऱ्याच्या पोटाकडील भागात असणारा पातळ मटणाचा मांसल भाग किमा देण्यासाठी वापर करत असतात. पण ते, पातळ मटन कोणी चुकून सुद्धा घेऊ नये. त्यात खास अशी चव नसते. किम्याकरिता, पिव्वर मांडीचं मटनच घ्यावं. आणि त्याच्यासोबत एखादा गुडदा, चरबी आणि कलेजी सुद्धा हमखास घ्यावी. मांडीचं मटन घेताना, दुकानदार लोकं तुम्हाला त्यात मुद्दाम मोठ्या हाडकाचा ( नळीचा ) पीस टाकतात. पण खवय्या माणसाने कोणतीही काळजी न करता मांडीतील त्या नळीचा मोठ्या आनंदाने स्वीकार करावा..
मटणाचा किमा करताना, तो किमा सत्तुरच्या सहाय्यानेच बारीक करून घ्यावा. मशीनमध्ये बारीक केलेल्या किम्याला म्हणावी अशी चव लागत नाही. सत्तुरवर पाणी टाकून, लाकडी ओंडक्यावर बारीक केलेला किमा अगदी लाल भडक आणि चरबी असल्यामुळे मध्येच किंचितसा पांढऱ्या रंगाच्या मिश्रणाचा तयार होतो. किम्याच्या त्या मिश्रणात कलेजीचे बारीक तुकडे आणि गुडद्याचे सुद्धा बारीक तुकडे करून घालावेत. कलेजी आणि गुडदा किम्याच्या खुमासदार भाजीची चव वाढवण्याचं काम करतात. शिवाय किमा खाताना, दाताखाली येणारे कलेजीचे आणि गुड्द्याचे मऊ तुकडे कमालीचे चविष्ट लागतात.
चला तर मग.. मटन किम्याच्या प्रत्यक्ष पाककृतीला आपण सुरवात करूयात.
मटन किमा बनवण्यासाठी लागणारं साहित्य :- अर्धा किलो बारीक केलेला मटन कीमा, एक मोठा बारीक कापलेला कांदा, आठ ते दहा लवंगा, दालचीनीचे दोन तूकडे, पाच सहा हिरव्या इलायची, दहा ग्राम काजू, पन्नास ग्राम दही, पाच सहा बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या, कसूरी मेथी, एक छोटा चमचा लसून आणि आल्याची पेस्ट, लिंबू, कोथांबीर, एक उकडलेलं अंडं आणि चवीनुसार मीठ. अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा मटन मसाला,एक छोटा चमचा लाल मिरची पावडर, छोटा चमचा धने पावडर, थोडी हळद पावडर, आणि दोन मोठे चमचे तेल.
सर्वप्रथम, एका भांड्यामध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घ्यावं. तेल गरम होईपर्यंत, दुसरीकडे खड्या मसाल्याची तिखट घालून पावडर करून घ्यावी.
तेल गरम झाल्यावर, त्यात बारीक चिरलेला कांदा, हळद, मीठ घालून परतून घ्यावा. पाच मिनिटात तो कांदा तांबूस रंगावर परतला जाईल. यामध्ये, मटन किमा आणि कलेजीचे तुकडे घालून, हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. आणि तीन चार मिनिटं हे मिश्रण शिजवत ठेवावं.
यानंतर.. मटन किम्यात चिरलेली हिरवी मिरची, एक छोटा चमचा लसून आणि आल्याची पेस्ट, सुखी कसुरी मेथी, धने पावडर, मटन मसाला, गरम मसाला, चवीसाठी थोडं मीठ आणि पन्नास ग्राम दही घालावं.
वरील सर्व सामग्री किम्यामध्ये एकजीव करून घ्यावी. त्यावर वरून थोडे काजूचे तुकडे घालावेत. आणि मंद आचेवर हे मिश्रण शिजू द्यावं. साधारण पंधरा मिनिटात, हा मटन किमा तयार झालेला असेल. त्यानंतर पंधरा मिनिटे त्याला तसाच वाफेवर शिजवत ठेवावा.
तयार झालेल्या लपथपित मटन किम्याला.. लिंबाच्या चकत्या, उकडलेल्या अंड्याच्या फोडी, आणि चिरलेली कोथंबीर पेरून छानसं सजवून घ्यावं. आणि, गरमागरम किमा.. मऊसर चपाती सोबत जेवणासाठी सर्व करावा.

O शेफ O
~PΔΠDIT PΩTTΣR~ 

Wednesday, 10 May 2017

यावर्षी, फार असह्य उन्हाळा आहे ना..!
आपण सर्वांनी, उन्हाळ्याचं स्वागत करण्यासाठी. घरामध्ये.. फ्रीज, कुलर, एसी, पंखे, खिडक्यांना गारगार वाळ्याचे पडदे, थंडगार सरबतच्या बाटल्या. या सगळ्या गोष्टींची तजवीज तर करून ठेवली आहे. हे आपलं दर वर्षीचंच झालं.
पण, आपण लोकं एक साधा विचार का करत नाही. कि.. दरवर्षी, उन्हाचा चटका वाढतच चालला आहे. त्यावर, आपल्याला काही उपाययोजना करता येईल कि नाही..?
पण नाही.. अपना सर्वांच्या डोळ्यावर, एका अनामिक श्रीमंतीची झापडं चढली आहेत. सगळी सुखं, आपल्यासमोर, अगदी हात जोडून उभी असल्याने. आपल्याला कोणत्याच गोष्टीची चिंता वाटेनाशी झालीय.
पण हे कुठवर..? अजून, दोन तीन वर्षात, उन्हाच्या तापमानाचा पारा अगदी पन्नाशीला येऊन पोहोचेल. आणि, हे अगदी खरं आहे बरं का.
त्यावेळी.. हे कुलर, पंखे, फ्रीज आणि एसी सुद्धा आपल्या काहीच कामाचे उरणार नाहीत. पालिकेच्या नळातून येणारं पाणी सुद्धा, अगदी उष्ण असेल. त्यावेळी आपण काय करणार आहोत..?
मित्रांनो. जमलं तर, थोडं मागे वळून पाहा..
आपण सर्वांनी, आजवर चाळीस पंचेचाळीस उन्हाळे तर नक्कीच पाहिले असतील. त्यातील,सुरवातीचे उन्हाळ्यातील दिवस तुम्हाला नक्कीच आठवत असतील.
ते दिवस आजच्या इतके उष्ण होते का..?
नाही ना. मग, हे तापमानाचं गणित नेमकं चुकतंय तरी कुठे..?
आजवर, ह्या वसुंधरेची आपण होईल तेवढी हेळसांड करत आलो आहोत. वारेमाप वृक्षतोड करून, सिमेंटची देखणी जंगलं आपण उभी केली. आणि, संपूर्ण वातावरणाची आपण वाट लाऊन टाकली.
काय तर म्हणे, काचेची बिल्डींग. अरे त्यामुळे तापमानात अजून वाढ होत आहे. हे आपल्या लक्षात का येत नाही..?
अहो.. तो सूर्यनारायण रोजच्या रोज न चुकता, आपल्याला दर्शन देत असतो. बिचारा वारा तर, आपल्याला दिसत सुद्धा नाही. पण त्यामुळेच, आपण जिवंत आहोत. हे, कोणाच्याच ध्यानात कसं येत नाही. नित्यनेमाने पाऊस पडतोय म्हणून, आपली तृष्णा शांत होत आहे.
अहो.. पाऊस पडेल तेंव्हाच आपल्याला बिसलेरी मिळेल ना..! आणि, शुद्ध वारा वाहील तेंव्हाच एसी आणि आपला श्वास सुद्धा चालु राहील. कि, आता आपण हवा सुद्धा आयात करणार आहोत..?
आपण लोकांनी.. भरमसाठ जनता तेवढी वाढवून ठेवली आहे. पण त्यातला, एक सुद्धा कामाचा नाही. असं म्हणायची आत्ता वेळ आली आहे.
लग्न झाल्यावर, न सांगता प्रत्येक जन.. दोन,चार पोरं तेवढी काढून ठेवत आहेत. पण, या वसुंधरेचं सुद्धा आपण काहीतरी देणं लागतोय. म्हणून. पर्यावरणाशी निगडीत आपण एक तरी गोष्ट निश्चित करायला हवी. असं कधी वाटलं नाही..?
खरं सांगा..आजवर, आपण एक तरी झाड कधी लावलं आहे का हो..?
माझ्या माहितीप्रमाणे.. आजवर, हा मूलभूत प्रश्न तुमच्या मनात कधी आलाच नसेल नाही..!
आपलं तर झालं गेलं हो, पण.. आपल्या नंतर येणाऱ्या पिढीचं काय..?
काल टीव्हीवरील बातम्यात सांगत होते. येत्या शंभर वर्षात, या वसुंधरेचा अंत होणार आहे. त्याकरिता, आपल्याला एखाद्या नवीन ग्रहावर स्थलांतर करावं लागणार आहे. अहो, या पृथ्वीचीच आपण एवढी वाट लाऊन ठेवली आहे. त्यामुळे, हि बातमी जर त्या इतर ग्रहांना समजली तर..? आपण तिथे जाण्या आधीच, आपली ते वाट लाऊन ठेवतील.
हे सगळं स्वप्नवत आहे म्हणा, कारण.. सगळी जग दुनिया चंद्रावर गेली. तरी आपण आपल्या गावात नीट राहू शकत नाहीये. हि भयाण वस्तुस्थिती आहे.
चला तर मित्रांनो.. आपण सर्वांनी एक संकल्प करूयात. रानावनात, मोकळ्या जागेत, डोंगर कपारीत, जमेल तिथे आपण वृक्षारोपण करूयात. आणि आपण लावलेल्या त्या रोपट्याला फक्त तीन वर्ष सांभाळायची तसदी घेऊयात. त्यानंतर, ते झाड आपलं अपुनच वाढत जाईल. आपल्या मुलांना.. आपण जन्मभर पोसत असतो. तर मग, या झाडांना आपल्या खर्या जीवाला आपण फक्त तीन वर्ष पोसू शकत नाही का..?
भारतातील प्रत्येक व्यक्तीने, दरवर्षी एक झाड लावलं. तर, हे भारतवर्ष हरित होण्यात नक्कीच मदत होईल. निसर्ग आजवर आपल्याला भरभरून देत आला आहे. परंतु, आज आपल्याला त्याचं काहीतरी देणं चुकतं करायची वेळ आली आहे. आणि ते सुद्धा, आपल्याच हितासाठी आहे बरं का. हा विषय फक्त वाचून सोडून देऊ नका. यावर क्रिया आणि प्रतिक्रिया फार महत्वाची आहे. चला तर मग.. आपण सगळे एक संकल्प करूयात.
" एक झाड लाऊया, आणि आपली वसुंधरा वाचवूया..! "
करा रे मित्रानो.. आपल्या आज साठी. आणि, आपल्या आप्तांच्या उद्यासाठी. आपण ठोस पावलं उचलनं नक्कीच हितकारक असेल.
वसुंधरे.. तू आम्हाला, हवी आहेस. कारण, आम्ही तुझे आहोत. आणि, सदैव तू आमचीच असशील.

फेसबुकने.. आजवर मला खूप काही दिलं..
माझी स्वतःची अशी, कुठे ओळख ना पाळख. लेखन क्षेत्रात मी अगदी नवखा आणि तिर्हाईत माणूस. आणि..माझ्यासारख्या, साध्या ड्रायव्हर लेखक माणसाला बाजारात कोण विचारतंय हो..!
माझं लेखन, अगदी लाजवाब असतं. हे सर्वश्रुत आहे. पण.. हे लेखन क्षेत्र आणि सगळं जग एक मायाजाल आहे. इथे, जिथे पहावं तिथे वशिला आणि राजकारण लपलेलं आहे.
पण.. माझ्या बाबतीत तसं काहीच घडत नाही. हे सगळं मी फक्त उघड्या डोळ्यांनी पहात असतो. जीवन आहे, अशा घडामोडी होतच राहणार. 
पण.. ते काहीका असेना, हि.. माझ्यासाठी एक फारमोठी जमेची बाजू म्हणावी लागेल.
सकाळ वृतपत्र समूहात, माझा एखादा तरी लेख छापून यावा. अशी माझी, बऱ्याच वर्षापासूनची फार मोठी मनशा होती. पण हे सगळं नेमकं साधायचं कसं,आणि सांगायचं तरी कोणाला..?
कारण, कोणाकडे याचना करत हात पसरणं मला जमत नाही. आणि, माझी म्हणावी अशी कोणत्याही माध्यमात ओळख सुद्धा नाही. पण म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग. या उक्तीप्रमाणे, माझ्या लेखनाचे वाचक आणि चाहते असणारे. सकाळ वृत्तपत्र समूहात सिनियर सब एडिटर म्हणून काम करत असणारे.
माझे प्रिय मित्र. श्री. मंदार भाऊंनी, मला मेसेज करून, माझा फेसबुकवर गाजलेला एक लेख स्वतः मागवून घेतला. आणि, त्याला या माध्यमाद्वारे जगभर प्रसिद्धी दिली.
हेच प्रेम असतं हो, बाकी सगळं काही झूट आहे.
आजच्या " सकाळ " वर्तमानपत्रात.. सप्तरंग पुरवणीत, नेट भेट मध्ये.
पहिल्यांदाच..माझा फोटो, आणि माझ्या नावासहित आलेला माझा लेख.


या वाईन शॉप वाल्यांची, हायकोर्टाने चांगलीच खोड मोडली बघा.
सुरवातीला यांचे फार नखरे असायचे,
सुट्टे पैसेच द्या, नाहीतर उरलेल्या पाच दहा रुपयात, रुपाया दोन रुपयाची फालतू चणे फुटाण्याची पुडी जबरदस्तीने हातावर टेकवायचे. नाहीतर, दारू द्यायला सरळ नकार द्यायचे. पूर्वी, भलताच माज होता यांना.
आज असाच.. एक दुक्खी वाईनशॉप चा मालक मला भेटला. सहज म्हणून मी त्याला विचारलं, 
कधी सुरु होतंय..? का कायमचा रामराम ठोकलाय..!
तर, अगदी अजीजीने मला तो म्हणाला.. नाही, नाही होईल येवढ्यात सुरु.
मग मी त्याला म्हणालो.. हि सगळी तुमच्या पापाची फळं आहेत बरं का. देशी वाल्याला ताटकळत ठेवून, इंग्लिश वाल्याला पहिलं प्राधान्य द्यायचे.
का..? तो देशीवाला तुमच्याकडून फुकट दारू घ्यायचा का.? काहीच कारण नसताना, तुम्ही त्याला नको तसं अपमानास्पद बोलायचे.
नको तसल्या फालतू चण्या फुटाण्याच्या पुड्या, लोकांच्या हातावर बळजबरीने टेकवायचे. का तर, तुमचं दुकान हायवेवर आहे म्हणून..! आता कसं वाटतंय तुम्हाला..? त्यावर, तो मित्र अगदी खुल्या मनाने मला म्हणाला..
नाही राव.. इथून पुढे तसले प्रकार आमच्या हातून घडणार नाहीत. फार मोठी अद्दल घडलीय आता. फक्त, आमची दुकानं तेवढी लवकर सुरु झाली पाहिजेत..!
फारच अवघड परिस्थिती झाली आहे..!
हे सगळं तो अगदी काकुळतीला येऊन बोलत होता. त्यामुळे मी सुद्धा, त्याची मनधरणी करत त्याला म्हणालो,
होईल.. सगळं काही ठीक होईल. अजून थोडा वेळ कळ काढा.
त्यावेळी.. खुश होऊन, त्याने माझ्या हातात दिलेला हात इतका घट्ट आवळून धरला होता. कि त्यावरून, मला त्याच्या परिस्थितीचा थोडक्यात अंदाज आला. शेवटी, यांना सुद्धा देणी घेणी असतातच कि. व्यवहार मोठे, खर्च मोठे, देणं घेणं मोठं. हे सगळं ओघाने आलंच. पण, एक गोष्ट त्यावेळी माझ्या ध्यानात आली.
सगळं बंद पडल्यावर..
शिलकी सुद्धा,जास्त दिवस कामाला येत नाही. आणि, हे तत्व सर्वांना लागू आहे बरं का.

शम्मी कपूर आणि वैजयंती माला या मदहोश जोडगोळीला घेऊन, निर्माते..एफ.सी. मेहेरा आणि लेख टंडन भारत वर्षातील एक अद्भुत सिनेमा आपल्या भेटीला घेऊन आले होते.
त्या सिनेमाचं नाव होतं..
" प्रिन्स "
सत्तरीतल्या दशकामध्ये.. शम्मी कपूर आणि वैजयंतीमाला सारख्या दोन दिग्गज अभिनेत्यांना घेऊन सिनेमा करणं म्हणजे सोनेपे सुहागा होतं. सत्तरीच्या दशकात, या सिनेमाने तब्बल चार कोटीचा व्यवसाय केला होता. त्यावेळचे चार कोटी म्हणजे आजचे किती झाले हो..?
खरोखर हा विचार करायला लावणारा प्रश्न होता. पण त्याकाळचे दिग्दर्शक लोकं खर्च करताना कोणतीच कंजुषी करत नसायचे. सगळं काही अगदी दिल खोलके करायचे. या सिनेमाचं काही चित्रीकरण विदेशात सुद्धा झालं आहे. बघा ना किती अजब गोष्ट आहे, हिंदी आणि मराठी भाषेमध्ये अगदी तसूभर सुद्धा अंतर नाही. पण मराठी सिनेमाचं चित्रीकरण, किमान त्या काळात तरी विदेशात झालेलं माझ्या आठवणीत नाही. आणि चुकून झालं असेल तर जाणकारांनी तशी माहिती पुरवावी.
तर विषय असा होता.. शंकर जयकिशन यांचं मदमस्त संगीत असणाऱ्या या चित्रपटातील सर्व गीतं हसरत जयपुरी आणि फारूक कासीर यांनी शब्दबद्ध केली होती.
तर.. या सिनेमातील एका मदमस्त दृश्यामध्ये एक सुंदरसं मधभरं गीत त्यांना अपेक्षित होतं.
पण काही केल्या, त्या गीताची म्हणावी अशी रचनाच होत नव्हती. या सिनेमाचं काही चित्रीकरण विदेशात सुद्धा होणार होतं. आता इतका सगळा लवाजमा घेऊन आपण विदेशात जाणारच आहोत. तर त्या दिग्दर्शकांनी हसरत जयपुरी यांना त्यांच्या सोबत विदेशात येण्याची गळ घातली. थोडासा विरंगुळा आणि विदेशवारी सुद्धा घडेल, असं ठरवून हसरत मिया विदेशात जायच्या तयारीला लागले.
प्रत्यक्षात विदेशात गेल्यावर.. त्यांना त्या विशेष गीताबद्धल काहीतरी सुचावं. या उद्देशाने त्यांना तिथे नेण्यात आलं होतं. आणि एकेदिवशी दिग्दर्शक महाशय हसरत जयपुरी यांना म्हणाले..
चला..आपण जरा डान्स बारमध्ये फेरफटका मारून येऊयात. हसरत भाई यांनी उभ्या जीवनात कधी दारूला शिवलं असं नव्हतं. त्यामुळे त्यांनी या गोष्टीला स्पष्ट नकार दिला. त्यावेळी त्यांची मनधरणी करत ते त्यांना म्हणाले.. मादिरालयात गेल्यावर मद्य प्राशन केलंच पाहिजे असा काही नियम नाहीये. तुम्ही त्याठिकाणी असणाऱ्या ईतर गोष्टी पाहून स्वतःचा जीव रमवा. झालं.. शेवटी नाय होय करत कसंबसं हसरत मिया या गोष्टीसाठी तयार झाले..!
मला तर अगदी आत्ता आत्ता, डान्सबार हा काय प्रकार आहे ते समजलं. म्हणजे बघा, ते गोरे लोकं आपल्या किती पुढे असतील..!
संध्याकाळची वेळ.. रात्र रंगात आली होती. सगळीकडे दारूचा महापूर वाहत होता. प्रत्येक बाशिंदा दर्दी आणि दिवाना झाला होता. आणि त्या मोहक वातवरणात, संगीताच्या तालावर मुरडत, एक मादक नौ यौवना त्या डायसवर आली. चंदेरी रंगाच्या ब्रा आणि पँटीवर आलेली ती अर्धनग्न मादक मंजुळा दिसायला सुद्धा खूपच सुंदर होती. तिच्या चंदेरी रंगाच्या ब्रा आणि पँटीवर असणाते चमकदार छोटे छोटे तेजस्वी हिरे त्या अंधाऱ्या रात्रीच्या झगमगाटात आणखीन उठून दिसत होते. आणि बघता बघता संगीताच्या तालावर त्या कॅब्रे डान्सरचा कमनीय देह नाशिले ठुमके घेऊ लागला.
आणि तितक्यात..आकाशात वीज तळपावी तशी हसरत मियाची लेखणी एकाएकी तळपली. आणि त्या मद्यधुंद, मदमस्त वातवरणात एका मद्यपान न करणाऱ्या गीतकाराच्या हातून एक लाजवाब गीत साकारलं गेलं.
बदन पें सितारे लपेटे हुये,
ओह जाने तमन्ना किधर जा रही हो.
जरा पास आओ तो चैन आ जाये..!
तर अशा पद्धतीने, या मदमस्त गीताची निर्मिती एका डान्स बार मध्ये झाली होती.आणि सत्तरीच्या दशकात या गीताने त्यावेळच्या तमाम तरुणाईवर एक प्रकारची मोहिनी घातली होती. आणि आजही हे गीत खूप लोकप्रिय आहे.

कीर्तन.. या विषयाची जवळपास सर्वांनाच माहिती असावी..
गेल्या सोमवारी, श्री संत शिरोमणी व संत परिवाराचे परीक्षक " श्री संत गोरा कुंभार " यांची ७०० वी पुण्यतिथी होती. त्यानिमित्ताने, पुण्यातील एका विठ्ठल मंदिरात एक धार्मिक कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. त्याच बरोबर त्याचदिवशी सायंकाळी आठ वाजता डोंबिवली स्थित एक महिला कीर्तनकार ह.भ.प. म्हात्रे ताई यांच्या कीर्तनाचा सुश्राव्य कार्यक्रम सुद्धा ठेवला होता. माझ्या अपेक्षेपेक्षा सुद्धा जास्ती लोकं तिथे कीर्तन ऐकण्यासाठी जमा झाले होते.
म्हात्रे ताई, खरोखर लाजवाब कीर्तनकार होत्या. ठरल्याप्रमाणे त्यांनी सुद्धा त्यांच्या क्षेत्रातील नामवंत कीर्तनकारांना एकदा हाताखालून घेतलं. त्यात दोन दिग्गज कीर्तनकार लोकांची नावं होती. एक होते बाबा महाराज सातारकर आणि दुसरे होते, निवृत्ती महाराज इंदुरीकर. या दोघांनी.. कीर्तन या विषयीचा अगदी बाजार करून ठेवला आहे. असं त्या ताईचं म्हणनं होतं. आणि त्यात बऱ्यापैकी तथ्य सुधा आहे. एक लाख रुपयाच्या खाली हि लोकं कीर्तन करत नाही. उंची गाड्यात फिरतात, उंची बंगल्यात राहतात. तिथे ते काय करत असतील ते पाहायला कोणी गेलं नाही. पण जगाला शहाणपण शिकवायला हि मंडळी अगदी अव्वलस्थानी असतात. ज्ञानेश्वरी आणि गाथा फक्त पन्नास रुपयात विकत मिळतात. पण त्यावर गाढा अभ्यास करून लोकं लाखो रुपये कमवतात. हि वस्तुस्थिती आहे. शेवटी काय आहे, हा ज्याच्या अकलेच्या वापराचा भाग आहे.
असो..शेवटी काय आहे, ज्या ठिकाणी पैशाचा विषय आला. त्याठिकाणी धंदा हा आपोआप येतोच. या ह.भ.प.ताई सुद्धा आमच्याकडे काही मोफत प्रवचन द्यायला आल्या नव्हत्या. पण त्यांची बिदागी त्यामानाने बरीच कमी होती. आजवर, मांडवात बसून कीर्तन ऐकण्याची माझी हि पहिलीच वेळ होती. कीर्तन म्हंटल कि त्यात धार्मिक विषयापासून राजकारण, विनोद ते समाजकारण सगळं काही ओघाने येतंच. तर त्या कीर्तनात, " झाकली मुठ सव्वा लाखाची " या विषयची मला मस्त उकल मिळाली..
तर, ती बोधकथा अशी होती.
एकदा राजाच्या घरी, धार्मिक कार्य करण्यासाठी एक भटजी जातात. धार्मिक कार्य पार पडल्यावर दक्षिणा म्हणून राजा त्यांना काही रुपये देऊ करतात. ती दक्षिणा, आपल्या मुठीत घेऊन तो ब्राम्हण राजदरबारातून बाहेर पडतो.
गावातील सर्व लोकांना माहित असतं, कि राजाच्या घरी आज काहीतरी पूजा अर्चना आहे. आणि, ते भटजी जसे मुख्य गावात येतात. तशी त्यांच्यापाशी लोकांची एकच झुंबड उडते. आणि एक कुतूहल म्हणून सगळी लोकं त्यांना विचारणा करतात.
राजाने, दक्षिणा म्हणून तुम्हाला काय दिलं आहे..?
भटजी महाचतुर असतात, ते म्हणतात.. मी तुम्हाला ते असं सांगणार नाही. तुम्हीच ते ओळखा. आणि या ओळखा ओळखीच्या खेळाचं कधी एकदा पैजेत रुपांतर होतं.
हे कोणालाच समजत नाही.
एक व्यक्ती म्हणतो.. तुमच्या मुठीत झाकलेली जी काही वस्तू असेल. ती मी दहा हजार रुपयात विकत घ्यायला तयार आहे. तर दुसरा व्यक्ती, लगेच वीस हजाराची बोली लावतो. तिसरा, चौथा, पाचवा, सहावा..असं करता करता ती बोली वाढतच जाते.
आणि बघता बघता हि बोली अगदी एक लाखावर येऊन पोहोचते. आता बाकी सर्व लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचते. कि त्या झाकल्या मुठीत नेमकं काय असेल..?
बाहेर चालू असलेला प्रकार पाहून, खुद्द प्रधानजी सुद्धा त्या गर्दीत सामील होतात. आणि घडला प्रकार पाहून अचंबित होतात. आणि हि हकीकत महाराजांना कळवतात. शेवटी महाराज सुद्धा चिंताग्रस्त होतात. आणि त्याठिकाणी येऊन, ब्राम्हणाला स्वतःच दिलेल्या दक्षिणेची सव्वा लाखाची बोली लावतात. आणि, त्या ब्राम्हणाच्या हातातील ती दक्षिणा गुपचूप आपल्या मुठीत घेऊन निघून जातात.
शेवटी लोकांना सुद्धा वाटतं. कि राजाने ब्राम्हणाला चुकून नक्कीच काहीतरी मौल्यवान भेट वस्तू दिली असणार आहे. त्यामुळेच तर धावत पळत येऊन त्यांनी हि बोली लावली असावी.
तर विषय असा असतो.. राजाने भटजीला फक्त " सव्वा रुपया " दक्षिणा दिलेली असते. झाकली मुठ उघडली, तर राजाच्या नावाने लोकांनी छी थू केली असती. आपला राजा येवढा कंजूस कसा..?
त्यामुळे रयतेसामोर आपली आब जाऊ नये. म्हणून राजाला हि बोली लावणं भाग पडलेलं असतं. शेवटी काय आहे, नदीचं मूळ आणि साधुचं कुळ कधी शोधू नये.
या उक्तीप्रमाणेच, झाकली मुठ कधी उघडून पाहू नये. आणि कोणाला दाखवू हि नये.
कारण.. झाकली मुठ हि, नेहमी " सव्वा लाखाचीच " असते..!
माझ्या हालाखीच्या आणि मजबूरीच्या काळात. उदरनिर्वाह करण्यासाठी, आणि पापी पोटाचे खळगे भरण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी. मी, हवी ती कामं केली आहेत.
त्याकाळी.. मी, स्क्रीन प्रिंटींगचा व्यवसाय सुद्धा केला आहे. लग्न पत्रिका, व्हीजिंग कार्ड, पावती पुस्तक छापायचं, आणि जे मिळेल ते काम मी त्याकाळी केलं आहे.
असच एकदा.. इलेक्शन पिरीयड असताना. माझ्याकडे, एका व्यक्तीचे राजकीय बॅनर छापण्यासाठी आले होते. मी त्यांना हव्या त्या आकारात आणि त्यांना हवे तसे कापडी बॅनर छापून दिले. त्यांचं ओळखपत्र म्हणून त्यांनी मला त्यांचं एक व्हिजिटिंग कार्ड दिलं.
त्या कार्डवर लिहिलं होतं.. " पोपलॅब इंडस्ट्रीज. "
हे पोपलॅब इंडस्ट्रीज नाव वाचून मला वाटलं, हि कोण्यातरी विदेशी व्यक्तीची कंपनी असावी.
कारण हे नाव जरा मला विदेशीच वाटत होतं. त्यामुळे, माझ्या पार्टनरशिप मध्ये असणाऱ्या माझ्या मित्राला ( मेहुण्याला ) याबाबत मी विचारणा केली. तर माझा मेहुणा मला म्हणाला..
ते विदेशी व्यक्ती वगैरे नाहीयेत. त्या व्यक्तीचं नाव,
" पोपट लबडे " असं आहे.
आणि.. त्यांनी आपल्या नावाचा शोर्टफॉर्म करत या नवीन नावाची मस्त उकल केली आहे.
आणि तेवढ्यात अचानक.. माझं त्या कापडी बॅनरकडे लक्ष गेलं. त्यावर सुद्धा लिहिलं होतं.
" श्री. पोपट लबडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा..! "
तुम्ही काहीही म्हणा, पण त्या व्यक्तीची हि शॉर्टकट नाव टाकण्याची कल्पना मला भयाण आवडली होती.

दिसायला सुंदर असणारी मुलं..
त्यांच्या सौंदर्याचा पुरेपूर लाभ उठवत, जिथे जाईल तिथे आपल्या देखणेपणाचा प्रभाव टाकत. मुली पटवण्यात तरबेज झालेली असतात. आणि त्यात ते बरेचदा सक्सेस सुद्धा होत असतात.
सुंदर मुलगा दिसला.. कि मुली त्याला पाहणार नाही, असं कधी होतच नाही. शेवटी, त्यांना सुद्धा सौंदर्याची पारख असतेच कि.
आणि कसं आहे, काही मुलं दिसायला अगदी सुमार असताना सुद्धा ते अतोनात सुंदर मुलीवर बिनधास्त लाईन मारत असतात. काहीवेळा त्यांच्या पदरी निराशा येते. तर काहीवेळा त्यांच्यावर सुद्धा दैवी कृपा होत असते. असं माझ्या पाहण्यात आलं आहे. शेवटी काय आहे, दगड मारून बघायला पैसे पडत नाहीत.
" बनी तो बनी, नाहीतर आहेच की आपल्या चौकातली मनी..! "
असा काहीसा त्या मुलांचा स्वभाव असतो..
पण याविरुद्ध.. सौंदर्याची लाजवाब देणगी लाभलेल्या मुली सुद्धा, या सुंदर मुलांसारखाच स्वभाव ठेवत असतील का..? किंवा एखाद्या सुमार दिसणाऱ्या मुलावर आपला जीव कुर्बान करत असतील का..?
माझ्या एका मित्राने,
मध्यंतरी व्हाट्स एपवर मला दोन झक्कास फोटो पाठवले होते.
दोन तरुण मुला मुलीचे लग्न करताना, गळ्यात हार घालत असतानाचे ते फोटो होते. असे फोटो पाहिले, कि मला माझं लग्नं आठवत असतं.
परंतु..हा फोटो नेमका कोणत्या नवविवाहित दाम्पत्याचा आहे..? त्याची मला काही करता लिंक लागेना. मला वाटलं, बहुतेक त्या मित्राच्या कोण्यातरी नातेवाईकांचे असतील. शेवटी, मला काही राहवलं नाही, आणि..ज्या मित्राने मला हे फोटो पाठवले होते. त्या मित्रालाच मी हा प्रश्न विचारला.
तर..त्याने मला सांगितलं,
अरे त्या फोटोसोबत मी तुला एक व्हिडिओ सुद्धा पाठवला होता. तो तू पाहिला नाहींस का..?
 मला तर, त्या फोटोसोबत कोणताच व्हिडिओ आला नव्हता. हे मी.. त्या मित्राला सांगितलं.
 तर अगदी तत्पतेने त्याने लगेच मला तो व्हिडीओ दाखवला.
मी सुद्धा, एक आवड म्हणून तो व्हिडियो पाहायला गेलो, आणि पाहतो तर काय..
त्यामध्ये, रक्तबंबाळ झालेली एक मुलगी व्हिडिओ मध्ये मरणासन्न अवस्थेत काहीतरी जबानी देत होती. तिच्या तोंडावर, मानेवर धारधार शस्त्राने वार केलेले स्पष्ट दिसत होते.
अणि, ते भयानक दृश्य कोणीतरी शूट करत होतं.
मला काही ते दृश्य पहावलं नाही. त्यामुळे, तो संपूर्ण व्हिडिओ मी काही पाहिला नाही. किंवा, ते दृश्य पाहण्याचं माझं काही धाडस झालं नाही.
थोड्या वेळाने मला समजलं, कि..माझ्याकडे आलेले दोन फोटो, याच सुंदर मुलीचे होते.
तर, त्या मित्राने मला सांगितलं, कि..
या दोघांनी, घरच्या विरोधाला न जुमानता आंतरजातीय विवाह केला होता. त्यामुळे रागे भरून, तिच्या वडिलांनी तिच्या लग्नाच्या अवघ्या अकराव्या दिवशीच पाळत ठेऊन. धारधार शस्त्राने वार करून तिला जीवे मारलं होतं.
बापरे.. ती बातमी ऐकून माझं काळीज अगदी चर्रर्र झालं.
एक जन्मदाता बाप, असं कृत्य करूच कसा शकतो..?
लहानपणापासून आपल्या अंगाखांद्यावर खेळवलेल्या आपल्या पोटच्या गोळ्याला. इतक्या निर्दयीपणे तो कसा काय मारू शकतो..? इतका पराकोटीचा राग कशाला असावा..? आपण जन्म घेताना, सोबत कोणती जात घेऊन आलेलो असतो..? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे,
मुलांना जन्म दिला म्हणजे आपण त्यांचे मालक झालेलो असतो का..?
एखादा मालक सुद्धा इतका निर्दयी वागला नसता. तर मग, एका बापाने असलं नीच कृत्य का आणि कशासाठी करावं..?
माझ्यामते..हा निव्वळ नालायकपणा आहे..!
त्या दोघांना पटलं होतं, त्यांच्या मनाच्या गाठी जुळल्या होत्या. म्हणून, त्यांनी प्रेमाच्या आणाभाका घेत लग्नं केलं. त्या मुलीच्या बापाला ते आवडलं नव्हतं. तर त्याने तो विषय तिथेच सोडून द्यायला हवा होता. त्याच्या मनात एवढाच राग असेल, तर त्याची शिक्षा म्हणून तिच्याशी त्यांनी कायमचे संबंध तोडून टाकायचे होते. एवढा पराकोटीचा राग काय कामाचा आहे हो..!
आपला समाज काय फक्त चिथावणीखोर वक्तव्य करण्यात पटाईत असतो. शेवटी, जीवनाचे भोग आपल्याला भोगावे लागत असतात. शेवटी ती मुलगी हकनाक मेली, आणि तो बाप म्हणवणारा गडी आता जेलमध्ये सडत पडला असेल. हे सगळं काही आता घडून गेलं,
पण त्यांच्या घरच्यांना हे किती त्रासदायक काम झालं असेल. माणसाने थोडं डोकं शांत ठेऊन निर्णय घ्यायला शिकलं पाहिजे.
" अहो.. आज रात्री झोपल्यावर, सकाळचा सूर्य पाहणं आपल्या नशिबी असेल कि नाही. ते कोणीच सांगू शकत नाही. आपल्याला झोपेतच मृत्यू आल्यावर काय करता..? "
प्रत्येक व्यक्तीला, आपापलं वैयक्तीक व्यक्ती स्वातंत्र्य आहे.
सज्ञान झालेल्या मुलांना, आपण वेळीच शिकवण देऊन ठेवावी. नंतर सांगून त्याचा काहीएक उपयोग होत नाही.
आणि चुकून.. जर असं काही झालं तर,
" झालं गेलं गंगेला मिळालं "
असं म्हणून त्या विषयाला तिथेच सोडून द्यावं.
मनुष्य जन्म पुन्हा नाही हो.. जातीचा विषय फार नंतर येत असतो.
धान्यात ठेवा, प्रथम मनुष्य जन्म महत्वाचा असतो. आणि तो, असा हकनाक वाया घालवण्यात काहीच अर्थ नसतो..!